बेलिस, सर विल्यम मॅडॉक : (२ मे १८६०-२७ ऑगस्ट १९२४). इंग्रजी शरीरक्रियावैज्ञानिक. त्यांच्या काळातील शरीरक्रियाविज्ञानातील ते एक अग्रगण्य व प्रख्यात शास्त्रज्ञ होते.

वेलिस यांचा जन्म वुल्व्हरहॅग्प्टन (इंग्लंड) येथे झाला. १८८१ मध्ये लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये वैद्यकाचे विद्यार्थी म्हणून ते दाखल झाले. १८८२ मध्ये त्यांनी प्राणिविज्ञान व भौतिकी हे विषय घेऊन बी.एस्सी. पदवी मिळविली आणि त्यानंतर वैद्यकातील शरीररचनाशास्त्र व शरीरक्रियाविज्ञान या विषयांच्या अभ्यासास सुरुवात केली. वैद्यकीय परीक्षेत ते शरीररचनाशास्त्र या विषयात अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे वैद्यकाचा अभ्यास सोडून देऊन त्यांनी आपले लक्ष शरीरक्रियाविज्ञानावर केंद्रित केले. १८८५ मध्ये ते ऑक्सफर्डमधील वॅडहॅम कॉलेजात गेले व १८८८ साली त्यांनी शरीरक्रियाविज्ञानाची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली. लंडनला परतल्यावर त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेजात शरीरक्रियाविज्ञानाचे प्रथम साहाय्यक व १९१२ पासून प्राध्यापक म्हणून काम केले.

 

बेलिस यांच्या संशोधनाचे क्षेत्र व्यापक होते व त्यांनी कित्येक महत्त्वाचे शोध लावले. त्यांच्या बहुतेक संशोधनात त्यांना त्यांच्या पत्नीचे बंधू  ð अनेंस्ट हेन्री स्टार्लिंग  यांचे सहकार्य लाभले होते. वेलिस व स्टॉर्लिंग यांची नावे शरीरक्रियाविज्ञानात अनेक वेळा एकत्र घेतली जात असली, तरी दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ शास्त्रज्ञ होते. वेलिस यांच्या शोधांपैकी हृदयक्रियेशी संबंधित असलेल्या विद्युत चालक आविष्कारांविषयीचे शोध सर्वात महत्त्वाचे होते. केल्व्हिन (टॉमसन) गॅल्व्हानामीटराचा [→गॅलव्हानोमीटर] उपयोग करून त्यांनी बेडकाच्या मुखातील ग्रंथींच्या व त्वचेच्या स्रावोत्पादनाच्या वेळी होणाऱ्या विद्युत वर्चसातील (पातळीतील) फरकांचा जे.आर्‌. वॅडफर्ड यांच्याबरोबर अभ्यास केला. त्यानंतर स्टार्लिंग यांच्याबरोबर त्यांनी सस्तन प्राऱ्यांच्या हृदयाचा विद्युत्‌ शरीरक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास केला. गाब्रिएल लीपमान या भौतिकीविज्ञांनी १८७३ मध्ये तयार केलेल्या केशनलिका विद्युत मापक या अतिशय संवेदशील उपकरणाचा उपयोग करून त्यांनी सस्तन प्राणी, बेडूक, कासव व मानव यांच्या हृदयातील विद्युत फरकांचे निरीक्षण केले. त्याच वेळी हृदीय आवर्तनातील कालसंबंधांचाही त्यांनी अभ्यास केला.

बेलिस यांनी स्टार्लिंग यांच्याबरोबर सस्तन प्राऱ्यांच्या हृदयाचा तंत्रिका (मज्जा) पुरवठा आणि ब्रॅडफर्ड यांच्या समवेत हात व पायातील रक्तवाहिन्यांचा तंत्रिका पुरवठा यावर संशोधन केले. वेलिस यांनी सर्वसाधारण वाहिनीप्रेरक (रक्तवाहिन्यांच्या भित्तींचे आकुंचन वा प्रसरण करणाऱ्या) प्रतिक्रियांचा व त्यांच्या मध्यवर्ती समन्वयाचा अभ्यास करून नेहमीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने तंत्रिका आवेग गेल्यास होणारी प्रतिक्रिया हा अक्षदंड प्रतिक्षेप असतो [→तंत्रिका तंत्र],  असे दाखविले. स्टार्लिंग यांच्या समवेत त्यांनी लघ्वांत्र (लहान आतडे) व वृहदांत्र (मोठे आतडे) यांच्या हालचाली व त्यांचा तंत्रिका पुरवठा यांवर केलेल्या संशोधनातून क्रमसंकोच या विशिष्ट हालचालीचे स्वरूप स्पष्ट झाले.

