बाल्कन युद्धे : एकोणिसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीस यूरोपीय राजकारणात ‘पूर्वेकडील प्रश्न’ ही एक गुंतागुंतीची समस्या होती. बाल्कन द्वीपकल्पातील तुर्की साम्राज्याच्या उतरत्या प्रभावामुळे बाल्कन राष्ट्रांच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करण्याच्या आवरणाखाली त्या प्रदेशात शिरकाव करण्याचा रशियाचा प्रयत्न होता व त्याला इंग्लंड, फ्रान्ससारख्या राष्ट्रांचा विरोध असल्याने त्यातून पूर्वेकडील प्रश्न निर्माण झाला. यूरोपातील बाल्कन द्वीपकल्पात राष्ट्रीय अस्मितेचा उदय झाल्याने तेथे तुर्की साम्राज्याविरुद्ध स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षात रशियाचा पाठिंबा बाल्कन राष्ट्रांना होता. ⇨ बाल्कन राष्ट्रांत आपला प्रभाव वाढवून रशियाला तुर्की साम्राज्य नष्ट करावयाचे होते. साम्राज्य नष्ट झाल्यास तुर्कस्तान दुर्बळ झाले असते व ते रशियाच्या हिताचेच होते. बाल्कन द्वीपकल्पातील या राजकारणाने इंग्लंड-फ्रान्स यांसारख्या पश्चिमी राष्ट्रांपुढे शृंगापत्ती उभी राहिली होती.एकीकडे बाल्कनमधील ख्रिस्ती लोकांच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल त्यांना सहानुभूती वाटत होती पण बाल्कन प्रदेशातील रशियाच्या प्रभावाचा त्यांना धोका जाणवत होता. हा पूर्वेकडील प्रश्न सु. शंभर वर्षे यूरोपीय मुत्सद्यांना संत्रस्त करीत होता.

पहिले बाल्कनयुद्ध (१९१२) : तुर्कस्तान-इटलीमध्ये ट्रिपोलीसाठी १९११-१२ मध्ये युद्ध झाले. लोझॅनच्या तहानुसार तुर्कस्तानला उत्तर आफ्रिकेतील लिबिया इटलीसाठी सोडून द्यावा लागला. तुर्कस्तानला बाल्कनमधील उर्वरित प्रदेशांतून माघार घेणे भाग पडले. शांतता तह होऊन हे युद्ध संपण्यापूर्वीच पहिल्या बाल्कन युद्धाला प्रारंभ झाला. मॅसिडोनियातील जुलमी तुर्की राजवट बाल्कन राष्ट्रांना अस्वस्थ करण्यास कारणीभूत झाली. तरुण तुर्क क्रांतीने तुर्की साम्राज्यातील अनिर्बंध राजसत्तेचा शेवट केला, तरी इस्लामवादी आणि साम्राज्यवादी प्रवृत्तींना आळा बसला नव्हता. त्यामुळे तुर्की स्वामित्वाखालील बाल्कन प्रदेशात मॅसिडोनियाच्या प्रजेचे हाल होत राहणार, हे स्पष्ट होते. परिणामत: त्यांनी तुर्कांविरुद्ध एकत्र येण्याचे ठरविले आणि रशियाच्या मदतीने बाल्कन संघाची (बाल्कन लीग) स्थापना केली. अखेरीस मार्च १९१२ मध्ये सर्बीया व बल्गेरिया यांच्यात एक तह झाला. त्यानुसार दोघांनी एकमेकांना परस्परांचे स्वातंत्र्य व प्रादेशिक अभंगत्व यांची हमी दिली. मॅसिडोनियातील प्रदेशाबद्दल रशियन लवाद मान्य होऊन एप्रिल १९१२ मध्ये दोन्ही राष्ट्रांत लष्करी समझोताही झाला. २९ मे १९१२ या दिवशी बल्गेरिया व ग्रीस यांच्यात युती झाली. बाल्कन राष्ट्रांच्या संघात माँटिनीग्रो या लहान बाल्कन राष्ट्रानेही सहभागी होण्याचे ठरविले.

