बाडे, व्हाल्टर : (२४ मार्च १८९३ – २५ जून १९६॰). जर्मन ज्योतिर्विद. आकाशगंगा व इतर ⇨ दीर्घिकांच्या सखोल अध्ययनाद्वारे त्यांनी ताऱ्यांच्या उत्क्रांतीविषयीच्या सिद्धांताचा विकास होण्यास साहाय्य केले. त्यांचा जन्म स्क्रॉटिंगौसेन (जर्मनी) येथे आणि शिक्षण मॅन्स्टर व गटिंगेन येथे झाले. १९१९ साली गटिंगेन विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविल्यावर १९३१ पर्यंत त्यांनी हँबर्ग वेधशाळेत काम केले. तेथे असताना १९२३ साली त्यांना एक धूमकेतू आढळला व त्यांनी धमकेतूच्या पुच्छाच्या आकाराविषयी स्पष्टीकरणही केले.१९२५साली ‘(९४४) हिदाल्गो’ व १९४९ साली ‘(१५६६) इकॅरस’ हे दोन लघुग्रहही (ज्यांच्या कक्षा मंगळ व गुरू यांच्या कक्षांच्या दरम्यान आहेत असे लहान खस्थ पदार्थही) त्यांनी शोधून काढले. १९२॰ साली त्यांचे लक्ष गोलीय तारकागुच्छ (हजारो तारे असलेले समूह) व त्यातील स्पंदमान ताऱ्यांकडे [आकुंचन व प्रसरण पावणाऱ्या ताऱ्यांकडे, सर्वाधिक आकुंचनाच्या वेळी ते सर्वाधिक तेजस्वी असतात ⟶ तारा]. अशा ताऱ्याचा प्रारण बाहेर टाकणारा पृष्ठभागच वर-खाली होत असतो (स्पंदमान असतो), असे त्यांनी १९२६ साली दाखविले. त्याच वर्षी रॉकफेलर फेलोशिप मिळून ते कॅलिफोर्नियाला गेले. १९३१-५८या काळात ते मौंट विल्सन वेधशाळेत (कॅलिफोर्निया) होते. १९४८ पासून ते मौंट पॅलोमार वेधशाळेतही काम करीत असत. त्यांनी एडविन पॉवेल हबल यांच्याबरोबर दूरवरच्या दीर्घिकांचा अभ्यास केला (१९३८). बाडे यांनी क्रॅब अभ्रिका [ताऱ्यांच्या दरम्यान दिसणारा अंधुक धुरकट पट्टा म्हणजे अभ्रिका ⟶ अभ्रिका] व ऑफियुची (भुजंगधारीतील) नवतारा (अंतर्गत स्फोटामुळे ज्याच्या दीप्तीमध्ये अचानकपणे १॰ हजार ते १.५लक्ष पट वाढ होते असा तारा) यांच्यावर प्रबंध लिहिले होते. त्यांनी देवयानी दीर्घिका (एम ३१) व तिच्या उपदीर्घिका (एम ३२ व एनजीसी २॰५) यांच्या गाभ्यातील तोपर्यंत न दिसलेल्या ताऱ्याची छायाचित्रे प्रथम घेतली. अशा प्रकारे दीर्घिकेच्या गाभ्यातील एकेकट्या ताऱ्याचे निरीक्षण व अभ्यास करणारे ते पहिले ज्योतिर्विद ठरले. एम ३१ दिर्घिकेच्या गाभ्यातील सर्वांत तेजस्वी तारे हे सभोवतालच्या चक्रभुजांमधील सर्वांत तेजस्वी ताऱ्याप्रमाणे निळे नसून तांबडे असल्याचे त्यांच्या अध्ययनावरून दिसून आले [ ⟶ दीर्घिका]. यावरून त्यांनी ताऱ्यांचे I सामूहिक तारे व II सामूहिक तारे असे वर्गीकरण केले [ ⟶ तारा]. मौंट पॅलोमार येथील २॰॰ इंची (५.॰८मी.) दुर्बिणीचा उपयोग विश्वाच्या समन्वेषासाठी कसा करावा याची रूपरेषा त्यांनी विशद केली होती. या दुर्बिणीच्या साहाय्याने घेतलेल्या छायाचित्रांवरून देवयानी दीर्घिका अपेक्षेप्रमाणे ७.५लक्ष प्रकाशवर्षे अंतरावर नसून त्यापेक्षा जास्त अंतरावर असल्याचे त्यांनी प्रतिपादिले. पुढे १९५२ साली विश्वाचे आकारमान पूर्वी वाटले होते त्याच्या दुप्पट असल्याचा निष्कर्ष निघाला. अशाच एका छायाचित्रात सिग्नस ए (हंस ए) या रेडिओ उद्गमाची जुळी प्रतिमा दिसली. तीवरून बाडे यांनी हा उद्गम आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे आकाशगंगेच्या पुष्कळच बाहेर असल्याचे सांगितले होते (१९५३ साली शोधला गेलेला हा पहिला रेडिओ उद्गम होय). अशा तऱ्हेने दीर्घिकांची अंतरे काढण्यासाठी ताऱ्यांचा वापर करून त्यांनी विश्वाचे आकारमान पुन्हा निश्चित केले. तसेच वाढलेल्या अंतरामुळे प्रकाशाला काटाव्या लागणाऱ्या जादा अंतरावरून त्यांनी विश्वाचे वयही नव्याने निश्चित केले.सेवानिवृत्त झाल्यावर १९५८ साली त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात एक व्याख्यानमाला गुंफली होती व काही काळ ऑस्ट्रेलियात ज्योतिषशास्त्रीय वेध घेण्याचे काम केले. नंतर मृत्यूपावेतो ते गटिंगेन विद्यापीठास ‘गौस प्राध्यापक’ म्हणून काम करीत होते. त्यांचे पुष्कळसे साहित्य अप्रकाशितच राहिले. रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक (१९५४), ब्रूस पदक (१९५५), तसेच विविध वैज्ञानिक संस्था व ॲकॅडेमी यांचे सदस्यत्व वगैरे बहुमान त्यांना मिळाले होते. ते गटिंगेन येथे मृत्यू पावले.

मोडक, वि.वि.