बॅल्बोआ : एक रेखाचित्र.

बॅल्बोआ, व्हास्कोन्यू नून्येथ : (१४७५–१५१९). पॅसिफिक महासागराचा पूर्व किनाऱ्याचा शोध लावणारा स्पॅनिश समन्वेषक. स्पेनमधील हेरेथ दा लोस काव्हाल्येरोस या गावी एका खानदानी कुटुंबात जन्म. १५०१ च्या सुमारास रॉड्रीगो दे बास्तीदास याच्याबरोबर तो दक्षिण अमेरिकेच्या मोहिमेवर गेला. ही त्याच्या आयुष्यातील पहिलीच संशोधन मोहीम होती. या मोहिमेत त्याने कोलंबियातील ऊराबा आखात व द. अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्याचे संशोधन केले. नंतर तो हिस्पॅनीओला (हैती) या स्पॅनिश वसाहत असलेल्या बेटावर स्थानिक इंडियन लोकांबरोबर शेती करू लागला. परंतु लवकरच तो कर्जबाजारी झाला. सावकारांना चुकविण्याकरिता त्याने स्पॅनिश वसाहतकार एन्थीसोच्या नेतृत्वाखाली पेरूकडे निघालेल्या जहाजावर प्रवेश मिळविला. पुढे त्याने एन्थीसोचे मन वळवून त्याला पनामाकडे जाण्यास प्रवृत्त केले कारण हा प्रदेश त्याने पूर्वी बास्तीदासबरोबर पाहिलेला होता. तेथे गेल्यावर जहाजावरील लोकांत बंड होऊन एन्थीसोचे नेतृत्व संपुष्टात आले व तो स्पेनला परतला. परिणामतः या मोहिमेचे नेतृत्व बॅल्बोआने स्वीकारले व पनामामध्ये अँटिग्वा देल डॅरिएन हे गाव वसविले. आपल्या सहकाऱ्‍यामार्फत पॅसिफिक महासागराचे संशोधन करण्यासाठी त्याने काही मोहिमा काढल्या. १५१३ मध्ये तो स्वतः मोहिमेवर गेला. पनामाच्या संयोगभूमीवरील उंच शिखरावरून त्याने पॅसिफिकचे निरीक्षण केले. एका हातात तलवार व दुसऱ्या हातात निशाण घेऊन त्याने अटलांटिक व पॅसिफिक या महासागरांच्या दरम्यानची भूमी स्पॅनिश अंमलाखाली आणली. त्याच्या या कर्तृत्वामुळे स्पेनच्या राजाने त्याचा सत्कार केला परंतु १५१४ मध्ये आव्हिला. याची डॅरिएन प्रदेशावर गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. आव्हिलाच्या कारकीर्दीत बॅल्बोआने बऱ्याच मोहिमा काढल्या तसेच त्याच्या मुलीशीही लग्न केले. बॅल्बोआच्या कर्तृत्वामुळे व लोकप्रियतेमुळे आव्हिला त्याचा मत्सर करू लागला. राजद्रोहाच्या तथाकथित आरोपाखाली आव्हिलाने त्याला अटक करून त्याचा शिरच्छेद करविला. बॅल्बोआ हा फार महत्त्वाकांक्षी व कठोर स्वभावाचा होता. परंतु त्याने स्थानिक लोकांना जी वागणूक दिली, ती इतर स्पॅनिश अधिकाऱ्यांपेक्षा फार चांगली होती.

संदर्भ : 1. Anderson, C. L. G. Life and Letters of Vasco Nunez de Balboa, New York, 1971.

           2. Romoli, Kathleen, Balboa of Darien : Discover of the Pacific, Toronto, 1953.

शाह, र. रू.