मार्लो क्रिस्टोफर : (१५६४–३० मे १५९३). श्रेष्ठ इंग्रज नाटककार. कॅटनबरी, केंट येथे जन्मला. त्याचे वडील जॉन मार्लो हे पेशाने चर्मकार होते. त्याचे अगदी आरंभीचे शिक्षण कोठे झाले, ह्याविषयीची माहिती उपलब्ध नाही. तथापि १४ जानेवारी १५७९ रोजी त्याने कटरबरी येथील ‘किंग्ज स्कूल’ मध्ये प्रवेश घेतल्याचे दिसते. त्यानंतर वर्षभराने केंब्रिजच्या कॉर्पस क्रिस्ती कॉलेजात तो शिकू लागला. १५८४ मध्ये तो बी. ए. व १५८७ मध्ये एम्. ए. झाला. पहिल्या एलिझाबेथच्या गुप्त सरकारी सेवेत तो होता, असे दिसते. नास्तिक असल्याच्या आरोपावरून त्याला अटक होण्याची शक्यता असतानाच, डेप्टफर्ड, लंडन येथील एका मद्यपानगृहात झालेल्या मारामारीत तो ठार झाला.
शेक्सपिअरचा उदय होण्यापूर्वी नाट्यलेखन करणाऱ्या आणि ‘युनिव्हर्सिटी विट्स’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिजातविद्याविभूषित अशा तरूण नाटककारांपैकी मार्लो हा एक होता.
टँबरलेन (प्रकाशित १५९०), एडवर्ड द सेकंड (प्रकाशित १५९४), मॅसॅकर ऑफ पॅरिस (प्रकाशित बहुधा १६००), द ट्रॅजिक हिस्टरी ऑफ डॉक्टर फॉस्टस (प्रकाशित १६०४ ) आणि द ज्यू ऑफ माल्टा (प्रकाशित १६३३) ही मार्लोने पूर्णतः स्वतः लिहिलेली नाटके. द ट्रॅजिडी ऑफ डायडो (प्रकाशित १५९४) हे नाटक त्याने ‘युनिव्हर्सिटी विट्स’ ह्या समूहातील टॉमस नॅश ह्या नाटककाराच्या सहकार्याने लिहिले.
ग्रंथांतर्गत पुराव्यांवरून असे सुचविले जाते, की शेक्सपिअरकृत टायटस अँड्रॉनिकस ह्या नाट्यकृतीचा काही भाग त्याने लिहिला असावा. हेन्री द सिक्स्थ आणि एडवर्ड द थर्ड ह्या नाटकांचाही काही भाग त्याने लिहिला असावा.
‘हीरो अँड लीअँडर’ नावाचे एक उत्तान, शृंगारिक काव्यही त्याने लिहिले. एलिझाबेदन कालखंडातील ही एक उत्कृष्ट भावकविता.
मार्लो ज्या तरूण नाटककारांच्या समूहात होता, त्या नाटककारांच्या नाट्यकृतींत चिंतनशीलता, व्यक्तीरेखांचा सखोल वेध घेणे, काव्यात्म भावाविष्कार, भीषण घटनांचे चित्रण, इंद्रियगोचर सुखांची महती सांगणे ह्यांपैकी एकेका वा काही गुणांचा परिपोष झालेला दिसतो. तथापि मार्लोमध्ये हे सर्व गुण एकवटलेले दिसतात. प्रबोधनाच्या चळवळीमुळे मानवात स्वकर्तृत्वाबद्दल निर्माण झालेला आत्मविश्वास मानवी आकांक्षांच्या आड कोणीही येऊ नये ही तीव्र इच्छा दुर्दम्य, उद्दाम, आव्हानात्मक उत्साह हे सर्व मार्लोच्या नाटकांतून प्रत्ययास येते. ह्या वैशिष्ट्यांमुळे मार्लोची मनोवृत्ती आधुनिक काळाशी जुळते, हे दिसून येते. मात्र मानवी ज्ञान व कर्तृत्व दैवी अधिसत्तेवर मात करीत नाही उलट मानवाला भीषण विनाशाकडे नेते, असाच प्रत्यय मार्लोच्या नाट्यकृतींतून येतो.
मार्लोच्या नाट्यकृतींत, अमर्याद सामर्थ्य प्राप्त करून घेऊ पाहणारी माणसे आढळतात. उदा., टँबरलेन हा पाशवी हिंसक शक्तीने जग जिंकून दैवालाही आव्हान देतो तर डॉक्टर फॉस्टस हा सैतानाला वश करून, त्याच्याकडे आपला आत्मा गहाण ठेवून सर्व सुखांचा उपभोग घेतो. शेक्सपिअरवर मार्लेचा प्रभाव स्पष्ट दिसतो. आर्. एच्. केस ह्यांनी मार्लोच्या साहित्यकृती संपादिल्या आहेत (६ खंड, १९३०–३३).
संदर्भ : 1. Bakeless, J. The Tragicall History of Christopher Marlowe, 2 Vols. Cambridge, Mass. 1942.
2. Boes, F. S. Christopher Marlowe, London, 1940.
3. Ellis-Furmov, Christopher Marlowe: A Critical Study, 1927.
4. Kocher, P. H. Christopher Marlowe: A study of His Thought, Learning and Character, London, 1946.
5. Leech, C. Ed. Marlowe: A collection of Critical Essays, 1964.
6. Levin, H. The Overreacher: A Study of Christopher Marlowe, Cambridge, Mass. 1952.
7. Millar, Maclure, Marlowe, The Critical Heritage 1588-1896, London, 1979.
8. O’ Neill, J. Ed. Critics on Marlowe, 1969.
9. Poirier, M. Christopher Marlowe, London, 1951.
10. Smith, M. B. Marolwe’s Imagery and the Marlowe Canon, Philadelphia, 1940.
11. Steane, J. B. Marlowe: A Critical Study, 1964.
12. Wilson, F. P. Marlowe and Early Shakespeare, Oxford, 1953,
भागवत, अ. के.
“