माहाराष्ट्री साहित्य : महाकाव्ये, खंडकाव्ये, चरितकाव्ये मुक्तक काव्ये, स्तोत्रे, गद्य चरितेअसे विविध प्रकारचे साहित्य माहाराष्ट्री भाषेत निर्माण झालेले आहे. इ. स.च्या दहाव्या शतकांनतर ह्या साहित्याला विशेष बहर आला. हेमचंद्रादी प्राकृतव्याकरणकार जैन माहाराष्ट्री ही स्वतंत्र भाषा न मानता, तिलामाहाराष्ट्रीच समजत असल्यामुळे प्रस्तुत व्याप्तिलेखात जैन माहाराष्ट्रीतीलसाहित्याचाही परामर्श घेतला आहे.

महाकाव्ये : प्रारंभीच्या काळातील माहाराष्ट्री महाकाव्यांवर संस्कृत महाकाव्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.⇨ प्रवरसेन (पाचवे शतक) ह्याने रचिलेल्या ⇨ सेतुबंध ह्या महाकाव्याचा विषय वानरसेनेने लंकेवर स्वारी करण्यासाठी बांधलेला सेतू आणि त्यानंतर रामाने केलेला रावणाचा वध हा होय. रावणवध अथवा दशमुखवध ह्या नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते. माहाराष्ट्रीतील सर्वोत्कृष्ट महाकाव्य म्हणून सेतुबंधाचा गौरव केला जातो. ह्यानंतर ⇨ गउडवहो (रचना सु. ७२५), ⇨ लीलावई (आठवे शतक), कुमार वालचरिय (बारावे शतक) आणि गोविंदाभिषेक (तेरावे शतक) ही काव्ये उल्लेखनीय आहेत. ⇨ वाक्‌पतिराजाने रचिलेल्या गउडहोत कनौजचा राजा यशोवर्मा ह्याच्या दिग्विजयाचे व त्याने केलेल्या गौड राजाच्या वधाचे वर्णन आहे. कोऊहल (कौतूहल) हा लीलावईचा कर्ता. प्रतिष्ठानचा राजा सातवाहन आणि सिंहल देशाची राजकन्या लीलावती ह्यांची प्रेमकथा त्याने लीलावईत सांगितली आहे. व्याकरण, कोश, अलंकार, छंद, इ. विषयांवर लेखन करणाऱ्या हेमचंद्राने कुमारवालाचरियाची (कुमारपालचरित) रचना केली आहे. ह्याला द्वाश्रय काव्य असेही म्हणतात. हे काव्य लिहून हेमचंद्राने दोन हेतू साध्य केले आहेत : सिद्धहेमह्या आपल्या व्याकरण ग्रंथातील नियम समजावून सांगणे हा एक आणि जैनधर्मोपासक राजा कुमारपाल ह्याचे चरित्र कथन करणे, हा दुसरा. ह्या ग्रंथाचेदोन भाग असून पहिल्या भागात (संस्कृत)सिद्धहेमातील संस्कृतव्याकरणाचे नियम समजावून सांगत असताना सोळंकी राजवंशातील मूलराजापासूनकुमारपालापर्यंत इतिहास सांगितला आहे. दुसऱ्या भागात (प्राकृत) प्राकृतव्याकरणनियमांचे स्पष्टीकरण देत असताना राजाकुमारपालाचे युद्ध इत्यादींचेवर्णन आहे. वररूचीचेप्राकृत प्रकाशआणि त्रिविक्रमाचेप्राकृत व्याकरणह्या दोन ग्रंथातील नियमांच्या विवेचनार्थगोविंदाभिषेकाची रचना केली गेली. ह्या काव्याच्या प्रत्येक सर्गाच्या अखेरीस ‘श्री’ कार असल्यामुळे ह्यालासिरिचिंधकव्व (श्रीचिह्‌नकाव्य) असेही म्हणतात. ह्या काव्याचे एकूण बारा सर्ग असूनत्यांपैकी पहिले आठ कृष्णलीलाशुक ह्या केरळवासी कवीने रचिले आहेत. सर्वभौम, कोदंडमंगल अशा नावानीही हा कवी ओळखला जातो.गोविंदाभिषेकाचे उर्वरित चार सर्ग दुर्गाप्रसाद नावाच्या कवीने लिहिले. काव्यसौष्ठव आणि रसवत्ता ह्या काव्यात फारशी दिसून येत नाही. ह्याखेरीजसोरिचरित (शौरिचरित-सु. १७००) हे कवी श्रीकंठकृत श्रीकृष्णचरितावरील काव्यहीअपूर्णावस्थेत (केवळ ४ आश्वास उपलब्ध) मिळते. श्रीकंठ हा राजा केरळवर्माह्याच्या दरबारातील पंडित. काहींच्या मते पंधराव्या शतकाच्या प्रथमार्ध हाश्रीकंठचा काल होय.सोरिचरितात श्रीकंठाचे काव्यचातुर्य ठिकठिकाणी प्रत्ययास येते. ह्या काव्यावर संस्कृत काव्याचा प्रभाव आहेच.

