बालमानसशास्त्र : (चाइल्ड सायकॉलॉजी). मानसशास्त्राची एक शाखा बालमानसशास्त्र म्हणजे मुलांच्या वर्तनाचा व शारीरिक-मानसिक विकासाचा शास्त्रोक्त अभ्यास. ह्या शास्त्रात मुख्यत: खालील विषयांचा अभ्यास होतो :
(१) बाल्य कालापासून म्हणजे जन्मापासून तो किशोरावस्थेपर्यंत होणारे मानसिक-शारीरिक विकासातील क्रमश: बदल (२) बालकांच्या विकासातील मूलभूत व सर्वसामान्य आकृतिबंध. (३) विविध परिस्थितीत बालकाकडून घडू शकणाऱ्या वर्तनाची तत्त्वे. आणि त्यांवर आधारित पूर्वकथन. (४) बालकांचा सुयोग्य विकास व समायोजन यांबाबत पालकांना मार्गदर्शन करण्याची तत्त्वे, (५) बालकांच्या वैकासिक दर्जाचे मानसशास्त्रीय मापन. (६) बालवर्तन व बालमनोविकासाचे सामान्यादर्श (नॉर्मस). (७) अध्ययन, प्रेरण, परिपक्वन व समाजाभिमुखीकरण या प्रौढ मानसशास्त्रीय मौलिक प्रक्रियांचा बालमानसशास्त्रीय पाया (किशोर व प्रौढांच्या वर्तनाची मुलांच्या वर्तनाशी तुलना व साम्य).
बालमानसशास्त्रीय अन्वेषणाचा हेतू त्यातील सामान्यादर्श ठरवणे हा तर असतोच, शिवाय ह्या शास्त्रातील नवीन सिद्धांत व परिकल्पनांचे परीक्षण करणे हाही असतो. ही अन्वेषणात्मक तंत्रे व अभ्यासपद्धती खालीलप्रमाणे आहेत :
(१) विकासाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये असलेल्या बालकांचा एकाच वेळी तुलनात्मक अभ्यास. (२) एकाच बालकाच्या विकासाच्या सर्व अवस्थांतील मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण. (३) चरित्र आणि व्यक्तीतिहास यांचा अभ्यास. (४) खास प्रश्नावली. उदा., स्टॅनली हॉल व स्थानानुक्रमण श्रेणी (रेटिंग स्केल) व ज्युनिअर आयसेंक व्यक्तिमत्त्व सूची (इनवेंटरी). (५) प्रमाणित मानसशास्त्रीय कसोट्या. (६) बाल वर्तनाचे सतत निरीक्षण व त्यासाठी ध्वनिलेखन छायाचित्रण व चलत्चित्रण शिवाय एकदिशादर्शी काचेचा कक्ष या खास साधनांचा उपयोग. (७) नियंत्रित परिस्थितीत मानसशास्त्रीय प्रयोग. उदा., एकांडी जुळी मुले व नियंत्रित बालसमूह यांच्यावरील प्रयोग.
मनोविकासाचे सिद्धांत : बालमनोविकासाचे सिद्धांत अनेक आहेत. त्यांपैकी चार विशेष महत्त्वाचे आहेत : (१) फ्रॉइड, (२) एरिकसन, (३) प्याजे व (४) अध्ययन वा ज्ञानसंपादन.
(१) फ्रॉइड : फ्रॉइड यांच्या अर्भकीय लैंगिकतेच्या सिद्धांताप्रमाणे मुळातील कामप्रेरणा वा सुखलुब्ध ऊर्जेच्या (लिबिडो) तृप्तीवर व्यक्तिविकास अवलंबून असतो. हा व्यक्तिविकास बालवयात चार टप्प्यांतून पूर्ण होतो. पहिल्या वर्षात स्तन चोखून मिळविलेल्या औष्ठिक वा मौखिक सुखावाटे ही कामप्रेरणा शमते- औष्ठिक अवस्था (ओरल फेज). एक ते तीन वर्षे ह्या वयात ती गुदद्वारामार्फत मिळालेल्या सुखसंवेदनेमुळे शमते-गुदद्वारिक अवस्था (एनल फेज). तीन ते सहा वर्षे ह्या काळात येणाऱ्या शिश्नावस्था वा जनेनेंद्रिय संबद्ध अवस्थेत (फॅलिक फेज) लिंग न्याहाळण्यात वा हाताळण्यात मिळाणाऱ्या सुखावाटे ही कामप्रेरणा शमते. सहा ते तेरा वर्षांपर्यंतच्या काळात कामप्रेरणेचे शमन विशेष न होता ⇨ ईडिपस गंडाचे विभेदन होऊन बालक समलिंगी पालकाशी एकरुपता साधते. शेवटच्या लैंगिक अवस्थेत (जेनिटल फेज) तेरा वर्षापासून एकोणीस वर्षांपर्यंतच्या वयात बालकाचा लैंगिक विकास पूर्ण होऊन कामप्रेरणेचे रुपांतरण प्रौढ लैंगिक वासनेत होते आणि समाजमान्य अशा लैंगिक सुखाच्या मार्गाने ही कामप्रेरणा शमू लागते. [⟶ फ्रॉइड, सिग्मंड].
