मालिन्यमिति व मळभमिति : (टर्बिडीमेट्री व नेफेलोमेट्री). एखाद्या द्रवात किंवा विद्रावात सूक्ष्म कण निलंबित (लोंबकळत्या) रूपात इतस्ततः विखुरलेले असल्यास त्याला गढूळपणा किंवा मालिन्य येते. अशा द्रवातील वा विद्रावातील निलंबित कणांची भारात्मक संहती (प्रमाण) प्रकाशाच्या साहाय्याने निश्चित करण्याची मालिन्यमिती व मळभमिती ही दोन तंत्रे आहेत.
मालिन्यमिती : निलंबित कण असलेल्या द्रवातून किंवा विद्रावातून प्रकाश आरपार जाऊ दिल्यास विद्रावातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता विद्रावात (निलंबनात) प्रवेश करणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेपेक्षा कमी झालेली आढळते. बाहेर पडणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेचे प्रवेश करणाऱ्या प्रकाशाच्या तीव्रतेशी असणारे गुणोत्तर निलंबित कणांची भारात्मक संहती व त्यांचे सरासरी आकारमान यांवर अवलंबून असते. प्रकाशाच्या तीव्रतेत झालेली सापेक्ष घट निलंबित कणांच्या भारात्मक संहतीच्या सरल प्रमाणात होताना दिसते. त्यांचा हा सरळ संबंध निलंबनाची संहती मोजण्याच्या पद्धतींचा आधार आहे.
प्रकाशाच्या तीव्रतेचे मापन प्रकाशाची दृश्य तीव्रता प्रत्यक्ष किंवा प्रकाशविद्युत् घटाद्वारे [→ प्रकाशविद्युत्] मापून केले जाते. निलंबित कणांमुळे प्रकाशाच्या तीव्रतेत झालेली घट आणि निलंबनाची संहती यांचा संबंध दाखवणारा भिन्न भिन्न संहतींनुसार होणारी घट मोजून एक प्रमाणित आलेख संदर्भासाठी प्रारंभीच तयार करून घ्यावा लागतो किंवा उपलब्ध असावा लागतो. त्याच्याशी तुलना करून त्याच पदार्थांच्या त्या कण-आकारमान मर्यादेतील परीक्षणार्थ दिलेल्या निलंबनामुळे प्रकाश संक्रमणात होणारी घट मापून त्या निलंबनातील निलंबित कणांची संहती आलेखाच्या मदतीने काढता येते.
मालिन्यमापकाचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी एकाची सुलभीकृत रेखाकृती दिली आहे. आ या प्रकाशात उद्गमाचा प्रकाश अ या अंतर्गोल आरशाने केंद्रित करून इ या संघननकारी (जास्तीत जास्त प्रकाश एकत्रित करणाऱ्या) जोड भिंगातून प या परीक्षण करावयाच्या निलंबनाने भरलेल्या नळीतून जाऊ दिला जातो. ईउ मार्गाने तो निलंबनातून पार जाऊन ऊ या प्रकाशाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्रणेवर पडतो. निलंबनातील संक्रमणामुळे प्रकाशाच्या तीव्रतेत होणाऱ्या घटीवर ही पद्धती अवलंबून आहे.
मालिन्यमितीच्या दुसऱ्या एका प्रकारात निलंबन एका उभ्या नळीत घेऊन तीमध्ये एक प्लॅटिनमची तार (किंवा अन्य तसाच चमकणारा पदार्थ) वरून खाली सरकवीत नेण्याची व्यवस्था असते. तार दिसेनाशी होईपर्यंत खाली सरकवली जाते व असे होताच विद्रावाच्या पृष्ठभागापासून तेथपर्यंत अंतर मोजले जाते. नंतर तशाच संदर्भ नळीत त्याच पदार्थाचे तसल्याच कण-आकारमान मर्यादेचे प्रमाणित निलंबन घेऊन त्यात तीच प्लॅटिनम तार (धुऊन पूर्ववत करून वापरल्यावर) ती किती अंतरातून खाली नेल्यास जेमतेम दिसेनाशी होते ते अंतर काढतात. ही परीक्ष्य व प्रमाणित निलंबनांतील तार जेमतेम दिसेनाशी होण्यास लागणारी अंतरे त्या दोन निलंबनांच्या संहतींच्या व्यस्त प्रमाणात असतात. ज्ञातमूल्य निलंबन संहतीवरून याप्रकारे परीक्षण केलेल्या निलंबनाची अज्ञात संहती काढता येते.
