मॉट, सर नेव्हिल फ्रान्सिस: (३० सप्टेंबर १९०५ – ). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. अस्फटिकी द्रव्यांवरील संशोधनाकरिता त्यांना ⇨ जॉन हॅसब्रूक व्हॅन व्ह्लेक आणि फिलिप वॉरन अँडरसन यांच्याबरोबर १९७७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. याखेरीज त्यांनी भौतिकीय आविष्कारांच्या स्पष्टीकरणासाठी ⇨ पुंज यामिकीचा उपयोग ⇨ घन अवस्था भौतिकी सिद्धांत आणि धातुनिरोधक संक्रमण या विषयात महत्त्वाचे संशोधन केले.
मॉट यांचा जन्म इंग्लंडमधील लीड्स येथे झाला. १९२७ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून गणित विषयातील पदवी मिळविली आणि प्रथम आर्. एच्. फौलर यांच्याबरोबर व नंतर कोपनहेगन येथे नील्स बोर यांच्याबरोबर काही काळ संशोधन केले. १९२९–३० मध्ये ते मँचेस्टर विद्यापीठात भौतिकीचे अधिव्याख्याते आणि १९३०–३३ मध्ये केंब्रिज विद्यापीठात फेलो व अधिव्याख्याते होते. नंतर १९३३–४८ या काळात ते ब्रिस्टल विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक आणि पुढे १९४८–५४ मध्ये त्याच विद्यापीठातील एच्. एच्. विल्स भौतिकी प्रयोगशाळेचे संचालक आणि भौतिकीचे एच्. ओ. विल्स प्राध्यापक होते. १९५४–७१ या काळात ते केंब्रिज विद्यापीठात प्रायोगिक भौतिकीचे कॅव्हेंडिश प्राध्यापक होते. १९७१–७६ मध्ये ते नॅशनल एक्सटेन्शन कॉलेजचे अध्यक्ष व विश्वस्त होते.
सुरुवातीला कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत त्यांनी अणुकेंद्रीय भौतिकी आणि अणू व अणुकेंद्रे यांच्यामुळे वेगवान कणांचे होणारे प्रकीर्णन (विखुरणे) या विषयांतील प्रश्नांकरिता पुंजयामिकीचा उपयोग करण्यासंबंधी सैद्धांतिक संशोधन केले. त्यानंतर धातू व अर्धसंवाहक (ज्यांची विद्युत् संवाहकता धातू व निरोधक यांच्या दरम्यान आहे असे पदार्थ) यांमध्ये घडणाऱ्या प्रक्रिया, छायाचित्रणामध्ये वापरल्या जाणाऱ्या पायसांच्या (प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्या रासायनिक द्रव्यांच्या) कार्यांमागील तत्त्वे व अस्फटिकी घन पदार्थांमध्ये मिळणारे विद्युत् संवहन या विषयांकडे त्यांनी आपले लक्ष वळविले. परिस्थिती अनुकूल केल्यास काही विशिष्ट द्रव्यांचे निरोधक अवस्थेमधून धातवीय विद्युत् संवाहक अवस्थेत संक्रमण होणे शक्य आहे, हे त्यांनी प्रथम दाखविले.
फीत मुद्रक, ⇨ लेसर, सौर ऊर्जा परिवर्तक (सौर ऊर्जेचे विद्युत् ऊर्जेत परिवर्तन करणारी प्रयुक्ती) इ. प्रयुक्तींमध्ये या आविष्काराचा महत्त्वाचा असा उपयोग होतो. रूढ भौतिकीप्रमाणे धातूमधील काही आणवीय इलेक्ट्रॉन मुक्त अवस्थेमध्ये जातात म्हणजे ते पदार्थांमध्ये मुक्तपणे हालचाल करू शकतात. धातूवर विद्युत् दाब लावला असता त्यामुळे मुक्त इलेक्ट्रॉनांचा जो प्रवाह चालू होतो तोच विद्युत् प्रवाह असतो. अशा प्रकारे धातू विद्युत् संवहन करू शकतात. याउलट निरोधकामध्ये आणवीय इलेक्ट्रॉन हे एकतर रासायनिक बंध किंवा आयन (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट) याबरोबर निगडित असल्यामुळे ते मुक्त अवस्थेत येऊ शकत नाहीत. यामुळे त्यांचा विद्युत् संवहनाकरिता उपयोग होऊ शकत नाही. एल्. ब्रीय्वँ, फीलिक्स ब्लॉक, आर्. ई. पाईर्लस व आर्नोल्ट झोमरफेल्ड यांनी या प्रश्नाचा निरनिराळ्या वेळी पुंजयामिकीच्या दृष्टिकोनामधून विचार केला. घन (स्फटिक) पदार्थामध्ये एकमेकांपासून