बॅरेंट्स, व्हिलेम : (? –२० जून १५९७). डच सागरी मार्गनिर्देशक व आर्क्टिक प्रदेशाचा एक आद्य समन्वेषक. नेदर्लंड्समधील टेर्स्कहेलिंग या बेटावर त्याचा जन्म झाला. त्याच्या खाजगी जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो पेट्रस प्लॅन्सिअस या मानचित्रकाराचा शिष्य होता, असे म्हणतात.
सोळाव्या शतकात आर्क्टिक प्रदेशातून उत्तर अटलांटिक ते पॅसिफिकच्या दरम्यान ‘ईशान्य मार्ग’ (आशिया-यूरोपच्या उ. किनाऱ्याला लागून असलेला अटलांटिक आणि पॅसिफिस महासागरांच्या दरम्यानचा सागरी मार्ग) शोधण्याच्या दृष्टीने बॅरेंटसने केलेले संशोधन फार महत्त्वाचे आहे. त्याने एकूण तीन सफरी केल्या (१५९४, १५९५, १५९६–९७). पहिल्या दोन सफरींत त्याने नॉव्हायाझीमल्या आणि ब्यर्नया ह्या बेटांचा शोध लावला होता. त्याच्या तिसऱ्या सफरीत नॉव्हायाझीमल्याच्या उत्तर टोकाला वळसा घालीत असताना त्याला अचानक स्पिट्सबर्गेन बेटाचा शोध लागला. याच सुमारास उत्तर ध्रुववृत्ताच्या उत्तरेस सु. ९७० किमी.वर त्याचे जहाज बर्फात अडकून पडले व संपूर्ण हिवाळा त्याला तेथेच घालवावा लागला. बॅरेंट्स व त्याचे सहकारी, हिवाळ्यात आर्क्टिक प्रदेशावर राहणारे पहिलेच यूरोपीय ठरले. १५९७ मध्ये बॅरेंट्सची प्रकृती खालावली व त्याचे जहाजही बर्फ मुक्त झाले नाही. या कारणांमुळे इतर सहकारी त्याला तेथेच ठेवून दोन छोट्या होड्यांच्या साहाय्याने निघून गेले. बॅरेंट्स तेथेच मृत्यू पावला.
पुढे सु. अडीचशे वर्षानंतर १८७१ मध्ये बॅरेंट्सच्या निवासस्थानाचा शोध लागला. तेथे सापडलेल्या अनेक वस्तूंचे अवशेष हेग येथील संग्रहालयात ठेवलेले आहेत. १८७५ मध्ये बॅरेंट्सच्या टिपणवह्यांचा काही भागही मिळाला. त्याने जमविलेली हवामानशास्त्रविषयक अचूक माहिती आणि बनविलेले मार्गनिर्देशक चार्ट इतर संशोधकांना अतिशय उपयुक्त ठरले आहेत.
स्पिट्सबर्गेन, नॉव्हायाझीमल्या व स्कँडिनेव्हिया यांमधील आर्क्टिक महासागराच्या भागात बॅरेंट्स समुद्र असे नाव दिलेले आहे.
शाह, र. रू.