३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर १९१२ या दिवशी बाल्कन राष्ट्रांनी युद्धाच्या उद्देशाने सैन्याची जमवाजमव करून ८ ऑक्टोबर १९१२ रोजी माँटिनीग्रोने तुर्कांवर प्रथम हल्ला केला. त्यानंतर इतर राष्ट्रांनीही तुर्कांविरुद्धच्या या युद्धात भाग घेतला.

बाल्कन द्वीपकल्पाच्या भौगोलिक रचनेमुळे तुर्कांना तीन स्वतंत्र आघाड्यांवर बाल्कन संघातील राष्ट्रांना तोंड द्यावे लागले. या युद्धांत लहान बाल्कन राष्ट्रांना तुर्की साम्राज्याविरुद्ध आश्चर्यकारक व जलद असे विजय मिळाले. सर्बीयन सैन्याने अल्बेनियामधून थेट एड्रिअँटिक समुद्राचा किनारा गाठला आणि मॅसिडोनियात कूमानॉव्हॉ येथे विजय मिळवला. बल्गेरियाने ग्रेसवर स्वारी करून काराकसे येथे विजय मिळवला. बल्गेरियन सैन्याने पुढे कॉन्स्टँटिनोपल या तुर्कांच्या राजधानीच्या दिशेने धडक मारली परंतु यावेळी रशियाने बल्गेरियाला युद्धाची धमकी देऊन कॉन्स्टँटिनोपल जिंकण्यापासून परावृत्त केले. कॉन्स्टँटिनोपल ही तुर्की राजधानी व लष्करी महत्त्वाचे ठिकाण रशियाचे जुने लक्ष्य होते व ते बल्गेरियाने जिंकावे, अशी रशियाची इच्छा नव्हती. ग्रीसने इजीअन समुद्रातील काही तुर्की बेटे जिंकली. तसेच सलॉनिक हे महत्वाचे शहरही ग्रीकांनी जिंकले. या सर्व पराभवांमुळे तुर्कांना शस्त्रसंधी करणे भाग पडले. ३ डिसेंबर १९१२ रोजी बाल्कन राष्ट्रे व तुर्की साम्राज्य यांच्यात शस्त्रसंधी झाला. शांतता तहाच्या वाटाघाटी होऊन लंडनच्या तहाने (३० मे १९१३) पहिले बाल्कन युद्ध संपले.या तहानुसार मॅसिडोनियाची वाटणी सर्बीया, ग्रीस व बल्गेरिया यांच्यात करण्यात आली. सर्बीयाला उत्तर व मध्य मॅसिडोनिया, ग्रीसला दक्षिण मॅसिडोनिया व सलॉनिक आणि क्रीट बेट यांची प्राप्ती झाली. सॅमोथ्रेस व लेमनॉस या बेटांचे भवितव्य बड्या राष्ट्रांच्या मदतीने ठरविण्याचे ठरले. बल्गेरियाला थ्रेसच्या पश्चिमेकडील भाग व इजीअन समुद्राची किनारपट्टी मिळाली. अल्बेनिया या स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. पहिल्या बाल्कन युद्धाचा परिणाम म्हणून तुर्कस्तानला यूरोपमधील आपल्या जवळजवळ सर्व प्रदेशाला मुकावे लागले. आता फक्त कॉन्स्टँटिनोपल व त्याच्या आसपासच्या प्रदेशावरच त्यांचे आधिपत्य राहिले.

दुसरे बाल्कन युद्ध (१९१३) : लंडनच्या तहाने बाल्कन प्रदेशात चिरस्थायी शांतता स्थापन होऊ शकली नाही. पुढे एक महिन्यातच दुसरे बाल्कन युद्ध सुरू झाले. बल्गेरियाला लंडनचा तह पसंत नव्हता. या तहान्वये ग्रीकांना आणि सर्बीयनांना झालेली प्राप्ती बल्गेरियाला अमान्य होती. शिवाय सर्बीयाही नाराजच होता. लंडन तहाला बल्गेरियाचा असलेला विरोध ओळखून सर्बीया आणि ग्रीस यांनी बल्गेरियाच्या विरुद्ध परस्परांत युती केली व त्यानुसार लष्करी तयारीही केली.

