बाहु : खांद्यापासून मनगटापर्यंतच्या शरीरभागाला ‘बाहू’ म्हणतात. सर्वसाधारणपणे बाहूमध्ये खांद्यापासून बोटांसहित संपूर्ण अवयवाचा समावेश केला जातो. शरीररचनाशास्त्रदृष्ट्या ‘बाहू’ ही संज्ञा खांद्यापासून कोपरापर्यंतच्याच भागाला लावतात. हाच भाग सर्वसाधारणपणे ‘दंड’ या नावाने ओळखला जातो. या भागाला ‘ऊर्ध्वशाखा’ आणि ‘भुजा’ अशाही संज्ञा देतात. विश्वकोशात ‘मनगट’ व ‘हात’ या विषयांवर स्वतंत्र नोंदी आहेत. प्रस्तुत नोंदीत प्रथम बाहूच्या ⇨ भ्रूणविज्ञानासंबंधी माहिती देऊन नंतर (१) दंड आणि (२) प्रबाहू अथवा उपभुजा यांविषयी माहिती दिली आहेत.
दंड : भुजास्थी नावाचे लांब, बळकट व गोलसर हाड, त्यावरील दणकट स्नायू, त्यांना पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या व तंत्रिका (मज्जातंतू), लसीका वाहिन्या [⟶ लसीका तंत्र] आणि या सर्वांना आच्छादणारी त्वचा मिळून शरीराचा दंड हा भाग बनलेला आहे. भुजास्थीचे वरचे टोक, स्कंधास्थी (पाठीवर वरच्या बाजूस असलेले चापट त्रिकोणी हाड) आणि जत्रु-अस्थी (छातीच्या वरच्या भागी असलेले खांदा आणि मान यांमधील आडवे हाड) मिळून खांद्याचा सांधा बनतो आणि या सांध्याच्या संधिबंधापेक्षा दणकट स्नायूंनी दंड धडाला बांधलेला असतो. या स्नायूंमुळे दंडाच्या अनेक हालचाली होतात. अपवर्तन (छातीपासून दूर जाणे), अभिवर्तन (छातीजवळ येणे) व पर्यावर्तन (गोलाकार फिरणे) या दंडाच्या हालचाली स्कंधसंधीमुळे होतात. मध्यभागी उरोस्थी (छातीच्या मध्यावरील चपटे हाड) दोन्ही बाजूंस जत्रु-अस्थी आणि पाठीच्या बाजूस दोन स्कंधास्थी मिळून ‘अंसमेखला’ तयार होते. भुजास्थीचे खालचे टोक काहीसे विस्तारित असते आणि ते व प्रबाहूतील (कोपर आणि मनगट यांच्यामधील बाहूचा भाग) दोन हाडे मिळून कोपराचा सांधा बनतो. भुजास्थीच्या दोन टोकांमधील अस्थिभाग दंडगोलाकार असून त्याला ‘अस्थिदंड’ म्हणतात. भुजास्थीच्या खालच्या टोकाजवळचा काही भाग वगळल्यास ते पूर्णपणे स्नायूंनी आच्छादित असते. पुढच्या बाजूस अगदी बिलगून भुजस्नायू आणि त्यापुढे द्विशिर स्नायू असतात, तर मागच्या बाजूस त्रिशिर स्नायू असतो. हे स्नायू मिळून दंडाचा भरीवपणा व गोलाकार निर्माण होतो.
भुजास्थी : वर्णनाकरिता भुजास्थीचे पुढील भाग पाडतात : (अ) वरचे टोक, (आ) अस्थिदंड आणि (इ) खालचे टोक.
खालचे टोक : खालचे टोक स्थूलकासारखे (गाठाळलेल्या वाटोळ्या टोकासारखे) असते. त्याच्या दोन्ही बाजूंस अधिस्थूलके असतात व त्यांना ‘अभिमध्य अधिस्थूलक’ आणि ‘पार्श्व अधिस्थूलक’ अशी नावे आहेत. प्रबाहूतील अरास्थी अथवा बाह्यास्थी आणि प्रबाहू-अंतरास्थी व खालच्या टोकावरील दोन संधिपृष्ठभाग मिळून कोपराचा बिजागरी सांधा बनतो. बाह्यास्थीशी संलग्न असलेल्या संधिपृष्ठाला ‘अस्थीगुच्छ’ (हाडाचा गुठळीसारखा भाग) आणि अंतरास्थी संलग्न असलेल्या भागाला ‘कप्पी’ म्हणतात. खालच्या टोकाला अग्र पृष्ठभागावर कप्पीच्या वर एक खळगा असतो व त्यात प्रबाहू दंडाजवळ आणते वेळी अंतरास्थीच्या वरच्या टोकावर अग्र बाजूस असलेला काकचंचुसदृश (कावळ्याच्या चोचीच्या आकाराचा) प्रवर्ध (पुढे आलेला भाग) सामावला जातो अस्थिगुच्छाच्या वरही छोटा खळगा असून याच क्रियेत बाह्यास्थीचा शीर्षभाग सामावला जातो. खालच्या टोकाच्या पश्च भागावर एक काहीसा मोठा खळगा असतो व कोपर सरळ केले असता अंतरास्थीचा कफोण्यग्र प्रवर्ध त्यात सामावला जातो. या खळग्याला ‘कफोण्यग्र खाच’ म्हणतात.
