बिकीनी : पश्चिम मध्य पॅसिफिक महासागरात ११0 ३५’ उत्तर अक्षांश व १६५0 २५’ पू. रेखांश यांवर मार्शल बेटांच्या रांगेत, हे प्रवाळ कंकणद्वीप असून त्याचे क्षेत्रफळ ५.२ चौ. किमी. आहे. क्वाजालेन बेटाच्या वायव्येस ते ३६० किमी.वर आहे. रशियन दर्यावर्दी ऑटो फोन कोट्सेबू याने प्रथम १८२५ च्या सुमारास एक निर्मनुष्य बेट म्हणून ते नकाशात दाखविले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी या बेटास एस्चोल्त्स प्रवाळ कंकण म्हणत. हे बेट १९४४ मध्ये जपानकडून अमेरिकन नौसेनेच्या आधिपत्याखाली आले. संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त पद्धतीनुसार अमेरिकेकडे १९४७ मध्ये हे बेट सुपूर्द करण्यात आले. तेव्हापासून पॅसिफिक ट्रस्ट टेरिटरी म्हणून हा अमेरिकेचा भाग आहे.
अमेरिकेने १९४६ मध्ये अणुचाचण्या सुरू केल्या. अणुस्फोटाचा जहाजांवर काय परिणाम होतो, ते पाहण्यासाठी ‘ऑपरेशन क्रॉसरोड्स’ हा शांततेच्या काळातील अणुचाचणीचा प्रयोग सुरू झाला. त्या वर्षीच्या १ जुलैला हवेत व २५ जुलैला पाण्याखाली स्फोट करण्यात आले. त्याअगोदर बेटावरील मूळ रहिवाशांना प्रथम राँगरिक येथे व ती जागा अपुरी पडू लागल्यावर १९४९ मध्ये कीली बेटावर हलविण्यात आले. नंतर १९५४, १९५६ व १९५८ ह्या तीन वर्षांत मिळून २१ चाचण्या घेण्यात आल्या. पहिल्या हैड्रोजन बाँबची चाचणी (१९५६) येथेच घेण्यात आली. १ मार्च १९५४ रोजी केलेल्या चाचणीच्या वेळी अणुधूळ अनपेक्षित रीत्या आसपासच्या प्रदेशात पसरल्याने अणुप्रदूषणाची व्याप्ती वाढली व अणुप्रदूषणाच्या संशोधनाला चालना मिळाली. ह्या चाचण्या १९५८ मध्ये थांबल्या, तथापि किरणोत्सर्गाच्या भयाने मूळ रहिवाशांना बेटावर परत येऊ दिले नाही. अमेरिकन शास्त्रज्ञांनी १९६४ व १९६७ मध्ये या भागाचे सर्वेक्षण केले. १९६९ मध्ये सहा वर्षांचा महत्त्वाकांक्षी पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि प्राथमिक किरणोत्सर्ग प्रतिबंधक उपाययोजना केल्यावर, माणसांनी हे बेट पुन्हा गजबजून गेले.
येथील मूळचे लोक मलायो पॉलिनीशियन वंशाचे असून त्यांच्यामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती रूढ होती. नारळ, मासे, आरारूट ही येथील प्रमुख उत्पादने होती. बदललेल्या पर्यावरणामुळे नारळाची पुन्हा लागवड करण्याबाबत अनिश्चितता आहे. म्हणून पर्यटन व्यवसायाचा विकास करण्यावर भर दिला जात आहे.
अमेरिकेने १ जुलै १९४६ मध्ये प्रथम येथे अणुस्फोटाची चाचणी घेतल्यानंतर चारच दिवसांनी पॅरिसमध्ये एका फॅशन प्रदर्शनाच्या वेळी मिचेलिन बर्नार्डी ह्या नर्तकीने स्त्रियांसाठी पोहण्याच्या पेहरावाचा एक नवा प्रकार सादर केला. लुई रेअर्ड ह्या फ्रेंच अभकल्पकाने तो तयार केला होता. तेव्हापासून ‘बिकीनी’ हे त्या पेहरावाचे नाव जगभर प्रसिद्ध झाले आहे.
पंडित, अविनाश डिसूझा, आ. रे.