बुंदेलखंड विद्यापीठ : उत्तर प्रदेशातील एक विद्यापीठ. राज्यशासनाच्या १९७४ च्या अधिनियमान्वये या विद्यापीठाची झांशी येथे २५ ऑगस्ट १९७५ रोजी स्थापना झाली. विद्यापीठाच्या कक्षेत बांदा, हमीरपूर, जालवन, झांशी आणि ललितपूर ह्या जिल्ह्यांचा अंतर्भाव होतो. विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक आहे. विद्यापीठास सोळा संलग्न महाविद्यालये असून विद्यार्थिसंख्या ३८,५५० (१९७९–८०) होती. १ जुलै ते ३० जून हे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष आहे. विद्यापीठात कला, वाणिज्य, विज्ञान व विधी ह्या चार विद्याशाखा आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना बहिःस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षेस बसण्याची विद्यापीठात सोय आहे. विद्यापीठाचे उत्पन्न व खर्च अनुक्रमे २.४७ कोटी आणि २.२५ कोटी रु. होते. (१९७९–८०).

मिसार, म. व्यं.