बासव्ह, न्यिकली गेनेडियव्ह्यिच : (१४ डिसेंबर १९२२ – ). रशियन भौतिकीविज्ञ. ⇨पुंज-इलेक्ट्रॉनिकीत त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधन कार्याकरिता १९६४ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक बासव्ह व ⇨ अल्यिक्सांदर म्यिखायलव्ह्यिप्रॉचोरॉव्ह यांना मिळून अर्धे आणि ⇨ चार्ल्स हार्ड टाउन्स या अमेरिकन भौतिकीविज्ञांना अर्धे असे विभागून देण्यात आले. या कार्यातूनच ⇨ मेसर व ⇨ लेसर या प्रयुक्तींचा आणि त्यांच्या तत्त्वांवर चालणाऱ्या आंदोलक व विवर्धक या साधनांचा विकास झाला.

बासव्ह यांचा जन्म व्हॉरोनेश जवळील ऊस्मन्या येथे झाला. १९४१ मध्ये शालेय शिक्षण संपल्यावर ते कूइबिशेव्ह मिलिटरी मेडिकल ॲकॅडेमीमध्ये दाखल झाले. या ॲकॅडेमीतून मिलिटरी डॉक्टराचे साहाय्यक म्हणून पात्रता संपादन करून त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला. १९४५ – ५३ या काळात त्यांनी मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एंजिनियर्स या संस्थेत भौतिकीचे शिक्षण घेतले. त्याचबरोबर १९५० – ५३ मध्ये त्यांनी पी. एन्. ल्येब्येड्येव्ह फिजिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉचोरॉव्ह व एम्. ए. ल्यिआँटोव्ह्यिच यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९५७ मध्ये भौतिक-गणितीय शास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळविली. १९५८ – ७२ या काळात ते या संस्थेचे उपसंचालक होते आणि १९७३ मध्ये ते संस्थेचे संचालक झाले. त्यांनी १९६३ मध्ये पुंज रेडिओ-भौतिकीची प्रयोगशाळा स्थापन केली. त्याच वर्षापासून ते मॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एंजिनियर्स या संस्थेत प्राध्यापक म्हणूनही काम करीत आहेत.

बासव्ह यांनी १९५२ मध्ये पुंज रेडिओ-भौतिकीसंबंधी संशोधन करण्यास प्रारंभ केला. प्रॉचोरॉव्ह यांच्या समवेत त्यांनी आंदोलक तयार करण्यासंबंधी सैद्धांतिक व प्रायोगिक प्रयत्न केले. डॉक्टरेटसाठी सादर केलेल्या प्रबंधात त्यांनी अमोनियाच्या शलाकेचा उपयोग करून रेणवीय आंदोलक तयार करण्यासंबंधीच्या आपल्या कार्याचे विवरण केले होते. रेणवीय आंदोलकांच्या कंप्रता (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येच्या) स्थैर्यासंबंधी संशोधन करण्यासाठी १९५५ मध्ये त्यांनी सहकारी शास्त्रज्ञांचा एक गट स्थापन केला. या संशोधनामुळे १९६२ मध्ये १०-११ इतके कंप्रता स्थैर्य असलेले आंदोलक तयार करणे शक्य झाले. प्रशासकीय (दृश्य) कक्षेतील पुंज आंदोलक तयार करण्याच्या दृष्टीने १९५७ मध्ये त्यांनी संशोधनास प्रारंभ केला आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने १९६३ च्या सुरुवातीस गॅलियम आर्सेनाइड या ⇨ अर्धसंवाहकाच्या स्फटिकांचा उपयोग करून अंतःक्षेपण लेसर तयार केला. १९६४ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत इलेक्ट्रॉनीय उद्दीपनयुक्त अर्धसंवाहक लेसर व त्यानंतर प्रकाशीय उद्दीपनयुक्त लेसर तयार केले. बासव्ह यांनी १९६१ मध्ये शक्तिमान लेसरांसंबंधी संशोधन करण्यास सुरुवात करून सहकाऱ्यांच्या मदतीने १९६८ मध्ये ३० जूल ऊर्जेचा (व २ X १०-११ से. स्पंद-अवधीचा) निओडिमियम लेसर व १९७१ मध्ये १० जूल ऊर्जेचा (व १०-११ से. स्पंद-अवधीचा) बहुपरिवाही लेसर तयार करण्यात यश मिळविले. १९६२ मध्ये त्यांनी व ओ.एन्. क्रॉसिन यांनी औष्णिक अणुकेंद्रीय आयनद्रायू [⟶ आयनद्रायु भौतिकी] मिळविण्यासाठी लेसर प्रारणाचा (तरंगरूपी ऊर्जेचा) उपयोग करण्यासंबंधी संशोधन केले. बासव्ह व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९६९ मध्ये लेसरनिर्मित ड्यूटेरियम आयनद्रायूंतील न्यूट्रॉन उत्सर्जनाचे प्रथमच यशस्वीपणे निरीक्षण केले. औष्णिक लेसर उद्दीपनांसंबंधी त्यांनी केलेल्या सैद्धांतिक कार्यामुळे वायुगतिकीय लेसरांचा विकास होण्यास चालना मिळाली. १९६३ मध्ये त्यांनी प्रकाशीय इलेक्ट्रॉनिकीसंबंधी संशोधन सुरू करून द्विप्रस्थ लेसरवर आधारित व द्रुत गतीने कार्य करणारे तार्किक घटक माहिती संस्करणासाठी तयार केले [⟶ प्रकाशीय संदेशवहन]. बासव्ह यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत १९७० मध्ये प्रथमच निर्वातात जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) क्षेत्रातील लेसर उत्सर्जन मिळविले. रासायनिक लेसरांच्या बाबतीतही त्यांनी मोठे कार्य केले आहे. आयनीकृत संपीडित (दाबाखालील) वायूच्या साहाय्याने उद्दीपन करण्याच्या पद्धतीचा त्यांनी वायू लेसरामध्ये उपयोग केला. १९७० सालाच्या शेवटी त्यांनी अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) लेसर प्रारणाने रासायनिक विक्रियेला उत्तेजन मिळते याचा प्रायोगिक पुरावा सादर केला.

रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे १९६२ मध्ये पत्रव्यवहारी सदस्य व १९६६ मध्ये ॲकॅडेमीचे सदस्य (ॲकॅडेमिशियन) म्हणून त्यांची निवड झाली. १९६७ मध्ये ते ॲकॅडेमीच्या अध्यक्षमंडळाचे सदस्य झाले. ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेचे तसेच जर्मनी, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, स्वीडन इ. देशांतील वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य आहेत. ते रशियाच्या शांतता संरक्षण समितीचे तसेच जागतिक शांतता मंडळाचे सदस्य व वैज्ञानिक कार्यकर्त्यांच्या जागतिक संघाचे उपाध्यक्ष (१९७६) आहेत. १९५१ पासून ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून १९७४ मध्ये रशियाच्या विधिमंडळाचे (सुप्रिम सोव्हिएटचे) सदस्य झाले. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना लेनिन पारितोषिक (प्रॉचोरॉव्ह यांच्या समवेत, १९५९), ऑर्डर ऑफ लेनिन (१९६७,१९७२ व १९७५) व्होल्टा सुवर्णपदक (१९७७) इ. बहुमान मिळालेले आहेत. PrirodaKvantovaya Elektronika या वैज्ञानिक नियतकालिकांचे ते प्रमुख संपादक असून Il Nuovo Cimento या नियतकालिकाच्या संपादक मंडळावरही आहेत.

शिंगटे, सु. र.