बेथोव्हन, लूटूव्हिख व्हान : (१६ डिसेंबर १७७०-२६ मार्च १८२७). श्रेष्ठ जर्मन संगीतकार. त्याच्या संगीतकृती अभिजात संगीतातील उत्कर्षयुगाच्या तद्वतच स्वंच्छदतावादी युगारंभाच्या प्रातिनिधिक समजल्या जातात. वॉन येथे जन्म. वयाच्या सहाव्या वर्षीच या मुलातील सांगीतिक प्रतिभेची चुणूक दिसून आली. त्यामुळे दरबारी संगीतकार असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याची संगीताची प्राथमिक तयारी करून घेतली. व्हिएन्ना हे त्या काळातील यूरोपचे प्रमुख संगीतकेंद्र होते. १७८७ मध्ये त्याने प्रथम व्हिएन्नाला भेट दिली त्यावेळी त्याच्या पियानोवादनाने मोट्सार्टसारखा तत्कालीन ज्येष्ठ संगीतकारही प्रभावित झाला. पुढे ऑस्ट्रियन संगीतकार⇨ फ्राटंस हायडनच्या निमंत्रणावरून तो पुन्हा व्हिएन्नाला गेला व त्याचे शिष्यत्व त्याने पतकरले.बेथोव्हनतेव्हापासून तो व्हिएन्नामध्येच स्थायिक झाला. बेथोव्हनच्या क्रांतिकारक सांगीतिक कल्पना हायडनला मानवण्याजोग्या नव्हत्या, परिणामी त्यांचे गुरुशिष्याचे संबंध संपुष्टात आले. पुढेही त्याने आंतॉन्यो साल्येअसरीसारख्या कैक नामवंत संगीतकाराकडे शिक्षण घेतले. पण त्याच्या स्वंतत्र प्रज्ञेमुळे तो कुणाच्याही प्रभावाखाली फार काळ राहू शकला नाही. त्याने स्वतःच आपली नवी वाट शोधून काढली.

 बेथोव्हन हा पाश्चात्त्य संगीतविश्वामध्ये एक क्रांतिकारक संगीतरचनाकार मानला जातो. त्याच्या संगीतरचना विपुल व वैविध्यपूर्ण आहेत: ९ सिंफनी, ५ पियानो-काँचेर्टो, ३२ पियानो-सोनाता, १० व्हायोलीन-सोनाता १६ क्वार्टेट्स आणि प्रत्येकी एक ऑपेरा व मॅस इ. संगीतकृतींचा त्याच्या रचनासंभारात समावेश होतो. त्याच्या प्रख्यात संगीतकृतींपैकी एरॉइका (इ.शी. हिरॉइक रचनाकाळ १८०३-४) ही तिसरी सिंफनी महत्त्वाची असून,ती त्याने सुरुवातीस नेपोलियनला अर्पण केली पण नेपोलियनने स्वतःला सम्राट म्हणून घोषित केल्यावर त्याने त्या सिंफनीची सुरुवातीची अर्पणपत्रिका बदलली आणि ‘श्रेष्ठ व्यक्तीची स्मृती जतन करणारे एक स्मारक’ म्हणून ही सिंफनी रचल्याचे नमूद करून, ती प्रिन्स लोबकोविट्स यांना अर्पण केली.  फीडेलिओ (१८०५ व १८१४) या ऑपेरामध्येही त्याने फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रेरक तत्त्वांचा- स्वातंत्र्य, व्यक्तिप्रतिष्ठा व जुलुमावर मात करणारी वीरवृत्ती यांचा- गौरव केला आहे. त्याची मिस्सा सॉलेम्नस (१८२३)ही एक अंत्यत भावपूर्ण धार्मिक रचना आहे. वादळी व्यक्तिमत्त्वाच्या या संगीतकाराने हायडन, ⇨ मोट्सार्ट प्रभृती समकालीन संगीतकारांनी रूढ केलेल्या बंदिस्त अभिजात रचनाशैलीहून निराळा स्वच्छदंतावादी प्रवाह पाश्चात्त्य संगीतात आणून सोडला. बेथोव्हननंतरच्या ⇨वाग्नरला स्फूर्ती मिळावी, इतके बेथोव्हेनचे कार्य मुक्तिदायी ठरले. स्वरसंवादाच्या रूढ कल्पनांना झुगारण्याचे किंवा धक्का देण्याचे धाडस करणे व वाद्यांच्या स्वनरंगांची नवनवीन मिश्रणे साधत स्वरकाव्ये – व्हाग्नरच्या शब्दांत‘टोन पोएम्स’– रचणे, हे त्याचे वैशिष्ट्य होय.

पहिल्या प्रेमभंगानंतर अविवाहित राहिलेला बेथोव्हन वयाच्या तिसाव्या वर्षापासूनच बहिरा होऊ लागला. पुढे १८१७ पासून तो ठार बहिरा झाला. त्याबरोबरच आर्थिक दुरवस्था, परावलंबन आणि ढासळती तब्येत यांनी त्याच्यावर आघात केले पण त्यामुळे खचून न जाता त्याने आपली संगीतसाधना अंखड चालू ठेवली. त्याच्या आरेखन-वह्यांवरून (स्केच बुक्स) त्याने आपल्या संगीतरचना पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या अफाट परिश्रमांची कल्पना येऊ शकते. अभिजात संगीतशैलीचा शेवटचा पाईक व आधुनिक युगाचा पहिला मानकरी हे त्याचे वर्णन सार्थ म्हणावे लागते. व्हिएन्ना येथे त्याचे निधन झाले. बेथोव्हनचा प्रंचड पत्रसंग्रह एमिली अँडरसनने द लेटर्स ऑफ बेथोव्हन या नावाने तीन खंडामध्ये संपादित व भाषांतरित केला आहे.

(१९६१).

संदर्भ :

1. Forbos, Elliot, Ed. Thayer’s Life of Beethoven, 2 Vols., London, 1967.

2. Grove, George, Beethoven and his Nine Symphonies, London, 1962.

3. Tovey, Donald F. Beethoven, New York, 1945. 

मोदी, सोराब (इं) रानडे, अशोक (म.)