बिल्डरडाइक, व्हिलेम : (७ सप्टेंबर १७५६ – १८ डिसेंबर १८३१). डच कवी. जन्म ॲम्स्टरडॅमचा. बिल्डरडाइकचे कुटुंबराजनिष्ठ आणि कॅल्व्हीन पंथीय होते. १७८२ मध्ये लायडन विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर हेग येथे त्याने १७९५ पर्यंत वकिली केली. फ्रेंचानी स्थापन केलेल्या बटेव्हियन रिपब्लिकला निष्ठा वाहण्यास नकार दिल्यामुळे त्याला १७९५ मध्ये परागंदा व्हावे लागले. १८०६ मध्ये तो नेदर्लंड्सला परतला. ल्वी बोनापार्टच्या राजवटीत त्याला राजाश्रय लाभला. १८१४ मध्ये नेदर्लंड्सची सत्ता पुन्हा ऑरेंज घराण्याकडे आल्यानंतर ॲम्स्टरडॅम येथे प्राध्यापकाची मानाची जागा आपणास मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती पण ती फोल ठरली. आपले उर्वरित आयुष्य त्याने इतिहास आणि साहित्य ह्या विषयांचे खाजगी अध्यापन करण्यात घालविले. हार्लेंम येथे तो निधन पावला.
बिल्डरडाइकच्या व्यक्तिमत्त्वात विवेकवाद-स्वच्छंदतावाद कॅल्व्हिन पंथनिष्ठा आणि भावेत्कटता अशा प्रस्परविरोधी प्रवृत्ती व प्रेरणा एकत्र आलेल्या होत्या. ह्या वस्तुस्थितीचा परिणाम त्याच्या काव्यावरही झालेला आहे. तसेच ह्या विसंवादांमुळे त्याचे व्यक्तिमत्त्वही वादग्रस्त ठरले. भावना हा जीवनाचाच मूलस्रोत असून कवित्वशक्ती ही ईश्वरी देणगी आहे, अशी त्याची श्रद्धा होती. तसेच कवीचे कार्य प्रेषिताचे आहे, असे तो मानीत असे. राजेशाहीबद्दलच्या त्याच्या कल्पना अद्भुतरम्य होत्या आणि लोकसत्ताक राज्याची कल्पना त्याला पूर्णतः नापसंत होती.
भावकविता, दीर्घ कथाकाव्ये, बॅलड, महाकाव्य असे विविध काव्यप्रकार बिल्डरडाइकने हाताळले. त्याची बरीचशी कविता नव-अभिजाततावादी शैलीत लिहिलेली असून मुख्यतः वैचारिक स्वरूपाची आहे. तथापि तीत स्वच्छंदतावादी प्रवृत्तीही दिसून येत असल्यामुळे तो डच स्वच्छंदतावादाचा पूर्वसूरी मानला जातो. नव-अभिजाततावादी काव्यनियमांवर त्याने टीकाही केली. ‘द डिसीस ऑफ द लर्नेड’ (१८०७, इं. शी.) आणि ‘द डिस्ट्रक्शन ऑफ द फर्स्ट वर्ल्ड’ (१८२०, इं. शी.) ह्या त्याच्या उल्लेखनीय काव्यकृती. ‘द डिस्ट्रक्शन ऑफ द फर्स्ट वर्ल्ड’ हे बिल्डरडाइकचे अपूर्ण राहिलेले महाकाव्य होय.
भाषाशास्त्र आणि इतिहास या विषयांतही बिल्डरडाइकने लेखन केले. ‘प्रिन्सिपल्स ऑफ वर्ड स्टडी’ (१८३१, इं. शी.) व ‘पॅट्रिअटिक हिस्टरी ऑफ हॉलंड’ (१८३२ – ५३, इं. शी.) हे त्याचे दोन ग्रंथ त्या दृष्टीने निर्देशनीय आहेत.
कुलकर्णी, अ. र.