मॉल्टा: भूमध्य समुद्रातील स्वतंत्र प्रजासत्ताक द्वीपराज्य. क्षेत्रफळ ३१५·६ चौ. किमी. लोकसंख्या ३,२९,१८९ (१९८३). भूमध्य समुद्राच्या मध्यभागी ३५° ४८ ते ३६° उ. व १४° १० ते १४° ३५ पू. यांदरम्यानच्या या देशात मॉल्टा (२४५·७ चौ. किमी.), गोट्सो (६७·१ चौ. किमी.) व कोमीनो (२·८ चौ. किमी.) या प्रमुख बेटांचा समावेश होतो. मॉल्टा द्वीपसमूहात कोमीनॉट्टो व फील्‌फ्ला ही निर्मनुष्य बेटे आहेत. देशाला वसती असलेल्या बेटांचा सु. १७९ किमी. लांबीचा किनारा लाभलेला असून व्हलेट्टा (लोकसंख्या १४,०४०–१९८३) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन: विस्ताराने छोट्या असलेल्या या देशात फारशी भूवैशिष्ट्ये नाहीत. सिसिलीच्या (इटली) दक्षिणेस सु. ९३ किमी. व ट्युनिशियाच्या पूर्वेस सु. २८८ किमी. अंतरावरील ही बेटे खडकाळ व चुनखडीयुक्त आहेत. या द्वीपसमूहातील मॉल्टा हे प्रमुख बेट असून ते अंडाकृती (२७ किमी. लांब व १४ किमी रुंद) आहे. यांचा भूभाग पूर्वेकडून वायव्येकडे सस.पासून सु. २४० मी. पर्यंत उंचावत गेला आहे. हा त्रिकोणाकृती पठारी भाग असून चुनखडकाचा आहे. उंच प्रदेश बाजूच्या सपाट प्रदेशापासून निळसर मृदेमुळे वेगळा झालेला आहे. समुद्र व मूळचा किनारा यांच्या दरम्यान कमी उंचीच्या प्रवाळांनी बनलेला पठारी प्रदेश दिसून येतो. दक्षिणेकडील भाग उतरता होत गेलेला असून तो कमी-जास्त उंचाचा आहे. पश्चिमेकडील भागापेक्षा पूर्वेकडील भागातील दऱ्या उथळ आहेत. पूर्व भागात मौंट सेबेरास नावाने ओळखला जाणारा एकच सुळक्यासारखा उंच भाग असून त्याच्यामुळे मार्सामूशेट्टो व ग्रँड या खाड्या वेगळ्या झाल्या आहेत. बहुतेक खाड्या, उपसागर व बंदरे बेटाच्या पूर्व भागात दिसून येतात. याचा नैर्ऋत्य किनारा वगळता बाकीचा किनारा दंतुर व खडकाळ आहे. बेटाचा बराचसा भूभाग निकृष्ट आणि चुनखडकाच्या टेकड्यांनी व्यापलेला असून अनेक ठिकाणी कार्स्ट भूमिस्वरूपे दिसून येतात. बेटावर मोठ्या नद्या अथवा सरोवरे नाहीत. गोट्सो हे दुसरे महत्त्वाचे बेट मॉल्टा बेटाच्या वायव्येस ३ किमी. वर असून १४ किमी. लांब व ४·८ किमी. रुंद आहे. या बेटाची सस.पासूनची जास्तीत जास्त उंची १९४·४ मी. आहे. या बेटाचा उत्तर भाग प्रवाळ आणि चुनखडकांचा बनलेला असून पठारी आहे, तर दक्षिण भाग ग्लोबिजेरिना चुनखडकाचा बनलेला असून सपाट व कमी उंचीचा आहे. येथील मृदा मॉल्टा बेटापेक्षा थोडी सुपीक आहे. कोमीनो हे छोटे बेट मॉल्टा व गोट्सो यांच्या दरम्यान असून याच्या जवळच पश्चिमेस कोमीनॉट्टो हे लहान निर्मनुष्य बेट आहे. देशाच्या भूरचनेतील चुनखडकांचे प्रमाण, कमी पर्जन्य त्यामुळे मोठ्या नद्या अथवा सरोवरे नाहीत. या सर्वांमुळे देशात पिण्याच्या पाण्याचे प्रमाण खूपच कमी असून ती मोठी समस्या आहे. त्यासाठी सागरी पाण्याचे निर्लवणीकरण करण्यासाठी ग्रँड हार्बर व गोट्सो येथे दोन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. देशातील मृदा नवनिर्मित व अत्यंत निकृष्ट प्रतीची असून काही भागातच थोडी सुपीक आढळते. वसाहतीसाठी बांधकाम केलेल्या भागातील चांगली मृदा अन्यत्र पसरून तिचा शेतीसाठी उपयोग केला जातो. 

