बूच : भाजलेली मृत्तिका (सेरॅमिक्स), काच, प्लॅस्टिक इत्यादींच्या बाटल्या, बरण्या, सुरया, किटल्या, सट, दबणाऱ्या नळ्या इ. धारकपात्रे योग्य प्रकारे बंद करून आतील पदार्थ सुव्यवस्थित राखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनाला ‘बुच’ असे म्हणतात. झाकण, टोपण इ. नावानींही ते ओळखण्यात येते. धारकपात्राच्या तोंडाच्या आकारानुसार बुचाचे आकार असतात. भाजलेली मृत्तिका, लाकूड, काच, लोखंडी पत्रा, पितळ, रबर, प्लॅस्टिक, ॲल्युमिनीयमचा पत्रा व वर्ख इ. वापर बूच तयार करण्यासाठी करतात. क्वचित प्रसंगी मक्याच्या कणसांची बुरकुंडे, नारळाची शेंडी, कागद, गवत आदींचा वापर बुचासाठी करण्यात येतो.
बूच हा आवेष्टनाचा महत्वाचा भाग आहे. बुचामुळे आवेष्टन परिपुर्ण होते. यामुळे धारकपात्रासह आतील पदार्थ साठवण, वाहतुक इत्यादींमध्ये न तुटता-फुटता ग्राहकांपर्यंत व्यवस्थित जाऊ शकतात. शिवाय त्यामुळे आवेष्टणाला व पर्यायाने धारकपात्राला शोभा येते. तसेच त्यावर कारखान्याचे बोधचिन्ह, अत्यावश्यक मजकूर इ. बाबी देता येतात. बूच हे आवेष्टनाचे अंतिम संस्करण असल्याने व ते महत्वाचे असल्याने त्याकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. [⟶ आवेष्टन].
बुचे ही विविध आकारांची असून धारकपात्राचे तोंड पूर्ण बंद होईल इतपत ती अचूक करतात. धातूंची व प्लॅस्टिकाची बूचे जास्त करून वापरतात. कथिलाच्छादित पत्रे, ॲल्युमिनियम व तिच्या मिश्रधातू इ. धातू व मिश्रधातू बेकेलाईट पॉलिथिन, पी. व्ही. सी. (पॉलिव्हिनल क्लोराईड), पॉलिस्टायरीन इ. प्लॅस्टिके बूच तयार करण्यासाठी जास्त करून वापरतात. धातू व प्लॅस्टिकची बूचे दृढ व अर्धदृढ असतात. धातुवर्खाचा वापर बूच म्हणून दुधाच्या बाटल्यांसाठी करतात. शिवाय त्याचा वापर इतर झाकणावरही आवेष्टन म्हणून करतात. सर्वसामान्यतः बूचे पाच प्रकारे वापरता येतात. (१) धर्षणजन्य : खुंटीसारखी बुचे तोंडात दाबून बसविता येतात, (२) आट्याची : अंतर्गत व बाह्य आट्याची, (३) धारकपात्रानुसार आकार घेऊ शकतील अशी, (४) निर्वात : ही बुचातील वातावरणीय दाबावर आधारीत असतात, (५) झाकण व धारकपात्र यांना यांत्रिकरित्या कायम स्वरूपात जोडलेली.
बुचाचे बरेच प्रकार वापरले जातात. तसेच ते विविध आकारात व आकारमानात वापरण्यात येते. सर्वसामान्यतः साधे बूच (स्टॉपर) व टोपीवजा झाकण (कॅप) यांचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो.