सामान्यतः निलंबित कणांची भारात्मक संहती ०·०५ ते ०·५ मिग्रॅ./१०० मिलि. या मर्यादांमध्ये असेल, तर मालिन्यमिती तंत्र उपयोगीपडते. या तंत्राने निश्चित केलेले संहति-मूल्य व प्रत्यक्ष संहति-मूल्य यांमध्ये ± ५ ते ± १०% तफावत पडण्याचा संभव असतो कारण विशिष्ट आकारमान मर्यादांतील व विशिष्ट भारात्मक संहतीची सर्वथा तुल्य व स्थायी (स्थिर) निलंबने बनविणे सुलभ नसते.
मळभमिती: निलंबित सूक्ष्म कणांची संहती वरील किमान मर्यादेपेक्षा कमी असल्यास मळभमिती हे मालिन्यमितीपेक्षा सूक्ष्मग्राही व काटेकोर तंत्र म्हणून उपयोगी पडते. या तंत्रामध्ये निलंबित कणांतून प्रकाश जात असता प्रकाशमार्गाला लंब असणाऱ्या दिशेने जो प्रकाश प्रकीर्णित होतो (विखुरला जातो) त्याची तीव्रता मोजतात. मूळची प्रकाश तीव्रता (प्रकीर्णनरहित म्हणून प्राय: शून्य) व प्रकीर्णित प्रकाशाची तीव्रता यांच्या गुणोत्तरावरून निलंबित कणांची भारात्मक संहती निश्चित करता येते. येथेही प्रकीर्णित प्रकाशाची तीव्रता व निलंबित कणांची संहती यांतील भिन्न संहतींनुसार संबंध दाखविणारा प्रमाणित आलेख तुलनेसाठी वापरणेच इष्ट असते. हा संबंध सरळ रेषात्मक असतो. निलंबित सूक्ष्म कणांमुळे होणाऱ्या प्रकाशाच्या प्रकीर्णनाला जॉन टिंड्ल या भौतिकीविज्ञांच्या नावावरून टिंड्ल परिणाम म्हणतात व त्यावर ही पद्धती आधारलेली आहे. वरील सुलभीकृत रेखाकृतीत मळभमितीच्या उपकरणाचाही समावेश आहे. प्रकाश ईउ दिशेने निलंबनातून जाताना लंब दिशेने त्याच्या प्रकीर्णनाचे मापन ए येथे प्रकाशाची प्रत्यक्ष तीव्रता पाहून किंवा त्या जागी प्रकाशविद्युत् घट वापरून करता येते. दोन्ही तंत्रांमध्ये निलंबित कण सूक्ष्म असले, तरी कलिल कणांच्या मर्यादेत [→ कलिल] समाविष्ट होतील एवढे सूक्ष्मतर नसतात. तसेच ते पुरेसा काल निलंबित रूपात राहू शकणारे व वर्णहीन असावे लागतात. शिवाय आवश्यक तेव्हा तुल्य स्थायित्वाचे व संहतीचे निलंबन तयार करणे शक्य असावे लागते म्हणजे अधिक विश्वसनीय व बिनचूक संहतिमूल्य या तंत्राने मिळविता येते.
उपयोग : चांदी, कॅल्शियम, गंधक, कथिल, क्लोरीन वगैरे कित्येक मूलद्रव्यांच्या भारात्मक मापनासाठी ही तंत्रे वापरता येतात. जीवरासायनिक विश्लेषणात रक्त, मूत्र व पृष्ठवंशातील (पाठीच्या कण्यातील) द्रव यांच्या तपासणीत, तसेच सूक्ष्मजंतूंची होत असलेली वाढ जाणण्यासाठी ही तंत्रे उपयोगी पडतात. काही उद्योगधंद्यात कच्च्या मालातील अनिष्ट निलंबित पदार्थ गाळण्याच्या क्रियेने दूर करावे लागतात. अशा ठिकाणी गाळण्याच्या क्रियेची क्षमता अजमावण्यासाठी ही तंत्रे वापरली जातात.
संदर्भ : 1. Donbrow, M. Instrumental Methods of Analytical Chemistry, Vol. II. London, 1967.
2. Hamiliton, L. F. Simpson, S. G. Quantitative Chemical Analysis, Vol. II, New York, 1952.
3. Thomas, L. C. Chamberlin, C. J. Colorimetric Chemical Analytical Mehthods, 1980.
4. Willard, H. H. Merritt, L. L. Jr. Dean, J. A. Instrumental Methods of Analysis, New York, 1958,
पानसरे, व. स.
“