बेट्स निकोलस : (१३ सप्टेंबर १८१४-१३ मार्च १९०३). डच कवी आणि कथाकार. ‘हिल्डेब्रांड’ ह्या नावाने ते ओळखला जात असे. हार्लेम येथे जन्मला. लायडन येथे त्याने ईश्वरविद्येचे शिक्षण घेतले. १८३९ मध्ये धर्मोपदेशकाची दीक्षा घेतल्यानंतर हेमस्टेड आणि उत्रेक्त येथे पास्टर म्हणून काम केले (१८४०-५४ १८५४-७४). १८७४ नंतर दहा वर्षे उत्रेक्त विद्यापीठात त्याने ईश्वरविद्येचे अध्यापन केले.

 बेट्सची कविता स्वच्छंदतावादी वळणाची असून तीवर विख्यात इंग्रज कवी बायरन ह्याचा प्रभाव दिसून येतो. तथापि आज बेट्सची कीर्ती त्याने लिहिलेल्या कामेरा ऑबस्क्यूरा (१८३९) ह्या गद्यग्रंथावरच मुख्यतः अधिष्ठित आहे. बेट्सने लिहिलेल्या काही कथा, शब्दचित्रे आणि निबंध ह्या ग्रंथांत संग्रृहीत आहेत. नेदर्लंडसमधील जीवन आणि निसर्गदृश्ये ह्यांचे जिवंत चित्रण यांत केलेले असून बेट्सची मार्मिक निरीक्षणशक्ती आणि विलोभनीय विनोदबुद्धी ह्यांचा प्रत्ययही त्यातून येतो. उत्रेक्त येथे तो निधन पावला.

 कुलकर्णी, अ. र.