बुर्गीबा, हबीब इब्नअली: ( ३ ऑगस्ट १९०३). उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील ट्युनिशिया

हबीब बुर्गीबा

इस्लामी प्रजासत्ताकाचा शिल्पकार व पहिला राष्ट्राध्यक्ष. जन्म मॉनस्टीर (ट्युनिशिया ) येथे सामान्य कुटुंबात झाला. मॉनस्टीर येथेच प्रारंभीचे शिक्षण घेऊन ट्युनिस व पॅरीस येथे त्याने उच्च शिक्षण घेतले आणि कायदा व राज्यशास्त्र या विषयांत पदवी मिळविली. (१९२८). तत्पूर्वी विद्यार्थीदशेतच त्याने मातील्द लॉरेन या युवतीशी विवाह केला. (१९२७). त्याच्या मुलाचे नांवही हबीब (१९२७-) आहे. तोही ट्युनिशियाच्या राजकारणांत मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध आहे. पहिल्या पत्नीशी बुर्गीबाने घटस्फोट घेऊन (१९६१). वासिलबेन अमर हिच्याशी दुसरा विवाह केला (१९६२). ऐन तारूण्यात तो ट्युनिशियाच्या स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाला सुरुवातीस तो दस्तूर पक्षाचा सभासद होता.(१९२०) नंतर व्हाईस ऑफ द ट्युनिशियन (इं. शी.). या फ्रेंच भाषिक वृत्तपत्राचे तो संपादन करू लागला (१९३०) परंतु वृत्तपत्रीय धोरणाबाबत मालकाशी मतभेद आल्यामुळे त्याने ट्युनिशियन ॲक्शन (इं. शि.) हे स्वतंत्र वृत्तपत्र फ्रेंच भाषेत सुरू केले (१९३२). फ्रान्सकडून ट्युनिशियाला स्वातंत्र्यमिळविण्यात दस्तूर पक्ष असमर्थ आहे, लक्षात येताच त्याने १९३४मध्ये पुढाकार घेऊन ‘नव-दस्तूर’ पक्षाच्या स्थापनेस सहकार्य केले व तो त्याचा मुख्यसचिव झाला (१९३४). त्यामुळे ट्युनिशियाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व त्याच्याकडे आले. त्याने अनेक राजकीय संघटना स्थापन केल्या. फ्रान्सविरोधी चळवळीमुळे बुर्गीबास अनेकवेळा तुरूंगवास भोगावा लागला आणि हद्दपारीत काळ कंठावा लागला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ट्युनिशियाच्या स्वातंत्र्य चळवळीस इतर राष्ट्रांचा पाठिंबा मिळावा, म्हणून त्याने मध्यपूर्वेतील देशातून झंजावती दौरे काढले त्यावेळी फ्रान्सने ट्युनिशियास स्वायत्ता देण्याऐवजी सहसार्वभौमत्वाचा मुद्दा काढून तेथील राजेशाही अधिक बळकट करण्याचे धोरण ठरविले.परिणामतः बुर्गीबाने बंडाचा पवित्रा घेऊन गनीमी युद्धतंत्राद्वारे स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्रतर केली आणि संयुक्त राष्ट्रे या संघटनेतही हा प्रश्न नेला तेंव्हा फ्रान्सने पॅरिस येथे त्याची मुक्तता केली (१९५४).ह्याचवेळी फ्रान्सबरोबर ट्युनिशियाच्या स्वातंत्र्यासंबंधी बोलणी करून त्याने एक करार केला. त्या करारान्वये ट्युनिशियाला पुढे २० मार्च १९५६ रोजी स्वातंत्र्य देण्यात आले. स्वतंत्र ट्युनिशियाचा तो पहिला पंतप्रधान झाला(१२एप्रिल१९५६). पुढे राजेशाहीच्या उच्चाटनानंतर जुलै १९५७ मध्ये त्याची राष्ट्राध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नंतर १९६४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याचीच निवड झाली. पुढे अनक्रमे १९७४ व १९७५ मध्ये नव-दस्तूर पक्षाचा आमरण अध्यक्ष व तह्ह्यात राष्ट्राध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली. या दोन्ही पदांव्यतिरिक्त त्याच्याकडे परराष्ट्र व संरक्षण ही खातीही होती

 राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्याने अंतर्गत धोरणात व्यावहारिक दृष्टीकोणठेवून सामान्य माणसाच्या हिताची सुटसुटीत घटना बनविली आणि पाश्चात्य सुधारणांचा पुरस्कार केला. देशात बहुसंख्य असलेल्या मुस्लिम स्त्रियांना स्वातंत्र्य देऊन मतदानाचा हक्क दिला आणि कायदेविषयक अनेक सुधारणा केल्या. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्याने पाश्चात्य देशांकडून आर्थिक मदत घेतली आणि अनेक योजना कार्यवाहीत आणल्या. फ्रेंच लोकांच्या ट्युनिशियातील जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले.

परराष्ट्रीय धोरणात बुर्गीबा अधिक उदारमतवादी व तटस्थ होता त्याचा कल पाश्चात्य राष्ट्रांची विशेषतः अमेरिकेची मैत्री संपादन करण्याकडे होता. म्हणून त्याने अरबराष्ट्रवाद व कम्युनिस्ट राष्ट्रे यांना दूर ठेवून व्हिएटनामच्या बाबतीत अमेरिकेच्या धोरणास पाठिंबा दिला. तसेच अतिरेकी सकल अरबवादाचा पाठपुरावा न करता इस्त्राएलशी प्रत्यक्ष वाटाघटी करण्यावर भर दिला. त्याबद्दल त्याला अरब राष्ट्रांचा रोषही पतकरावा लागला पण१९६७ नंतर त्याची भूमिका बदलली. बुर्गीबावाद म्हणून या धोरणाचा निर्देश करण्यात येतो. आफ्रिका खंडांतर्गत समाजवादी पक्षांची संघटना करण्यात त्याने पुढाकार घेतला आणि त्यांची पहिली परिषद २६ ते २८ एप्रिल १९८१ दरम्यान ट्युनिस येथे भरविली. तिचे अध्यक्षस्थान भूषविण्याचा मानही त्याला मिळाला.  

 बुर्गीबाने फ्रान्सच्या दस्तूर पक्षासंबंधीचे तसेच ट्युनिशियाच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दलचे आपले मौलिक विचार Le Destour et la France (१९३७) आणि La Tunisla et la France (१९५५) या दोन पुस्तकांत व्यक्त केले आहेत.

संदर्भ :

1. Rudebeck, Lars, Party and People : a Study of Political Change in Tunisia, New York, 1967.  

2. Simmon, John Russell, A.S. Change in Tunisla, New York, 1976.

 

शेख, रूक्साना