खंडकाव्ये : माहाराष्ट्रीतकंसवहो (कंसवध) आणिउसणिरुद्ध (उषा-अनिरुद्ध) ही दोन नाव घेण्याजोगी खंडकाव्ये असून तो⇨ रामपाणिवाद (अठरावे शतक) ह्या केरळीय कवीने रचिलेली आहेत. श्रीमद्‌भागवतावर आधारलेल्या कंसवहो चे चार सर्ग असून त्यांत एकूण २३३ पद्ये आहेत. ह्या अलंकारिक काव्यात संस्कृतातील विविध छंदांची योजना करण्यात आली आहे. संस्कृत काव्यांचा विशेषतः माघाच्या शिशुपालवधाचा-प्रभाव रामपाणिवादाच्या ह्या रचनेवर दिसून येतो. उसाणिरुद्धाचेही चार सर्ग असून ह्याची कथाही श्रीमद्‌भागवतातून घेतली आहे. ह्या खंडकाव्यावर राजशेखराच्या कर्पूरमंजरीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

चरितकाव्ये व गद्यपद्यमिश्रित चरित : आपल्या धर्ममताच्या प्रसारार्थ, जैन पुराणांतर्गत महापुरुषांची चरितकाव्ये जैन कवींनी रचिली तसेच काही चरितकाव्ये काल्पनिक पात्रांभोवती गुंफलेली आहेत. विमलसूरिकृत (इ.स. च्या पहिल्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत हा केव्हा तरी होऊन गेलाअसावा)⇨पउमचरिय (पद्मचरित) ह्या चरित काव्याचा अपवाद वगळता माहाराष्ट्रीतील बहुतेक काव्यरचना दहाव्या शतकानंतरची आहे. पउमचिरिय हे रामाचे चरित्र होय. तथापि वाल्मीकी रामायण हे अनेक विपरीत आणि असंभवनीय अशा गोष्टींनी भरलेले आहे. अशी भूमिका घेऊन, विमलसूरीने जैन मतानुसार आपली रामकथा मांडली आहे. ह्या रामकथेतील रावण जिनेंद्राचा भक्त आहे. तसेच अग्निदिव्यातून बाहेर आल्यानंतर सीतेने जैन धर्माची दीक्षा घेतली. असेही ह्या काव्यात दाखविले आहे. धनेश्वराने सुरसुंदरीचरिय (अकरावे शतक) रचिले. त्याचे १६ परिच्छेद असून प्रत्येकपरिच्छेदात २५० पद्ये आहेत. ही एक प्रदीर्घ प्रेमकथा आहे. चंद्रप्रभ महत्तराने सिरि विजयचंद केवलिचरिय (अकरावे शतक-सं. रूप श्रीविजयचंद्र केवलिचरित) ह्या नावाने, पूजेच्या अष्टविध द्रव्यांवर आठ कथांचा संग्रह लिहिला आणि त्याला पार्श्वभूमिदाखल ह्या केवलिचे थोडेसे चरित्र दिले आहे. वर्धमानसूरीकृत आदिनाहचरिय (अकरावे शतक), हेमचंद्राचे गुरू देव सूरी ह्यांचे संतिनाहचरिय (शांतिनाथचरित), मलधारी हेमचंद्रकृत नमिनाहचरिय (नेमिनाथचरित), त्याचा शिष्य श्रीचंद्रसूरी ह्याने लिहिलेले मुणिसुव्वयसामिचरिय (मुनिसुव्रत स्वामिचरित), श्रीचंद्राचा गुरूबंधू लक्ष्मणगणी ह्याचे सुपासनाहचरिय (सुपार्श्वनाथचरित – बारावे शतक), श्रीचंद्रसूरीचा शिष्य वाटगच्छीय हरिभद्र ह्याने लिहिलेली चन्दप्पहचरिय (चंद्रप्रभचरित), मल्लीनाहचरिय (मल्लिनाथचरित) व नेमिनाहचरिय (नेमिनाथचरित) ही चरिते, सोमप्रभसूरीचे सुमतिनाहचरिय (सुमतिनाथचरित) मुनिभद्राचे संतिनाहचरिय (शांतिनाथचरित) इ. अन्य चरितेही उल्लेखनीय आहेत.


