बिबळ्या : हा फेलिडीतील (मार्जार कुलातील) एक प्राणी असून याचे शास्त्रीय नाव पँथेरा पार्डस आहे. आफ्रिका व आशिया खंडांत तसेच भारतात हा सर्वत्र आढळतो. याच्यात व माणसाळविलेल्या मांजरात पुष्कळ साम्य आहे, हा प्राणी दिसण्यात मोहक असून शक्तिमान व चलाख आहे. मांजराप्रमाणेच याचे डोके गोल आणि नाक लहान व चपटके असते. याचे शेपूट लांब व सडपातळ असते. याची नखे तीक्ष्ण, लांब व प्रतिकर्षी (आत ओढून घेता येणारी) असतात. याचे दातही तीक्ष्ण व लांब असून सिंहापेक्षाही मजबूत असतात. याचे कातडे पिवळसर रंगाचे असून त्यावर आखूड केस व काळे, गोल ठिपके असतात. पोट व पायाचा आतील भाग पांढरा असतो. निरनिराळ्या प्रदेशांत राहणाऱ्या बिबळ्यांचे ठिपक्यांचे नमुने वेगवेगळे असतात. साधारणतः बिबळ्यांची कोणतीही दोन कातडी अगदी सारखी असत नाहीत. शरीराच्या बाजूंस, डोक्यावर आणि पायांवर हे ठिपके नुसते विखुरलेले असतात पण पाठीवर मात्र या ठिपक्यांचे गट आढळतात. आफ्रिकेच्या बिबळ्यात हे ठिपके लहान आकाराचे, तर आशियातील बिबळ्यात ते मोठ्या आकाराचे असतात. भारतातील डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या बिबळ्याच्या अंगावरचे ठिपके विरळ असतात पण जरी असे फरक असले, तरी सर्व बिबळे शास्त्रीय दृष्ट्या एकाच जातीत मोडतात.

बिबळ्या

बिबळ्याचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) मध्य व दक्षिण अमेरिकेत सापडले आहेत. मार्जार कुलातील हा प्राणी इतर मार्जार प्राण्यांपेक्षा सर्वांत आधी अस्तित्वात आला असावा. मायोसीन (सु. १.२ ते २ कोटी वर्षांपूर्वीच्या ) काळात हा प्राणी असावा, असे जीवाश्मांवरून वाटते. बिबळ्याची उत्पत्ती प्रथम सायबीरियात झाली. सायबीरियातून तो यूरोप, आफ्रिका व आशियाच्या इतर भागांत गेला आणि तेथून आसाममार्गे भारतात आला. बिबळ्याची वाढ कोणत्याही हवामानात होते. घनदाट जंगल, मोकळे गवती रान, वाळवंटी प्रदेश, खडकाळ डोंगरी भाग, हिमालयातील २,५०० ते ३,००० मी. उंचीचा प्रदेश या सर्व ठिकाणी तो आढळतो. आर्. आय्. पोकॉक यांच्या मते आशियातील बिबळ्यांच्या एकूण ११ जाती आहेत. त्यांपैकी भारतात ३ जाती आढळतात. कोचीनजवळ लहान आकाराची काळ्या रंगाची जाती आढळते. अशीच जाती आसामातही आढळते. हजारीबाग येथे पांढऱ्या रंगाचा (अल्बिनो) बिबळ्या आढळला होता.

बिबळ्या कावेबाज असतो. तो चांगला पोहणाराही आहे आणि त्याला झाडावर चढता येते. तो झाडावर लपून बसून येणाऱ्या जाणाऱ्या प्राण्यावर झडप घालतो व मारलेले भक्ष्य दाट झाडीत नेऊन लपवून ठेवतो. शिकार करताना त्याच्या पावलांचा आवाज होत नाही कारण त्याची पावले मांसल असतात. पुढच्या पायांना चार व मागच्या पायांना पाच नख्या असतात. डोळे गोलाकार व बुबळे हिरवट रंगाची असतात. त्याचे श्रवणेंद्रिय तीक्ष्ण आणि दृष्टी उत्तम असते. ससा, कुत्रा, डुक्कर, हरिण, बॅबून इ. प्राणी याच्या भक्ष्यस्थानी पडतात. मनुष्यवस्तीजवळ राहून शेळ्या, मेंढ्या, वासरे, कोंबड्या वगैरे प्राणी पळविण्यात हा पटाईत आहे. कधीकधी तो नरभक्षकही बनतो. नर बिबळ्याची लांबी २१५ सेंमी.पर्यंत असते. मादी थोडी लहान म्हणजे १५०-१७५ सेंमी. लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन सरासरी ६८ किग्रॅ. तर मादीचे ५० किग्रॅ. आढळले आहे. खांद्यापर्यंतची उंची ८० सेंमी.पर्यंत असते. नरमादी एकत्र राहत नाहीत पण समागमाचे वेळी एकत्र येतात. सर्व ऋतूंत यांची वीण होते. गर्भावधी सरासरी ९० दिवसांचा असतो व एका वेळी मादी २ ते ४ पिलांना जन्म देते. बिबळ्याचे आयुर्मान १५ ते २५ वर्षे असते.

दातार, म. चिं.