स्नायू: दंडातील स्नायूंची विभागणी (अ) अग्र गट व (आ) पश्च गट अशा दोन गटांत केली आहे. याशिवाय दंडाचा वरचा व पार्श्वभाग अधिस्कंध नावाच्या स्नायूने वेष्ठिलेला असून तो खांद्याच्या विशिष्ट आकारास कारणीभूत असतो.
अग्र गट : या गटात (१) काक-भुजी, स्नायू, (२) भुज अस्थिस्नायू आणि (३) द्विशिर स्नायू यांचा समावेश होतो.
(१) काक-भुजीय स्नायू : हा अभिमध्य बाजूस असून अस्थिदंडाच्या त्याच बाजूच्या मध्यबिंदूजवळ ३ ते ५ सेंमी. पृष्ठभागावर जोडलेला असतो. दंडाच्या पुढे येण्याच्या व अभिमध्य बाजूकडे जाण्याच्या हालचाली या स्नायूमुळे होतात.
(२) भुजस्नायू : हा भुजास्थीपासून निघून प्रबाहूतील अंतरास्थीवरील पुढच्या बाजूस असलेल्या प्रवर्धावर व गुलिकेवर जोडला जातो. कोपराच्या अंतर्नमनास (प्रबाहू दंडाकडे आणण्यास) हा स्नायू कारणीभूत असतो. प्रबाहूच्या अधस्तलन (हात पुढे केलेल्या वेळी तळहात पायाकडे वळवणे म्हणजे आशीर्वाद देताना होतो तसा होणे) आणि उत्तलन (हात पुढे केलेल्या वेळी तळहात डोक्याकडे वळवणे म्हणजे काहीही मागताना होतो तसा होणे) या दोन्ही अवस्थांत कोपराचे अंतर्नमन भुजस्नायूमुळे सहज होते. द्विशिर स्नायू नावाप्रमाणे लांब व लघू अशा दोन शीर्षांच्या जुळण्याने बनतो. ही शीर्षे स्कंधास्थीपासून निघतात. प्रबाहूतील बाह्यास्थीच्या वरच्या टोकावर ग्रीवेच्या खाली अभिमध्य बाजूस जोडला जातो. द्विशिर स्नायू प्रबाहूचे उत्तलन, कोपराचे अंतर्नमन आणि अल्प प्रमाणात स्कंधसंधीचे अंतर्नमन या क्रिया करतो. हा स्नायू अतिशय शक्तिशाली असून प्रबाहूचे उत्तलन झालेल्या अवस्थेतही कोपराचे जोरदार अंतर्नमन करू शकतो. अप्रत्यक्ष रीत्या हा स्नायू कंडराकलेद्वारे (पातळ, रुंद व चपट्या कंडरेद्वारे) अंतरास्थीस जोडलेला असल्यामुळे त्या अस्थीच्या उत्तलनाच्या वेळच्या हालचालीस कारणीभूत होतो.
पश्च गट : या गटात (१) त्रिशिर आणि (२) कूर्पर असे दोन स्नायू आहेत. त्यांपैकी त्रिशिर स्नायू भुजास्थीचा अधिस्कंध स्नायू संपतो तेथून खालचा व पश्च भाग आच्छादितो. स्कंधास्थी व भुजास्थी यांपासून निघणाऱ्या तीन शीर्षांचा मिळून बनलेला हा स्नायू एका दणकट व पसरट कंडरेद्वारे अंतरास्थीच्या कफोण्यग्रावर जोडलेला असतो आणि प्रबाहूचे कोपरामध्ये प्रसारण (अंतर्नमनाच्या विरोधी क्रिया) करून बाहू सरळ करतो. कूर्पर स्नायू हा छोटा त्रिकोणी स्नायू भुजास्थीच्या पार्श्व अधिस्थूलकापासून निघून अंतरास्थीच्या कफोण्यग्रावर पार्श्व बाजूस जोडला जातो. हा क्षीण स्नायू कोपराच्या सर्व प्रसारण क्रियांत भाग घेतो. त्रिशिर स्नायूच्या खालच्या भागापासून निघून कोपराच्या सांध्याच्या पश्चभागी असलेल्या जाड संपुटावर जोडलेले काही स्नायूतंतू असतात व त्यांना एकत्रितपणे ‘अधोकूर्पर’ स्नायू म्हणतात. प्रसारणाच्या वेळी संपुट वर ओढण्याचे कार्य हा स्नायू करतो.
