मॉगादॉर : विद्यमान नाव एस्वीर. पश्चिम मोरोक्कोचे अटलांटिकवरील बंदर व त्याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३०,०६१ (१९७१). आगादिर व साफी यांदरम्यानचे हे शहर भाराकेशच्या पश्चिमेस १६८ किमी. वर आहे. ॲटलास पर्वतामुळे याचे सहाराच्या उष्णतेपासून संरक्षण होते. हवा उबदार, बहुधा कोरडी समशीतोष्ण असते. पाऊस हिवाळ्यात अखेरीस येतो. वार्षिक पर्जन्यमान सु. ३०·५ सेंमी. हे सस. पासून ३ ते ७ मी. उंचीच्या वालुकाश्म भूशिरावर वसलेले असून मोठ्या भरतीच्या वेळी ते जवळ जवळ बेटच होऊन जाते. किनाऱ्याजवळच्या द्वीपिका व खडकाळ भूशिर यांमुळे हे सुरक्षित असले, तरी त्याची खाडी रुंद व धोकेबाज आहे. त्यामुळे लहान जहाजेच फक्त आत येऊ शकतात. जमिनीच्या बाजूस कित्येक किमी. पर्यंत वाळूच्या टेकड्या व ब्रूम झुडुपे आहेत. त्यांपलीकडे मोरोक्कोतच फक्त आढळणारे आर्गन अरण्य आहे. मॉगादॉर हे हस्तकामासाठी विशेषतः लाकडावरील नक्षीच्या जडावकामासाठी, प्रसिद्ध आहे.येथील सुंदर पुळणीवर हौशी लोक समुद्रस्नानासाठी येतात. धान्य ही येथील प्रमुख निर्यात वस्तू होय. येथून आगादिर, माराकेश, यांकडे रस्ते गेलेले आहेत.
सुलतान सिदी मुहम्मद इब्न अब्दुल्ला याने आगादिरला प्रतिस्पर्धी म्हणून १७६५ मध्ये फ्रेंच अभियंते व कैदी यांच्याकडून हे बांधून घेतले. फ्रेंच अंमलात काही काळ याची भरभराट झाली. परंतु आगादिर परदेशी व्यापाराला खुले झाल्यावर याचा ऱ्हास झाला. दुसऱ्या महायुद्धात १९४२ मध्ये अमेरिकेचे सैनिक येथे उतरले होते.
कुमठेकर, ज. ब.