मार्शल, जॉर्ज कॅटलेट: (३१ डिसेंबर १८८०–१६ ऑक्टोबर १९५९). अमेरिकेचा एक निष्णात सेनानी, मुत्सद्दी व जागतिक शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी.

त्याचा जन्म युनिअन टाउन (पेनसिल्व्हेनिया) येथे खाण मालकाच्या अत्यंत श्रीमंत कुटुंबात झाला. तो व्हर्जिनिया मिलिटरी इन्स्टिट्यूटमधून पदवीधर झाला (१९०१). प्रारंभी काही दिवस फिलिपीन्स व पश्चिम अमेरिकेत लष्करात नोकरी केल्यानंतर युनायटेड स्टेट्‍स एनफन्ट्री कॅव्हल्‌री स्कूल (१९०७) आणि आर्मी स्टाफ कॉलेज (१९०८) येथून त्याने विशेष पदवी संपादन केली व आर्मी स्टाफ कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्याने अमेरिकेत व फिलिपीन्समध्ये विविध लष्करी पदांवर १९१३–१९१६ दरम्यान काम केले. काही दिवस जनरल हंटर लिगेटचा स्वीय साहाय्यक म्हणूनही त्याने काम केले. त्याच्या लष्करातील कार्यक्षमतेचे मे. ज. फ्रँक्लिनने कौतुक केले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी त्याची नियुक्ती मित्र राष्ट्रांना सहकार्य करण्यासाठी अमेरिकी पहिल्या डिव्हिजनचा प्रमुख म्हणून फ्रान्समध्ये झाली (१९१७). सँ मीयेल आणि म्यूज-ऑर्‌गॉन येथील लष्करी चढाईतील विशेष कामगिरीबद्दल त्याला पदोन्नती देण्यात आली. पुढे १९१९–२४ दरम्यान तो जनरल जॉन जे. पर्शिंगचा स्वीय साहाय्यक होता. त्या काळात १९२९ चा राष्ट्रीय सुरक्षा कायदा संमत करून घेण्यात त्याने मदत केली. या काळात (१९२७–३३) फोर्ट बेनिंग येथील लष्करी विद्यालयात त्याने भू-युद्धाबद्दलची नवीन प्रणाली प्रसृत केली. यामुळे पुढे त्याची सहायक प्रमुख म्हणून नियुक्ती झाली (१९३८). दुसऱ्या महायुद्धात त्याच्याकडे सेना प्रमुखपद देण्यात येऊन जनरलच्या पदावर नियुक्ती झाली (१९३९). यूरोपमध्ये सुरू झालेल्या या युद्धात अमेरिका ओढली जाणारच या अंदाजाने मार्शलने सक्तीची लष्करभरती सुरू केली. त्याच्या प्रेरणेने तिन्ही दलांत सुसूत्रता असावी म्हणून एक समिती स्थापण्यात आली आणि १९४१ मध्ये अमेरिका युद्धात सहभागी होण्यापूर्वी मित्र राष्ट्रांना कशी मदत करता येईल, याची एक योजना आखली. पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर (७ डिसेंबर १९४१) त्याची मित्र राष्ट्रांच्या भूसेनेच्या एका तुकडीचा प्रमुख म्हणून नेमणूक झाली. युद्धसमाप्तीपर्यंत त्याने भूसेनेत दोन लाखांवरून ऐंशी लाखापर्यंत वाढ केली. दुसऱ्या महायुद्धानंतर लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडे राजकीय वर्तुळातील अनेक महत्त्वाची पदे व मध्यस्थीचे कार्य सोपविण्यात आले. सैनिक म्हणून त्याने नेतृत्वाचे विलक्षण गुण दाखविले. यांशिवाय त्याच्याकडे अविचल निष्ठा, निःपक्षपाती वृत्ती आणि मानवाने मानवाकडे कसे पहावे याचा मानवी दृष्टीकोन होता. त्याचा पिंड लष्करी शिपायाचा असला, तरी युद्ध अटळ असल्यास ते व्हावे, अन्यथा शांततेचे सहजीवन असावे, असे त्यास मनोमन वाटे. लष्कर आणि