बाडेन – बाडेन : पश्चिम जर्मनीच्या बाडेन-वर्टेबर्ग राज्यातील ब्लॅक फॉरेस्ट निसर्गरम्य भागातील क्षारयुक्त गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर. लोकसंख्या ३६,९॰॰ (१९७१ अंदाज). हे कार्लझूएच्या नैऋत्येस २९ किमी. ओस नदीच्या खोऱ्यात समुद्रसपाटीपासून १८३ मी. उंचीवर वसलेले आहे. आरोग्यधाम म्हणूनही त्याचा लौकिक असून शहरात त्या बाबतीत अनेक सुविधा उपलब्ध आहेत. बाडेन-बाडेन इ.स. तिसऱ्या शतकापासून ज्ञात आहे. पाचव्या शतकारंभी येथील रोमन अंमल नष्ट झाल्यानंतर त्याचे महत्त्व कमी झाले. परंतु बाराव्या शतकापासून बाडेनच्या सरदाराचे ठाणे येथे असल्याने त्याचा विकास घडून आला. दुसऱ्या महायुद्धकाळात येथे जर्मनांचे सैनिकी उपचार केंद्र होते. शहरात रोमन सम्राट कॅराकॅला याच्या कारकीर्दीत (इ.स. २११-१७) बांधलेल्या स्नानगृहाचे अवशेष आढळतात. येथील गरम पाण्याच्या झऱ्याचे तपमान ६६॰ से.पर्यंत असते. याशिवाय न्यूइस श्लोस (१५ वे शतक), लिखटेन्टल कॉन्व्हेंट (१२५४), पंप रूम, (ट्रिंकहॉल) ग्रीक चॅपेल (१८६३), नृत्यगृह, आधुनिक स्नानगृह, फ्रीड्रिख्सबॅद स्नानगृह (१८६९) ही पर्यटकांची आकर्षणे होत.
शहाणे, मो. ज्ञा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..