(२) एरिकसन : ई.एच्. एरिकसन (१९०२-) यांनी फ्रॉइडप्रणीत वरील मानसिक-लैंगिक विकासावस्थेपेक्षा मानसिक–सामाजिक (सायको-सोशल) विकासावस्थांना प्राधान्य दिले. दोघांच्यासिद्धांतातील एकोणीस वर्षांपर्यंतच्या टप्प्यांचा कालखंड व संख्या जवळजवळ सारखी आहे परंतु एरिकसन यांनी आणखी काही पुढील टप्पे प्रतिपादिले आहेत : प्रथमावस्थेत बालकाच्या गरजा भागविल्या गेल्यामुळे स्वत:वर व पालकांवर श्रद्धा निर्माण होते. दुसऱ्या अवस्थेत स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव आणि संकल्प निर्माण होतात. हळूहळू आत्मविश्वास व संयम वाढतो आणि अस्मिता (सेल्फ-एस्टीम) प्रस्थापित होते. तिसऱ्या अवस्थेत बालक अनुकरणाद्वारे शिकते तसेच सक्रिय बनून आक्रमकताही दाखवते. चौथ्या अवस्थेत म्हणजे सहा ते अकरा वर्षांच्या काळात बालकात कर्तव्याची जाणीव तसेच उद्योगप्रियता निर्माण होते. पाचव्या अवस्थेत म्हणजे अठराव्या वर्षापर्यंत स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची घडण पूर्ण होते आणि बालक स्वावलंबी बनून पालकांपासून अलग व स्वतंत्र होते.
(३) प्याजे : यांचा सिद्धांत बोधनिक, बौद्धिक तसेच नैतिक विकासांच्या टप्प्यांचे वर्णन करतो. बोधनिक विकासाच्या त्यांनी चार अवस्था वर्णिलेल्या आहेत : (१) वाचापूर्व अवस्था: संवेदनात्मककारक (सेंसॉरी-मोटर) कौशल्यांची वाढ (वयाच्या दोन वर्षांपर्यंत). (२) क्रियापूर्व अवस्था : या अवस्थेत चिन्हे (प्रतीके) आणि भाषेचा वापर वाढतो (दोन ते सात वर्षे). (३) मूर्तक्रियांची अवस्था : (सात ते अकरा वर्षे). भोवतालच्या जगाची ओळख होऊ लागते आणि अनुभवाचे वर्गीकरण होते. (४) रीतसर क्रिया (फॉर्मल ऑपरेशन्स) : ह्या अवस्थेत अमूर्त संकल्पनीकरण शक्य होऊन बालक उच्च शिक्षणास पात्र ठरते. [⟶ प्याजे, झां].
(४) अध्ययन वा ज्ञानसंपादन सिद्धांत : ⇨ आय्. पी. पाव्हलॉव्ह यांच्या अभिजात अभिसंघानाच्या मूळ सिद्धांतानंतर ⇨ जे. बी. वॉटसन यांनी प्राण्यांवरील मानसशास्त्रीय प्रयोगांद्वारे प्रतिपादित केलेला ⇨ वर्तनवाद आणि त्यानंतर ⇨ बी. एफ्. स्कीनर यांच्या क्रियावलंबी अभिसंघान या महत्त्वाच्या सिद्धांताने असे सिद्ध केले आहे, की अभिसंघान व सहयोग तसेच बक्षिस वा प्रशंसा आणि त्याउलट शिक्षा वा निंदा या साधनांतर्फे होणारे प्रबलन, बालकाचे अध्ययन आणि पर्यायाने बोधनिक व बौद्धिक विकास सुरळित व खात्रीशीर रीत्या घडवून आणते.