दंडातील दोन्ही गटांतील स्नायू बहुतांशी कोपरातील सांध्याच्या हालचालींशी निगडित आहेत, हे वरील वर्णनावरून सहज ध्यानात येईल. प्रत्यक्ष दंडाची हालचाल करणारे स्नायू हे स्कंधास्थि-भुजास्थी गट, प्रामुख्याने स्कंधसंधीच्या हालचाली करणारा गट आणि स्कंधसंधी व कोपरसंधी या दोन्हींच्या हालचाली करणारा गट असे विभागता येतात. यांपैकी काही स्नायू धडापासून निघतात, काही स्कंधास्थीपासून निघतात, तर काही जत्रु-अस्थीपासून निघतात. या स्नायूंचे वर्णन प्रस्तुत नोंदीत केलेले नाही.
प्रबाहू : कोपरापासून मनगटापर्यंतच्या बाहूच्या भागाला प्रबाहू म्हणतात. ‘उप-भुजा’ व ‘प्रकोष्ठ’ अशी दुसरी नावेही याच भागाला आहेत. दंड व प्रबाहूत यांमधील सांध्याला कफोणी अथवा कोपराचा सांधा म्हणतात. प्रबाहूत (अ) अरास्थी अथवा बाह्यास्थी व (आ) प्रबाहू-अंतरास्थी अथवा अंतःप्रकोष्ठिका अथवा अरत्नी अशी दोन हाडे व काही स्नायू आहेत. प्रस्तुत नोंदीत या दुसऱ्या हाडाचा उल्लेख अंतरास्थी म्हणून केला आहे.
बाह्यास्थी: वर्णनाकरिता बाह्यास्थीचे पुढीलप्रमाणे तीन भाग पाडले आहेत : (१) वरचे टोक, (२) अस्थिदंड आणि (३) खालचे टोक.
वरचे टोक : यामध्ये शीर्ष, ग्रीवा व गुलिका यांचा समावेश होतो. शीर्षाचा ऊर्ध्व पृष्ठभाग उथळ बशीसारखा असून तो भुजास्थींच्या अस्थिगुच्छ भागाशी संलग्न असतो. शीर्षाच्या खालच्या अरुंद भागाला ग्रीवा म्हणतात. ग्रीवेच्या खाली अभिमध्य बाजूवर उंचवटा असतो व त्याला ‘बाह्यास्थी गुलिका’ म्हणतात. या गुलिकेवर द्विशिर स्नायू जोडलेला असतो.
अस्थिदंड : अस्थिदंड सौम्य (किंचित) वक्र असून त्याची बहिर्वक्रता पार्श्व बाजूस असते. खालच्या भागाकडे अस्थिदंड रुंदावतो. अस्थिदंडाच्या तीन कडा व तीन पृष्ठभाग वर्णितात परंतु फक्त अस्थ्यंतर (दोन हाडांच्या एकमेकांकडे असलेल्या पृष्ठभागाकडील) कडा स्पष्ट दिसते. त्यामुळे पृष्ठभाग व कडा स्पष्टपणे ओळखता येत नाहीत. अस्थिदंडाचा आडवा छेद त्रिकोणी दिसतो.
खालचे टोक : वरच्या टोकापेक्षा खालचे अधिक रुंद असते व या ठिकाणी आडवा छेद घेतल्यास तो चौकोनी दिसतो. टोकाची पार्श्व बाजू खाली वाढलेली असून त्याला ‘कीलकाकृती प्रवर्ध’ म्हणतात. टोकाचा अधःपृष्ठभाग संधानिक असून तो मनगटातील हाडाशी सांध्याद्वारे जोडलेला असतो. याच भागाला ‘मणिबंध संधानक पृष्ठभाग’ असे म्हणतात. अभिमध्य पृष्ठभागावर खाच असते व ती अंतरास्थीच्या शीर्षाशी संलग्न असून दोन्ही हाडांमधील अधःस्थ (खालचा) सांधा बनविण्यात भाग घेते. या खाचेला ‘अंतरास्थी खाच’ म्हणतात.
अंतरास्थी: प्रबाहूत आतील बाजूस असलेले हे हाड सरळ नसून ते द्विवक्र असते. वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत ते सौम्य वक्र असून त्याची बहिर्वक्रता पश्च बाजूस असते. याशिवाय वरचा अर्धा भाग पार्श्व बाजूस व खालचा अर्धा अभिमध्य बाजूस वाकलेले असतात. वर्णनाकरिता अंतरास्थीचे पुढीलप्रमाणे तीन भाग पाडतात : (१) वरचे टोक, (२) अस्थिदंड आणि (३) खालचे टोक.