साधे बूच : हे बूच वरच्या बाजूस रुंद व खाली अरुंद असते. धारकपात्राच्या तोंडाच्या आकारानुसार त्याचा आकार ठरविला जातो. सामान्यतः ही बुचे बारीक तोंडाच्या बाटल्या-बरण्यांसाठी वापरतात. क्वचित रुंद तोंडाच्या बाटल्यांसाठी वापरतात (उदा., रुंद तोंडाचे थर्मास). कित्येक झाडांची ‘कॉर्क’या नावाने ओळखण्यात येणारी व मेणाने लेपित अशा पेशींनी बनलेली साल बुचाकरिता सोळाव्या शतकाच्या मध्यास व त्यापूर्वी वापरात होती. निमुळत्या कॉर्कचा बूच म्हणून वापर करण्यात येई. १६६० नंतरच्या दशकात शॅँपेन मद्याचा शोध लागल्यावर ही बुचे दोऱ्याने जागेवर बांधून ठेवण्यात येऊ लागली. स्पेन व पोर्तुगाल येथील कॉर्क ओक (कर्कस स्यूबर) या वृक्षाच्या सालीपासून तयार केलेली बुचे अद्यापही मद्याच्या बाटल्यांकरिता वापरण्यात येतात. हे झाड १२ वर्षांचे झाल्यावर प्रथम व पुढे नऊ वर्षांनी त्याची साल काढतात. साल प्रथम वाळवितात, नंतर पाण्यात उकळतात व विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करून तिची बुचे करतात. बुचे कधीकधी उठावरेखित लाकडी टोपणाने सुशोभित करतात. पूर्वी शिसा वगैरे लहान तोंडाच्या बाटल्यांना (वा बरण्यांना) सळईच्या वा तारेच्या साहाय्याने बिजागरीसारखी योजना करून उघडता-घालता येणारी भाजलेल्या मृत्तिकेची वा लाकडाची बुचे बसवीत. ही बुचे अर्थातच बाटलीपासून अलग करता येत नसत. काही बाटल्यांना काचेची बुचे वापरतात. ही बुचे काढता-घालता येण्यासाठी त्यांना बोटात धरता येईल असा भाग असतो. बाटलीच्या तोंडात बसणारा भाग खरबरीत केलेला असतो. जैव (सेंद्रिय) पदार्थ व रसायने यांच्यासाठी रबराची विविध आकारांची बुचे वापरतात. यांशिवाय अंतःक्षेपणाच्या (इंजेक्शनांच्या) बाटल्यांकरिता वापरण्यात येणारा आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे तोंडाला रबरी बूच लावल्यावर तोंडाच्या काठावर बुचाची कड घट्ट बसते आणि अशा बुचावर लोखंडी (वा ॲल्युमिनियमाचे) आवरण असते व त्याचा मधला भाग अलग करून अंतःक्षेपणाच्या सुया आत खुपसून आतील औषधी द्रव्य काढून घेता येते. प्लॅस्टिकचीही विविध प्रकारची बुचे वापरात आहेत.
टोपीवजा झाकणे : ही झाकणे फिरकीची (स्क्रू), लग, क्राऊन इ. प्रकारांची असतात. फिरकीची झाकणे निश्चितपणे कधी वापरात आली हे ज्ञात नाही. एकोणिसाव्या शतकापर्यंत तोंडाला आटे असलेल्या बाटल्या इ. क्वचित वापरत, कारण आटयाच्या बाटल्या बनविणे कठीण व त्रासाचे होते. झाकणाच्या आत कॉर्कची चकती असलेल्या व ही चकती तोंडावर घट्ट बसणाऱ्या ‘मेसन-जार’ चा शोध १८५८ मध्ये जॉन एल. मेसन यांनी लावला. मेसन यांनी बाटलीवरील आटयांच्या अभिकल्पात (आराखड्यात) महत्वाची सुधारणा केली. त्यांनी वरच्या पृष्ठभागाच्या थोड्या खाली आट्याची सुरुवात करून बाटलीच्या मानेपाशी पोहोचण्यापूर्वी त्याचा शेवट होईल अशी रचना केली. यामुळे झाकण फिरवून खाली पोहोचेपर्यंत ते आटयात अडकण्याची वा बाटलीची वरची कडा तुटण्याची भीती राहिली नाही. आशील वाइसेतानर यांनी १८९२ मध्ये सपाट तबकडी व ती घट्ट दाबून बसण्यासाठी चीरयुक्त कडी असलेल्या फिनिक्स झाकणाचा शोध पॅरिस येथे लावला. आटयाच्या बाटलीवर बिनआट्याची ॲल्युमिनियम झाकणे बसवून ती रुळांनी दावून आट्यांवर बसविण्याची कल्पना १९२४ मध्ये पुढे आली. दंतधावनाच्या नळीला जी झाकणे बसवितात ती प्लॅस्टिकची असतात. १९२७ मध्ये बेकेलाइटचा शोध लागल्यावर त्याचा वापर झाकणासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. धातूपेक्षा बेकेलाइटची झाकणे महाग असूनही चैनीच्या वस्तूंच्या बाटल्यांसाठी त्यांच्यावरील नक्षीकाम, नयनमनोहर रंग व उष्णतारोध यांमुळे ती वापरात राहिली पण धातूंइतकी ती टिकाऊ नव्हती.