बालकांचा मनोविकास हा बालमानसशास्त्रातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. हा मनोविकास शारीरिकविकासाबरोबरच होत असतो. मनोविकासाचा खरा प्रारंभ नवजातावस्थेतच होतो. अर्भकीय मानसशास्त्राची पहिली प्रचीती म्हणजे भुकेमुळे किंवा वेदनेमुळे रडणे, पहिल्या काही आठवड्यांत ही निव्वळ प्रतिक्षेपी क्रिया असते परंतु तिसऱ्या महिन्यात अर्भक आपल्या रडण्यावर ऐच्छिक ताबा मिळविते व निरनिराळ्या गरजांसाठी ते निरनिराळ्या प्रकारे रडते. किंबहुना रडण्याच्या प्रमाणात, कारणांत आणि प्रकारांत त्याच्या पुढे उमलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची बीजे दिसतात. रडण्याशिवाय स्तन चोखणे, झोपणे, अंगस्थिती व हालचाली ह्या गोष्टीतसुद्धा वैयक्तिक भिन्नता असल्यामुळे याच वयात व्यक्तिमत्त्वाची प्राथमिक लक्षणे दिसून येतात. बाह्य परिसराची दखल घेण्यापासून समायोजन करण्याला सुरुवात होते. अर्थातच संवेदनक्षमता परिपक्व झाल्याशिवाय ते शक्य नसते परंतु चौथ्या महिन्यात रुची, स्पर्श, दृष्टी व श्रवण यांच्या क्रिया परिपक्व होऊ लागल्यामुळे बालक बाह्य परिसराचे निरीक्षण करू लागते व हळूहळू सामाजिक परिसराची नोंद घेऊ लागते. सर्वप्रथम आईचा आवाज व चेहरा ओळखणे त्याला शक्य होते. त्यानंतर निकटवर्तीय विशेषत: वडील आणि मोठी भावंडे. यांची ओळख पटू लागते. वयोवर्ष तीन पर्यंतच्या भावनिक वाढीबद्दल शर्मन व ब्रिजिस यांनी बरेच संशोधन केले आहे.
अर्भकावस्था : नवजात अर्भकाच्या प्रतिक्रिया सुखदु:खसूचक असतात. खुषी (डिलाइट) ह्या भावपूर्ण जाणिवेचा उगम शमलेली भूक, उबदार आवरण व क्लेशदायक संवेदनांचा अभाव ह्यांतून होतो. खुषीच्या उलट क्लेश (डिस्ट्रेस). यातून हळूहळू विशिष्ट भावनिदर्शक प्रतिक्रियांचा विकास होऊ लागतो. सुरूवातीला चौथ्या महिन्यात अनुकूल व लाभदायक अशा उद्दीपकांची वा चेतकांची प्रतिक्रिया म्हणून नुसता आवेश (एक्साईट्मेंट) ही भावपूर्ण अवस्था दिसून येते. विशेषत: भूक शमल्यावर व चांगली झोप झाल्यावर आईच्या उबदार सान्निध्यात व तिच्या प्रेमळ कर्णमधुर आवाजामुळे तसेच सुरक्षिततासूचक अशा प्रसन्न व परिचित चेहऱ्याच्या दर्शनामुळे बालक खुषीत येऊन हातापायांची जोरजोरात हालचाल करते व हुंकारही देते. पाच-सहा महिन्यानंतर तिटकारा, भीती व राग ह्या भावना बालकात साकार होऊ लागतात व त्याप्रमाणे रडण्याच्या सुरातही बदल होतात. १०-१२ महिने उलटल्यावर भावोच्चालन (एलेशन) व मायेची भावना (अफेक्शन) निर्माण होते. १८ महिन्यानंतर मत्सर व २४ महिन्यांनंतर हर्ष व अभिमान ह्या जटिल भावना त्याच्या ठिकाणी दिसू लागतात. चिंता ही प्रौढांत असणारी भावना तिसऱ्या वर्षात उदित होते. विशेषत: काळजी घेणाऱ्या आईवडिलांच्या गैरहजेरीत ती प्रादूर्भूत होते.
पहिली दोन वर्षे : शैशवकालात (इन्फन्सी) बालक बरेचसे स्वावलंबी होण्याच्या मार्गाला लागते. ह्या काळात त्याची शारीरिक वाढ शीघ्र गतीने होते. रडणे, बडबडणे, शरीराचे आविर्भाव इत्यादींमधून बालकांच्या भाषेचा विकास होतो. आठव्या महिन्यात ती खूपच बडबडतात व त्यामुळे स्वरयंत्राला चांगला सराव मिळतो. मुखाविर्भाव, हस्ताविर्भाव इत्यादींचा भाषेसारखा उपयोग केला जातो. शब्दार्थांची समज बालकांना लवकर येते. त्यांच्या आरंभीच्या शब्दसंग्रहात नावांची संख्या बरीच जास्त असते. काही क्रियावाचक शब्द व विशेषणांचीही ओळख त्यांना होते. बालके दोन वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या बोलण्यातील शब्दसंपत्ती सु. ३० शब्दांइतकी असते, तर त्यांना समजणाऱ्या शब्दांची संख्या सु. २७० असते. दोन शब्दांची वाक्ये त्यांच्या बोलण्यात विशेषकरून आढळतात.
