मानाडो: इंडोनेशियातील उत्तर सूलावेसी प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या २,१७,२५९ (१९८०). हे सेलेबीझ बेटाच्या ईशान्य किनारी भागात गूनुंग क्लाबाट (२,०२२ मी.) या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. एरोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मानाडो हे एक खुले बंदर होते. आसमंतातील शेतमालाचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून यास विशेष महत्त्व असून येथून कॉफी, ऊस, एबनी, मसाल्याचे पदार्थ, खोबरे, लाकूड इत्यादींची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. स्थानिक हस्तोद्योगांपैकी बांबूकाम व वेतकाम, लाकडावरील कोरीव काम, बुरूडकाम हे उल्लेखनीय हस्तोद्योग आहेत.
शहरात चिनी लोकांचे आधिक्य असून ख्रिस्तधर्मीयही बरेच आहेत. मानाडो येथे विमानतळ असून आमूरांग, बोलांग, बूटंग व गॉराँतालो या शहरांशी ते रस्त्यांनी जोडलेले आहे. डचांनी १६५८ मध्ये बांधलेल्या किल्ल्याचे अवशेष व साम रातुलांगी विद्यापीठ (स्था. १९६१) या येथील उल्लेखनीय वास्तू होत.
गद्रे. वि. रा.