बासोडा : याला ‘गंज बासोडा’ असेही नाव आहे. मध्य प्रदेश राज्यातील विदिशा जिल्ह्याच्या बासोडा तालुक्याचे प्रमुख ठिकाण व पूर्वीच्या बासोडा संस्थानची राजधानी. लोकसंख्या ३०,२३५ (१९८१). रेल्वे स्थानक गंज बासोडा असून मध्य रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावर हे ठिकाण विदिशेपासून ईशान्येस ४० किमी. अंतरावर आहे. ⇨ओर्छा संस्थानचा राजा वीरसिंगदेव याने सतराव्या शतकात याची स्थापना केली. हे गाव ‘हैदरगड बासोडा’ व ‘नबाब बासोडा’ या नावांनीही ओळखले जात असे. गेल्या शतकाच्या अखेरीस येथे रेल्वे स्थानक झाल्यावर व्यापारी केंद्र म्हणून याची प्रगती झाली. गहू, हरभरा, धान्ये यांच्या व्यापारासाठी तसेच पीठगिरण्या व काचकामासाठी हे प्रसिद्ध आहे. शासकीय कचेऱ्यांखेरीज येथे महाविद्यालय, पशुपालन केंद्र, पशुरुग्णालय व इतर सुविधा आहेत.
चौधरी, वसंत.