सर्वसाधारण भावनात्मक संक्षुब्धतेतून हळूहळू भीती, क्रोध, दु:ख, हर्ष, आनंद व प्रेम अशा भावनांचा यथाक्रम विकास होऊ लागतो. बालकांच्या भावना अल्पकाळ टिकतात पण त्यांची अभिव्यक्ती मुक्त असते. बालकाचे समाजाभिमुखीकरण शीघ्र गतीने होते. तिसऱ्या महिन्यात त्याला व्यक्तींची ओळख पटू लागते. त्यांच्याकडे पाहून ते हसते, स्मित करते व त्यांच्या चेहऱ्यावरील आविर्भाव न्याहाळते. इतरांच्या भावनिक आविर्भावाची जाणीव त्याला सहाव्या महिन्यात होऊ लागते. नवव्या महिन्यात ते इतरांच्या बोलण्याचे अनुकरण करू लागते. एक वर्ष वय होताच त्याला नकारात्मक आदेश कळू लागतात. दुसऱ्या वर्षात बालकामध्ये बहुधा नकारवृत्ती जास्त प्रमाणात आढळून येते परंतु दुसऱ्या वर्षाच्या शेवटी ते प्रौढांशी सहकार्यही करू लागते. ह्या काळात त्याला इतर समवयस्क बालकांबद्दलही आकर्षक वाटू लागते व त्यांच्याशी त्याचे सामाजिक संबंध प्रस्थापित होऊ लागतात.
परिपक्वन आणि शिकण्याच्या द्वारा बालकास निरनिराळ्या गोष्टींचा अर्थ कळू लागतो. वस्तूच्या रंगारुपाचे निरीक्षण करणे तिची चव, वास इत्यादींचा अनुभव घेणे वस्तूचे हस्तोपयोजन करणे अशा गोष्टींमुळे त्याच्या वस्तूविषयीच्या अर्थपूर्णतेत भर पडत जाते. बालकाचा बोधनात्मक (कॉग्निटिव्ह) विकास हळूहळू होतो. सजीव व निर्जीव वस्तू असा फरक ह्या काळात बालकास कळत नाही. नैतिक दृष्ट्या ह्या वयात बालकाचा फारसा विकास झालेला नसतो. शिकवणुकीने व अनुकरणाने सामाजिक वर्तनरीती मात्र त्याच्या शिकण्यात येतात.
दोन ते सहा वर्षे : आपल्या परिसराचे अन्वेषण करून त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या कलेत प्रस्तुत कालखंडात बालकाचा खूपच विकास होतो. ह्या काळात शारीरिक सवयी चांगल्या प्रस्थापित झालेल्या असतात. हे वय अनेक समस्या निर्माण करणारे आहे. अनेक कृति कौशल्ये (मोटार-स्कील्स) ह्या वयात बालकाकडून आत्मसात केली जातात व त्याचे परावलंबित्व कमी होते. साहजिकच स्वत:च्या अनेक गोष्टी स्वत:च करण्याकडे त्याची प्रवृत्ती होते. स्वहस्ते खाऊ लागणे, स्वत: कपडे घालू लागणे इ. गोष्टी ३ ते ४ वर्षाच्या वयात त्याला सहज करता येऊ लागतात. यानंतर स्वत: स्नान करणे, कपडे करणे, बुटाचे बंद बांधणे, केस वळविणे ह्या गोष्टी बालकास करता येतात. याशिवाय खेळणे, बागडणे याची आवड निर्माण होऊन सांधिक कृती करण्याची त्याची क्षमताही वाढते. ही सर्व कौशल्ये जितक्या लवकर त्याच्या शिकण्यात येतात तितक्या लवकर इतर बालकांशी त्याचे सामाजिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात.
बालकांची व विशेषत: बालिकांची शब्दसंपत्ती शालापूर्व वयात फार भराभर वाढते. वाढत्या वयानुसार सर्व प्रकारच्या शब्दांचा वापर बालके करू लागतात. रंगविषयक शब्द पाचव्या वर्षी शिकण्यात आलेले असतात. कालवाचक शब्दांचाही वापर करण्यात येतो. बारापर्यंत वस्तू व आकडे त्यांना मोजता येतात, सहाव्या वर्षी वाक्यरचनेचे अनेक प्रकार त्यांच्या बोलण्यात आढळतात. तीन-चार वर्षापर्यंत बालकांचे बोलणे बोबडे असते पण आईवडिलांच्या स्पष्ट शब्दोच्चारांचा आदर्श ठेवून हे उच्चार सुधारलेही जातात. प्रारंभी बालकांचे बोलणे आत्मकेंद्री असते पण त्यांचा सामाजिक परिसर जसजसा मोठा होतो तसतसे बोलणे अधिक समाजानुकूल होते.
तीन ते चार वर्षांच्या वयात भावनात्मकता व आक्रस्ताळेपणा ही वैशिष्ट्ये बालकांच्या वागण्यात आढळतात. सहा वर्षाच्या वयात बालके खूप खेळू लागतात. शिवाय विस्तार पावलेल्या सामाजिक वातावरणाशी अवघड समयोजन करणे त्यांना शिकावे लागते. साहजिकच त्यांची भावनात्मकता वाढते. हवी ती वस्तू शीघ्र व सहज मिळविण्यासाठी रागाचा चांगला उपयोग होतो, हे एव्हाना त्यांच्या चांगलेच अंगवळणी पडलेले असते.
