बाख, योहान झेबास्टिआन : (२१ मार्च १६८५ – २८ जुलै १७५॰). पश्चिमी संगीतविश्वातील एक श्रेष्ठ जर्मन संगीतकार व ऑर्गनवादक. जवळजवळ सात पिढ्यांची सांगीतिक परंपरा लाभलेल्या घराण्याच्या पाचव्या पिढीतला हा संगीतकार होय. त्याच्या चर्चसंगीतरचना विशेषत्वाने नावाजल्या जातात. आयसेनाख येथे त्याचा जन्म झाला. संगीताचे बाळकडू त्याला लहानपणीच त्याच्या वडीलांकडून – योहान आम्ब्रोझिउस बाख यांच्याकडून तसेच नंतर त्याचा भाऊ योहान क्रिस्टोफ याच्याकडून मिळाले. ल्युनबुर्क येथे सोप्रानो पट्टीतील अप्रतिम आवाजाचा बाल गायक म्हणून त्याने लौकिक मिळवला.
सर्वसाधारण नागरी जीवनातही संगीतास भरपूर प्रतिष्ठा असलेल्या प्रॉटेस्टंटपंथीय उत्तर जर्मनीतील व्हायमार, कटन व लाइपसिक या शहरांत बाखचे संगीत आकारास आले. वयाच्या अठराव्या वर्षापासून वृंदगायक, राजाच्या वाद्यवृंदातील व्हायोलिनवादक, दरबारी संगीतकार, चर्चमधील ऑर्गनवादक इ. विविध सांगीतिक भूमिका बाखने पार पाडल्या. वयाच्या केवळ दहाव्या वर्षीच आलेला पोरकेपणा, दरबारी राजकारण इ. कारणांनी नोकऱ्यांत वेळोवेळी होत गेलेले बदल, दोन विवाह, राजकोपाने घडलेला तुरुंगवास आणि जीवनाच्या अखेरीस आलेले अंधत्व अशा घटनांनी बाखचे जीवन भरले आहे. मुख्यत: चर्चसंगीताची रूढी व स्वत:ची कलात्मकता या दोन शक्तींच्या संघर्षातून बाखने आपली कला आकारास आणली. ऑर्गनबरोबरच हार्पसिकॉर्ड व क्लॅव्हीकॉर्ड वादनातही तो निपुण होता. चर्चसंगीत, ऑर्गनसंगीत व इतर वाद्ये या सर्वांसाठी त्याने रचना केल्या. मॅस, पॅशन, काँचेर्टो, कँताता या सर्व प्रकारच्या रचनांत त्याने भर घतली. तरीही त्याने रचलेल्या पाच पॅशन-रचनांपैकी दोनच उपलब्ध आहेत व उपलब्ध २॰ कँताता-रचनांशिवाय, निदान शंभर तरी अधिक रचना त्याने केल्या असाव्यात. जर्मन संगीतपरंपरेखेरीज फ्रेंच व इटालियन संगीतपरंपरांचाही त्याने कसून अभ्यास केला होता आणि आपल्या स्वत:च्या ग्रंथालयात व्हीव्हाल्डी, कोरेल्ली इ. अनेकांच्या रचनांची हस्तलिखिते जमा केली होती. म्हणूनच व्यासंग आणि प्रतिभा या दोहोंचा आढळ त्याच्या कर्तृत्वात झाला असल्यास नवल नाही. त्याच्या समकालीनांना तो काहीसा रुक्ष वा विद्वज्जड वाटे. इतरांपेक्षा त्याचा ओढा भारदस्तपणाकडे अधिक होता. एकंदरीत अभिजात वा शास्त्रोक्त (क्लासिकल) म्हणून संबोधल्या जाणाऱ्या संगीताचा तो अध्वर्यू मानला जातो. ‘बी मायनर’ पट्टीतील त्याची मॅस प्रकारातील रचना, विख्यात ब्रांडनबुर्क काँचेर्टो इत्यादींतून त्याची थोरवी प्रत्ययास येते. बहुधुनपद्धतीच्या बरोक संगीताचा विकास घडवून आणण्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याच्या दोन मुलांनीही संगीताच्या क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली. लाइपसिक येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Schweitzer, Albert Trans. Newman, Ernest, J.S. Bach, 2. Vols. London, 1964.
2. Spittta, Phillipp Trans. Bell, Clara and Fuller- Maitland, J.A. Johann Sebassian Bach, 3 Vols. New York, 1951.
3. Terry, C.S. Bach : A Blography, Gloucester, Mass, 1964.
रानडे, अशोक.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..