हवामान : देशात प्रामुख्याने भूमध्य सागरी हवामान असून वार्षिक सरासरी तापमान १८° से. असते. उन्हाळा उष्ण व कोरडा, तर हिवाळा सौम्य असतो. उन्हाळ्यात येथील सरासरी तापमान ३१° से., तर हिवाळ्यात ते ९° से. असते. पर्जन्याचे वार्षिक सरासरी प्रमाण ५६ सेंमी. असून बहुतेक पर्जन्य हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च या काळात पडतो. येथे जोरदार वारे वाहतात. सर्वसाधारणपणे वायव्येकडून येणारे वारे थंड, तर ईशान्येकडून येणारे वारे कोरडे असतात. आग्नेयीकडून येणारे वारे उष्ण व आर्द्रयुक्त असतात. येथे आर्द्रता जास्त असते.

निकृष्ट जमीन, कमी पर्जन्य यांमुळे येथे वनस्पतींचे प्रमाणही खूपच कमी आढळते. बहुतेक ठिकाणी तुरळक खुरट्या वनस्पती दिसून येतात. काही थोड्या सुपीक भागात पूर्वीपासूनच थोड्याफार प्रमाणात अंजीर, द्राक्षे, ऑलिव्ह यांची लागवड केली जाते. देशात हिंस्त्र श्वापदेही फारशी नाहीत. वीझल, जाहक, वटवाघूळ इ. प्राणी मूळचे असून त्यांशिवाय पांढरा ससा, उंदीर, चिचुंदरी, वेगवेगळ्या प्रकारची कासवे व सरडे हेही दिसून येतात. सागरकिनारी सील, शिंशुक इ. जलचर प्रामुख्याने सापडतात. देशात वेगवेगळी फुलपाखरे, चष्मेवाला, वॉर्ब्लर, होला, घुबड इ. पक्षी आहेत. यांशिवाय सिसिलीहून लेडीबर्ड येतात.  