ह्या चरितांचा एक ठराविक साचा आहे. ह्यात चरित्रनायकाच्या पूर्वजन्माचे वर्णन उपाख्याने व धार्मिक प्रवचने नायकाचे चरित्रवर्णन (नायकाच्या जन्मनगरीचे सौंदर्य, मातापितरांचे वैभव, जन्मादी पंचकल्याण, नायकाची कठोर तपस्या, केवलज्ञानोत्पत्ती, समवशरणरचना, धर्मोपदेश, देशविहार, निर्वाण) ह्यांचा समावेश होतो. 

गद्यपद्यमिश्रित अशी चरितेही आहेत. शीलांकाचार्याने (ह्याला शीलाचार्यही म्हणतात) चोपन्न शलाका महापुरूषांचे जीवन चउपन्न महापुरिस चरियात (नववे शतक) वर्णिले आहे. जैन परंपरेतील शेवटच्या केवलीचे (केवलज्ञान प्राप्त झालेल्या मुनींचे) – जंबूस्वामीचे – चरित्र जंबूचरियात सांगितले आहे. ह्या ग्रंथातील भाषा ओघवती असून तीत अधूनमधून जैन धर्मोपदेशही केलेला आहे. गुणचंद्राच्या ⇨ महावीरचरियाचे आठ प्रस्ताव आहेत. कालिदास, बाणभट्ट, माघ ह्या संस्कृत कवींच्या प्रभावाचा प्रत्यय ह्या चरितात येतो. त्यात अधूनमधून संस्कृत श्लोकही उद्‌धृत केलेले आहेत. तसेच ह्यांतील अनेक पद्ये अवहट्ट भाषेत लिहिलेली असून त्यांवर गुजरातच्या नागर अपभ्रंश भाषेचा परिणाम दिसून येतो. गुणचंद्राने पासनाहचरियाचीही (पार्श्वनाथचरित) रचना केली. नेमिचंद्राच्या रयणचूडरायचरियावर (रत्नचूडराजचरित-बारावे शतक) संस्कृताचा प्रभाव आहे. बृहदगच्छीय नेमिचंद्राने भगवान महावीरांचे केवलज्ञानप्राप्तीपर्यंतचे एक चरित्र लिहिले आहे (महावीरचरिय, अकरावे शतक). ह्या चरित्रावर कालिदास, बाण इ. प्रतिभावंतांचा प्रभाव दिसून येतो. हे मात्र पद्यमय आहे. 

मुक्तके : एक श्लोकी स्वतंत्र रचना म्हणजे मुक्तक. अशा मुक्तकरचनेचा वारसा सांगणारे दोन संग्रह माहाराष्ट्रीत आढळतात. एक ⇨ गाहा सत्तसई आणि दुसरा ⇨ वज्‍जागलग्ग. गाहा (गाथा) ह्यानावाने ओळखली जाणारी गाहा सत्तसईतील गीते, सातवाहन राजा ⇨ हाल (इ. स. चे पहिले वा दुसरे शतक) ह्याने संकलित केलेली आहेत. त्याने स्वतः रचलेल्या काही गाथाही तीत अंतर्भूत आहेत. प्रत्येक गाथेतील कल्पना स्वयंपूर्ण असून ती वेचक व सूचक शब्दांत मांडलेली आहे. विविध प्रकारच्या स्त्रियांच्या मनःस्थितींचे, प्रेमाच्या विविध अवस्थांचे, सुंदर निसर्गदृश्यांचे, मदनोत्सवासारख्या विशेष प्रसंगाचे चित्रण ह्या गाथांतून केलेले आहे. वज्‍जालंग्गाचे संकलन जयवल्लभाने केले. ‘एकाच विषयावरील अनेक गाथा संगृहीत केल्या गेल्या, की त्याला ‘वज्‍जालग्ग’ म्हणतात. वज्‍जा म्हणजे ‘पद्धती’ अशा आशयाचे स्पष्टीकरण ह्या ग्रंथात दिले आहे. सज्जन, दुर्जन, दैव, दारिद्य, गज, सिंह, भ्रमर, प्रेम, ज्योतिषी, लेखक, वैद्य, वैश्या अशा एकूण ९५ विषयांवरील गाथा वज्‍जालग्गात आहेत.