जठरातील पचनक्रिया संपल्यावर जो आमरस अथवा अर्धपक्व (अर्धवट पचलेले) अन्न तयार होते ते अम्लधर्मी असते. हा आमरस ग्रहणीत (लघ्वांत्राच्या पहिल्या भागात) उतरताच अग्निपिंडस्रावात [à अग्निपिंड] भरपूर वाढ होते. ही वाढ तंत्रिका-नियंत्रित नसून ती रासायनिक चेतनेमुळे होते, असे त्यांनी व स्टार्लिंग यांनी प्रयोगान्ती सिद्ध केले. या रासायनिक चेतकाला त्यांनी ‘सिक्रिटीन’ असे नाव दिले. रक्तप्रवाहाद्वारे क्रियाशील असणाऱ्या या रासायनिक पदार्थांना स्टार्लिंग यांनी १९०५ मध्ये हॉर्मोने हे नाव प्रथम दिले [→हॉर्मोने]. बेलिस यांनी स्टार्लिंग यांच्या समवेत अग्निपिंडस्रावातील ट्रिप्सीन या घटकाचाही अभ्यास केला. हा घटक प्रथिनाचे अपघटन ९रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करतो परंतु एंटेरोकायनेज या आंन्नस्रावातील एंझाइमाशिवाय (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनाशिवाय) तो क्रियाशील होत नाही. ही क्रियाशीलता ट्रिप्सीन व एंटेरोकायनेज यांच्या संयुक्त मिश्रणाचा परिणाम नसून एंटेरोकायनेज फक्त उत्प्रेरकाचे (रासायनिक विक्रियेत स्वत: भाग न घेता तिची गती बदलणाऱ्या पदार्थाचे) कार्य करते, असे त्यांनी दाखविले. त्यांनी ट्रिप्सिनाच्या क्रियेचा विविध भौतिक रसायनशास्त्रीय पद्धती वापरूनही विस्तारपूर्वक अभ्यास केला. बेलिस यांनी अर्धपार्थ पटलाच्या एका बाजूस कॉंगो रेड या रंजक द्रव्याचा विद्राव व दुसऱ्या ‌बाजूस मिठाचा विद्राव ठेवून कॉंगो रेड विद्रावाच्या पारगम्यतेचा अभ्यास केला आणि त्यावरून कॉंगो रेड विद्रावाच्या तर्षण दावासंबंधी काही महत्त्वाचे निष्कर्ष मांडले. हे निष्कर्ष एफ्‌.जी. डॉनन यांच्या पटल समतोलत्वाच्या सिद्धांताला आधार देणारे ठरले. [→तर्षण].

वरील संशोधनाखेरीज पहिल्या महायुद्धाच्या वेळी आघात अथवा शारीरिक इजेमुळे होणाऱ्या अवसादावर (सार्वदेहिक प्रतिक्षोभावर) वेलिस यांनी शोधलेला, रक्तस्त्रावातून गेलेल्या रक्ताची न्यूनता भरून काढण्याकरिता डिंक व मीठ यांचा विद्राव नीलेतून देण्याचा पचार अनेक सैनिकांचे प्राण वाचविणारा ठरला. रक्ताभिसरणात पुरेसा कलिलीय तर्षण दाब राखण्याचे महत्त्वही त्यांनी दाखवून दिले.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९०३ मध्ये त्यांची निवड झाली. सोसायटीने त्यांना रॉयल पदक (१९११) व कॉप्ली पदक (१९१९) हे बहुमान दिले.फिजिऑलॉजिकल सोसायटीचे १८९० मध्ये सदस्य म्हणून त्यांनी निवड झाली. ते या संस्थेचे सचिव (१९००-२२) व खजिनदार (१९२२-२४) होते. रॉयल डॅनिश ॲकॅडेमी ऑफ सायन्स, बायॉलॉजिकल सोसायटी ऑफ पॅरिस इ. शास्त्रीय संस्थांचेही ते सदस्य होते. ऑक्सफर्ड, सेंट अँड्रूज व ॲबर्डीन या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. १९१७ मध्ये रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे बेली पदक त्यांना मिळाले. १९२२ साली त्यांना नाइट या किताबाचा बहुमान मिळाला.

वेलिस यांचे मूळ संशोधनकार्य विविध शरीरक्रियावैज्ञानिक व जीवरसायनशास्त्रीय नियतकालिकांत १८९०-१९२४ या काळात प्रसिद्ध झाले. ते फिजिऑलॉजिकल ॲबस्ट्रॅक्ट्‌स या नियतकालिकाचे संपादक (१९२३-२४) व बायोकेमिकल जर्नल या नियतकालिकाचे सहसंपादक (१९१३-२४) होते. प्रिन्सिपल्स ऑफ जनरल फिजिऑलॉजी  हा १९१४ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा ग्रंथ आधुनिक शरीरक्रिया विज्ञानाच्या मूलतत्त्वांचे विवरण करणारा एक मूल्यवान ग्रंथ मानला जातो व त्याचा जगभर प्रभाव पडलेला होता. याखेरीज त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या अनुरोधाने शरीरक्रियाविज्ञान, एंझाइम क्रिया, आघाताने उद्‌भवणारा अवसाद, वाहिनीप्रेरणक तंत्र इ. विषयांवर सात ग्रंथ लिहिले होते. ते हॅम्पस्टेड येथे मृत्यू पावले.

भालेराव, य.त्र्यं.