इतिहास व राज्यव्यवस्था: मॉल्टा बेट पूर्वीपासूनच यूरोपियांना ज्ञात होते. अश्मयुगीन तसेच नवाश्म व ब्राँझ युगांतील पुरातत्त्वीय, स्थापात्यविषयक अवशेष येथे अद्यापही पहावयास मिळतात. फिनिशियन, कार्थेजियन व विशेषतः रोमन यांच्या साम्राज्यकाळातच या बेटांना महत्त्व प्राप्त झाले. इ. स. ६० मध्ये पॉल नावाच्या धर्मगुरूचे जहाज रोमला जाताना या बेटावरच फुटले, त्यामुळे जहाजातील धर्मप्रसारकांनी येथे येऊन पुढील दोन वर्षांतच बेटावरील मूळ रहिवाशांचे ख्रिस्तीकरण केले. ईशान्येकडील उपसागरात हे जहाज फुटले, त्या उपसागराला सेंट पॉल उपसागर असे नाव देण्यात आले. इ. स. ३९५ मध्ये झालेल्या रोमन साम्राज्याच्या विभागणीत हे बेट बायझंटिन साम्राज्यात व ८७० मध्ये अरबांच्या ताब्यात गेले. १०९० मध्ये नॉर्मंडीच्या काउंट रॉजरने अरबांचा पराभव करून हे आपल्या सत्तेखाली आणले. त्यानंतर बराच काळ हे बेट सिसिली नॉर्मनांच्या व अरगोनेसांच्या ताब्यात होते. १५३० मध्ये रोमन सम्राट पाचवा चार्ल्स याने ऱ्होड बेटांवरून आलेल्या जेरूसमेलच्या सेंट जॉनच्या धर्मप्रसारक सरदारांना (पुढे मॉल्टा नाइट्स या नावाने प्रसिद्ध झाले) हे बेट दिले. त्यांनी जेरूसलेम व ऱ्होड येथील धर्मयुद्धांतून जखमी होऊन आलेल्यांचे रक्षण करण्याचे मोठे काम येथे केले. १५६५ मध्ये मोठ्या सैन्याविषयी तुर्कांनी हे घेण्याचा प्रयत्न केला परंतु १७९८ पर्यंत ते सरदारांच्या ताब्यात राहिले. याच काळात बेटावर व्हलेट्टा किल्ला व बंदर बांधले. १७९८ मध्य हे बेट पहिल्या नेपोलियनने जिंकले. त्यामुळे मॉल्टामधील लोकांनी फ्रेंचांविरुद्ध बंड पुकारले व त्याचा फायदा घेऊन त्यांच्या मदतीने दोन वर्षांतच (१७९८ ते १८००) ब्रिटिशांनी हे बेट बळकावले. १८१४ मध्ये मॉल्टामधील लोकांचे काही हक्क अबाधित राखून मॉल्टा ब्रिटिशांची वसाहत म्हणून ठरविण्यात आली. मात्र संरक्षण, परदेश व्यवहार ब्रिटिशांच्या ताब्यात ठेवण्याविषयीचा पॅरिस येथे करार करून याची सत्ता ब्रिटिश मिलिटरी गव्हर्नरच्या ताब्यात देण्यात आली. सुएझ कालवा वाहतुकीला खुला करण्यात आल्यावर (१८६९) भूमध्य समुद्राच्या मध्यावर असल्याने या बेटाचे महत्त्व खूपच वाढले. दुसऱ्या महायुद्धकाळात इटली व जर्मनांच्या अतोनात बाँबवर्षावाला येथील लोकांनी धैर्याने तोंड दिले. त्यामुळे १९४२ मध्ये सहाव्या जॉर्जने बेटावरील सर्वच लोकांना मर्दुमकी व त्यांच्या धैर्याबद्दल ‘जॉर्ज क्रॉस’ हा बहुमान बहाल केला. तथापि यापूर्वीपासूनच येथील काही लोकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध चळवळ सुरू करून राजकीय स्वातंत्र्याची मागणी केली होती. त्यामुळे १९२१ मध्ये ब्रिटिशांनी मॉल्टाचे स्वतंत्र संविधान जाहीर करण्याची परवानगी दिली होती, परंतु १९३६ मध्ये ती रद्द करण्यात आली आणि मॉल्टाला ब्रिटिशांच्या वसाहतीचा दर्जा देण्यात आला. पुन्हा १९४७ मध्ये पूर्वीच्याच संविधानाला मान्यता मिळाली परंतु अंतर्गत गोंधळाचे कारण पुढे करून ही मान्यता १९५९ मध्ये पुन्हा मागे घेण्यात आली. त्यानंतर २१ सप्टेंबर १९६४ रोजी मात्र मॉल्टाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. यावेळी संरक्षण व आर्थिक बाबींसंबंधी ग्रेट ब्रिटनशी करार करण्यात आला. मॉल्टा राष्ट्रकुलाचा सदस्य असून १९६५ मध्ये तो संयुक्त राष्ट्रांचाही सभासद झाला आहे. १९७० व १९७९ मध्ये झालेल्या करारांन्वये मॉल्टामधून ब्रिटिश सैन्य काढून घेण्यात आले व नाटोचा नौदल तळही बंद करण्यात आला.

मॉल्टाचे संविधान २१ सप्टेंबर १९६४ रोजी अंमलात आले. त्यानंतर १० वर्षांनी हा देश राष्ट्रकुलाचा सभासद झाला. १९७४ च्या संविधानानुसार देशात एकसदनी पद्धती असून वैधानिक सत्ता ६५ सभासदांच्या लोकप्रतिनिधी गृहाकडे असते. हे सभासद ५ वर्षांसाठी सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धतीने (१८ वर्षांवरील) निवडलेले असतात. राष्ट्राध्यक्ष हा राज्याचा प्रमुख असून त्याची निवड ५ वर्षांसाठी लोकप्रतिनिधी गृहातून केली जाते. राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानाची नियुक्ती करतो व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांच्या नियुक्तीची शिफारस करतो. सर्व कार्यकारी सत्ता मंत्रिमंडळाच्या ताब्यात असते. पंतप्रधान हा बहुमतवाल्या पक्षाचा नेता असून तो सरकारी कामकाजाला जबाबदार असतो. मंत्रिमंडळ लोकप्रतिनिधी गृहाला जबाबदार असते. देशात प्रमुख तीन राजकीय पक्ष असून १२ डिसेंबर १९८१ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी गृहातील त्यांचे बलाबल पुढीलप्रमाणे होते : मॉल्टा मजूर पक्ष-३४, राष्ट्रीय पक्ष-३१ व स्वतंत्र पक्ष-० जागा.