बरण्यांसाठी (विशेषतः भाजलेल्या मृत्तिकेच्या) आतून बसतील पण बाहेरुन आटे असणारी भाजलेल्या मृत्तिकेची व अन्य पदार्थाची झाकणे वापरात आहेत.
धातवीय झाकणावरचे आटे बाहेरुनही दिसू शकतात. प्लॅस्टिकाच्या झाकणांचे आटे फक्त आतूनच दिसतात. आटयांची बुचे बाटल्यांना बसविल्यावर त्यावर धातवीय वा प्लॅस्टिक वर्खाचे सील असलेले एक आवेष्टनही कधीकधी बसविण्यात येते. आणखी एक फिरकी झाकणाचा प्रकार हल्ली वापरात आहे. ही झाकणे बाटलीला घट्ट बसवितात. याचा खालचा आटा तिरकस नसून सरळ आडवा असतो व त्यावर खाचा असतात. चाकूने वा झाकण फिरवून या खाचेपासून झाकण अलग करतात. झाकणाचे हे दोन्ही भाग जोपर्यंत एकत्र असतात तोपर्यंत बाटलीतील पदार्थात भेसळ वगैरे होण्याची शक्यता फारच कमी असते. बाटलीतील पदार्थांच्या वासांनुसार वा स्वादांनुसार झाकणे कशाची बनवावयाची आणि वापरावयाची हे ठरवितात. बहुतेक झाकणांतून चकतीच्या स्वरूपातील पदार्थ वापरण्यात येतात. ‘लग’ प्रकारची झाकणे पूर्वीपासून रुंद तोंडाच्या खाद्यपदार्थांच्या बाटल्यांसाठी वापरात आहेत. पुढे त्यांचा वापर लहान तोंडाच्या बाटल्यांसाठीही होऊ लागला. ही झाकणे १/४ आटा फिरवून बसविता-काढता येतात. या झाकणाचा आणखी एक फायदा म्हणजे पात्राच्या बंदीकरण पृष्ठीगावर अधिक एकसारखा दाब पडतो.
वातयुक्त पेयांच्या बाटल्यांसाठी बसवावयाच्या झाकणाचा विल्यम पेंटर यांनी शोध लावला. त्यास ‘क्राऊन कॅप्स’ असे म्हणतात. १८९२ मध्ये त्याचे त्यांना एकस्व (पेटंट) मिळाले. ही बुचे धातूची असतात. प्रथमतः त्यांच्या आतील बाजूस घन कॉर्कची चकती असे. पुढे अधिक एकसारखी गुणवत्ता असलेल्या संमिश्र कॉर्कचा१९१२ मध्ये चकतीसाठी वापर करण्यात येऊ लागला. कॉर्क चकतीच्या मध्यभागी कागद, वर्ख वा पातळ पटलाची गादीवजा चकती असलेली ‘स्पॉट क्राऊन’ बुचे १९२० नंतरच्या दशकाच्या अखेरीस जिंजर एल, ऑरेंज सोडा, बिअर यांसारख्या पेयांचे स्वाद टिकविण्यासाठी प्रचारात आली. ही बुचे यंत्राने बाटलीस बसवितात.