अनेक कारणांनी घरच्या वातावरणात संघर्ष उत्पन्न झाल्यामुळे किंवा इच्छांचा अवरोध झाल्यामुळे बालके रागावतात आणि लाथा झाडणे, हातपाय आपटणे, जमिनीवर लोळण घेणे, शरीर ताठ करणे इ. प्रकारचे आक्रस्ताळे वर्तन करतात. हा आक्रस्ताळेपणा ६ वर्षे वयात कमी होऊ लागतो. वयाच्या वाढीबरोबर भीती वाढत जाते. आईच्या व बालकांच्या भीतीविषयांत बरीच समानता आढळते. काही गोष्टींची भीती कच्च्या
समायोजनामुळे किंवा अप्रिय अनुभवांमधून निर्माण झालेली असते. दोन ते पाच वर्षांच्या काळात असूया बरीच दिसून येते. वडील-भावंडाला अधिक सवलती मिळतात म्हणून धाकट्याला त्याच्याबद्दल व आपल्या प्रेमातील प्रतिस्पर्धी म्हणून मोठ्याला धाकट्याबद्दल असूया वाटू लागते. असूयेमुळे परागमनात्मक (रिग्रेसिव्ह) वर्तन निर्माण होते. म्हणजे ते बालक अर्भकासारखे वागू लागते. छोट्या कुटुंबामध्ये असूयेचे प्रमाण अधिक आढळते. ह्या काळात बालकांची जिज्ञासा बरीच वाढलेली असते पण वस्तू हाताळण्यासाठी आवश्यक त्या
स्नायुकौशल्याचा पुरेसा विकास झालेला नसल्यामुळे त्यांच्या हातून वस्तूची बरीच मोडतोड होते. जिज्ञासेपोटी बालके अनेक प्रश्न विचारीत असतात आणि ही जिज्ञासापूर्ती जर पालकांनी केली नाही तर ती वैफल्यग्रस्त होतात.
प्रारंभीच्या सामाजिक अनुभवांच्या यशापयशावर बलकांचे नंतरचे सामाजिक यशापयश अवलंबून असते. यशस्वी सामाजिक समायोजनाला पोषक वर्तन निर्माण होण्याच्या दृष्टीने विकासातील ही अवस्था फार महत्त्वाची आहे. ह्या अवस्थेत प्रथम नकारवृत्ती दिसून येते. ती मूक, शाब्दिक किंवा वार्तनिक स्वरुपात असते. स्पर्धेची कल्पना बालकांना चौथ्या वर्षात येऊ लागते व पाचव्या वर्षात स्पर्धावृत्ती प्रभावी होते. सामाजिक समज जसजशी वाढते, तसतसा सहकारी वृत्तीचा विकास होऊ लागतो. ह्या विकासातूनच मैत्रीचे नाते निर्माण होते. वाढत्या वयानुसार बालकांना आपल्या समवयस्कांकडून मान्यता प्राप्त होण्याचे महत्त्व वाटू लागते. [⟶ सामाजीकरण].
बालकांचा संकल्पनात्मक (कन्सेप्च्युअल) विकास शीघ्रतेने होऊ लागतो. प्रारंभी त्यांच्या दृष्टीने सर्व वस्तू व खेळणी मानवी गुणांनी युक्त असतात (मानवीकरण). वस्तू हाताळणे व प्रश्न विचारणे ह्या दोन गोष्टींनी ⇨संकल्पनांचा विकास होतो, अंतरविषयक सूचक चिन्हांशी त्यांचा परिचय होतो. आकार व स्वरूपविषयक प्रत्यक्षाचा विकास ह्या काळात होतो. डावे व उजवे अंग असा भेद बालकांना करता येऊ लागतो. चार वर्षे वयात आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची त्यांना जाणीव होते. सहा वर्षे वयामध्ये उपहास, अपयश, प्रतिष्ठा इत्यादींची जाणीव वाढल्यामुळे बालके लाजाळू आणि आत्मबोधावस्थ होतात. बालकांचा बौद्धिक विकास या वयात मर्यादित असल्यामुळे योग्यायोग्यतेसंबंधीची अमूर्त तत्त्वे त्यांना नीट वापरता येत नाहीत. चांगल्या वाईटांसंबंधी त्यांच्यावर जे संस्कार होतात, त्यांतूनच नंतरच्या वर्तनाला मार्गदर्शक ठरणाऱ्या नौतिक मूल्यांचा पाया घातला जातो. ह्या वयात व्यक्तिमत्त्वाच्या मूळ गाभ्याला योग्य आकार देण्याच्या दृष्टीने पालक व बालके तसेच भावंडांचे परस्परसंबंध सलोख्याचे व स्थिर असणे फार महत्त्वाचे ठरते.