कीलकाकृती प्रवर्ध आखूड व गोलसर असून तो खालच्या टोकाच्या पश्च-पार्श्व बाजूकडून निघतो. त्याचे टोक त्वचेखाली मनगटाच्या पश्च-अभिमध्य बाजूस बोटाला लागते. बाह्यास्थीचा कीलकाकृती प्रवर्ध व अंतरास्थीचा कीलकाकृती प्रवर्ध एकाच पातळीत नसून खाली-वर असतात. अंतरास्थीचा प्रवर्ध बाह्यास्थीच्या प्रवर्धापेक्षा १ सेंमी वर असतो.
स्नायू : प्रबाहूतील स्नायूंची विभागणी पुढील दोन प्रमुख गटांत करतात : (१) अग्र गट आणि (२) पश्च गट.
अग्र गट : या गटातील स्नायू (अ) पृष्ठस्थ आणि (आ) खोल अशा दोन उपगटांत विभागले आहेत.
(अ) पृष्ठस्थ गट : यात (१) अधस्तलनक गोल स्नायू, (२) बहिर्मणिबंध अंतर्नमनक स्नायू, (३) दीर्घ करतालिका स्नायू, (४) अंतर्मणिबंध अंतर्नमनक स्नायू आणि (५) पृष्ठस्थ करांगुली अंतर्नमनक स्नायू यांचा समावेश होतो.
(१) अधस्तलनक गोल स्नायू : हा स्नायू भुजास्थीचे खालचे टोक व अंतरास्थीचा काकचंचुसदृश प्रवर्ध यांपासून निघतो व बाह्यास्थीच्या मध्यभागी पार्श्व बाजूस जोडलेला असतो. या स्नायूच्या आकुंचनामुळे बाह्यास्थी अंतरास्थीवर चक्रीय गतीने फिरते म्हणजेच प्रबाहूचे अधस्तलन होऊन तळहात पायाकडे वळतो.
(२) बहिर्मणिबंध अंतर्नमनक स्नायू : भुजास्थीच्या खालच्या टोकापासून निघणारा हा स्नायू दुसऱ्या करभास्थीच्या (तळहातातील दुसऱ्या क्रमांकाच्या हाडाच्या) सुरुवातीच्या भागावर जोडला जातो. मनगटातील सांध्याचे अंतर्नमन (तळहात खांद्याकडे वळवणे) आणि तळहाताचे अपवर्तन (तळहात अंगठ्याकडे वळवणे) या क्रिया या स्नायूमुळे होतात.
(३)दीर्घ करतालिका स्नायू : हा काहीसा कृशांग स्नायू भुजास्थीच्या खालच्या टोकापासून निघतो व एका लांब कंडरेद्वारे करतल कंडराकलेच्या मध्य भागावर जोडला जातो. या स्नायूच्या आकुंचनामुळे मणिबंधाचे (मनगटाचे) अंतर्नमन होते.
(४)अंतर्मणिबंध अंतर्नमनक स्नायू : पृष्ठस्थ स्नायूंपैकी अभिमध्य बाजूस असणारा हा स्नायू भुजास्थी व अंतरास्थी यांपासून निघतो. त्याच्या मध्यापासून त्याची कंडरा तयार होते व तो मनगटातील कलायस्थीवर [⟶ मनगट] जोडला जातो. काही तंतू मनगटातील जवळच्या हाडामधील बंधासी जोडले जातात. मनगटाचे अंतर्नमन करणाऱ्या इतर स्नायूंना पूरक कार्य हा स्नायू करतो. करंगळीच्या काही हालचालींच्या वेळी हा स्नायू कलायस्थीस जागेवर खिळवून धरतो.
(५) पृष्ठस्थ करांगुली अंतर्नमनक स्नायू : पृष्ठस्थ अंतर्नमनक स्नायूंपैकी हा सर्वांत मोठा स्नायू असून तो वरील सर्व स्नायूंच्या मागे असतो. भुजास्थी, अंतरास्थीचा काकचंचुसदृश प्रवर्ध आणि बाह्यास्थीची अग्र कडा यांपासून तो निघतो. स्नायूतंतूंची रचना काहीशी गुंतागुंतीची असलेल्या या स्नायूपासून चार कंडरा निघतात व त्या मधले बोट, तर्जनी, अनामिका व करंगळी या चार बोटांच्या मधल्या पेऱ्याच्या हाडावर जोडल्या जातात. या स्नायूच्या आकुंचनामुळे प्रथम या बोटांच्या मधल्या पेऱ्याचे व नंतर समीपस्थ (जवळच्या) पेऱ्याचे अंतर्नमन होते. तो मनगटाचाही अंतर्नमनक आहे.
(आ) खोल गट :या गटात (१) खोल करांगुली अंतर्नमनक स्नायू, (२) दीर्घ अंगुष्ठ अंतर्नमनक स्नायू आणि (३) अधस्तलनक चौधारी स्नायू यांचा समावेश होतो.
