बिस्मार्क : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी नॉर्थ डकोटा राज्याची राजधानी व बर्ली काउंटीचे मुख्यालय. लोकसंख्या ४४,५०२ (१९७०). हे फार्गोच्या पश्चिमेस ३०५ किमी. अंतरावर मिसूरी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. लोहमार्गाच्या कामासाठी आलेल्या लोकांच्या संरक्षणासाठी एक लहानसे लष्करी ठाणे म्हणून १८७२ मध्ये हे वसविण्यात आले. उत्तर पॅसिफिक लोहमार्गाच्या उभारणीसाठी जर्मनांची मदत मिळावी, म्हणून १८७३ मध्ये जर्मनीच्या ऑटो फोन बिस्मार्क याच्या नावावरून शहरास हे नाव देण्यात आले. येथून जवळच असलेल्या ’ब्लॅक हिल्स’मध्ये सोन्याच्या खाणींचा शोध लागल्याने शहराच्या विकासास चालना मिळाली. १८८३ मध्ये डकोटा विभागाची (टेरिटरीची) राजधानी येथे होती. त्याच्या विभाजनानंतर (१८८९) नॉर्थ डकोटाची ही राजधानी बनली.
शहराच्या आसमंतात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असलेल्या गहू, बार्ली, लोणी इत्यादींची ही मोठी बाजारपेठ आहे. शेतीचे अवजारे, अन्नप्रक्रिया, बांधकाम-साहित्य इ. उद्योगधंदे येथे विकसित झालेले आहेत. हे शहर राज्यातील प्रमुख शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असून येथील ’स्टेट हिस्टॉरिकल सोसायटी लायब्ररी’, ’स्टेट लॉ लायब्ररी’ उल्लेखनीय आहेत. शहरात अनेक उद्याने अढळतात. येथून ट्रिब्यून हे दैनिक प्रसिद्ध होते. येथे दरवर्षी कलाप्रदर्शन भरते. नदीतीराच्या पलीकडील ’फोर्ट लिंकन स्टेट पार्क’ला ऐतिहासिक महत्त्व आहे. राष्ट्राध्यक्ष थीओडोर रूझवेल्ट यांनी वास्तव्य केलेली कुटी येथे आहे.
गाडे, ना. स.