शालेय वयातील (किशोरावस्थापूर्व) विकास : उतावळेपणा आणि दूरदृष्टीचा अभाव ही प्रस्तुत कालखंडाची वैशिष्ट्ये होत. ह्या काळात बालकांचा चेहरा अधिक प्रमाणबद्ध होतो पण उंचीच्या मानाने स्नायूंचा फारसा विकास होत नसल्यामुळे ती हाडकुळी व अनाकर्षक दिसतात. अनाकर्षकतेत भर घालणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे मोठे दिसणारे नवीन दात आणि केशभूषेकडे व वैयक्तिक स्वच्छतेकडे केले जाणारे दुर्लक्ष. शालेय जीवनाच्या व क्रीडाकौशल्यातील यशाच्या दृष्टीने कृति-कौशल्याचे फार महत्त्व आहे. बहुतेक बालके ह्या काळात विविध प्रकारच्या क्रियांमध्ये आवडीने भाग घेतात. अभ्यासातील व खेळातील नैपुण्याचा त्यांना अभिमान वाटतो. लेखन, वाचन, संख्यागणन तसेच चित्रे काढणे आणि ती रंगविणे इ. गोष्टी ती शिकतात.⇨ अनुकरणाने त्यांचे कौशल्य वाढू लागते. ज्या बालकांमध्ये कौशल्य अधिक, त्यांचे सामाजिक समायोजनही अधिक चांगले असल्याचे आढळते.
अभ्यास, वाचन, श्रवण इत्यादींमुळे बालकांची शब्दसंपत्ती भराभर वाढू लागते. आपले विचार व भावना ठळकपणे व्यक्त करण्यासाठी कित्येक आर्ष शब्दांचा वापर बालके करू लागतात. बालिकांपेक्षा बालकांची वर्तणूक आडदांड स्वरुपाची असते व त्यातूनच त्यांना आपल्या लैंगिक वेगळेपणाची जाणीव होते. आपल्या खास मित्रमंडळीसाठी बालक-बालिका ‘गुप्त’ भाषेचा उपयोग करू लागतात. किशोरावस्थेपर्यंत ही भाषा प्रचारात असते.
वाढत्या वयानुसार बालकांची भाषा अधिक बंदिस्त होऊ लागते. बहुतेक बालके जरूरीपेक्षा मोठ्याने बोलतात. बोलण्याचे विषय सुरूवातीला स्वत:संबंधी असतात. वाढत्या वयानुसार बाह्य अभिरुचीबद्दलचे बोलणे वाढते. इतरांवर टीका करणे तसेच भिन्न लिंगीय समवयस्कांची टिंगल-टवाळी करणे ह्या वयात बरेच आढळते.
वाढत्या वयानुसार बालके भावनांचे बाह्य प्रगटीकरण नियंत्रित करू लागतात पण घरात मात्र भावनांचा उद्रेक होतच असतो. दहा ते बारा वर्षांच्या काळात भावंडांमधल्या भांडणांना ऊत येतो. राग आलाम्हणजे मुली रडू लागतात, तर मुले वस्तू फेकतात किंवा लाथाडतात. हा राग धुसफुसण्यातूनही व्यक्त होतो. सामान्य गोष्टींबद्दलची व वैयक्तिक सुरक्षिततेची भीती व चिंता वाढते. ह्या वयात स्वातंत्र्याची इच्छा तीव्र असते त्यामुळे इतरांशी तुलना केली जाणे, उपदेश केला जाणे, शिक्षा, खोटे आरोप इत्यादींची मुलामुलींना मनस्वी चीड येते. वाढत्या वयानुसार पुढे जिज्ञासा चांगलीच अभिव्यक्त होऊ लागते. व तिच्या पूर्तेतेसाठी मुले सक्रिय प्रयत्नाने सुद्धा आपल्या माहितीत भर घालतात. वयाच्या नवव्या वर्षापासून वाचनाचा नाद वाढू लागतो.
