बुरुशास्की भाषा : काश्मीरच्या पाकव्याप्त प्रदेशातील गिलगिट गावाच्या परिसरातील हुंझा व नगर या भागांत बुरुशास्की भाषा बोलली जाते. सु. २०,००० बुरुशो लोक ही भाषा बोलतात. तिला आजूबाजूचे लोक ‘खाजुना’ असेही म्हणतात.

 इंडो-इराणी, तुर्की, तिबेटो-बर्मी या भाषांनी वेढलेली बुरुशास्की भाषा मात्र या तीनही भाषा समूहातील नाही. मुंडा आणि द्राविडी भाषाशी तिचा संबंध जोडण्याचे प्रयत्नही अयशस्वी झाले. त्यामुळे बुरुशास्की ही जगातील कोणत्याही भाषा-समूहात न बसणारी भाषा आहे, असे म्हणावे लागते. या भाषेला लिपी नाही वाङ्मयपरंपराही नाही. बुरुशास्की आणि वेरचिकवार या एकाच भाषेच्या दोन बोली आहेत असे काहीजण मानतात. बेरचिकवार बोली असणारे ७,५०० लोक यासीन नदीच्या खो ऱ्यात आहेत.

 बुरुशास्की भाषेत नामांचे चार प्रकार आहेत: पुल्लिंगी मानुष स्त्रीलिंगी मानुष पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी सजीव पण मानवेतर आणि काही निर्जीव निर्जीव वस्तू. नाम आणि विशेषणांना लिंगप्रत्ययानुसार बहुवचनी प्रत्ययही लागतात. बुरुशास्की क्रियापंदाना लिंग प्रत्यय आणि तृतीय पुरुषी प्रत्यय लागतात. बुरुशास्कीमध्ये वीसच्या पटीने एक हजारपर्यंत आकडे मोजण्याची पद्धत आहे.

संदर्भ: Lorimer, D.L.Q. The Burushaski Language, Vol.I.II., III, Osio, 1935.

 

धोगडे, रमेश, वा.