बिजू : हा मांसाहारी सस्तन प्राणी मुस्टेलिडी कुलाच्या मेलिनी उपकुलातील आहे. याचे चार-पाच वंश असून सात-आठ जाती आहेत. यांपैकी चिनी फेरेट-बॅजर (बिजू) व ब्रह्मी फेरेट-बिजू या जाती भारतात आढळतात. या दोन्ही जातींत प्राण्यांच्या शरीराची लांबी सु. ४५ सेंमी. व शेपटाची सु. २३ सेंमी. असते. या दोन्ही जातींच्या दंतरचनेत फरक आहे. चिनी फेरेट-बिजूच्या दाढा लहान व त्यावर निरूंद उंचवटे असतात, तर ब्रह्मी फेरेट-बिजूच्या दाढा मोठ्या व त्यांवर रुंद उंचवटे असतात. दोन्ही जातींचा रंग सारखाच असतो. केसांचे आवरण दाट जांभळसर करड्या रंगापासून ते तपकिरी रंगापर्यंतच्या छटा दाखविते. लांब केसांची टोके रंगरहित असतात. त्यामुळे सर्वांगावर एक प्रकारची रुपेरी तकाकी दिसते. तोंडावर, गालांवर व शरीराच्या अधरपृष्ठावर (खालच्या बाजूवर) पांढरी छटा आढळते. डोक्यापासून पाठीवरून शेपटापर्यंत पांढऱ्या केसांचा एक पट्टा आढळतो. चिनी फेरेट-बिजू आसाम, ब्रह्मदेश, दक्षिण चीन व इंडोचायना या प्रदेशांत आढळतो, तर ब्रह्मी फेरेट-बिजू हा नेपाळ ते आसाम, ब्रह्मदेश, थायलंड आणि व्हिएटनाम या प्रदेशांत आढळतो. चीनमध्ये याच्या फरला ‘पाहमी’ असे म्हणतात.

भारतात हे प्राणी उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांतील जंगलांत सापडतात. हे प्राणी निशाचर आहेत. दिवसा हे स्वतः केलेल्या किंवा नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या बिळात किंवा वृक्षांच्या ढोलीत राहतात. ते आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ जमिनीवर धावतात. काही वेळा झाडावर चढूनही ते आपल्या भक्ष्याचा पाठलाग करतात. साधारणपणे हे मांसाहारी प्राणी आहेत पण काही वेळा ते फळेही खातात.

आसामातील जंगलात राहणाऱ्या काही आदिवासी जमाती या प्राण्यांना आपल्या झोपड्यांत प्रवेश देतात व त्यांच्याकरवी झुरळे व इतर कीटकांचा नाश करवून घेतात. हे प्राणी काही झाडांची मुळे व गांडुळे यांवरही उपजीविका करतात. याकरिता त्यांची तीक्ष्ण नखे व मुस्कट यांचा त्यांना फार उपयोग होतो. याच्या गुद ग्रंथीची (गुदद्वाराजवळ असलेल्या दुर्गंधी बाहेर टाकणाऱ्या ग्रंथीची ) विशेष वाढ झाल्यासारखे दिसत नाही. या प्राण्यांची निर्भय वृत्ती व चिकाटी या समूहातील इतर प्राण्यांसारखीच आहे. यांखेरीज हे प्राणी घृणास्पद व भयसूचक रंग असणारे आहेत. यांच्या विणीबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. सर्वसाधारणपणे मादी एका वेळेस तीन पिलांना जन्म देते. पूर्ण वाढ होईपर्यंत पिले अंगावर पितात.

आ. १ चिनी बिजू आ. २. सामान्य बिजू

डुकरासारखे मुस्कट असलेली आणखी एक बिजूची जाती भारतात आढळते. हिला द हॉग-बिजू (आर्क्टोनिक्स कोलॅरिस) असे म्हणतात. या जातीच्या बिजूचे मुस्कट लांब असते. मुस्कटाच्या टोकाशी नाकपुड्या असतात. याचा रंग काळ्या पांढऱ्या रंगांच्या मिश्रणासारखा असतो. हे प्राणी आसाम, पूर्व हिमालय, ब्रह्मदेश, तिबेट, चीन, थायलंड व मलाया येथे आढळतात.