शालेय वयात सामाजिकतेचा विकास शीघ्रतेने होतो. मुलांना आवडणारे बहुतेक खेळ सांघिक असतात व त्यांतूनच त्यांची सामाजिकतेची वाढलेली भूक शमत जाते. आत्मकेंद्रितता, मतभेद, भांडणे जसजशी कमी होत जातात तसतसे सामाजिक समायोजनही वाढत जाते. मुलांच्या सामाजिक क्रियांमधून गट वा कंपू अस्तित्वात येतात. गटांसमोर सामाजिक कार्यक्रम काहीच नसेल, तर त्यांची शक्ती खोडसाळपणाकडे किंवा नियमबाह्य वर्तनाकडे खर्च होणे साहजिकच आहे. गटाकडून उच्छृंखल वर्तन घडण्याची शक्यता नेहमीच असते. अशा वर्तनाचे मुख्य प्रेरण साचलेली ‘वाफ’ (आवेग) मुक्त करणे, हेच असते. मुलाला एखाद्या गटाचा सदस्य असण्याबद्दल विशेष अभिमान वाटतो. त्यामुळेच तो गटाच्या बऱ्यावाईट आदर्शांच्या बाबतीत सूचनक्षम असतो, घरचे आदर्श मोडायलाही त्यामुळेच तो कित्येकदा तयार असतो. समाजाभिमुखीकरणाच्या दृष्टीने गटाचे आगळेच महत्त्व आहे. स्पर्धा, सहकार्य, समवयस्कांबद्दल सहानुभूती, जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, खिलाडू वृत्ती अशा कितीतरी गोष्टींचे शिक्षण गटातील सामाजिक जीवनातून मुलांना मिळते. मुले व मुली ह्या वयात स्वतंत्र गट करून असतात आणि त्यामुळे एकमेंकांपासून फटकून राहतात. [⟶ जमाव]. शालेय वयात मुलांचे लक्ष सांघिक खेळांकडे अधिक वेधले जाते व खेळांमध्ये स्पर्धाही अधिक आढळते. प्रारंभी मुलांचे लक्ष अशा खेळांमध्येही वैयक्तिक नैपुण्याकडे अधिक असते. पण पुढे पुढे सहकारी वृत्ती अधिक प्रभावी होऊ लागते. वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद १० ते ११ वर्षे वयात अधिक आढळतो. मोठी मुले त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींचा संग्रह अधिक चोखंदळपणे करतात. साहसकथांचे वाचन ह्या वयात अधिक आवडीने केले जाते कारण हे वय साहसप्रिय आणि विभूतिपूजनाचे असते. बाराव्या वर्षी वाचनाचा नाद फारच वाढतो. वाचनविषयांत लैंगिक आणि बौद्धिक भिन्नताही स्पष्टपणे दिसून येते. स्वप्नरंजनाला पोषक असलेल्या चित्रकथा (कॉमिक्स) मुलांचे लक्ष वेधून घेतात. स्त्रीसुलभ कला व गुण प्रकट करणाऱ्या गोष्टींचे वाचन मुलींकडून केले जाते.
शिक्षणामुळे व त्याच प्रकारे मित्रमंडळीत वावरण्यामुळे मुलांचा सामाजिक विकास चौरस होतो. आपल्याबद्दल इतर लोकांची मते कशी आहेत. हे कळू लागल्यामुळे व आपल्या योग्यतांची व उणिवांची इतरांशी तुलना करण्याने मुलांच्या स्वत:विषयीच्या कल्पना अधिक स्पष्ट होऊ लागतात. सामाजिक प्रसंगांत अधिकाधिक भाग घेण्यामुळे मुलांची सामाजिक जाणीव वाढत जाते. त्यातूनच औचित्यविषयक कल्पना दृढ होत जातात व नैतिक आदर्श व मूल्यांचा विकास होतो. शालेय वयाच्या शेवटी त्यांचे नैतिक आदर्श प्रौढांप्रमाणे होऊ लागतात तरीही मोठ्या मुलांकडून पुष्कळदा जाणूनबुजून चुकीच्या गोष्टी घडतातच. अशा गोष्टींचे मूळ प्रेरण बंडखोर वृत्ती असते व त्यातूनच प्रौढांचे नियंत्रण धुडकावून लावले जाते. ह्या वयात मुलांना अमुक गोष्ट योग्य का व दुसरी चूक का, याचे तार्किक स्पष्टीकरण हवे असते व त्यामुळेच लहानपणच्या अनुशासन पद्धतीबद्दल त्यांना तीव्र चीड वाटते. वर्तनाच्या औचित्य-अनौचित्याबद्दल योग्य स्पष्टीकरण दिले गेले, तरच त्याच्या नैतिक कल्पनांना व्यापक बैठक प्राप्त होते.
मुलांचा वैकासिक दर्जा आणि समूहातील त्यांची भूमिका ह्यांना अनुसरून मुलांच्या अभिरूचीचे स्वरुप ठरते. वयात आल्यावर झालेल्या शारीरिक बदलांमुळे लैंगिक भेद आता त्यांच्या डोळ्यात भरतात व लैंगिक जीवनाशी संबंधित प्रश्नांबद्दल तीव्र उत्सुकता वाटू लागते. पण त्यासंबंधी प्रश्न विचारणे मात्र त्यांना अवघड वाटते. कारण त्यांच्या मनात जननेंद्रिय व घृणेची भावना यांचे साहचर्य प्रस्थापित झालेले असते. शिवाय वडीलमंडळीही अशा प्रश्नांचे स्वागत करीत नाहीत. त्यामुळे अयोग्य व्यक्तींकडून व अश्लील लिखाणातून त्यांना चुकीची माहिती मिळते. हस्तमैथुन, समलिंगी व विषमलिंगी संबंध यांचे चोरटे व अयशस्वी प्रयोग केले जातात व त्यामुळे अपराधी भाव, लैंगिक समस्या व मानसिक अनिष्ट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतात. [⟶ लैंगिक अपमार्गण लैंगिक वर्तन लैंगिक शिक्षण].
