बॉक्सर बंड : (१८९८-१९००). पाश्चात्त्यांच्या वाढत्या वर्चस्वाविरुद्ध चिनी लोकांनी केलेला सशस्त्र उठाव. या उठावाच्या संघटनेतील बहुसंख्य सदस्य कसरतपटू किंवा बलदंड तरूण होते, म्हणून यूरोपीय लोकांनी त्यांना बॉक्सर (मुष्टियोद्धे) हे नाव दिले. या उठावाच्या मागे अनेकविध कारणे होती. ⇨ अफूच्या युद्धांत (१८४२ व १८५६) चीनचा पराभव झाल्यामुळे पाश्चात्य देशांचे चीनवर वर्चस्व स्थापन झाले आणि त्यांना चीनमध्ये अनेक व्यापारी सवलती मिळाल्या तसेच ख्रिस्ती मिशनऱ्यांना पाश्चात्य सत्तांचा पाठिंबा मिळाल्यामुळे चीनमध्ये कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथांचा प्रसार जनविरोध असतानासुद्धा त्यांनी जोरात केला. १८९४ – ९५ मध्ये चिनी-जपानी युद्धात जपानच्या विजयामुळे त्याचे वर्चस्व चीनमध्ये वाढले व मांचू राजवटीची मानहानी झाली. पाश्चात्य लोक हळूहळू चीनमधील जमिनींची मागणी करू लागले व विशेष अधिकार मागू लागले. पाश्चात्यांच्या या वाढत्या प्रभावास प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांना नामशेष करून देशातून हाकलून लावण्यासाठी तसेच देशाची मानहानी होत असतानासुद्धा त्यांना सहकार्य देणारे मांचू शासन उद्ध्वस्त व्हावे, म्हणून ई-ह-थ्वान नावाची गुप्त संघटना धार्मिक व राजकीय तत्त्वांवर स्थापन झाली. या संघटनेतील सदस्यांनी परकीय म्हणून जे जे दिसेल ते नष्ट करण्याचा चंग बांधला. चीनच्या जनतेनेही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. या संघटनेचे माचू राजवटीविरुद्ध धोरण बदलण्यासाठी त्या काळची राजपालक सम्राज्ञी त्स-स्यीने या गुप्तसंघटनेस उघड पाठिंबा जाहीर केला. संघटनेच्या अनुयायांनी चीनमधील ख्रिस्ती धर्मपीठे, टपालखाते, रेल्वे, शाळा, राहती घरे इत्यादींची मोडतोड करून सर्वत्र धुमाकूळ घातला. त्यांना चिनी शासकीय सैन्यदलही सहकार्य देत असे. हळूहळू बंडखोरांनी सैन्याच्या मदतीने २१ जून ते १४ ऑगस्ट १९०० च्या दरम्यान पीकिंगमधील चर्च-वास्तू उद्ध्वस्त केल्या आणि परदेशी वकिलातींवर हल्ले करून तेथील कार्यालये, चर्चे जाळली व अनेक परकीयांची कत्तल केली. तेव्हा फ्रान्स, इंग्लंड, जपान, रशिया या देशांनी बचावासाठी सैन्य बोलावले. या सैन्याने बंडखोरांवर चढाई करून त्यांचा पराभव केला. या युद्धात पाश्चात्य सैन्यानेही चीनमध्ये बरीच नासधूस केली. शेवटी मांचू राजवट व पाश्चात्य देशांचे प्रतिनिधी यांत ७ सप्टेंबर १९०१ रोजी तहनामा होऊन मांचू राजवटीने नुकसान भरपाई म्हणून सु. ३३ कोटी डॉलर्स देण्याचे कबूल केले आणि पाश्चात्यांच्या अनेक अपमानास्पद मागण्या मान्य केल्या पण पाश्चात्यांबद्दलचा व मांचू राजवटीबद्दलचा एकूण असंतोष मात्र यामुळे कमी झाला नाही. त्यानंतर दहा वर्षांनी मांचू राजवटीविरूद्ध बंड होऊन ती नष्ट झाली आणि चिनी गणराज्याची स्थापना झाली.
संदर्भ : O’Connor, Richard, The Spirit Soldiers : a Historical Narrative of the Boxer Rebellion, London, 1973.
शेख, रुक्साना