यूरोप आणि आशिया खंडांत आढळणाऱ्या बिजूला सामान्य बिजू म्हणजे ‘द कॉमन बॅजर’ (मेलिस मेलिस) असे म्हणतात.याची लांबी सरासरी ९० सेंमी. असते यात १० ते १५ सेंमी. लांब शेपटाचा समावेश आहे. याचे वजन सरासरी १५ किग्रॅ. असते. नराचे वजन मादीच्या वजनापेक्षा जास्त असते. या उकिडव्या बसणाऱ्या प्राण्याचे डोके सपाट असते. कान व डोळे लहान असतात. रंग मिश्र असतो. याचे कारण प्रत्येक केस मुळाजवळ पिवळा, मध्यावर काळा व टोकाजवळ करडा असतो. डोके पांढरे व मुस्कट काळे असते. डोळ्याच्या पुढे दोन काळ्या रेषा सुरू होऊन त्या कानांवरून हळूहळू कमी होत पाठीवर लुप्त होतात. मान काळी असते. केस उत्थानक्षम (ताठ उभे राहणारे) असतात. धोक्याची सूचना मिळताच केस उभे राहतात व या स्थितीत प्राण्याचा आकार जवळजवळ दुप्पट होतो. हा प्राणी अत्यंत लबाड आहे आणि त्याला सहजासहजी पकडता येत नाही.


यांची बिळे फार स्वच्छ असतात. जमिनीवर खड्डे (दुसरी बिळे) खणून ते त्यांचा संडासासारखा (म्हणजे विष्ठा टाकण्यासाठी) उपयोग करतात. बिळास आतून वाळलेल्या गवताचे अस्तर असते. हे आपल्या बिळातून सूर्यास्तापूर्वी बाहेर पडत नाहीत. हे समूहाने राहणारे प्राणी आहेत. हे समूह त्यांच्याच लागोपाठच्या पिढ्यांतील प्राण्यांचे असतात. या समूहातील कुटुंबे स्वतंत्र रीत्या एकाच शेकडो मीटर लांबीच्या बिळात आढळतात. स्कँडेनेव्हिया, पोलंड व उत्तर रशिया या प्रदेशांत हिवाळ्यात ते शीतनिष्क्रियतेच्या (हिवाळ्यात येणाऱ्या अर्धवट वा पूर्ण गुंगीच्या) अवस्थेत असतात पण पश्चिम यूरोपात मात्र ही स्थिती आढळत नाही. उन्हाळ्यात नरमादीचे मीलन व अंड्याचे फलन होते पण अंड्याचे म्हणजे आद्य भ्रूणाचे गर्भाशयात रोपण (गर्भाशयाच्या अंतःस्तराला चिकटले जाण्याची क्रिया) उशिराने म्हणजे डिसेंबर-जानेवारीत होते व मार्च-एप्रिलच्या सुमारास बिळात मादी दोन ते चार पिलांना जन्म देते. जन्मल्यापासून एक आठवड्याने पिलाचे डोळे उघडतात व ती सु. महिन्याची झाली की, त्यांचे अंगावरचे पिणे तोडले जाते. या वयातील पिलांचे केस मऊ असतात व त्यांची कातडी फर म्हणून जमविली जातात. हा प्राणी माणसाळविला जातो व घरात तो घाण करत नाही. याची आयुर्मर्यादा सरासरी १५ वर्षे आहे.

बिजू हे प्राणी निशाचर आहेत. ते उंदीर, घुशी, ससे व इतर लहान पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यावर उपजीविका करतात. यांच्या आहारात गांडुळांचाही समावेश असतो. पिलांना अंगावर पाजणारी मादी फक्त गांडुळांवरच जगते. ते पक्ष्यांची अंडी व लहान पक्षीही खातात. काही वेळा ते वनस्पती व मध यांचेही भक्षण करतात. हवामान वाईट असले, तर ते बिळाबाहेर पडत नाहीत. 

