बारबूडा (ॲटिग्वा-बारबूडा) : वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील लीवर्ड बेटांपैकी १ नोव्हेंबर १९८१ रोजी स्वतंत्र झालेला द्वीपसमूह. हा नवस्वतंत्र द्वीपसमूह कॅरिबियन समुद्रात प्वेर्त रीकोच्या आग्नेयीस व ग्वादलूप बेटांच्या उत्तरेस ७२ किमी. पर्यंत पसरला आहे. क्षेत्रफळ ४४१.३ चौ.किमी. लोकसंख्या ६९,७०० (१९७५ अंदाज). हा द्वीपसमूह ॲटिग्वा (क्षेत्रफळ २८० चौ. किमी.), बारबूडा (१६० चौ. किमी.) व रेडोंडा (१.३ चौ. किमी.) या तीन बेटांचा बनलेला असून त्यांपैकी रेडोंडा हे बेट निर्मनुष्य आहे. ॲटिग्वा बेटावरील सेंट जॉन्स(लोकसंख्या २३,५००-१९७४) ही राजधानी आहे.
भूवर्णन : क्षेत्रफळाच्या दृष्टीने अत्यंत लहान असलेल्या या बेटांवर वैशिष्ट्यपूर्ण भूविशेष आढळत नाहीत. बेटांवर उंच डोंगर वा नदीप्रवाह नसल्याने ही बेटे कोरडी व इतर लीवर्ड बेटांपेक्षा वेगळी आहेत. अँटिग्वा या मोठ्या बेटाचा भूप्रदेश कमी उंचीचा पण चढ-उताराचा व खडकाळ आहे. या बेटाचा उत्तर भाग प्रवाळांनी बनलेला असून पश्चिम भाग उंच व ज्वालामुखीजन्य खडकांचा आहे. बोग्गी हे बेटावरील उंच शिखर (४०५ मी.) याच भागात आहे.
बारबूडा हे अंडाकृती बेट अँटिग्वाच्या उत्तरेस ४० किमी. असून ते प्रवाळांचे बनलेले आहे. शेल व चुनखडक यांनी बनलेला याचा भूप्रदेश बव्हंशी सपाट आणि सस.पासून सु. १.५ ते ३ मी. उंचीचा आहे. बेटाच्या पूर्वभागात उंची थोडी वाढत जाते. या भागात ६० मी. उंचीचे ‘टेबल लँड’ असून ईशान्य भागात ‘लिंडले हिल’ हा या बेटावरील सर्वांत उंच (८५ मी) प्रदेश आहे. बारबूडा बेटाच्या वायव्य भागात ‘कॉड्रिंग्टन’ नावाचे मोठे खारकच्छ आहे. रेडोंडा हे या द्वीपसमूहातील तिसरे बेट अँटिग्वा बेटाच्या नैर्ऋत्येस ४० किमी वर आहे. येथील भूप्रदेश खडकाळ व सु. ३३० मी. उंचीचा असून या बेटावर फॉस्फेटच्या साठ्यांचा शोध लागला आहे.
हवामान : या बेटांवरील हवामान उत्साहवर्धक व आरोग्यदायक असल्याने ती पर्यटकांची केंद्रे बनली आहेत परंतु कमी पर्जन्य व पाण्याचे दुर्भिक्ष्य त्याचबरोबर नापीक जमीन यांमुळे ही बेटे इतर बाबतींत फारशी प्रगती करू शकली नाहीत. येथे वार्षिक सरासरी पर्जन्य १०० सेंमी. पेक्षाही कमी पडतो. या बेटांना, विशेषतः अँटिग्वाला, अधूनमधून हरिकेन वाऱ्यांना तसेच कोरड्या दुष्काळांना तोंड द्यावे लागते. पर्जन्य कमी व जमीन मध्यम प्रतीची असल्याने वनसंपत्तीही निकृष्ट प्रतीची आढळते. बारबूडा बेटाच्या बहुतेक भागात काटेरी झुडपे व रान-फुलझाडे आढळतात. यांशिवाय बेटाच्या काही भागात पांढरा सीडार आणि पूर्वी थोडीफार शेती केलेल्या भागात निवडुंगासारख्या व उंच काटेरी वनस्पती आढळतात. या नैसर्गिक परिस्थितीमुळे बेटावरील लोकवस्ती सागर किनाऱ्यावरील कॉड्रिंग्टन या गावाभोवती एकवटली आहे. येथील जंगलात रानडुक्कर, हरिण, गिनी फाउल, कबुतरे, बदके इ. पशुपक्षी आढळतात. त्यामुळे हे बेट शिकाऱ्यांचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे.