एका अज्ञात आचार्याने संकलित केलेले वैराग्यशतक, लक्ष्मीलाभगणीचे वैराग्यसायनप्रकरण व पद्मनंदीचे धम्मरसायण हे तीन ग्रंथही उल्लेखनीय आहेत.

स्तोत्रे : संस्कृतातील स्तोत्रवाङ्‌मयाप्रमाणेच माहाराष्टीतील स्तोत्र वाड्मय हे भक्तिपरिप्लुत असून भाषाशैलीच्या आणि विचारांच्या दृष्टीने सुंदर आहे. ही स्तोत्रपंरपरा इ. स. १००० पूर्वीची असल्याचे दिसते. कवी योगीद्रदेव किंवा योगींदू वा जोइंदूकृत ‘निजात्माष्टक’, नंदिषेणाचे (नववे शतक) ‘अजिय-संतिथव’ (अजितशांतिस्तव), भद्रबाहूने रचिलेले ‘उवसग्गहर’ (उपसर्गहर), देवेंद्रसूरीचे ‘शाश्वत चैत्यास्तव’, दिगंबर जैनांचे प्रमाणभूत स्तोत्र ‘निर्वाणकांड’ ह्यांसारखी अनेक स्तोत्रे आहेत. ‘निजात्माष्टका’ चा कर्ता जोइंदू हा परमप्पयासूची रचना करणारा जोइंदू असल्यास इ. स. ६०० ते १००० हा ह्या स्तोत्राचा काळ असावा. ह्यात आठ गाथा आहेत. ‘अजियसंतिथवा’त भिन्न भिन्न अशा २५ छंदांची योजना करण्यात आली आहे. ‘उवसग्गहर’ हे स्तोत्र पार्श्वनाथस्तुतिपर असून त्याच्या पठणाने सर्व अधि-व्याधी नाहीशा होऊन सुखप्राप्ती होते, असे मानतात. ‘शाश्वतचैत्यावस्तवा’त जैनांच्या भूगोलविषयक कल्पना ग्रथित केलेल्या आहेत, तर ‘निर्वाणकांडात’ जैनांची तीर्थस्थाने दिली आहेत. ह्यांशिवाय धनपालाने (दहावे शतक) रचिलेले ‘ऋषभपंचाशिका’ आणि जिनवल्लभसूरीचे ‘लघुअजितसंतिथव’ (लध्वजितशांतिस्तव) ह्यांचा उल्लेख आवश्यक आहे. ‘ऋषभपंचाशिके’ त ऋषभनाथांची स्तुती आहे ‘लधुअदितसंतिथव’ हे नावाप्रमाणेच लघु असून त्यात १७ गाथा आहेत.

अन्य पद्यसाहित्य : संस्कृत नाटकांतून आणि प्राकृत सट्टकांतून माहाराष्ट्री पद्ये आहेत. रस व अलंकाराची उदाहरणे म्हणून संस्कृत साहित्यशास्त्रावरील ग्रंथांतून अनेक माहाराष्ट्री गाथा उद्‌धृत केल्या आहेत. त्यांपैकी कित्येक गाथांचे रचयिते अज्ञात आहेत. आनंदवर्धनाचा ध्वन्यालोक, भोजाचा सरस्वतीकंठाभरण, हेमचंद्रकृत काव्यानुशासन इ. ग्रंथातून माहाराष्ट्री गाथा आढळतात. अनेक माहाराष्ट्री गाथा जनसामान्यांच्या भावना व्यक्त करीत असल्यामुळे त्यांत थोडा मनमोकळा रांगडेपणाही आहे.