(१) खोल करांगुली अंतर्नमनक स्नायू :अंतरास्थीच्या वरच्या तीन चतुर्थांश अग्र पृष्ठभागापासून प्रामुख्याने निघणारा हा स्नायू अस्थ्यंतर कलेच्या अग्र पृष्ठभागापासूनही निघतो. त्यापासून चार कंडरा निघतात आणि तर्जनी, मधले बोट, अनामिका व करंगळी या चार बोटांतील शेवटच्या पेऱ्यातील हाडावर जोडल्या जातात. मधल्या पेऱ्यातील अंतर्नमनानंतर या स्नायूमुळे दूरस्थ (शेवटच्या) पेऱ्याचे अंतर्नमन होते. तो मनगटाच्या अंतर्नमनासही मदत करतो.
(२) दीर्घ अंगुष्ठ अंतर्नमनक स्नायू : वरील स्नायूच्या पार्श्व बाजूस असलेला हा स्नायू बाह्यास्थी व अस्थ्यंतर कलेपासून निघतो. त्यापासून निघणारी चापट कंडरा अंगठ्याच्या दूरस्थ पेऱ्यावर जोडली जाते. अंगठ्याच्या दोन्ही पेऱ्यांचे अंतर्नमन या स्नायूच्या आकुंचनामुळे होते.
(३) अधस्तलनक चौधारी स्नायू : बाह्यास्थी आणि अंतरास्थी दोहींच्या अस्थिदंडांच्या खालच्या भागावर पसरलेला हा स्नायू नावाप्रमाणे चार कडांचा असून अंतरास्थीच्या अस्थिदंडाच्या खालच्या भागावरून आणि याच स्नायूवर आच्छादिलेल्या जाड कंडराकलेपासून निघतो. त्याचे तंतू पार्श्वबाजूकडे तिरपे व खालच्या बाजूस जाऊन बाह्यास्थीच्या खालच्या भागावर जोडले जातात. प्रबाहूच्या अधस्तलन हालचालीत या स्नायूचा प्रमुख भाग असतो. ज्या वेळी ही क्रिया जलद व जोराने करावयाची असते त्या वेळी पृष्ठस्थ गटातील अधस्तलनक गोल स्नायू पूरक कार्य करतो. बाह्यास्थी व अंतरास्थी यांची खालची टोके एकमेकांपासून अलग होऊ न देण्याचे कार्यही या स्नायूमुळे होते.
पश्च गट : या गटातील स्नायूंची विभागणी (अ) पृष्ठस्थ गट व (आ) खोल गट अशी करतात.
(अ) पृष्ठस्थ गट : याला प्रसारक गट असेही म्हणतात. यामध्ये पुढील स्नायूंचा समावेश होतो. (१) भुज-बाह्यास्थी स्नायू, (२) दीर्घ बहिर्मणिबंध प्रसारक स्नायू, (३) लघू बहिर्मणिबंध प्रसारक स्नायू, (४) करांगुली प्रसारक स्नायू, (५) कनिष्ठ करांगुली प्रसारक स्नायू, (६) अंतर्मणिबंध प्रसारक स्नायू आणि (७) कूर्पर स्नायू.
(१) भुज-बाह्यास्थी स्नायू : प्रबाहूतील बाह्यास्थीकडील बाजूस असलेला हा पृष्ठस्थ स्नायू भुजास्थीची पार्श्व कडा व अस्थ्यंतर कला यांपासून निघतो. प्रबाहूंच्या मध्यास त्यापासून चापट कंडरा निघून ती बाह्यास्थीच्या खालच्या टोकाच्या पार्श्व भागी कीलकाकृती प्रवर्धाच्या लगेच वर जोडली जाते. प्रबाहूच्या अंतर्नमनात तो भाग घेतो. अर्ध अधस्तलन अवस्थेत प्रबाहू असताना जोराने अंतर्नमन करण्याच्या क्रियेत तो विशेष भाग घेतो. कोपराच्या अंतर्नमन व प्रसारण या क्रिया जेव्हा जलद केल्या जातात तेव्हा हा स्नायू कोपराच्या सांध्यातील संधानक पृष्ठभाग एकमेकांपासून अलग न होऊ देण्याचे कार्य करतो.
(२) दीर्घ बहिर्मणिबंध प्रसारक स्नायू : वरील स्नायूने अंशतः आच्छादिलेला स्नायू भुजास्थीच्या खालच्या एक तृतीयांश पार्श्व कडेपासून निघतो. प्रबाहूच्या वरचा एक तृतीयांश भाग संपतो तेथून त्याची कंडरा सुरू होते आणि ती प्रबाहूतील खालच्या व मागच्या बाजूस असलेल्या प्रसारक उपबंधाखालून जाते आणि दुसऱ्या करभास्थीच्या पृष्ठीय भागाच्या तळभागावर जोडली जाते.