न्याय व संरक्षण: मॉल्टाच्या विधी व न्यायव्यवस्थेत पुष्कळसे कायदे किंवा अधिनियम विधिमंडळाने संमत केलेले आहेत. येथील न्यायव्यवस्थेवर मुख्यतः रोमन व ब्रिटिश कायदेपद्धतींची छाप दिसून येते. दिवाणी कायदा प्रामुख्याने रोमन विधीतूनच उत्क्रांत झालेला आहे. फौजदारी विधीवर मात्र ब्रिटिश कायद्याचा मोठा प्रभाव पडलेला आहे. देशाच्या संविधानानुसार देशात एक सर्वोच्च न्यायालय असून राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नेमणूक करतो. सर्वोच्च न्यायालयाशिवाय देशात दिवाणी, फौजदारी, व्यापारी, पोलीस न्यायालये तसेच बाल न्यायालयेही आहेत. 

देशातील सैन्यदलात ८०० सैनिक असून हवाई गस्त घालणारी काही हेलिकॉप्टरही आहेत. यांशिवाय १,१०० लोकांची सैनिकीसम संघटना आहे. किनारी प्रदेशाच्या रक्षणासाठी १९७३ मध्ये छोटे नाविक दल उभारण्यात आले असून त्यात १९८५ मध्ये १५ गस्तनौका होत्या. १९७९ पासून देशातून ग्रेट ब्रिटनचे सर्व सैन्य काढून टाकण्यात आले होते.

आर्थिक स्थिती: पारतंत्र्य काळात मॉल्टाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती झाली नाही. गोड्या पाण्याचा तुटवडा, अत्यंत मर्यादित व निकृष्ट मृदा, कमी पर्जन्य व पारंपारिक शेतीपद्धती या नैसर्गिक त्र‍ुटींमुळे स्थानिक गरजेपुरतेही अन्नधान्य पिकविणे अशक्य होते. बहुतेक अन्नधान्य व पेये आयात केली जातात. ब्रिटिशांच्या अमदानीत बहुतेक उत्पादने येथील सैन्यापुरतीच मर्यादित होती. स्वातंत्र्योत्तर काळातही औद्योगिक विकास आणि घरबांधणी यांमुळे लागवडीखालील शेतीचे प्रमाणही कमी होत चालले आहे. खडकाळ प्रदेशांदरम्यानच्या अगदी थोड्या जागेचाही लागवडीसाठी उपयोग करून घेतला जातो. गोट्सो बेटावरील जमीन मॉल्टा बेटापेक्षा सुपीक असल्याने तेथे शेती उत्पादनाचे प्रमाण जास्त आहे. पठारी प्रदेशाच्या उतारांवर थोड्याफार प्रमाणात पायऱ्या पायऱ्यांची शेती केली जाते. अलीकडच्या काळात काही भागांत नवीन शेती तंत्राचा वापर करून स्थानिक गरजे पुरता भाजीपाला, फळे, मका यांसारखे उत्पन्ने घेतली जातात. यांशिवाय शेतीतून बटाटे, टोमॅटो, द्राक्षे, कांदे, गहू, सातू, विविध प्रकारची फुले यांचेही उत्पन्न काढतात. विविध प्रकारची फुले, फुलझाडांची छाटकलमे व बी-बियाणे यांची प्रामुख्याने निर्यात केली जाते. १९८३ मध्ये देशात एकूण सु. ११,४९१ हे. क्षेत्र लागवडीखाली होते. १९८२ च्या मानाने हे १४८ हे. कमी होते. याच वर्षी शेतीत पूर्णवेळ आणि अर्धवेळ काम करणारे शेतकरी अनुक्रमे ४,३७३ व १०,९०३ होते. शेती उत्पादनांच्या निर्यातीपासून देशाला १८१ लक्ष मॉल्टीज लीरा (एलएम्) इतके स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मिळाले. निर्यातीत प्रामुख्याने बटाटे (४,२३,६९२ एलएम्), बी बियाणे, फुले व फुलझाडे (५,६९,९७५), वाइन (१,६७,८०८), कांदे (२,३२६) यांचा समावेश होता. आयातीत मुख्यत्वे यंत्रसामग्री, कापड, अन्नधान्ये, रसायने व औषधे, मांस, दुग्धपदार्थ यांचा समावेश असतो. १९८३ मध्य मुख्यत्वे इटली, ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी, अ. सं. सं. व काही आशियाई आणि आफ्रिकी देशांकडून आयात करण्यात आली.


