बाल हत्या : (इनफन्टिसाइड). सामान्यपणे नवजात बालकाची हत्या म्हणजे बालहत्या किंवा अर्भकहत्या असे समजले जाते. कायद्याच्या दृष्टीने पाहता भारतीय दंडसंहितेने सज्ञान व्यक्ती, अज्ञान व्यक्ती आणि बालक यांच्या हत्येमध्ये फरक केलेला नाही. गर्भातून बाहेर आल्यावर सजीव असलेल्या कोणत्याही बालकाची हत्या झाल्यास तो खून ठरतो. हत्या जाणूनबुजून केली, तर तो खून व इतर परिस्थितीत सदोष मनुष्यवध ठरतो. उतावळ्या हयगयीने झाला तरीही गुन्हाच.

भारतीय दंडसंहितेतील कलम ३१५ व ३१६ अन्वये जो इसम मूल जन्मण्याअगोदर कोणतेही असे कृत्य करील की, ज्यामुळे मूल जिवंत बाहेर येण्यास अडथळा निर्माण होईल अथवा आल्यास ते मरेल व अशा तऱ्हेचे कृत्य आईचा जीव वाचविण्याच्या सद्भावनेने केलेले नसेल, तर तो बेकायदेशीर गर्भपाताचा गुन्हा ठरतो. [ गर्भपात]. अशा गुन्हेगारास जास्तीत जास्त सजा दहा वर्षे अगर दंड किंवा दोन्ही शिक्षा फर्माविण्यात येतात. हालचाल करीत असलेल्या गर्भस्थ मुलाचा जो कोणी सदोष वध करील त्याला कमाल शिक्षा दहा वर्षे आणि /अथवा दंड अशी आहे. आई, बाप यांपैकी कोणीही बारा वर्षाखालील बालकास टाकून दिले, तर त्याला कमाल शिक्षा सात वर्षे अगर दंड किंवा दोन्ही अशी सजा आहे आणि जर त्या बालकास मृत्यू आला, तर गुन्हेगार खून अथवा सदोष मनुष्यवधाच्या शिक्षेस पात्र ठरतो.

इंग्लिश फौजदारी कायद्याप्रमाणे जर एखाद्या स्त्रीने बारा महिन्यांखालील आपल्या बालकास मारले असेल आणि त्यावेळी प्रसूतीनंतर तिची बिघडलेली मानसिक स्थिती टिकून असेल, तर तो सदोष मनुष्य वध ठरतो. जिवंत बाहेर येऊ शकणाऱ्या गर्भस्थ बालकास जर एखाद्या इसमाने ठार करण्याच्या उद्देशाने काही कृत्ये केली आणि त्यामुळे ते मूल मेले, तर अशा वेळीही या इसमास बालहत्या ह्या गुन्ह्याबद्दल दोषी धरण्यात येते. असा गुन्हा करणाऱ्यास कमाल सजा आजन्म कारावास आहे.

कवळेकर, सुशील