कीरत बाबाणी

बाबाणी, कीरत चोइथराम : (३ जानेवारी १९२२ -). एक अष्टपैलू सिंधी साहित्यिक व पत्रकार. जन्म सिंध (पाकिस्तान) मधील नबाबशाह या गावी. कराची येथील डी.जे. सिंध महाविद्यालयात असतानाच १९४३ साली बाबाणी यांचा ‘ आजादी ऐं. गुलामी’ या शीर्षकाचा लेख हिंदवासी या सिंधी साप्ताहिकातून प्रसिद्ध झाला. विद्यार्थिदशेतच त्यांनी कथा, निबंध, विनोदी लेख इ. प्रकारचे लेखन केले आणि ते सर्व विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. पुढे बाबाणी साहित्याच्या चळवळीकडे आकृष्ट झाले. तिचे एक अग्रणी म्हणून कराची येथील साहित्यिक वर्तुळात राहून त्यांनी खूपच कार्य केले. 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. काही काळ त्यांना सिंधमधून हद्दपारही करण्यात आले होते. देशाच्या फाळणीनंतर ते मुंबईला येऊन स्थायिक झाले व त्यांनी ‘ सिंध मॉडेल हायस्कूल’ येथे शिक्षकाची नोकरी पतकरली. तेथे नोकरी सांभाळून त्यांनी आपले अपुरे राहिलेले शिक्षण पुरे केले. ते १९५॰ मध्ये बी.ए. व १९५२ मध्ये एल्एल्. बी. झाले. फाळणीमुळे भारतात आलेले सिंधी हिंदू आपल्या घरादाराला तर मुकले होतेच शिवाय भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत स्थायिक होण्यासाठी अनेकविध अडचणींना तोंड देण्यात गुंतल्यामुळे ते आपल्या भाषा-साहित्य आणि संस्कृती यांपासूनही दुरावले होते. याची खंत बाळगणाऱ्या काही तरुण सिंधी लेखकांनी एक सहकारी संघटना स्थापन करून त्याद्वारे सिंधी भाषा, साहित्य, संस्कृती इत्यादींच्या संरक्षण-संवर्धनासाठी एक मोहीम सुरू केली. या मोहिमेचे बाबाणी हे एक अध्वर्यू होत. सिंधी भाषेला एक स्वतंत्र म्हणून भारतीय संविधानात स्थान मिळावे, हे या मोहिमेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. १९६८ मध्ये हे उद्दिष्ट साध्य झाले. सिंधी भाषा-साहित्याच्या अभिवृद्धीसाठीही या संघटनेकडून प्रयत्न करण्यात आले. या अनुषंगाने सिंधी साहित्याला वाहिलेले सिंधुधारा हे साप्ताहिक व नई दुनिया हे मासिक १९५॰ च्या सुमारास मुंबईहून सुरू करण्यात आले. त्यातही बाबाणींनी पुढाकार घेतला. १५वर्षे ते सिंधुधाराचे संपादक होते.

बाबाणी १९७३ ते १९८॰ च्या दरम्यान ‘अखिल भारत सिंधी बोली व साहित्य सभा’ या संस्थेचे अध्यक्ष होते. १९७३ मध्ये भरलेल्या ‘ अखिल भारत सिंधी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सिंधी साहित्यक्षेत्रात एक सिद्धहस्त कथाकार म्हणून त्यांचे विशिष्ट स्थान आहे. याशिवाय चरित्र, निबंध, एकांकिका इ. साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले आहेत. हूअ (म.शी.ती) आणि दर्द जो दिलिमें समाइजो न सध्यो (म.शी. दु:ख हृदयी सामावेना!) हे अनुक्रमे १९५६ व १९६६मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे दोन प्रमुख कथासंग्रह होत. याशिवाय त्यांच्या अनेक कथा विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत व कथासंकलन ग्रंथातूनही त्या अंतर्भूत झाल्या आहेत.

त्यांच्या १९७२ मध्ये प्रकाशित झालेल्या एकांकिकासंग्रहातील ‘सूरीअ सडु कयो’ (सुळाचे निमंत्रण) ही प्रमुख एकांकिका सिंधी स्वातंत्र्यवीर हेमू कालाणी यांच्या जीवनावर आधारित आहे, तर इतर एकांकिकांत सामाजिक दोषांवर मार्मिक टीका आहे. ‘सिंधी जातीअ जो आईंदो’ (सिंधी जातीचे भवितव्य) हा प्रदीर्घ निंबंध बाबाणींनी १९६९ साली लिहिला. १९७८ मध्ये त्यांचा अमन जे उफक डांहुं (शांतीच्या गगनाप्रत) हा निबंधसंग्रह प्रकाशित झाला. १९८१ मध्ये साहित्य अकादेमीने प्रसिद्ध कलेल्या निवडक सिंधी निबंधसंग्रहाचे (चूंड सिंधी मज्मून) बाबाणी संपादक होत.

साहित्यसमीक्षेवरही अदबमें कदुरनि जो स्वालु (१९७८, साहित्यातील मानदंडासंबंधी प्रश्न) व ओखडोख (१९८१, विचारमंथन) हे त्यांचे दोन लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. बाबाणींचे स्वतंत्र कादंबरीलेखन नाही तथापि १९५८ साली ⇨ मुल्क राज आनंद (१९॰५ – ) यांच्या कूली (१९३६) या इंग्रजी कादंबरीचे आणि १९६॰ साली  ⇨ मॅक्झिम गॉर्की (१८६८-१९३६) च्या माल्व्हा (1897) या रशियन लघुकादंबरीचे सिंधी भाषांतर त्यांनी केले आहे. त्यांच्या १९८॰ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेनिन-दुनियाजी अजीमु शख्स्यत (लेनिन –एक आगळे व्यक्तिमत्त्व) या चरित्रग्रंथास सोविएत लँड नेहरू पुरस्कार देण्यात आला.बाबाणी यांच्या साहित्यात सूक्ष्म अवलोकन, मार्मिक विनोद आणि भाषेवरील प्रभुत्व दिसून येते. त्यांचे विषय काही वेळा राजकीय किंवा देशभक्तिपरही असतात पण मुख्यत्वे ते सामाजिक विषयावरच लिहितात. त्यांच्या सर्वच लिखाणात पुरोगामी आणि सुधारणावादी दृष्टिकोण आढळतो. सिंधी भाषा-साहित्यात मोलाची भर घालणारे एक अष्टपैलू लेखक म्हणून बाबाणींचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

बाधवाणी, यशोधरा.