शेतीशिवाय पशुपालन व मासेमारी हे येथील लोकांचे पूरक व्यवसाय आहेत. १९८३ मध्ये देशात १२,७९४ गुरे ५३,३६६ डुकरे ९,२८८ शेळ्या मेंढ्या व १० लक्ष कोंबड्या होत्या. याच वर्षी देशातून ८९,७५७ एल्‌एम्‌ची चामडी कातडी व २०,२०९ एल्एम्‌ची केपर झुडुपांची निर्यात करण्यात आली. देशाच्या किनारी भागात एकूण ९९३ टन मासे पकडण्यात आले. या वर्षी देशात १,०५२ स्वयंचलित व ९३ इतर बोटी होत्या.

देशात नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रमाण खूपच कमी असल्याने फार मोठे उद्योगधंदे नाहीत. बहुतेक व्यवसाय आयातीवरच अवलंबून आहेत. पूर्वीपासून हा नाविक तळ असल्याने जहाजबांधणी व दुरुस्ती हा महत्त्वाचा परंपरागत व्यवसाय आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत १९६० नंतर मॉल्टाने प्रगती केली आहे. १९७१ नंतर या देशाने प्रामुख्याने घरबांधणी, वैद्यकीय सुविधा व इतर सामाजिक कल्याणकारी योजना राबविल्यामुळे येथील लोकांचे राहणीमान उच्च प्रतीचे बनले आहे. इतर देशांच्या मदतीने औद्योगिक प्रगती घडवून आणली जात आहे. विशेषतः कापडनिर्मिती व इलेक्ट्रॉनिकी उद्योगांवर भर देण्यात आला आहे. चीन, लिबिया व सौदी अरेबिया यांच्या मदतीने बंदरांची वाढ व सुधारणा येत आहेत. 

मॉन्टील लीरा (एल्‌एम्) हे देशाचे चलन असून सेंट व मिल हे त्याचे भाग आहेत. १० मिलचा १ सेंट व १०० सेंटचा १ एलएम् होतो. ३० सप्टेंबर १९८४ रोजी १ स्टर्लिंग पौंड = ५६४·३ मिल व १ अमेरिकी डॉलर = ४५६·९ मिल असा विनिमय दर होता. देशात २, ३, ५ मिलची व १, २, ५, १०, २५, ५० सेंटची नाणी आणि १, ५, १० लीरांच्या नोटा प्रचलित आहेत.

शक्तिसाधने: देशाची बहुतेक इंधनाची गरज आयातीवरच अवलंबून आहे. वीज हे देशातील प्रमुख शक्तिसाधन असून मॉल्टा बेटांवर एकूण तीन औष्णिक वीजनिर्मितीकेंद्रे आहेत. मॉल्टा आणि गोट्सो बेटांवरील बहुतेक सर्व लहान मोठ्या गावांना विद्युत् पुरवठा करण्यात आला आहे. सप्टेंबर १९७८ पर्यंत मॉल्टा बेटावरील ११५ मेवॉ. क्षमतेच्या २ विद्युत् केंद्रांवरून सर्वत्र वीज पुरवठा केला जात होता. या बेटावर आणखी एक ८५ मेवॉ. क्षमतेचे व प्रतिदिवशी ४० लक्ष गॅलन पाण्याचे ऊर्ध्वपातन करणारे केंद्र उभारण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने जनतेच्या दैनंदिन वापरासाठी केला जातो. १९८३–८४ मध्ये देशात एकूण ७,१५७ लक्ष किवॉ. ता. वीजनिर्मिती झाली.

वाहतूक व संदेशवहन : देशात १९८३ मध्ये एकूण १,३१० किमी. लांबीच्या रस्त्यांपैकी ९४% पक्के होते. येथील सर्व मोठी शहरे व लहान गावे रस्त्यांनी जोडलेली असून त्यांदरम्यान नियमित बस वाहतूक चालते. देशात लोहमार्ग नाहीत. मॉल्टा व गोट्सो बेटां दरम्यान नियमितपणे फेरी वाहतूक चालते. मोटारी फेरी बोटींतून नेल्या जातात. व्हलेट्टा हे प्रमुख बंदर असून तेथून वर्षाला सु. ३,००० सागरगामी बोटींची ये जा होते. १९८३ अखेर देशात १,०५,२५२ नोंदणीकृत स्वयंचलित वाहने होती. त्यांपैकी ७३,४४८ खाजगी २,७७२ भाडोत्री १६,०३७ व्यापारी वाहने १३८ बसगाड्या १२,०१९ मोटारसायकली व ८३८ इतर वाहने होती. याच वर्षी देशात ४५५ जहाजे होती.