बल्गेरियाचा राजा फर्डिनंड याने मॅसिडोनियामधील वादग्रस्त प्रदेश ताब्यात घेऊन बसलेल्या सर्बीयन व ग्रीक सैन्यांवर हल्ला केला. त्यातून दुसरे बाल्कन युद्ध पेटले परंतु या युद्धात बल्गेरियन सैन्याला ग्रीक व सर्बीयन सैन्याकडून पराभव पतकरावा लागला. तर बल्गेरिया युद्धात गुंतला आहे, या अडचणीचा फायदा रूमानिया व तुर्कस्तान या दोन राष्ट्रांनी उठवला. लंडनचा तह धाब्यावर बसवून तुर्कस्तानने थ्रेसचा काही भाग आणि एड्रिअँनोपल हे महत्त्वाचे ठाणे बल्गेरियनांकडून जिंकून घेतले. पहिल्या बाल्कन युद्धात रूमानियाला काहीच प्राप्ती झाली नव्हती. आता रूमानियाने बल्गेरियावर स्वारी करून काही महत्वाची ठाणी काबीज केली व बल्गेरियन राजधानी सोफियालाही धोका निर्माण केला.

सर्बीयन, ग्रीक, रूमानियन व तुर्की सैन्यांकडून पराभव स्वीकारावा लागल्याने बल्गेरियाला शांतता तह स्वीकारणे भाग पडले. अखेरीस १० ऑगस्ट १९१३ रोजी झालेल्या बूकारेस्ट तहाने दुसरे बाल्कन युद्ध संपुष्टात आले. हा तह बल्गेरिया आणि सर्बीया, ग्रीस व रूमानिया यांच्यात झाला. या तहान्वये रूमानियाला डॅन्यूब नदीवर वर्चस्व प्रस्थापित करणारा सिलिस्ट्रियाचा किल्ला व दोब्रूजचा दक्षिण भाग मिळाला. सर्बीयाला उत्तर मॅसिडोनिया व मॅसिडोनियातील वादग्रस्त प्रदेश मिळाला. ग्रीसला दक्षिण मॅसिडोनिया व कव्हाल बंदर व त्यामागील तंबाखू पिकवणारा प्रदेश मिळाला. एवढे गमावूनही पश्चिम थ्रेसचा काही भाग बल्गेरियापाशी राहिला. तुर्कांनी पुढे बल्गेरियाबरोबर स्वतंत्र तह कॉन्स्टँटिनोपल येथे केला व आपला काही गमावलेला प्रदेश बल्गेरियाकडून परत मिळविला.

या युद्धात दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सु. दोन-अडीच लाखांच्या सैन्यानिशी भाग घेतला होता. तुर्कस्तानचे पुष्कळ सैन्य या देशांच्या आशियाई भागात होते परंतु थ्रेसशिवाय अन्यत्र पश्चिम आघाडीवर हे सैन्य तुर्कस्तानला हलविता आले नाही कारण पूर्वभूमध्य समुद्रातील ग्रीक नौदलाच्या हालचाली हे होते. याचा परिणाम तुर्कांच्या पीछेहाटीवर झाला.परिणामत: या युद्धांमुळे यूरोपातील तुर्की साम्राज्य जवळजवळ नष्ट झाले. थ्रेसचा काही भाग व कॉन्स्टँटिनोपल वगळता तुर्कांचे यूरोपातील अस्तित्व संपुष्टात आले. सर्बीया, ग्रीस व रूमानिया यांचा प्रदेशविस्ताराच्या दृष्टीने बराच फायदा झाला. बूकारेस्ट तहाने बरेच काही गमवावे लागलेल्या बल्गेरियालाही काही प्रदेश मिळाला. सर्बीयाला अल्बेनियाची प्राप्ती ऑस्ट्रियाच्या विरोधामुळे होऊ शकली नाही. त्यामुळे त्या देशाचे ऑस्ट्रियाबरोबरचे मूळचे शत्रुत्व आधिक तीव्र बनले आणि त्याची परिणती लवकरच पहिल्या महायुद्धात झाली. स्वतंत्र अल्बेनियाचीही निर्मिती ही बाल्कन युद्धांतूनच घडून आली. यांमुळे बाल्कन युद्धांना ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

संदर्भ : 1. Helmreich, E. C. The Diplomacy of the Balkan Wars–1912-13, Cambridge (Mass.), 1969.

2. Young, George, Nationalism and War in the Near East, 1970.

पेंडसे, म. मो.