बालु चार : एक परंपरागत भारतीय वस्त्रप्रकार, यालाच ‘बालुचार बुटीदार’ असेही म्हणतात. प.बंगालमधील बालुचार गावचा हा साडीप्रकार [⟶ साडी] कालबाह्य झाला असला, तरी एक मौलिक वस्त्रप्रकार म्हणून त्याचा वापर घरंदाज घराण्यांतील स्त्रियांकडून अजूनही करण्यात येतो. बालुचार साड्या एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धा पर्यंत विशेष रूढ होत्या त्यानंतर मुरादाबादच्या द्रोब्राजनामक निष्णात कारागिराच्या निधनाबरोबरच ही परंपरा उत्तरोत्तर क्षीण होत गेली, असे समजले जाते.
बालुचार पद्धतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील नक्षीदार आकृतिबंध. हे जामदानी [⟶ जामदानी कलाकाम] प्रमाणे मलमलीवर उठविण्यात येत नाहीत तर ते प्राय: रेशमी कापडावर रेशमी धाग्यानेच उठविण्यात येतात. या रेशमी साडीची लांबी ५ यार्ड (सु. ४.५७ मी.) व रुंदी ४२ इंच (सु. १०६.६८ सेंमी.) असून तिची निर्मिती कच्च्या रेशमापासून वा रंगीत रेशमी धाग्यापासून करण्यात येते. तिचे काठ वेलबुटीने सजविलेले असतात. पोत बहुधा गडद जांभळे अथवा सतेज तांबड्या रंगाचे असते तथापि कधी कधी ते गडद तांबडे किंवा निळे असून त्यावर शुभ्र पांढऱ्या, सोनेरी, नारंगी, लाल, पिवळ्या व हिरव्या रंगाच्या रेशमी धाग्याने बुटीदार व कैरीसदृश नक्षी विणण्यात येते. या साडीचा पदर मात्र भरघोस नक्षीकामाने खूपच सजविलेला असतो. त्यावर लहान लहान लांब चौकोन उठवून त्यांत देवालय, कालीमाता, राजदरबार, कल्पवृक्ष, विविध प्राणी, फुले व वनस्पती, संभाषण करणाऱ्या व फुलांनी सजलेल्या स्त्रिया वा राजपूत शैलीतील वेधक दृश्ये इत्यादींचे आकृतिबंध साधलेले असतात. कधीकधी परंपरागत शैलीतील वेलबुटीने साडीचे पोत सजविलेले असते. मात्र त्यात रंगसंगती व नक्षीची लपेट यातून सुसंवाद साधलेला असतो. सांकेतिक नक्षीदार विणकामाचेच दर्शन त्यातून घडते.
बालुचार साड्यांची निर्मिती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुर्शिदाबादेतील ईस्ट इंडिया कंपनीच्या एका कारखान्यातही होऊ लागली. यूरोपीय पाहुण्यांना भेटीदाखल देण्यात येणाऱ्या बालुचार साड्यांवर प्राय: पाश्चिमात्य धाटणीचेच आकृतिबंध काढण्यात येत. एका तत्कालीन बालुचार साडीवर वाफेच्या एंजिनाचा आकृतिबंधही विणल्याचे दिसून येते.
अलीकडे बालुचार साड्यांची निर्मिती वाराणसी येथील विणकरांकडून करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी ते जुनेच आकृतिबंध नव्या तंत्राने साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
पहा : वस्त्रकला.
जोशी, चंद्रहास
“