बेटे, हान्स आल्ब्रेख्ट : (२ जुलै १९०६- ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. अणुकेंद्रीय विक्रियांचा सिद्धांत आणि ताऱ्यांमधील ऊर्जानिर्मितीसंबंधीचा सिद्धांत यांविषयीच्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल त्यांना १९६७ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. शास्त्रज्ञांच्या सामाजिक जबाबदारीवर भर देणाऱ्यांमध्ये ते अग्रणी आहेत. बेटे यांचा जन्म फ्रान्समधील (त्या वेळी जर्मनीतील) स्ट्रॅस्बर्ग येथे झाला. त्यांचे शिक्षण फ्रॅंकफुर्ट व म्यूनिक येथील विद्यापीठात झाले. १९२८ मध्ये त्यांनी आर्नोल्ट झोमरफेल्ड या सुप्रसिद्ध सैद्धांतिक भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाखाली म्यूनिक विद्यापीठाची पीएच्‌.डी. पदवी मिळविली. १९२८-३३ या काळात त्यांनी फ्रॅंकफुर्ट, स्टटगार्ट, म्यूनिक व ट्यूबिंगेन येथील विद्यापीठांत अध्यापन केले. जर्मनीत नाझी अंमल सुरू झाल्यावर त्यांनी ऑक्टोबर १९३३ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले आणि पुढील दोन वर्षे मॅंचेस्ट व ब्रिस्टल येथील विद्यापीठात अध्यापन केले. फेब्रुवारी १९३५ मध्ये अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात (इथाका, न्यूयॉर्क) साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३७ मध्ये त्यांना प्राध्यापकपद मिळाले व त्यानंतर त्यांनी तेथेच कायम वास्तव्य केले. १९४१ साली त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रेडिएशन लॅबोरेटरीमध्ये सूक्ष्मतरंग रडारसंबंधी [⟶ रडार] काम केले, तसेच लॉस ॲलॅमॉस येथील पहिल्या अणुबाँब प्रकल्पात सैद्धांतिक भौतिकी विभागाचे संचालक म्हणून महत्त्वाचा भाग घेतला. या प्रकल्पात त्यांच्याकडे यशस्वी अणुस्फोटाकरिता आवश्यक असणारी यु‌रेनियमाची किंवा प्लुटोनियमाची राशी आणि अशा अणुस्फोटातून निर्माण होणारी एकूण ऊर्जा निर्धारित करणे ही कामे सोपविलेली होती. याखेरीज उच्च स्फोटक द्रव्यांच्या साहाय्याने अंतःस्फोटाने युरेनियमाचा वा प्लुटोनियमाचा गोलाकार गोळा अत्यल्प काळात एकत्र आणणाऱ्या यंत्रणेचा अभिकल्प(आराखडा) तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या एका गटाबरोबरही बेटे यांनी कार्य केले. याच काळात त्यांनी आघात तरंगांच्या [⟶ तरंग गति] सिद्धांताविषयी संशोधन केले आणि हा अनुभव त्यांना अणुबाँबवरील व नंतर अण्वस्त्रांच्या परिणामांविषयीच्या कामात उपयुक्त ठरला. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा ती अतिशय तापतात. अशा क्षेपणास्त्रांच्या संरक्षणासाठी उष्णता निरोधक आवरणाचा अभिकल्प तयार करण्याकरिताही बेटे यांनी साहाय्यभूत कार्य केले. बेटे यांचे कार्य अणुकेंद्रीय सिद्धांताविषयी आहे. आर्‌. ए. पिअर्ल्स यांच्याबरोबर त्यांनी १९३४ मध्ये ड्यूटेरॉनासंबंधाचा (हायड्रोजनाच्या ड्यूटेरियम या समस्थानिकाच्या-अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराचा-अणुकेंद्रासंबंधीचा) सिद्धांत विकसित केला व पुढे १९४९ मध्ये त्याचा विस्तार केला. त्यांनी अणुकेंद्रीय द्रव्यमान मापक्रमातील काही विसंगतींचे १९३५ मध्ये निरसन केले. १९३५-३८ या काळात अणुकेंद्रीय विक्रियांचा अभ्यास करून त्यांनी अनेक विक्रियांच्या संभाव्यतादर्शक काटच्छेदांचे (अणुकेंद्रीय कणांच्या आघात विक्रियांत लंब दिशेने आघात करणाऱ्या कणांना लक्ष्य म्हणून उपलब्ध असलेल्या अणुकेंद्रांच्या परिणामी क्षेत्रफळांचे) भाकीत वर्तविले होते.