माहाराष्ट्रीतील श्रेष्ठ चंपूकाव्य हे ⇨ कुवलयमाला (७७९) होय. उद्योतनसूरीकृत ह्या चंपूकाव्यात क्रोध इ. विकारांचे परिणाम दाखविणाऱ्या कथांची गुंफण केली आहे.

कथासाहित्य (गद्य-पद्य) : माहाराष्ट्रीतील गद्यसाहित्य मुख्यतः कथनपर आहे. ह्या कथावाङ्‌मयामागील प्रमुख प्रेरणा धर्मप्रसाराची आहे. ⇨ पादलिप्तसूरीकृत (इ. स. च्या पाचव्या शतकापूर्वी) ⇨ सरंगवइकहा (तरंगवतीकथा) ही एकूण प्राकृत साहित्यातील सर्वप्राचीन धर्मकथा माहाराष्ट्रीत आहे. ही कथा आज तिच्या मूळ स्वरूपात उपलब्ध नसली, तरी तरंगलोला ह्या नावाने तिचा केलेला एक संक्षेप उपलब्ध आहे. त्यावरून मूळ कथेची कल्पना येऊ शकते आणि ती एक वैराग्यप्रवर्तक प्रेमकथा होती, ती हे लक्षात येते. ⇨ वसुदेवाहिंडी हा कथाग्रंथही उल्लेखनीय आहे. ‘वसुदेवहिंडी’ म्हणजे कृष्णपिता वसुदेव ह्याचे भ्रमण (हिंडी). ह्या भ्रमणाच्या कथेच्या अंतर्गत अन्य अनेक कथा आहेत. मुख्यतः गद्यात्मक समासान्त पदावलित लिहिलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना असून अधूनमधून पद्याचा वापरही केलेला आहे. गुणाढ्यकृत ⇨ बड्‌डकहा (बृहत्कथा) ह्या कथाग्रंथाची वसुदेवहिंडीची तुलना केली जाते. ह्या ग्रंथाचे दोन खंड असून पहिल्या खंडाचा कर्ता संघदासगणी वाचक,तर दुसऱ्याचा धर्मसेनगणी आहे. इ. स. सु. पाचवे शतक हा संघदासगणी वाचकाचा काळ मानला जातो. हरिभद्रसूरीकृत (आठवे शतक) ⇨ धुत्तक्‌खाण (धूर्ताख्यान) ब्राम्हणी पुराणांचा विडंबनात्मक उपहास करण्यासाठी लिहिले गेले आहे. ह्याच हरिभद्राने ⇨ समराइच्‍चकहा (समरादित्यकथा) ह्या नावाची एक धर्मकथाही लिहिली आहे. बाणभट्टाच्या कादंबरीचा तसेच श्रीहर्षाच्या रत्नावलीचा प्रभाव हरिभद्राच्या ह्या कथाग्रंथावर दिसून येतो. ह्या कथाग्रंथाचा पद्यभाग आर्याछंदात रचिलेला आहे. श्वेतांबर आचार्य जिनेश्वरसूरी ह्याने १०५२ मध्ये कहाणयकोस (‘कथा कोष प्रकरण’ ह्या नावानेही प्रसिद्ध) लिहिला. कहाणयकोसात ३० गाथा असून त्यांवरील टीकेत ३६ मुख्य आणि ४–५ अवांतर कथा आलेल्या आहेत. ह्या ग्रंथातील कथांतून तत्कालीन समाज. आचारविचार, राजनीती इत्यादींचे प्रतिबिंब पडलेले दिसते. संवेगभावाचे प्रतिपादन करण्यासाठी जिनचंद्रसूरीने ११६८ मध्ये संवेगरंगसाला (संवेगरंगशाळा) हा कथात्मक ग्रंथ लिहिला, तर महेश्वसूरीने णाणपंचमीकहा (ज्ञानपंचमीकथा) ह्या ग्रंथात ज्ञानपंचमीचे (कार्तिक शु. पंचमीचे) महात्म्य सांगणाऱ्या दहा कथा लिहिल्या. त्या सु. २००० गाथांत गुंफिलेल्या आहेत. देवभद्रसूरीने कहारयणकोस (कथारत्नकोश) रचिला (११०१). अनेक लौकिक कथा ह्यात अंतर्भूत आहेत. एकूण ५० गद्य – पद्य कथा ह्यात असून संस्कृत