मारवाडी (डिंगल) भाषा : इंडो-आर्यन (भारतीय आर्य) भाषा-उपकुलाची राजस्थान राज्यात बोलली जाणारी एक बोली. राजस्थानात बोलल्या जाणाऱ्या मारवाडी, जयपूरी (ढुंढारी), मेवाती, मालवी इ. बोलींचा ‘राजस्थानी’ या एकत्रित संज्ञेने उल्लेख होतो. ही प्रथा कर्नल टॉडने पाडली. आजही या राज्यातील भाषकांना (सु. दीड कोटी) आपली भाषा राजस्थान आहे असे म्हणण्यास आवडते.
राजस्थानीची प्रणाम बोली मारवाडी ही होय. जोधपूर केंद्र धरून पश्चिम राजस्थानातील मारवाड-मल्लानी, मेरवाढ, किशनगढ, सिरोही, पालनपूर, पारकर, जैसलमीर, बिकानेर या विस्तृत विभागात मारवाडी बोली वापरात असली, तरी मारवाड-मल्लानी प्रदेशातील मारवाड ही अधिक प्रमाण मानली जाते. १९७१ च्या जनगणनेनुसार मारवाडी मातृभाषा नोंदणारांची एकूण संख्या ६२,४२,४४९ एवढी होती राजस्थानमध्ये ५७,८१,८४६ महाराष्ट्रात २,३५,३३९ व मध्य प्रदेशात ७३,६३६ अशी त्यांची विभागणी होती.
वाङ्मयरचना : प्राचीन काळात मारवाड हा मरूदेश व तेथील भाषा ही मरुभाषा म्हणून ओळखली जाई. इ. स. ७८८ च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या उद्योतनसूरी याच्या कुवलयमाला या ग्रंथात उल्लेखिलेल्या अठरा भाषांत मरुभाषेचा समावेश आहे. ‘अप्पातुप्पा भणिरे अह पेच्छइ मारूए तत्तो’ असे मारवाडी भाषेचे वर्णन त्यात आलेले आहे. पिशेलच्या मताप्रमाणे गुजराती व मारवाडी या भाषा शौरसेनी प्राकृताच्या गुर्जरी अपभ्रंशाची उक्रांत रूपे होत. प्रारंभी एकरूप असलेल्या या भाषांचे स्वतंत्र वळण पंधराव्या शतकापासून दिसू लागले. ⇨ नरसी मेहताच्या (सोळावे शतक) भक्तिकाव्यात आद्य गुजरातीचे, तर ढोला मारू रा दूहा (सु.१४७४) या लोककाव्यात आद्य मारवाडीचे स्वतंत्र रूप पहावयास मिळते. [→ शौरसेनी भाषा].
मारवाडी भाषेतील प्राचीन साहित्य प्रामुख्याने चारण जातीच्या राजकवींनी लिहिले. हे आपल्या भाषेस ‘डिंगल’ (उच्चारण-डींगळ) म्हणवीत. ब्रज भाषेशी जवळीक असलेल्या उत्तर-पूर्वेकडील राजस्थानी बोलींचा निर्देश ‘पिंगल’ या नावाने होई. पिंगल भाषेतील प्रमुख साहित्यरचना भाट जातीच्या लोकांनी केली. डिंगल व पिंगल या भाषांतील शब्दांमध्ये व, श, ल, ण, क्ष इत्यादी ध्वनींच्या उच्चारणप्रक्रियेत काहीसा फरक आढळून येतो. उदा., डिंगल-दिवस, देश, भोली, प्राण, खण (क्षण) पिंगल-दिवस, देस, भोरी, प्रान, छण. डिंगलमधील म्हारो, थारो, इणां, उणां, थयो, हुओ ही शब्दरूपे पिंगलमध्ये मेरो, तेरो, इन उन, हुतौ, भयौ याप्रमाणे होतात.
डिंगल व पिंगल दोन्ही भाषांतून ख्यात, वात, विगत, पीढी, रासौ, प्रकास, विलास, रूपक, वचनिका, नीसाणी, झूलणा, वेल, झमाल, गीत, कवित्त, दूहा इ. प्रकारची साहित्यरचना झालेली आढळते. डिंगल हे पुराण आणि मध्य राजस्थानी यांचे दुसरे नाव आहे. पिंगल म्हणजे राजस्थानी कवींनी वापरलेली आणि त्यामुळे राजस्थानीचे संस्कार झालेली पुराणी ⇨ ब्रज भाषा. ब्रजला त्याकाळी साहित्याच्या दृष्टीने अधिक प्रतिष्ठा होती. ⇨ मीराबाईने दोन्हींचा उपयोग केलेला दिसतो [→ ब्रज साहित्य].
लिपी : मारवाडी भाषेतील ग्रंथलेखनासाठी हल्ली देवनागरी लिपीचा वापर होतो. (ळ साठई पुष्कळदा ल आणि ख साठी ष वापरतात). पत्रव्यवहार व जमाखर्च यांसाठी मोडी व गुजराती यांच्याशी साम्य असलेल्या महाजनी किंवा वाणियावटी नावाच्या शीघ्रलिपीचा उपयोग करतात. [→ नागरी लिपि मोडी लिपि].