नागरी भाग यांच्या सीमा कुठे आणि केव्हा सुरू होतात व संपतात, याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्यामुळेच लष्करी सेवेतून मुक्त झाल्यानंतरही हॅरी ट्रूमन या राष्ट्राध्यक्षाने त्याला परराष्ट्र मंत्रिपद देऊन त्याच्या सम्यक ज्ञानाचा उपयोग युद्धोत्तर परिस्थिती हाताळण्यासाठी व शांततामय सहजीवन व सामंजस्य स्थापन करण्यासाठी केला. चीनमध्ये राष्ट्रवादी चीन (तैवान) व साम्यवादी (लाल) चीन यांतील संघर्ष मिटविण्यासाठी त्याला पाठविले. त्याला युद्धबंदी करण्यात यश आले पण त्यांच्यातील संघर्ष कमी करता आला नाही. १९४७ मध्ये ट्रूमनने त्याच्या सल्ल्यानुसार युद्धोत्तर शांततेसाठी मदत करण्यासाठी ट्रूमन तत्त्वप्रणाली मांडली. यात यूरोपातील युद्धात पोळलेल्या जनतेचा सर्वांगीण विकास-विशेषतः आर्थिक विकास व शांततामय सहजीवन-यांचा अंतर्भाव होता. मार्शलने या योजनेच्या आराखड्यासंबंधी ५ जून १९४७ रोजी हार्व्हर्ड विद्यापीठात एक भाषण दिले. त्या योजनेनुसार रशिया आणि त्यांची अंकित राष्ट्रे वगळता अमेरिका पश्चिम यूरोपमधील देशांना सर्वतोपरी आर्थिक साह्य देण्यास सज्ज असल्याचे घोषित करण्यात आले. या योजनेला ⇨ मार्शल योजना ही संज्ञा रूढ झाली. पुढे संरक्षणाचे आणि शांततेसंबंधीचे करार झाले. प्रकृती अस्वास्थ्यानिमित्त त्याने परराष्ट्र मंत्रिपदाचा राजीनामा दिला (१९४९). त्यानंतर तो काही वर्षे रेडक्रॉस या संस्थेचा अध्यक्ष होता. कोरियन युद्धाच्या वेळी (१९५०–५१) त्याने संरक्षण सचिव म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धात यूरोपीय राष्ट्रे आर्थिक दृष्ट्या अत्यंत कमकुवत झाली होती. त्याना आर्थिक साहाय्य देऊन तेथील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी त्याने एक विधायक व भरीव योजना आखली. त्यामुळे शांततामय मार्गानी मानवी कल्याण साधेल, अशी त्याची धारणा होती. पुढे मार्शल प्लॅनच्या योजनेबद्दल त्यास शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (१९५३). ग्रीस व तुर्कस्तान येथील कम्युनिस्ट उठाव मोडण्याकरिता तेथील प्रस्थापित शासनांना अमेरिकेने सहकार्य द्यावे, असा सल्ला त्याने राष्ट्राध्यक्षास दिला, त्यातून शीतयुद्धाचा पाया घातला गेला, अशी त्याच्यावर पुढे टीका झाली. वॉशिंग्टन येथे तो मरण पावला. मार्शलने लष्कर व नागरी शासनातील अनेक महत्त्वाची पदे भूषविली तथापि त्याचे खाजगी जीवन फारसे सुखावह नव्हते. त्याने पहिला विवाह एलिझाबेथ कार्टर कोल्स या युवतीबरोबर केला (१९०२). तिच्या मृत्यूनंतर (१९२७) त्याने कॅथरिन सुपर ब्राउन या महिलेबरोबर दुसरा विवाह केला (१९३०). या दोन्ही पत्न्यांपासून त्याला संतती नव्हती.

संदर्भ : 1. Ferrell, H. Robert, Ed. The American Secretaries of State and Their Diplomacy, Vol.15, New York, 1966.

           2. Luard, Evan, The Cold War, A Reappraisal, London, 1964.

शेख, रुक्साना