बेलारीझाँती : दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलच्या मीनास झिराट्इ राज्याची राजधानी. लोकसंख्या १५,५७,४६४ (१९७५ अंदाज). हे रीओ दे जानेरोच्या वायव्येस सु. ३५६ किमी. अंतरावर वसलेले आहे. आरोग्यवर्धक हवामानामुळे विश्रामस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे.
हे शहर इ.स. १८९७ मध्ये वसविण्यात आलेले आहे. वॉशिंग्टन डी.सी.च्या धर्तीवर याची नगररचना करून (१८९५-९७) १८९७ पासून राज्याची राजधानी येथे करण्यात आली. या शहराचा आसमंत लोह, सोने, हिरे, मॅंगॅनीज इत्यादींच्या खाणींनी समृद्ध असल्याने शहराचा विकास वेगाने झाला. अवजड यंत्रनिर्मिती, हिऱ्यांना पैलू पाडणे हे येथील प्रमुख उद्योग असून लोखंड-पोलाद, कापड, सिमेंट, विद्युतसाहित्य, अन्नप्रक्रिया इ. उद्योगही प्रगत झालेले आहेत.
युनिव्हर्सिटी ऑफ मीनास झिराइस, मीनेरा युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट ही राज्यातील प्रमुख विद्यापीठे येथेच आहेत. येथील सरकारी व
खाजगी इमारतींवरून आधुनिक वास्तुकलेच्या प्रगतीची कल्पना येते. याच्या जवळच पॅम्पुल्हा येथील कृत्रिम सरोवर तसेच उद्योगाने प्रसिद्ध आहेत. येथील ‘चॅपेल ऑफ सॅन फ्रॅन्सिस्को’ची वास्तू वैशिष्ट्यपूर्ण आहे. आल्हाददायक हवामामुळे तसेच निसर्गसौंदर्यांमुळे येथे पर्यटकांची वर्दळ असते.
गाडे, ना.स.
“