या कार्याच्या संदर्भात त्यांनी नील्स बोर यांचा संयुक्त अणुकेंद्राचा सिद्धांत अधिक परिमाणात्मक रीतीने विकसित केला. त्यांचे हे कार्य आणि अणुकेंद्रीय सिद्धांत व तत्संबंधित उपलब्ध असलेले ज्ञान व प्रायोगिक निष्कर्ष यांचा सारांशरूपाने रिव्ह्यूज ऑफ मॉडर्न फिजिक्स या नियतकालिकात तीन लेखांच्या स्वरूपात आढावा घेण्यात आला. या लेखांचा पुढे अणुकेंद्रीय भौतिकीविज्ञांना अनेक वर्षे पाठ्यपुस्तकासारखा उपयोग झाला. अणुकेंद्रीय विक्रियांवरील आपल्या कार्यातून बेटे यांनी ताऱ्यांना ऊर्जापुरवठा करणाऱ्या विक्रियांचा शोध लावला. तेजस्वी ताऱ्यांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची विक्रिया म्हणजे कार्बन-नायट्रोजन चक्र [⟶ अणुऊर्जा तारा] ही असून सूर्य व त्यापेक्षा निस्तेज तारे बहुशः प्रोटॉन-प्रोटॉन विक्रियेचा उपयोग करतात. बेटे यांचे या बाबतीतील महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी इतर शक्य असलेल्या अणुकेंद्रीय विक्रिया वर्ज्य ठरविल्या, हे होय. अणुकेंद्रीय भौतिकीमध्ये संशोधन करण्यापूर्वी त्यांनी मुख्यत्वे आणवीय भौतिकी व आघात सिद्धांत यांविषयी अभ्यास केला. आणवीय भौतिकीच्या तत्कालीन उपलब्ध ज्ञानातील उणिवा भरून काढून एकूण आढावा घेणारा एक लेख Handbuch der Physik मध्ये त्यांनी लिहिला. आघात सिद्धांतात त्यांनी अस्थितिस्थापक आघातांविषयीचा (ज्यांमध्ये आघात- टक्कर – होणाऱ्या कणांची आघातापूर्वीची एकूण गतिज ऊर्जा ही आघातानंतरच्या एकूण गतिज ऊर्जेइतकी नसते अशा आघातांविषयीचा) साधा पण प्रभावी सिद्धांत मांडला. या सिद्धांताचा उपयोग त्यांनी उच्च वेगयुक्त कणांना थांबविण्याची पदार्थाची क्षमता निर्धारित करण्यासाठी केला आणि त्यामुळे अणुकेंद्रीय भौतिकीविज्ञांना आपल्या प्रयोगांचे अभिकल्प तयार करण्यास एक उपयुक्त साधन उपलब्ध झाले आहे. विघातक अणुकेंद्रीय प्रारणांपासून (तरंगरूपी ऊर्जांपासून) माणसांचे संरक्षण करण्यासाठी उपाय योजण्याच्या दृष्टीने अणुकेंद्रीय विक्रियकांच्या (अणुभट्ट्यांच्या) अभिकल्पात तसेच अंतराळवीरांचे विश्वकिरणांपासून (बाह्य अवकाशातून येणाऱ्या अतिशय भेदक किरणांपासून) संरक्षण करण्याच्या व्यवस्थेत बेटे यांचे हे कार्य महत्त्वाचे ठरले आहे. अधिक जोरदार आघातांच्या संदर्भात त्यांनी डब्ल्यू. हाइटलर यांच्याबरोबर सापेक्षीय (ज्यांचा वेग प्रकाशाच्या वेगशी तुलना करण्याजोगा आहे अशा) इलेक्ट्रॉनांचा एखाद्या अणुकेंद्रावर आघात झाल्यास त्या इलेक्ट्रॉनांनी उत्सर्जित होणाऱ्या प्रारणाचे (ब्रेम्सस्ट्राहलुंग) गणित केले तसेच त्यांनी उच्च ऊर्जायुक्त गॅमा किरणांमुळे [⟶ किरणोत्सर्ग] होणाऱ्या इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन जोडीच्या निर्मितीचाही अभ्यास केला. घन अवस्था सिद्धांताविषयी [⟶घन अवस्था भौतिकी] संशोधन करून त्यांनी स्फटिकात एखादा अणू प्रविष्ट केल्यास आणवीय ऊर्जा पातळ्यांत होणाऱ्या विभाजनाचे विवेचन केले. तसेच मिश्रधातूंतील सुव्यवस्था व अव्यवस्था यांविषयी एक सिद्धांत विकसित केला. १९४७ मध्ये प्रथमतः त्यांनीच हायड्रोजन वर्णपटातील लॅंब स्थानच्युतीचे [⟶ पुंजयामिकी] स्पष्टीकरण दिले व पुंज विद्युत गतिकीच्या आधुनिक विकासाचा पाया घातला. त्यानंतर त्यांनी अनेक सहकाऱ्यांबरोबर पाय मेसॉनांच्या [⟶ मूलकण] प्रकीर्णनासंबंधी (विखुरण्यासंबंधी) व विद्युत्‌ चुंबकीय प्रारणामुळे होणाऱ्या त्यांच्या निर्मितीसंबंधी संशोधन केले.