(३) लघू बहिर्मणिबंध प्रसारक स्नायू : वरील स्नायूपेक्षा लहान असणारा हा स्नायू त्याच्या खालीच असतो. तो भुजास्थीच्या पार्श्व अधिस्थूलकापासून निघतो व त्याची कंडरा प्रसारक उपबंधाखालून जाऊन तिसरी करभास्थी बाह्यास्थीचा कीलकाकृती प्रवर्ध आणि दुसरी करभास्थी यांवर जोडली जाते. वरील स्नायूची कंडरा आणि ही कंडरा प्रसारक उपबंधाखालून एकाच कप्प्यातून जातात व दोन्हींही मिळून एकच संधिकला आवरण असते.
या अगोदरचा व हा स्नायू हे दोन्ही बोटांच्या अंतर्नमनास कारणीभूत असणाऱ्या स्नायूंचे सहकारी असतात. याशिवाय ते मनगटाचे अंतर्नमन व हाताचे अपवर्तन या क्रियांतही पूरक स्नायू म्हणून भाग घेतात.
(४) करांगुली प्रसारक स्नायू : भुजास्थीच्या पार्श्व अधिस्थूलकापासून आणि आंतरस्नायू पटल व भुजाग्र प्रावरणी (आच्छादणारे पटलासारखे तंतुमय ऊतक म्हणजे पेशीसमूह) यांपासून निघतो व त्यापासून चार कंडरा निघतात व त्या प्रसारक उपबंधाखालून एकाच कप्प्यातून जातात. हाताच्या पृष्ठीय भागावर या कंडरा सुट्या व स्वतंत्र होतात आणि अंगठा सोडून इतर चार बोटांच्या पेऱ्यांवर जोडल्या जातात. प्रत्येक बोटाच्या पृष्ठीय भागावरील हा जोड बराच गुंतागुंतीचा असतो. या चार बोटांच्या करभास्थी व अंगुलास्थी यांमधील सांधा, तसेच आंतर-अंगुलास्थी सांधे या ठिकाणी होणाऱ्या प्रसारक हालचालीस हा स्नायू कारणीभूत असतो. हाताची पकड सैल करणे आणि पकडण्यापूर्वीची तयारी करणे या क्रियांत तो भाग घेतो. यांशिवाय मनगटाच्या प्रसारणातही त्याचा प्रमुख भाग असतो.
(५) कनिष्ठ करांगुली प्रसारक स्नायू : हा कृशांग स्नायू बहुतकरून वरील स्नायूशी संबंधित असून तो समाईक प्रसारक कंडरा आणि आंतरस्नायू पटल यांपासून निघतो. त्याची स्वतंत्र कंडरा प्रसारक उपबंधाखालून जाऊन बहुधा दोन शाखांत विभागली जाते. पार्श्वशाखा करांगुली प्रसारक स्नायूच्या कंडरेशी जोडली जाते, तर अभिमध्य शाखा पाचव्या बोटावर जोडली जाते. कधीकधी हा स्नायू करांगुली स्नायूतच समाविष्ट झालेला असतो व क्वचित वेळी तयार झालेलाच नसतो. करंगळीच्या प्रसारक हालचालीत आणि मनगटाच्या प्रसारणात तो भाग घेतो.
(६) अंतर्मणिबंध प्रसारक स्नायू :समाईक प्रसारक कंडरा, अग्रबाहू प्रावरण व अंतरास्थीची पश्च कडा यांपासून हा स्नायू निघतो व त्याची कंडरा स्वतंत्र असते. ही कंडरा प्रसारक उपबंधाखालून जाताना अंतरास्थीने शीर्ष व कीलकाकृती प्रवर्ध यांमधील खोबणीतून जाते व पाचव्या करभास्थीच्या अभिमध्य बाजूवर असलेल्या एका गुलिकेवर जोडली जाते. दीर्घ व लघू बहिर्मणिबंध प्रसारक स्नायूंबरोबर हा स्नायू पूरक कार्य करतो. वस्तू पकडण्याची क्रिया आणि मूठ आवळण्याची क्रिया या स्नायूंच्या एकत्रित शक्तीमुळे होतात. मनगटाचे प्रसारण व हाताचे अभिवर्तन (हात अभिमध्य रेषेकडे वळवणे) या क्रियांतही तो भाग घेतो.
(७) कूर्पर स्नायू : कोपराच्या सांध्याच्या पश्चभागी असलेला हा लहान त्रिकोणी स्नायू अंशतः त्रिशिर स्नायूत मिसळलेला असतो. भुजास्थीच्या पार्श्व अभिस्थूलकाच्या पश्च भागापासून स्वतंत्र कंडरेने तो निघतो आणि अंतरास्थीच्या कफोण्यग्राला व अस्थिदंडाच्या पश्चभागी जोडला जातो. त्रिशिर स्नायूस कोपराच्या प्रसारक हालचालीत तो मदत करतो व प्रबाहूच्या अधस्तलनाच्या वेळी तो अंतरास्थीच्या हालचालीस कारणीभूत असतो.