तसेच अपभ्रंश भाषेचा उपयोगही केलेला आहे. नेमिचंद्रसूरी हा अक्‌खाणमणिकोसाचा (आख्यानमणिकोश) कर्ता. हाही कथाग्रंथच होय. हा ग्रंथ पद्यात आहे. पद्यचंद्रसूरीच्या एका अज्ञातनाम शिष्याने विक्कमसेणचरिय (विक्रमसेनचरित) नावाचा कथाग्रंथा रचिला होता. त्यात आलेल्या चौदा कथांपैकी बारा कथा पाइअकहासंग्रहात (प्राकृतकथासंग्रह) आहेत. ह्या संग्रहात दानशील, तप, भावना, सभ्यक्‌त्व, अनित्यता इ. विषयांशी संबंधित अशा कथा आहेत. ११३० मध्ये महेंद्रसूरीने नम्मयासुंदरीकहा (नर्मदासुंदरीकथा) रचिली. ही कथा गद्य-पद्यमय असून तीत पद्याचा भाग अधिक आहे. परदेशात कपटाने वेश्यागृहात आणल्या गेलेल्या नर्मदासुंरी ह्या विवाहित स्त्रीची ही कहाणी आहे. आपले शील टिकविण्यासाठी नर्मदासुंदरीने जो छळ सोसला आणि खंबीरपणा दाखविला तो ह्या कहाणीत प्रभावीपणे चित्रित केलेला आहे. सौमप्रभसूरीने ११८४ मध्ये कुमारवालपडिबोह (कुमारपालप्रतिबोध) लिहिला. हेमचंद्रने गुजरातचा राजा कुमारपाल ह्याला धर्मबोध करण्यासाठी सांगितलेल्या कथा, अशा पार्श्वभूमीवर सोमप्रभसूरीने ५४ कथा ह्यात गुंफल्या आहेत. ह्या ग्रंथातील काही भाग संस्कृतात आणि अपभ्रंशात आहे. सुमतिसूरीचे गद्यपद्यात्मक जिनदत्ताख्यानही उल्लेखनीय आहे. जिनदत्त नावाच्या नायकाची ही कहाणी. जिनदत्त चार स्त्रियांशी विवाह करतो आयुष्यात विविध प्रकारचे अनुभव घेतो आणि अखेरीस दीक्षा ग्रहण करतो. चौदाव्या पंधराव्या शतकांतही माहाराष्ट्री प्राकृतात कथारचना होतच होती. उदा., रत्नशेखरसूरीकृत सिरिवालकहा (श्रीपालकथा) आणि जिनहर्षगणीकृत रयणसेहरीकहा (रत्नशेखरी कथा). ह्या दोन ग्रंथापैकी पहिला चौदाव्या शतकातला, तर दुसरा पंधराव्या शतकातला आहे. श्रीपालकथेत एकूण १,३४२ पद्ये असून ती मुख्यतः आर्या छंदात आहेत. श्रीपालाच्या कथेतून सिद्धचक्राचे माहात्म्य सांगण्यात आले आहे. पर्व आणि तिथी ह्यांचे माहात्म्य रत्नशेखरी कथेत सांगितलेले आहे. हा ग्रंथ गद्यपद्यमय आहे.

एकूण प्राकृत साहित्याचा विचार केला. तर प्रकाशित साहित्यापेक्षा अप्रकाशित साहित्य जास्त आहे, असे दिसून येईल. माहाराष्ट्री ही एक प्रमुख प्राकृत भाषा असल्यामुळे माहाराष्ट्रीतील ग्रंथांचे अधिकाधिक संशोधन-संपादन झाले, तर ते प्राकृत साहित्याचा इतिहास नीट लिहिला जाण्याच्या दृष्टीने उपकारक ठरेल.

संदर्भ : 1. Winternitz M. A. History of Indian Literature, Vol, 2, Calcutta, 1933.

              २. जैन, जगदीशचंद्र, प्राकृत साहित्य का इतिहास, वाराणसी, १९६१.

              ३. नेमिचंद्र शास्त्री, प्राकृत भाषा और साहित्य का आलोचनात्मक इतिहास, वाराणसी, १९६६.

तगारे, ग. वा.