वाढत्या वयानुसार आईवडिलांचे वर्चस्व झुगारून देण्याकडे मुलांचा कल असतो. त्यांना अधिक स्वातंत्र्य हवे असते. मार्गदर्शनासाठी मुले आईवडिलांवर अवलंबून राहत असली, तरी अतिलालन किंवा अवास्तव शिस्त यांचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वविकासाला बाधक ठरतो. वयोमानानुसार जबाबदारी सांभळण्याची संधी देण्यात आली, तर त्यांच्या विकासाला अनुकूल वातावरणाचा लाभ होतो. मुलांसंबंधी आईवडिलांच्या महत्त्वकांक्षेचाही मुलांच्या विकासावर व वर्तनावर प्रभाव पडतो.
मानसिक आरोग्य : बालकाचे मानसिक आरोग्य (प्रकृतावस्था)म्हणजे सुरळित शारीरिक वाढ व व्यक्तिमत्त्वविकास तसेच सामाजिक वातावरणाशी समायोजनी समतोल यांचा संगम. बालमनाला हानिकारक असे शारीरिक, मानसिक व सामाजिक तणाव उद्भवल्यास, त्या बालकाच्या विकासाच्या पातळीप्रमाणे आणि समायोजनशक्तीप्रमाणे समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो तथापि त्यात यश न आल्यास प्रासंगिक लक्षणे उद्भवतात. उदा., धुसफूस, आदळआपट, अस्वस्थ झोप, न खाणे किंवा भलताच हट्ट. ह्या लक्षणांचे स्वरुप आणि तीव्रता त्या तणावकारक प्रसंगाच्या तीव्रतेवर तसेच मुलाच्या समतोलरक्षणयंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते.
बालविकासासाठी आवश्यक असलेल्या वातावरणात महत्त्वाच्या उणिवा निर्माण झाल्यास अथवा काही महत्त्वपूर्ण बदल घडून आल्यास बहुतेक बालकांत वर्तनसमस्या अथवा भावनिक विकार उद्भवतात. अशा हानिकारक सामाजिक वातावरणात त्या बालकास बराच काळ रहावे लागते, तर भावी मनोविकृतीचा पाया घातला जाण्याचा संभव देखील बळावतो. ह्याचा निर्वाळा जे. बोलबी यांच्या अन्वेषणाने (१९५२) दिलेला आहे. मातेच्या प्रेमळ सहवासाला मुकलेल्या बालकांची मनोशारीरिक वाढ पूर्ण होत नाही आणि त्यांच्यात मतिमांद्य, व्यक्तिमत्त्वविकार तसेच वर्तनसमस्या निर्माण होऊ शकतात.
मानस-लैंगिक वाढीसाठी (सायको-सेक्शुअल डेव्हलपमेंट) आई-वडिलांशी असलेले नाते प्रकृत व प्रमाणशीर असावे लागते. समलिंगी पालकांवर असलेले अवलंबित्व अतिरेकी झाल्यास अथवा भिन्नलिंगी पालकाशी असलेले नाते कच्चे राहिल्यास लैंगिक आत्मप्रतिमेत (सेक्शुअल आयडेंटिटी) आणि लैंगिक भूमिकेत विकृत बदल होतात.
तात्पर्य, प्रकृत मनोविकास आणि विकृत मन:स्थिती ही एकाच सातत्यकावरील (कंटिन्यूअम) दोन टोके असून, मध्ये विकासांतर्गत अनेक समस्या तसेच अर्धप्रकृत व अर्धविकृत अशा अवस्था असतात. यावरून बालमानसशास्त्र व बालमनोविकृतिशास्त्र यांतील अखंड दुवे सिद्ध होतात. [⟶ मानसिक आरोग्य].
पहा : किशोरावस्था वर्तनविकृति व्यक्तिमत्त्वज्ञानसंपादन.
संदर्भ : 1. Arieti, S. Ed. American Handbook of Psychiatry, NewYork, 1974
2. Carmichael, L. Ed. Manual of Child Psychology, New York, 1954.
3. Eysenck, H. S. Ed. Encyclopaedia of Psychology, London, 1972.
4. Hurlock, E. B. Developmental Psychology, London, 1959.
5. Jersild, A. T. Child Psychology, London, 1960.
6. Stewart, R. S. Workman, A. D. Children and Other People, New York.
7. Strang, Ruth, An Introduction to Child Study, New York, 1959.
8. Thompson, G. G. Child Psychology, Bombay, 1965.
पंडित, र. वि. शिरवैकर, र. वै.
“