बेयर, (योहान फ्रीड्रिख व्हिल्हेल्म) आडोल्फ फोन:(३१ ऑक्टोबर १८३५-२० ऑगस्ट १९१७). जर्मन रसाययनशास्त्रज्ञ.

रंजक व हायड्रोॲरोमॅटिक संयुगे [⟶ ॲरोमॅटिक संयुगे ] यांवरील कार्याबद्दल १९०५सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले. त्यांचा जन्म बर्लिन येथे झाला.

आडोल्फ फोन बेयरत्यांचे शिक्षण फ्रीड्रिख व्हिल्हेल्म जिम्नॅशियम व बर्लिन विद्यापीठात पी.जी.डीरिक्ले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. हायडल्बर्ग येथे आर. बन्सन यांच्याबरोबर त्यांनी प्रायोगिक रसायनशास्त्राचे अध्ययन केले. १८५८मध्ये त्यांनी आउगुस्ट केकूले यांच्या खाजगी प्रयोगशाळेत प्रवेश घेतला व तेथे त्यांनी कार्बनी रसायनशास्त्राचा अभ्यास केला. आर्सेनिक मिथिल क्लोराइडावरील कार्याबद्दल त्यांना १८५८मध्ये बर्लिन विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली. १८७२मध्ये स्ट्रसॅबर्ग येथील न्यू इंपीरिअल विद्यापीठात त्यांची रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदावर नेमणूक होईपर्यत ते बर्लिन येथील गेवेर्व इन्स्टिट्यूटमध्ये प्रयोगशाळा प्रमुख होते. १८७५मध्ये त्यांची म्यूनिक येथे युस्टुस फोन लीबिक यांच्या जागी रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली व शेवटपर्यंत ते तेथेच होते.

निळीवरील संशोधन हे बेयर यांचे सर्वाधिक प्रसिध्दी पावलेले कार्य होय. ते त्यांनी १८६५मध्ये सुरू केले व त्यामुळे थॅलीन रंजकावरील कार्य सुरू झाले. १८४१ मध्ये लॉरां यांना निळीचा शोध लागला होता व ऑक्सिडीकरणाने [⟶ ऑक्सिडीभवन] त्यांनी इसॅटीन हे संयुग मिळविले होते. बेयर यांनी लॉरां यांची प्रक्रिया उलट केली व १८७०मध्ये त्यांनी व एमर्लिंग यांनी इसॅटिनावर फॉस्फरस ट्रायक्लोराइडाचे संस्करण करून व ⇨ क्षपण करून निळीची निर्मिती केली. १८७८मध्ये फिनिल ॲसिटिक अम्लापासून इसॅटिनाचे संश्लेषण करून (कृत्रिम रीतीने बनवून)निळीचे संपूर्ण संश्लेषण शक्य असल्याचे बेयर यांनी सप्रयोग दाखवून दिले. निळीचे संरचना सूत्र (संयूगात अणू एकमेकांस कसे जोडले गेले आहेत हे दाखविणारी मांडणी)निश्चित करताना त्यांनी दोन इंडॉल गाभ्याच्या बंधाचे निरीक्षण केले. इतर अनेक विक्रियाकारक (रासायनिक क्रिया घडविणारी द्रव्ये) वापरुन त्यांनी नीळ तयार केली व शेवटी १८८३मध्ये ऑर्थोडायनायट्रो-डायफिनिल-डायॲसिटिलिनापासून संश्लेषणाद्वारे बंधाचे निश्चित स्थान व निश्चित संरचना सूत्र दाखविले. या कृत्रिम निळीच्या शोधामुळे नैसर्गिक निळीच्या धंद्याला व शेतीला जबरदस्त तडाखा बसला व त्यामुळे बंगालमधील निळीची लागवड बंद पडली.

यांबरोबरच बेयर यांनी इतरही बरेच संशोधन केले. यूरिक अम्लाचे अनुजात (त्यापासून बनणारी इतर संयूगे) तयार करीत असताना त्यांनी⇨ बार्बिच्युरेटे तयार केली. त्यांनी आपल्या विद्यार्थ्याच्या मदतीने आल्डिहाइडे व फिनॉले यांच्या विक्रियांवर बरेच संशोधन केले. त्यामुळे फिनॉलप्थॅलीन व थॅलीन गटातील संयुगांचा शोध लागला आणि त्यांच्यापासून बेयर यांनी गॅलेइन व कोएऱ्यूलीन ही रंजके मिळविली. थॅलिक अम्लावरील संशोधन कार्यामुळे ते बेंझिनाच्या संरचनेवर अनुसंधान करण्यास प्रवृत्त झाले. त्यांनी पॉलिॲसिटिलिनाचे संशोधन केले व अनेक उच्च स्फोटक संयुगे तयार केली. या संयुंगाचा अभ्यास करताना कार्बनाच्या द्वि- वत्रि-बंधाच्या रोधावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले व त्यातून पुढे रासायनिक संयुगांच्या क्रियाशीलतेतील फरकांसंबंधीचा ‘ताण सिद्धांत’ मांडला. ऑक्झोनियम संयुगावरील कार्य हे त्यांचे शेवटचे विस्तृत संशोधन कार्य होय. टर्पिनावर कार्य करीत असताना त्यांनी पेरॉक्साइड संयुगे वापरली होती व (HO.HO) हे हायड्रोजन पेरॉक्साइडाचे सरंचना सूत्र असल्याचे सुचविले होते.

म्युनिक येथे एक रसायनशास्त्रीय प्रयोगशाळा उभारण्यात बेयर यांनी सक्रिय भाग घेतला. वर्गातील व्याख्यानांपेक्षा प्रयोगांवर त्यांचा जास्त भर असे. त्यांचा विद्यार्थी व शिष्य परिवार मोठा होता व त्यांमध्ये सी. लीबरमान,सी.ग्रेबे, व्ही. व आर्. मायर आणि ई. व ओ. फिशर यांचा समावेश होता. त्यांचा ७०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे शास्त्रीय प्रंबध एकत्रित करून दोन खंडात प्रसिद्ध करण्यात आले. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना बर्लिन केमिस्टस काँग्रेसचे लीविक पदक, डेव्ही पदक इ. बहुमान मिळाले. बर्लिन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, जर्मन केमिकल ॲसोसिएशन इ. शास्त्रीय संस्थाशी त्यांचा जवळचा संबंध होता. स्टार्नबेर्ख (जर्मनी) येथे ते मृत्यू पावले.

जमदाडे, ज.वि.