एका ठराविक अंतरावर असे आणविय आयन उपस्थित असतात. या आयन वितरणामुळे एका विशिष्ट तऱ्हेचे विद्युत् क्षेत्र निर्माण होते. या विद्युत् क्षेत्रामुळे घन पदार्थांमधील इलेक्ट्रॉनाकरिता एकमेकांपासून अलग असे काही ठराविक ऊर्जा विभाग निर्माण होतात. पुंजयामिकीनुसार पदार्थांमधील इलेक्ट्रॉनाकरिता असणारे सर्वांत उच्च ऊर्जा विभाग हे जर संपूर्णपणे इलेक्ट्रॉनांनी भरलेले असतील किंवा ते संपूर्णपणे इलेक्ट्रॉनविरहित असतील, तर तो पदार्थ विद्युत् संवाहक नसतो. याउलट यांपैकी सर्वांत जास्त मूल्याचा ऊर्जा विभाग हा जर अंशतः इलेक्ट्रॉनांनी भरलेला असेल, तर तो पदार्थ धातूप्रमाणे विद्युत् संवहन करतो. अर्धसंवाहकाच्या विद्युत् गुणधर्माची मीमांसा देण्याकरिता वरील प्रतिरूप पुष्कळ प्रमाणात उपयुक्त ठरले. निकेल ऑक्साइडाकरिता हा नियम लागू पडत नाही, असे दिसते कारण हे द्रव्य पारदर्शक असून विद्युत् निरोधक पण आहे. मॉट यांनी दिलेल्या सुधारित मीमांसेप्रमाणे पदार्थाच्या इलेक्ट्रॉनाकरिता असलेला अंतिम ऊर्जा विभाग हा अंशतः इलेक्ट्रॉनांनी भरला असला, तरी तो धातूप्रमाणे विद्युत् संवहन करीलच असे नाही. हे ठरविण्याकरिता पदार्थामधील इलेक्ट्रॉन घनफळ घनता (पदार्थाच्या एका घन सेंटिमीटरमध्ये असणारी इलेक्ट्रॉनांची संख्या) या राशीचा पण विचार करावा लागतो. पदार्थामध्ये योग्य अपद्रव्यभरण (अन्य अशुद्ध द्रव्य मिसळणारी क्रिया) केले असता या राशीमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणून मूळ पदार्थांचे निरोधक अवस्थेमधून धातवीय विद्युत् संवाहकात (अथवा याउलट) रूपांतर करता येईल, असे मॉट यांनी दाखविले. या संक्रमणाला मॉट संक्रमण असे म्हणतात.
मॉट यांनी केलेल्या संशोधन कार्याबद्दल लंडन, पॅरिस, ऑक्सफर्ड इ. अनेक विद्यापीठांना त्यांना सन्माननीय डी. एस्सी. पदव्या दिल्या. १९६२ मध्ये त्यांना ‘नाइट’ हा किताब देण्यात आला. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १९३६ मध्ये त्यांची निवड झाली. अमेरिकेची नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस व इतर अनेक वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. ते इंटरनॅशनल युनियन ऑफ फिजिक्स ह्या संघटनेचे १९५१–५७ या काळात अध्यक्ष होते. त्यांनी भौतिकी विषयावर लिहिलेल्या ग्रंथांपैकी ॲन आउटलाइन ऑफ वेव्ह मेकॅनिक्स (१९३०), द थिअरी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड ॲलॉइज(एच्. जोन्स यांच्याबरोबर, १९३६), इलेक्ट्रॉनिक प्रोसेसेस इन आयॉनिक क्रिस्टल्स (आर्. डब्ल्यू. गर्नी यांच्याबरोबर, १९४०), वेव्ह मेकॅनिक्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स (आय्. एन्. स्नेडॉन यांच्याबरोबर, १९४८), एलेमेंट्स ऑफ वेव्ह मेकॅनिक्स (१९५२), ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड द स्ट्रेंग्थ ऑफ मेटल्स (१९५६), द थिअरी ऑफ ॲटॉमिक कोलिजन्स (एच्. एस्. डब्ल्यू. मॅसी यांच्याबरोबर, १९३४ तिसरी आवृत्ती १९६५), इलेक्ट्रॉनिक्स प्रोसेसेस इन नॉनक्रिस्टलाइन मटेरियल्स (ई.ए. डेव्हिस यांच्याबरोबर, १९७१), एलेमेंटरी क्वांटम मेकॅनिक्स (१९७२) आणि मेटल इन्शुलेटर ट्रँझिशन्स (१९७४) हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. यांशिवाय त्यांनी घन अवस्था भौतिकी आणि विज्ञान शिक्षण या विषयांवर अनेक संशोधन निबंध लिहिले आहेत.
चिपळोणकर, व. त्रिं.