व्हलेट्टाच्या जवळच सु. ८ किमी. वरील लूका येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, ईजिप्त, प. जर्मनी, फ्रान्स, इटली, लिबिया, नेदर्लंड्स. नायजेरिया, स्वित्झर्लंड, ट्युनिशिया, यूगोस्लाव्हिया इ. देशांशी नियमित हवाई वाहतूक चालते. १९८३ मध्ये लूका विमानतळावरून एकूण १२,९४८ नागरी विमानांतून १०,८३,२३० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. 

देशातील दूरलेखा आणि दूरध्वनी व्यवस्था टेलेमॉल्टा कॉर्पोरेशन पाहते. १९८३ मध्ये देशात १,१०,१९१ दूरध्वनी संच होते. यांशिवाय केबलीद्वारा इतर देशांशी संपर्क व टेलेक्स सेवाही उपलब्ध आहे. याच वर्षी देशात १,०१,७०४ नोंदविलेले दूरचित्रवाणी संच व २१,१४२ रेडिओ संच, तसेच १८,५६१ प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असलेली २६ चित्रपटगृहे होती. देशातून एक इंग्रजी, तीन मॉल्टीज भाषेतील दैनिके व पाच साप्ताहिके प्रसिद्ध होत होती. 

पर्यटन : सृष्टिसौंदर्य, मोठमोठ्या पुळणी, कार्स्ट भूमिस्वरूपे, चांगले हवामान व ऐतिहासिक अवशेष यांमुळे पर्यटन व्यवसाय वाढत असून त्या व्यवसायामुळे देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. याच्या वाढीसाठी जाहिरात व पर्यटकांसाठी सुखसोयी वाढवून पर्यटकांना आकर्षून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. देशातील प्राचीन गुहा, समुद्रपक्षी, मध्ययुगीन सरदारांच्या राजवाड्यांचे व कॅथीड्रलचे अवशेष, धर्मयोद्धांच्या कबरी यांशिवाय लांबट विमानाच्या आकाराच्या नावांतून खडकाळ व अरुंद खाड्यांचा प्रवास, व्हलेट्टा शहरातील तीव्र उतारांचे रस्ते, सोळाव्या शतकातील घरे, रोमन वास्तुशैलीतील प्रासाद, तटबंदीयुक्त किल्ले ही येथे येणाऱ्या पर्यटकांची प्रमुख आकर्षणे असतात. १९८३ मध्ये देशाला सु. ४,९०,८१२ पर्यटकांनी भेट दिली व त्यांत प्रामुख्याने ग्रेट ब्रिटन, इटली, प. जर्मनी, लिबिया येथील लोकांचा समावेश होता.


लोक व समाजजीवन: या बेटांवर राहणारे मूळचे लोक हे आजूबाजूच्या प्रदेशांतूनच आलेले असावेत. येथील लोकांत प्रामुख्याने सिसिलियन, फिनिशियन आणि कार्थेजियनांचा समावेश असल्याने येथील लोकसंख्या मिश्र स्वरूपाची दिसून येते. येथील लोक ‘मॉल्टीज’ या नावाने ओळखले जातात. क्षेत्रफळाच्या मानाने लोकसंख्या खूपच जास्त असून १९८३ मध्ये लोकसंख्येची घनता दर चौ.किमी. ला १०४१·७ होती. दाट लोकवस्ती व कमी उत्पन्नाची साधने यांमुळे बेकारीचे प्रमाण वाढू लागल्याने एकोणिसाव्या शतकापासूनच अनेक लोकांनी हा देश सोडून देऊन द. यूरोप व उ. आफ्रिका तसेच मध्यपूर्वेतील देशांत स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. पहिल्या महायुद्धानंतर ग्रेट ब्रिटन, कॅनडा, अ. सं. सं. येथून आलेल्या लोकांनी हा देश सोडून आपल्या देशांत स्थलांतर केले. १९४५ नंतर कमी जन्मप्रमाण व स्थलांतर या निर्णयामुळे १९७०–८० या काळात येथील लोकसंख्येत खूपच घट झालेली दिसून येते. १९८० नंतर मात्र लोकसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. १९८३ मधील देशातील जन्मप्रमाण दर हजारी १७·२ व मृत्युमान ९·५ होते. लोकांचा ओघ औद्योगिक शहरांकडे व सागरी बंदरांकडे जास्त आहे. त्यामुळे खेड्यांमधील जुन्या चर्च वास्तू, पारंपरिक रूढी, उत्सव-महोत्सवांच्या परंपरा अद्याप टिकून आहेत.