(आ) खोल गट :या गटात पुढील स्नायूंचा समावेश होतो : (१) उत्तानक स्नायू, (२) दीर्घ अंगुष्ठ अपवर्तक स्नायू, (३) लघू अंगुष्ठ प्रसारक स्नायू, (४) दीर्घ अंगुष्ठ प्रसारक स्नायू आणि (५) तर्जनी प्रसारक स्नायू.
(१) उत्तानक स्नायू :बाह्यास्थीचा वरचा एक तृतीयांश भाग आच्छादणारा हा स्नायू पृष्ठस्थ व खोल अशा दोन भागांचा मिळून बनतो. दोन्ही भाग भुजास्थीच्या पार्श्व अभिस्थूलकाच्या पश्चभागापासून निघतात. याशिवाय काही स्नायुंतंतू कोपराच्या सांध्यावरील काही बंध व बाह्यास्थी यांच्या जवळपासच्या भागापासूनही निघतात. सर्व तंतू बाह्यास्थीच्या पार्श्व भागी वरच्या एक तृतीयांश पृष्ठभागावर जोडले जातात. बाह्यास्थीला चक्रीय गतीने फिरवून प्रबाहूच्या होणाऱ्या उत्तानक हालचालीत (पालथा तळहात उलथा करणे) हा स्नायू प्रमुख असतो. प्रबाहू कोपरात वाकलेला असताना शक्तिशाली द्विशिर स्नायू या स्नायूला मदत करतो. जड वस्तू उचलताना प्रबाहू बहुधा अधस्तलन अवस्थेत असतो.
(२) दीर्घ अंगुष्ठ अपवर्तक स्नायू : अंतरास्थीच्या अस्थिदंडाचा पश्च व पार्श्व भाग आणि बाह्यास्थीच्या अस्थिदंडाचा पश्च भाग यांपासून निघणारा हा स्नायू पहिल्या करभास्थीच्या तळावर आणि मनगटातील चतुष्कोणी अस्थीवर जोडला जातो. अंगठा मध्यरेषेपासून दूर नेण्याची (तळहातापासून दूर नेण्याची) क्रिया या स्नायूमुळे होते. याशिवाय मणिबंध- करभास्थी या सांध्यातील अंगठ्याच्या प्रसारणाची क्रिया करणाऱ्या स्नायूस तो पूरक असतो.
(३) लघू अंगुष्ठ प्रसारक स्नायू : वरील स्नायूशी जवळीक असलेला हा स्नायू बाह्यास्थीचा पश्च भाग आणि अस्थ्यंतर कला यांपासून निघतो. या दोन्ही स्नायूंचे तंतू एकाच दिशेस जातात आणि त्यांच्या कंडरा बाह्यास्थीच्या टोकावरील एकाच खोबणीतून जातात. अंगठ्याच्या समीपस्थ पेऱ्यातील हाडांशी त्यांची कंडरा जोडली जाते. अंगठ्याच्या पहिल्या पेऱ्याची प्रसारक हालचाल या स्नायूमुळे होते.
(४) दीर्घ अंगुष्ठ प्रसारक स्नायू : वरील स्नायूपेक्षा मोठा असलेला हा स्नायू अंतरास्थीच्या अस्थिदंडाच्या पश्च पृष्ठभागापासून व अस्थ्यंतर कलेपासून निघतो. त्याची कंडरा बाह्यास्थीच्या खालच्या टोकावरील पश्च भागी असलेल्या तिरप्या खोबणीतून जाते व अंगठ्याच्या दूरस्थ पेऱ्यातील हाडावर जोडली जाते. अंगठ्याच्या दूरस्थ पेऱ्याची प्रसारक हालचाल या स्नायूमुळे होते. अंगठा पूर्णपणे प्रसारित केला असता या स्नायूची कंडरा व वरील स्नायूची कंडरा यांच्या दरम्यान पार्श्व बाजूवर त्रिकोणी खाच तयार होते. तिला थट्टेने ‘शारीरिक तपकीर डबी’ म्हणतात.
(५) तर्जनी प्रसारक स्नायू :वरील स्नायूच्या समांतर व अभिमध्य बाजूस असणारा हा स्नायू अंतरास्थीच्या अस्थिदंडाच्या पश्च भागापासून व अस्थ्यंतर कलेपासून निघतो आणि तर्जनीच्या समीपस्थ पेऱ्यातील हाडावर करांगुली प्रसारक स्नायूच्या कंडरेशी त्याची कंडरा मिसळते. तर्जनीची प्रसारक हालचाल यांत हा स्नायू भाग घेतो.