 दुसऱ्या महायुद्धानंतरही त्यांनी अणुऊर्जेविषयी संशोधन चालू ठेवले पण ते मुख्यतः शक्तिनिर्मितीसारख्या शांततामय उपयोगांच्या दृष्टीनेच होते. १९७३ च्या सुरुवातीपासून त्यांनी कमी होत चाललेल्या खनिज तेलाच्या पुरवठा उद्गमांच्या ऐवजी अणुऊर्जेचा उपयोग करण्यासंबंधी मोठ्या प्रमाणावर लेखन केले व व्याख्याने दिली. अणुकेंद्रांच्या गुणधर्मांचे व त्यांच्या संरचनेचे स्पष्टीकरण त्यांतील कणांमध्ये असणाऱ्या प्रेरणांच्या पदांत मांडण्यासाठी त्यांनी मूलभूत सैद्धांतिक कार्यही चालू ठेवले आहे. बेटे यांनी १९७० मध्ये अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने न्यूट्रॉन ताऱ्यांतील [⟶ तारा] द्रव्य वितरणाचे गणित केले. त्यावरून न्यूट्रॉन ताऱ्याचे शक्य असलेले महत्तम द्रव्यमान सूर्याच्या द्रव्यमानाच्या दुपटीपेक्षा काहीसे कमी असावे, असे दिसून आले. १९७८ मध्ये त्यांनी पुन्हा अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने ⇨ गुरूत्वीय अवपाताने आकुंचित होणाऱ्या ताऱ्यातील द्रव्याच्या वर्तनाचा अभ्यास केला. त्यावरून असे आढळून आले की, सुरुवातीच्या अवपातामुळे ताऱ्याच्या मध्यभागाची होणारी घनता अणुकेंद्राच्या घनतेपेक्षा किती तरी पटींनी अधिक असते (अणुकेंद्राची घनता सु. २.५ x १०१७ किग्रॅ./मी.३). हे निरीक्षण अतिदीस नवताऱ्याच्या [⟶ अतिदीप्त नवतारा] स्फोटाविषयी उलगडा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर अणुयुद्धातील भयंकर धोक्याची सामान्यजनांना जाणीव करून देण्याच्या दृष्टीने इतर शास्त्रज्ञांबरोबर त्यांनी अविरत प्रयत्न केले. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विज्ञान सल्लागार समितीवर १९५६-६४ मध्ये काम करीत असतानाच त्यांनी १९५८ मध्ये अध्यक्षीय निःशस्त्रीकरण अभ्यास समितीचे प्रमुख म्हणून काम केले. १९४४ मध्ये अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून व १९५४ मध्ये अमेरिकन फिजिकल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना जर्मनीचे माक्स प्लांक पदक (१९५५), ताऱ्यांसंबंधीच्या कार्याबद्दल नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ड्रेपर पदक (१९४७) व रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे एडिंग्टन पदक (१९६३), अणुबाँबसंबंधीच्या कार्याबद्दल अमेरिकेच्या सरकारचे मेडल ऑफ मेरिट (१९४६), अणुकेंद्रीय भौतिकी व अणुऊर्जा यासंबंधीच्या कामाकरिता अमेरिकेच्या अणुऊर्जा मंडळाचे एन्रीको फेर्मी पारितोषिक (१९६१) इ. बहुमान मिळालेले आहेत. बेटे यांचे एलेमेंटरी न्यूक्लिअर थिअरी (१९४७ दुसरी आवृत्ती पी. मॉरिसन यांच्या समवेत, १९५६), क्वांटम मेकॅनिक्स ऑफ वन-अँड-टू इलेक्ट्रॉन ॲटम्स (ई. ई. सॉल्पिटर यांच्या समवेत, १९५७), स्प्लिटिंग ऑफ टर्म्स इन क्रिस्टल्स (१९५८) आणि इंटरमिजिएट क्वांटम मेकॅनिक्स (१९६४) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांचे प्रमुख संशोधनकार्य २५० हून अधिक निबंधांच्या रूपात विविध शास्त्रीय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले आहे.

 भोईटे,  प्र. बा.