बीअरबोम, सरमॅक्स : (२४ ऑगस्ट १८७२ — २० मे १९५६). इंग्रज साहित्यिक आणि मार्मिक व्यंग्यचित्रकार. जन्म लंडनचा. शिक्षण लंडनजवळील चार्टरहाउस ह्या विख्यात शाळेत आणि मर्टन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. कथा, कादंबरी, ललित निबंध, विडंबनात्मक लेख, नाट्यसमीक्षणे असे विविध प्रकारचे लेखन त्याने केले उत्कृष्ट व्यंग्यचित्रे काढली. आपल्या लेखनाद्वारा त्याने व्हिक्टोरियन कालखंडातील अनेक प्रवृत्तींचे व आचारविचारांचे विडंबन केले. तसेच जोसेफ कॉनरॅड, हेन्‍री जेम्स, टॉमस हार्डी आदी साहित्यिकांची हासकचित्रे (कॅरिकेचर्स) रेखाटली. १९३९मध्ये त्याला ‘सर’ हा किताब देण्यात आला.

मॅक्स बीअरबोमचे लेखन सुगम, डौलदार आणि विनोदगर्भ असून त्याच्या स्वभावातला विलोभनीय गोडवा आणि खिलाडू वृत्ती त्यातून स्पष्टपणे प्रतीत होतात. मोजक्याच रेषांनी दुसऱ्याचे व्यंग नेमके चित्रित करण्याचे त्याचे जे कौशल्य त्याच्या व्यंग्यचित्रांत दिसून येते, तेच त्याच्या ललित निबंधांतून आणि विडंबनात्मक लेखांतून प्रत्ययास येते.

बीअरबोमचे विशेष उल्लेखनीय लेखन व चित्रसंग्रह असे : कथासंग्रह — सेव्हन मेन (१९१९) कादंबरी — झुलेखा डॉब्‌सन (१९११) निबंधसंग्रह — द वर्क्स ऑफ मॅक्स बीअरबोम (१८९६), मोअर (१८९९), अँड ईव्हन नाउ (१९२०), विडंबनलेख — क्रिसमस गार्लंड (१९१२) व्यंगचित्रे — द पोएट्स कॉर्नर (१९१४), रोसेटी अँड हिज सर्कल (१९२२).

द सॅटरडे रिव्ह्यू ह्या सुप्रसिद्ध नियतकालिकातून त्याने अनेक वर्षे नाट्यसमीक्षात्मक लेखन केले. इटलीतील रापाल्लो येथे तो निधन पावला.

बापट, गं. वि.