अस्थ्यंतर कला: प्रबाहूतील दोन्ही हाडे ज्या कलेने एकमेकांशी जोडलेली असतात तिला अस्थ्यंतर कला म्हणतात. या तंत्वात्मक कलेचे तंतू प्रामुख्याने खालच्या व अभिमध्य बाजूस बाह्यास्थीपासून अंतरास्थीकडे तिरपे जातात. प्रबाहूतील काही स्नायू या कलेपासून निघतात. वरच्या भागात ही कला अपूर्ण असते व तिची सुरुवात बाह्यास्थी गुलिकेपासून २ ते ३ सेंमी. अंतरावरून होते. खालच्या बाजूस काही तंतू अंतरास्थीकडून उलट दिशेने म्हणजे वर बाह्यास्थीकडे जातात. वरच्या बाजूस व खालच्या कडेपासून काही अंतरावर या कलेमध्ये फटी असतात आणि त्या रक्तवाहिन्या मागून पुढे किंवा पुढून मागे जाण्यास मोकळ्या जागा पुरवितात.
रोहिण्या : महारोहिणी चापापासून [⟶ रक्तभिसरण तंत्र] निघणारी अधोजत्रुक नावाची रोहिणी बाहूची शुद्ध रक्त पुरवणारी एकमेव मोठी रोहिणी असते. ही रोहिणी जेव्हा मानेच्या तळाजवळून काखेत येते तेव्हा तिला ‘कक्षा रोहिणी’ म्हणतात. कक्षा रोहिणी छातीची पार्श्व भित्ती व बाहूतील दंडाचा काही भाग यांना रक्तपुरवठा करते. कक्षा रोहिणी बाहूत उतरताच ती ‘भुज रोहिणी’ या वेगळ्या नावाने ओळखली जाते. दंडातील बहुसंख्य स्नायूंना तिच्या शाखा रक्तपुरवठा करतात. ती कोपराच्या अग्रभागी येताच तिचे दोन शाखांत विभाजन होते व त्या प्रबाहूत उतरतात. पार्श्व बाजूस असणाऱ्या शाखेस ‘अरीय रोहिणी’ व अभिमध्य बाजूस असणाऱ्या शाखेस ‘अंतरास्थीय रोहिणी’ म्हणतात. या दोन शाखांच्या उपशाखा दंड, प्रबाहू, मनगट व बोटांसहित हात यांना रक्तपुरवठा करतात.
बाहूच्या रोहिण्या खोल असतात कारण त्यांवर जाड स्नायूंचे आच्छादन असते. याला दोन अपवाद आहेत : (१) दंडात भुजरोहिणी फक्त प्रावरणी व त्वचा यांनी आच्छादिलेली असते. या ठिकाणी तीवर दाब देऊन म्हणजे तिला भुजास्थीवर दाबून प्रबाहू व खालील भागातील रक्तस्त्राव थांबवता येतो.
(२) अरीय रोहिणी प्रबाहूत खालच्या भागात येते तेव्हा बाह्यास्थीची पार्श्व कडा आणि बहिर्मणिबंध अंतर्नमनक स्नायूची कंडरा या दोन्हींच्या मध्ये ती असते. या ठिकाणी ती त्वचेखालीच असल्यामुळे तिचे स्पंदन बोटांना सहज लागते. वैद्यकीय व्यावसायिक तपासतात ती ‘नाडी’ हीच होय.
बाहूतील प्रमुख तंत्रिका : भुजजालिकेपासून निघणाऱ्या पुढील प्रमुख तंत्रिका व त्यांच्या शाखा बाहूतील स्नायू, त्वचा, अस्थी इत्यादींना पुरवठा करतात.
स्नायू-त्वचा तंत्रिका : दंडातील स्नायूंना पुरवठा केल्यानंतर ही तंत्रिका प्रबाहूतील काही त्वचाभागाला पुरवठा करते.
मध्यस्थ तंत्रिका : भुजजालिकेपासून दोन मुळांनी निघणारी ही तंत्रिका दंडामध्ये भुजरोहिणीच्या जवळपास असते. कफोणी खाचेत ती कोपराच्या सांध्याच्या अग्रभागी असून सांधा व तंत्रिका यांमध्ये भुजस्नायू असतो. दंडामध्ये या तंत्रिकेचे काही तंतू भुजरोहिणीस व गोल अधस्तलनक स्नायूस पुरवठा करतात. हातामध्ये तिच्या चार-पाच शाखा बोटांना पुरवठा करतात. अंगठा, तर्जनी, मधले बोट व अनामिकेचा अर्धा भाग यांवरील त्वचा, तळहातावरील पुष्कळसा त्वचा भाग यांना या तंत्रिकेने पुरवठा केला जातो.
1. Hamilton. W. J., Ed., Textbook of Human Anatomy, London, 1958.
कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.
“