इतिहास व राज्यव्यवस्था : क्रिस्तोफर कोलंबसने १४९३ मध्ये अँटिग्वा बेटाचा शोध प्रथम लावला व बेटास स्पेनमधील सेव्हिल या गावी असलेल्या चर्चच्या नावावरून ‘अँटिग्वा’ हे नाव दिले. त्यानंतर स्पॅनिशांनी व फ्रेंचांनी येथे वसाहती स्थापन करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु प्रत्यक्षात १६३२ मध्ये ब्रिटिशांना येथे वसाहत स्थापन करण्यात यश मिळाले. ब्रिटिशांनी येथे प्रथम तंबाखूची लागवड केली. नंतर काही काळ या बेटांवर फ्रेंचांचा अंमल होता परंतु १६६७ च्या ब्रेडा (नेदर्लंड्स) तहानुसार ते ब्रिटिशांना परत मिळाले. सतराव्या शतकाच्या अखेरीस या बेटावर उसाचे पीक किफायतशीर ठरू लागल्याने गुलामांकरवी मोठ्या प्रमाणावर त्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. याच शतकात पूर्वी डुल्सीना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बारबूडा या बेटाची सत्ता ब्रिटिश राजघराण्याकडून ‘कॉड्रिंग्टन’ नावाच्या घराण्याकडे गेली. (कार. १६९१-१८७२). या घराण्याच्या नावावरून बारबूडा बेटावरील एकमेव वसाहतीला कॉड्रिंग्टन असे नाव देण्यात आले. या घराण्याने शिकारीचा खेळ, पशुपालन तसेच थोड्या प्रमाणात ऊस, लाकूड, लोणारी कोळसा, चुना इ. उत्पादने घेण्यासाठी बारबूडा बेटाचा उपयोग करून घेतला. १८७२ नंतर मात्र हे बेट ब्रिटिशांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतले व अँटिग्वाबरोबरच बारबूडा बेटही ब्रिटिश वसाहत म्हणून ओळखले जाऊ लागले. १८३४ मध्ये गुलामगिरी नष्ट झाल्याने व नैसर्गिक आपत्तींमुळे अँटिग्वाबेटावरील ऊस उत्पादनाचे खूप नुकसान झाले व त्यामुळे बेटाची अर्थव्यवस्था ढासळली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात येथे कापसाची लागवड करण्यास सुरुवात झाली. १९४१ मध्ये या बेटाचा ईशान्य किनारा अ.सं.ना.सैनिकी तळ उभारण्यासाठी भाडेपट्टीच्या कराराने देण्यात आला. १९५८-६२ या काळात अँटिग्वा ‘फेडरेशन ऑफ वेस्ट इंडिज’ चा सभासद झाला. १९६७ नंतर अँटिग्वाला बारबूडा व रेडोंडा बेटांसह अंतर्गत स्वातंत्र्य मिळाले परंतु परराष्ट्रीय धोरण व संरक्षण हे अधिकार ग्रेट ब्रिटनकडेच राहिले. बारबूडा व रेडोंडा या बेटांवर अँटिग्वाची सत्ता आली. सु. ३५० वर्षांच्या सत्तेनंतर १ नोव्हेंबर १९८१ रोजी ब्रिटिशांनी ही बेटे स्वतंत्र झाल्याचे घोषित केले.