अमेरिकन बिजू (टॅक्सीडीया टॅक्सस ) हा प्राणी कॅनडाच्या नैर्ऋत्य प्रदेशात व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उत्तरेकडून मेक्सिकोपर्यंतच्या प्रदेशात आढळतो. याचे वास्तव्य कोरड्या व उघड्या जमिनीवर असते. याची लांबी ४२ ते ७२ सेंमी. आणि शेपटाची लांबी १० ते १५ सेंमी. इतकी व वजन ३.५ ते १० किग्रॅ. इतके असते. याच्या पाठीचा वरचा भाग करडा ते लालसर रंगाचा असतो. नाकापासून खांद्यापर्यंत पांढरा पट्टा असतो. तोंडावर व गालावर काळे ठिपके असतात. हनुवटी, गळा व अधर भाग पांढरा असतो. पाय दाट तपकिरी ते काळसर रंगाचे असतात. बाजूचे केस जास्त लांब असतात. गुद ग्रंथी गुदद्वाराजवळ असते. उत्तर अमेरिका खंडात हा एकच बिजू आढळतो.बिजू हा एकाकी राहणारा प्राणी निशाचर असला, तरी दिवसाही क्रियाशील असतो. हे फार जलद गतीने व सफाईने बिळे करतात. यांच्या आहारात कृंतक (कुरतडणाऱ्या) व इतर प्राण्यांचा समावेश असतो. जर त्यांनी मोठा ससा मारला, तर तो ते बिळात नेऊन ठेवतात व बरेच दिवस त्याच्या मांसावर जगतात. या काळात ते बिळातून बाहेर पडत नाहीत. सामान्य बिजूप्रमाणे हे बिजूही आपली विष्ठा टाकण्यासाठी निराळी बिळे करतात. बर्फाच्छादित जमिनीत असलेल्या बिळांत बिजू निद्रा घेतात व बर्फ वितळून जाईपर्यंत बाहेर येत नाहीत. यांच्या बिळांमुळे गाईबैल व घोडे यांना फार त्रास होतो. धावताना गुरांचे व घोड्यांचे पाय या बिळांत रुततात व त्यांना इजा होते. यांची वीण ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांत होते. फलित अंड्याचे गर्भाशयात रोपण फेब्रुवारीत होते. गर्भाची पूर्ण वाढ होण्यास सरासरी सहा आठवडे लागतात. मादी एका वेळी एक ते पाच (सर्वसाधारणपणे दोन) पिलांना जन्म देते. प्राणिसंग्रहालयात या बिजूचे आयुष्य सरासरी १३ वर्षे असल्याचे आढळले आहे. 

आ. ३. अमेरिकन बिजू

सर्वसाधारणपणे बिजू हा शेतकऱ्यांना उपयुक्त असा प्राणी आहे कारण तो भुंगेऱ्यांचे डिंभ (अळ्या), उंदीर व ससे या शेतकऱ्यांस उपद्रवी ठरलेल्या प्राण्यांचा नाश करतो. याच्या केसांचे निरनिराळ्या प्रकारचे कुंचले तयार करतात. उदा., बरीच वर्षे दाढी करण्याकरिता वापरले जाणारे ब्रश बिजूच्या केसांचे बनवीत असत. मात्र आता या केसांऐवजी कृत्रिम तंतूंचा वाढता वापर होऊ लागला आहे. फर उद्योगात याची फर वापरली जाते तसेच याच्या कातड्याचे बुरणूसही बनवितात.

पहा : बाजरा.

संदर्भ : 1. Prater, S. H. The Book of Indian Animals, Bombay. 1965. 

          2. Walker, E. P. Mammals of the World Vol. II. Baltimore, 1964.

 इनामदार, ना. भा. भट, नलिनी