ध्वनिव्यवस्था : ही मुख्यतः हिंदीप्रमाणे असली तरी तिच्यामध्ये ण, ळ यांसारखे मूर्धन्य ध्वनी आढळून येतात. उदा., माळी, चंचळ, जीवण, माण. ऐ आणि औ आ अक्षरांनी लिहिलेल्या वर्णांचा उच्चार ॲ आणि ऑ यांसारखा होतो. श आणि स हे स्वतंत्र वर्ण असले, तरी त्यांचे लेखन सर्रास स असेच करतात. या भाषेत ओष्ठ्य अर्धस्वर व दन्तौष्ठ्य घर्षक असे स्वतंत्र वर्ण असून त्यांतील भेद दर्शविण्यासाठी घर्षकाच्या अधोभागी बिंदू देतात. उदा., व-वंचियो ‘वांचला’, वात ‘वायू’ व-वंचियो ‘बच्चा’, वात ‘कहाणी’.
मारवाडी भाषेतील ध्वनिपरिवर्तन वैशिष्ट्यपूर्ण आहे. या भाषेत संस्कृत ‘य’ चा शब्दारंभी ‘ज’, अन्यत्र ‘य’ होतो. उदा., युद्ध > जुद्ध, योद्धा > जोधा, यात्रा > जात्रा, माया > माया, न्याय > न्याय. वर्णागमाची प्रवृत्तीही विपुल प्रमाणात आढळते. उदा., स्मृती > समृति, दुर्लभ > दुरलभ, कीर्ती > कीरत, रण > आरण, एक > हेक, एकठा > हेकठा. स > छ आणि व > म हे परिवर्तनही रूढ आहे. उदा., तुलसी > तुलछी, सभा > छभा, किवाड > किमाड, रावण > रामण.
व्याकरण : आशयानुसार नामांचे वर्गीकरण पुल्लिंगी व स्त्रीलिंगी अशा दोन गटांत करता येते. उदा., पुल्लिंगी-कागलो, खेत, तेली स्त्रीलिंगी-कोयल, घी, दुकान. नामांना विशिष्ट प्रत्यय लावून त्यांची अनेकवचनी रूपे सिद्ध होतात. उदा., खेत-खेतां, कवि-कवियां, घोडो-घोडां, रात-रातां, रोटी-रोट्यां, भासा-भासाबां, बहू-बहुबां, गौ-गौवां. विभक्तिप्रत्यय वा परसर्ग लागण्यापूर्वी नामांचे सामान्यरूप होते. जसे : घोडो-घोडा +सुं (ए. व.), घोडां + सु (अ. व). काही विभक्त्यन्त व परसर्गयुक्त रूपे पुढीलप्रमाणे : घोडै (घोड्याला), घोडाऊं (घोड्याला), घोडासुं (घोड्यापासून), घोडारो (घोड्याचा), घौडै (घोड्यात), कागळचौ (कागदाचा), गणपतकनै (गणपतकडे), घरमैं (घरात), बापनै (बापाला), नणतणै (नटाचा), मूठिमां (मुठीत) इत्यादी. विकारशील व अविकारी अशा दोन्ही प्रकारची विशेषणे आढळून येतात. सर्वनामे : हूं ~ म्हूं (मी), म्हे ~ मे (आम्ही), तूं ~ थूं (तू), थे ~ तमे (तुम्ही), वो (तो), वे (ते) यांप्रमाणे आहेत. सर्वनामांची षष्ठीची रूपे म्हारो, म्हांरो, थारो, थांरो, उणरो, उणांरो यांप्रमाणे होतात.
क्रियापदांची एकंदर व्यवस्था हिंदीप्रमाणेच असली, तरी रूपे स्वतंत्र आहेत. उदा., वर्तमानकाळ-है, मारै भूतकाळ-हो, माऱ्यो, कियो, लियो भविष्यकाळ-व्हेही, माऱ्ही धातुसाधिते : होवण (व्हायला), हुवो (झाला), हुवोडो (झालेला), मारण (मारायला) इत्यादी, काही अकरणरूपे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उदा., गातो रहणो म्हणजे ‘गात राहणे ’ नव्हे, तर ‘गायचे राहणे ’ म्हणजेच ‘न गाणे ’ होय.
शब्दसंग्रह : हा हिंदीपेक्षा गुजरातीस जवळचा आहे. काही मारवाडी शब्द : पग (पाय), मुंडो (तोंड), मंडर (पाठ), लो (लोखंड), मिनख (माणूस), लुगाई (स्त्री), जोडायन (बायको), टाबर (मूल), एवाळियो (धनगर), आड (बदक), जिम (खाणे), कनै (जवळ), लारै (मागे).
संदर्भ : 1.Grierson, G. A. Linguistic Survey of India, Vol. IX, Part II, Calcutta, 1909.
२. माहेश्वरी, हीरालाल, राजस्थानी भाषा और साहित्य, कलकत्ता, १९६०.
३. मेनारिया मोतीलाल, राजस्थानी भाषा और साहित्य, प्रयाग, १९५२.
कुलकर्णा, सु. वा.
“