आर्थिक स्थिती : या नवनिर्मित देशाची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटन व्यवसाय व ऊस उत्पादन यांवरच अवलंबून आहे. जमीन मध्यम प्रतीची असल्याने फक्त ऊस, तंबाखू, कापूस, भाजीपाला, थोड्या प्रमाणात फळे यांचे उत्पादन घेतले जाते. यांशिवाय लाकूड, लोणारी कोळसा, मीठ (विशेषतः बारबूडा बेटावर) इ. उत्पादने घेतली जातात. १९६८ मध्ये लागवडीखाली एकूण ५९.१%, तर जंगलांखाली १५.९%, कुरणे ६.८% व इतर १८.२% असे जमिनीचे वाटप होते. मासेमारी व पशुपालनाचाही व्यवसाय केला जातो. अँटिग्वा बेटावर साखर, रम तयार करणे, कापूस पिंजणे हे व्यवसाय चालतात. या बेटावरून पायराइट खनिज त्रिनिदादला निर्यात केले जाते. अन्नधान्ये, कापड, लाकूड व अखाद्य तेले यांची परदेशातून आयात केली जाते. बारबूडा बेट शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. देशाची गरज भागण्याइतकी उत्पन्नाची साधने नसल्याने बहुतेक माल आयातच करावा लागतो. निर्यातीत प्रमुख्याने साखर, कापूस व मळी यांचा समावेश असतो.
दळणवळण : या प्रदेशात १९७० पर्यंत लोहमार्ग उपलब्ध नव्हते. १९६० साली या प्रदेशात सु. २५३ किमी. लांबीचे रस्ते होते. याशिवाय देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ (अँटिग्वा बेटावर) असून सेंट जॉन्स व कॉड्रिंग्टन ही महत्त्वाची बंदरे आहेत. येथून हवाई व जलवाहतूक चालते. या प्रदेशात १९६९ साली दोन दैनिके ४,५०० दूरचित्रवाणी संच व १ प्रेक्षपण केंद्र तसेच ३,८०० रेडिओ संच (१९६५) आणि २,५९६ दूरध्वनी संच (१९७१) होते.
लोक व समाजजीवन : सुमारे ७० हजार लोकसंख्या असलेल्या या देशातील बव्हंशी लोक निग्रो आणि मिश्रवंशी आहेत देशात आफ्रिकनांचे प्रमाण सर्वांत जास्त असून यूरोपियन व आशियाई अल्प आहेत. बहुतेक लोकसंख्या अँटिग्वा बेटावर असून बारबूडा बेटावर सु. १,५०० लोक राहतात. देशात प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. १९६३-६४ साली या प्रदेशात ४३ प्राथमिक शाळांत ११,०५२ विद्यार्थी व ३४७ शिक्षक ९ माध्यमिक शाळांत ६,०७३ विद्यार्थी व १२३ शिक्षक उच्च शिक्षण संस्थांत ५० विद्यार्थी व ३ शिक्षक होते. शिक्षणात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. या प्रदेशात १९६४ मध्ये ४२४ रुग्णालयखाटा व १९६७ मध्ये एकूण सतरा डॉक्टर होते.
पर्यटन : पर्यटन हा देशातील महत्त्वाचा व्यवसाय असून येथील जंगलांत शिकारीसाठी पर्यटकांची गर्दी होते. याशिवाय अँटिग्वा बेटावरील ‘इंग्लिश हार्बक’ हे इतिहासप्रसिद्ध बंदर असून तेथे नौकानयनाच्या सोयी उपलब्ध आहेत. होरेशो नेल्सन या ब्रिटिश नौदल अधिकाऱ्याने १७८४ ते १७८७ या आपल्या नौसेवेतील काळात या बंदरात राहून महत्त्वाचे कार्य केले होते. येथे होणाऱ्या नौकाशर्यती हे पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण असते.
चौंडे, मा. ल.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..