बांतूभाषासमूह: आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील कॅमेरूनपासून पूर्व किनाऱ्यावरील केन्यापर्यंत एक रेषा ओढली, तर ह्या रेषेच्या दक्षिणेला जेवढ्या स्थानिक आफ्रिकन भाषा बोलल्या जातात, तेवढ्या (कालाहारी वाळवंटाच्या भागात बोलल्या जाणाऱ्या खोईसान भाषासमूहाचा ठळक अपवाद सोडून) बांतू भाषासमूहात मोडतात. यूरोपियनांचा ह्या भाषांशी परिचय बराच अगोदर झाला. ह्या समूहात कमीत कमी ३०० बोली मोडतात. अधिक शोधानंतर हा आकडा ४५० पर्यंत जाऊ शकेल. बोलणाऱ्यांची संख्या ७ कोटी असावी. ह्यांच्यापैकी काही बोली त्यांच्या मूळच्या संकुचित क्षेत्राच्या बाहेर व्यापार किंवा धर्मप्रसार किंवा अन्य दळणवळण यांसाठी वापरल्या जातात. अशा बोलींपैकी काही रोमन लिपीत लिहायला आणि छापायलाही सुरूवात झाली आहे. ह्या सहायक भाषा आणि त्यांची विस्तारक्षेत्रे शेजारील कोष्टकात दिली आहेत.
इंग्लिश भाषेत आफ्रिकन लोकांच्या लढ्याचे ध्येय ह्या अर्थी ‘uhuru’ (स्वातंत्र्य) हा शब्द स्वाहीली भाषेतील आहे. बांतू भाषांचे लक्षात येण्यासारखे दोन विशेष म्हणजे–शब्दाच्या किंवा धातूच्या सुरूवातीला येणारे अनुस्वारवजा अनुनासिक आणि नामांना व त्यांच्या बरोबर संबद्ध शब्दांना लागणारे लिंगदर्शक पूर्वप्रत्यय. ही व्याकरणिक लिंगे भाषेनुसार ५ पासून १२ पर्यंत असू शकतात अनेकवचनाचा पूर्वप्रत्यय पुष्कळदा वेगळा असतो. बा-न्तू (लोक) ह्या अनेकवचनी नामात ही दोन्ही वैशिष्ट्ये दिसतात. तसेच स्वाहीली भाषेतील पुढील दोन वाक्ये उदाहरणादाखल पहावीत :
ki-ti |
ky-angu |
ki-refu |
ki-lianguka |
खुर्च्-ई |
माझ्-ई |
लांब |
पडल्-ई |
vi-ti |
vy-angu |
vi-refu |
vi-lianguka |
खुर्च्ऱ्या |
माझ्ऱ्या |
लांब |
पडल्ऱ्या |
अलीकडच्या संशोधनातून निष्पन्न झाले आहे, की बांतू हा स्वतंत्र भाषासमूह नसून नायजर-काँगो भाषासमूहाचा डझनभर उपसमूहांपैकी असलेल्या बेनुए-काँगो उपसमूहाचा चार उप-उप-समूहांपैकी एक आहे. मात्र भाषांची संख्या (८०० पैकी ३०० ते ४५०), लोकसंख्या आणि क्षेत्रविस्तार ह्या सर्व दृष्टींनी बांतू भाषांचे महत्त्व नजरेत भरण्यासारखे आहे (नायजर-काँगोच्या कक्षेत पश्चिम आफ्रिका आणि सूदान ह्यांचा दक्षिण पट्टाही येतो). ह्या आणि इतर प्रमाणावरून बांतू भाषिक लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरले आणि ही क्रिया सोळाव्या-सतराव्या शतकांपर्यंत चालू असावी, असे म्हणता येते. मात्र आजचे सर्व बांतू भाषिक लोक संस्कृतीने एक आहेत, किंवा त्यांचा बांतू वांशिक गट आहे, असे मात्र म्हणता येत नाही.
भाषा |
विस्तारक्षेत्र |
कि-कोंगो (मुनुक-टुबा) |
काँगोखोरे-किन्शासा (लिओपोल्डव्हिल) शहराच्या भोवताली. |
लि-ड्गाला (मा-ड्गाला) |
काँगो खोरे-किसांगानी (स्टॅन्लीव्हिल) शहराच्या भोवताली. |
कि-लुबा |
काँगो खोरे-एलिझाबेथव्हिल शहराच्या भोवताली. |
लु-गांदा |
युगांडा |
स्वाहीली |
केन्या, टांझानिया (टांगानिका). |
न्यांजा |
मालावी (न्यासालँड). |
रुंदी |
बुरूंडी |
रुआंदा |
रुआंडा |
वेंबा |
झँबिया (उ. ऱ्होडेशिया) |
शोना |
(द.) ऱ्होडेशिया, मोझँबीक. |
कि-म्बुन्दु व उ-म्बुन्दु |
अंगोला |
हेरेरो |
अंगोला, नैर्ऋत्य आफ्रिका, |
कापनीर (त्लाउसा) |
नाताळ (झूललँड धरून). |
सेच्वाना |
बोट्स्वाना (बेचुआनालँड) |
उत्तर सोथो |
ट्रान्सव्हाल |
दक्षिण सोथो (से-सोथो) |
लेसोथो (बासूटोलँड) |
स्वाती |
स्वाझीलँड |
संदर्भ: 1. Bryan. M. A., Ed. The Bantu Languages of Africa London, 1959.
2. Voegelin. F. C. Voegeline, F. M. “Languages of the World,” Anthropological Linguistics, 6:5, Bloomington (Indiana), May, 1964.
केळकर, अशोक. रा.
“