बहुतेक मॉल्टीज पूर्वीच्या कार्थेजियनांचे वंशज असले, तरी इटालियन व इतर भूमध्य सागरी प्रदेशातील लोकांचेही प्रमाण येथे बरेच आहे. यांबरोबरच इतर यूरोपीय देशांतील लोकही थोडेबहुत आहेत. रोमन कॅथलिक हा देशाचा अधिकृत धर्म असला, तरी इतर धर्मांवर श्रद्धा ठेवण्याचेही नागरिकांना स्वातंत्र्य आहे. १९८० मध्ये देशात ९७% लोक कॅथलिक होते. राजकीय क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांत धर्मगुरूंची सत्ता होती परंतु अलीकडच्या काही वर्षांत धर्मगुरू व सरकार यांचे संबंध बिघडल्याने सरकारने जून १९८३ मध्ये चर्चच्या मालमत्तेपैकी ७५% मालमत्ता आपल्या ताब्यात घेतली. देशात बहुतेक सर्व आरोग्यसुविधा उपलब्ध असून जनकल्याणकारी अनेक योजना राबविल्या जात आहेत. १९७९ मध्ये देशातील ८ सरकारी रुग्णालयांत ३,५०० खाटांची सोय होती. १९७५ मध्ये येथे ३८२ डॉक्टर, ४४ दंतवैद्य, ९५ प्रसाविका, २,१७८ परिचारिका होत्या. देशातील १९५६ च्या राष्ट्रीय विमा कायद्यानुसार विवाह, आजारपण, प्रसूती, बेकारी, वैधव्य, दौर्बल्य, वार्धक्य, औद्योगिक अपघात इत्यादींसाठी भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कल्याणकारी योजनांमुळे येथील लोकांचे राहणीमान बाजूच्या प्रदेशांपेक्षा उच्च प्रतीचे आहे.

देशात ६ ते १६ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून असून सरकारी शाळांतून ते मोफत दिले जाते. माध्यमिक शिक्षण (वयाच्या ११ वर्षानंतर) ५ वर्षांचे आहे. १९८४ मध्ये देशात ७२ खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्था होत्या व त्या रोमन कॅथलिक चर्चतर्फे चालविल्या जात होत्या. उच्च शिक्षणासाठी मॉल्टा विद्यापीठ (स्थापना १५९२) असून याशिवाय देशात अनेक तांत्रिक शिक्षणसंस्थाही आहेत. १९८३ मध्ये देशात एकूण १६२ बालोद्यान शाळांमध्ये ३,४८९ मुले ८० सरकारी प्राथमिक शाळांमध्ये २४,८२५ विद्यार्थी ३१ माध्यमिक शाळांमध्ये ११,७९६ विद्यार्थी होते. विद्यापीठात कायदा, वैद्यक व शल्यचिकित्सा, अभियांत्रिकी, वास्तुशिल्प, दंतवैद्यक, शिक्षण, व्यवस्थापन इ. विषयांच्या उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे. यांशिवाय देशात अनेक खाजगी शिक्षणसंस्था असून धंदेशिक्षणाच्या सोयी आहेत.

मॉल्टीज व इंग्रजी या देशाच्या अधिकृत भाषा असून व्यवहारात प्रामुख्याने मॉल्टीज भाषा वापरली जाते. यांशिवाय इटालियन भाषेचाही वापर केला जातो. सरकारी कामात व शिक्षणक्षेत्रात इंग्रजीचा वापर करतात. मॉल्टीज ही मुख्यतः अरबी भाषेवर आधारलेली असून तीत रोमन व इंग्रजीचे मिश्रण आढळते. ही भाषा रोमन लिपीत लिहिली जाते. अगदी अलीकडच्या काळातच या भाषेमध्ये थोडे फार साहित्य निर्माण आहे. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये सरकारी सार्वजनिक ग्रंथालये आहेत. व्हलेट्टा येथे राष्ट्रीय संग्रहालय असून त्यात अनेक पुरातत्त्वीय वस्तूंचा संग्रह आहे. याशिवाय सेंट जॉन्स म्यूझीयम, व्हिटोरिओसा येथील दोन संग्रहालये प्रसिद्ध आहेत. फुटबॉल (सॉकर) हा राष्ट्रीय खेळ असून याशिवाय बिल्यर्ड्‌झ व स्नूकर हे खेळही लोकप्रिय आहेत.