खास प्रकारांची बुचे : डोळयांत, कानात वा नाकात घालावयाच्या औषधिद्रव्याच्या थेंबांच्या बाटल्यांना बसविण्यात येणाऱ्या बुचांच्या मध्यभागी आतून प्लॅस्टिकची वा काचेची नळी (ड्रॉपर) असते व त्यास वरच्या बाजूने रबरी टोपी बसवितात. ही बुचे फिरकीची असतात. अशा बाटल्यांना नेहमीचे बूच काढून त्या जागी प्लॅस्टिकची तोटी असलेली व दाबल्यास औषध बाहेर येईल अशी बुचेही बसवितात.
डिंक, नखांना लावावयाचे पॉलिश, ओले कुंकू इ. वस्तूंचा वापर करण्यासाठी दांडा वा ब्रश असलेली बुचे वापरतात. ती फिरकीची असतात. मीठ, मसाले आदी खाद्यपदार्थावर टाकण्यासाठी झाकणास छिद्रे ठेवतात. पॉलिथिनाची ‘स्नॅप’ प्रकाराची बुचे लहान बाटल्यांसाठी (शिशीसाठी) वापरतात. हे बूच दाबून बसविले जाते. यंत्रांना वंगणे, तेले इ. घालण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बाटल्यांना तोटी असलेली फिरकीची बुचे वापरतात.
सोडावॉटरच्या बाटलीत जी काचेची गोळी असते ती बाटलीत व्यवस्थित बसण्यासाठी आत रबराची गोल कडी असते. पेयातील वायूचा दाब योग्य होताच गोळी वर सरकते व आतील दाबामुळे व रबरी कडीमुळे गोळी बुचासारखी बसते.दुधाच्या बाटल्यांना बसविण्यात येणारी झाकणे ॲल्युमिनियमाच्या वर्खाची बसून ती यंत्राने बसवितात. ही झाकणे परत वापरता येतात.
अस्तर : आवेष्टनाचा सर्वात लहान पण अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे बुचाचे अस्तर होय. याच्यामुळे धारकपात्रातील पदार्थ बाहेरील संसर्गापासून अलिप्त ठेवता येईल इतपत बूच घट्ट बसते व प्रत्यक्ष बूच व आतील पदार्थ यांचा संबंध येत नाही.
अंतर्गत (बुचाला लागून असलेले) अस्तर व बाह्य (धारकपात्रातील पदार्थाला सन्निध असलेले) अस्तर अशी दोन प्रकारची अस्तरे वापरतात. अंतर्गत अस्तर मऊ, धारकपात्रांच्या तोंडानुसार आकार घेऊ, धारकपात्रांच्या तोंडानुसार आकार घेऊ शकेल असे, स्थितिस्थापक (ताण काढून घेतल्यावर मूळ स्थिती प्राप्त होणारे) व बाटलीतील पदार्थाने खराब होणार नाही असे असते. ते धातवीय बुचास डिंकाने चिकटवितात, तर प्लॅस्टिकाच्या बुचात दाबून बसवितात. अंतर्गत अस्तरासाठी सामान्यतः लगद्याचे तक्ते (औषधे सौंदर्यप्रसाधने इत्यादींसाठी), पुनर्सस्कारित कागद, टाकाऊ लोकरी कापडापासून तयार केलेले फेल्ट तक्ते, कॉर्कचे दाणेदार तक्ते, रबर इत्यादींचा वापर करतात. बाह्य अस्तर हे उघडझाप करताना होणाऱ्या घर्षणास टिकेल व आतील पदार्थाचा अनिष्ट परिणाम होणार नाही असे असते. यासाठी क्राप्ट कागद, केसीन-स्तरित कागद, व्हिनिलाइट, पॉलिथीन, सरान, मायलार, सेलोफेन, ॲल्युमिनियम वर्ख इत्यादींचा उपयोग करतात.
संदर्भ : hanlon, J.F. Handbook of Package Engineering, New York, 1971
मिठारी, भू. चिं.
“