महत्त्वाची स्थळे : मॉल्टा बेटावरील व्हलेट्टा हे देशाच्या राजधानीचे ठिकाण, सागरी बंदर, व्यापारी केंद्र व ऐतिहासिक घटनांसाठी प्रसिद्ध आहे. सोळाव्या शतकातील मॉल्टा सरदारांचा प्रमुख ग्रँड मास्टर व्हलेट्टा याच्या नावावरून शहरास हे नाव देण्यात आले. स्लीमा (लोकसंख्या २०,१२३–१९८३) हे लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील सर्वांत मोठे शहर, व्हलेट्टाच्या वायव्येस समुद्रकाठी वसलेले असून सुंदर पुळणीसाठी प्रसिद्ध आहे. बिर्किर्कारा (१६,३२०) हे व्हलेट्टाच्या पश्चिमेस सु. ५ किमी. अंतरावरील शहर औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथे लेस, विटा-फरश्या, मृत्पात्री, मासे डबाबंद करणे इ. उद्योग चालतात. लिंबू जातीची फळे व फुलांच्या उत्पादनासाठी हे प्रसिद्ध आहे. सोळाव्या व सतराव्या शतकांतील चर्चवास्तू, राजवाडे येथे पहावयास मिळतात. कॉर्मी (१५,३०१) हे व्हलेट्टाच्या नैर्ऋत्येस सु. ५ किमी. वरील शहर पाव, मॅकरोनी, बिस्किटे या खाद्य पदार्थांच्या व गहू, बटाटे इ. कृषी उत्पादनांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथील मॉल्टी शैलीची पॅलाझो स्टॅग्नो (स्था. १५८९) ही तटबंदीयुक्त बाग प्रसिद्ध आहे. राबात (११, ६५९) हे देशातील महत्त्वाचे शहर व्हलेट्टाच्या पश्चिमेस सु. १० किमी.वर आहे. शेती व पशुपालनासाठी प्रसिद्ध असलेल्या भागातील हे शहर बेटाची जुनी राजधानी होती. येथे शेती उपयोगी गाड्या व हातमागावरील कापड तयार करण्याचे व्यवसाय चालतात. चुनखडकातील गुहा व भुयारे तसेच गव्हर्नरचे उन्हाळी निवासस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. झेटून हे व्हलेट्टाच्या दक्षिणेस सु. ५ किमी. वर असून कृषिप्रदेशातील हे शहर सेंट ग्रेगरी या देशातील जुन्या (१४३६) भग्न चर्च वास्तूसाठी व अनेक भग्न राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हामरून हे व्हलेट्टाच्या नैर्ऋत्येस असून बटणे, फरश्या-विटा, मेणबत्त्या, आरसे व बीर यांच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. गोट्सो बेटावरील व्हिक्टोरिया (५,११२) हे प्रमुख शहर असून ते व्हलेट्टाच्या वायव्येस सु. २५ किमी. वर आहे. हे कृषिप्रदेशातील शहर लेस, मेणबत्त्या यांच्या उत्पादनात देशात अग्रेसर आहे. पूर्वी हे राबात या नावाने ओळखले जात होते. याच्या जवळच आदिम लोकांच्या गुहा व वसतिस्थाने मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. यांशिवाय पाउला, मिसिडा, मदीना, लूका (विमानतळ) इ. गावे प्राचीन अवशेष आणि कुटिरोद्योगांसाठी महत्त्वाची आहेत. 

मॉल्टाकबरस्तानाजवळील आधुनिक प्रसिध्द मशोद, मार्सव्हलेट्टा येथील 'कार्निव्हल' उत्सवाचे दृश्यबरोक वास्तुशैलीतील प्रख्यात कँथीड्ल, एमदोनाराजधानी व्हलेट्टा: ग्रँड हार्बर बंदर

संदर्भ : Blouet, Brian, The Story of Malta, London, 1981.

चौंडे, मा. ल.