मानसचिकित्सा : (मनोदोषचिकित्सा किंवा मनोविकृतिशास्त्र−सायकीॲट्री−). ही आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक शाखा असून तिच्यात सर्व तऱ्हेच्यामानसिक विकारांच्या कारणांचा, विकृति−चिन्हांचा−लक्षणांचा, निदानाचा, उपचाराचा व प्रतिबंधाचा शास्त्रोक्त अभ्यास केला जातो. मानसचिकित्सेच्या पोटशाखा व संलग्न शास्त्रे पुढे दिल्याप्रमाणे आहेत : प्रौढ मानसचिकित्सा, बाल मानसचिकित्सा, मनोविकृतिशास्त्र, मनोविश्लेषण, मानस–शारीर वैद्यक (सायकोसोमॅटिक मेडिसीन), वैद्यक मानसशास्त्र, मनोमिती (सायकोमेट्री), सामाजिक मानसचिकित्सा, मनोविकार प्रतिबंधशास्त्र (प्रिव्हेंटिव्ह सायकीॲट्री) व मानसिक आरोग्य विज्ञान (मेंटल हायजीन). ह्या विषयांचे महत्त्व व्यापक असून सर्वसाधारण वैद्यकशास्त्र व सर्व मानववर्तनशास्त्रांशी मानसचिकित्सेचे संबंध जवळचे आहेत. उदा., सामान्य मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, अतींद्रिय मानसशास्त्र, शैक्षणिक मानसशास्त्र व औद्योगिक मानसशास्त्र. त्याशिवाय दंडविधानशास्त्र, राज्यशास्त्र, युद्धशास्त्र या शास्त्रांशीही मानसचिकित्सेचा संबंध येतो.
इतके असूनसुद्धा या विषयाबद्दल अज्ञान, गैरसमज व दूषित पूर्वग्रह समाजात प्रचलित आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हे शास्त्र त्यामानाने नवीन आहे तसेच प्राचीन कालापासून मनोविकृती ही एक बाहेरची बाधा आहे अशी समजूत प्रचलित आहे. काही तीव्र मनोविकारांतील विक्षिप्त वर्तणुकीमुळे सर्वसाधारण व अनभिज्ञ समाज ह्या विकारांबद्दल तिटकारा व भीती बाळगून आहे. मानसिक विकारांचे प्रमाण एकंदर विकारात बरेच जास्त आहे. तरीही शारीरिक लक्षणे प्रमुख असलेले विकार तसेच बऱ्याच असमाजी (डिस्सोशल) व समाजविरोधी वर्तनसमस्या मानसिक विकारात गणल्या जात नाहीत. काही प्रगत व अतिविकसित देशांतील सांख्यिकीय तपशिलाप्रमाणे दवाखान्यात व रुग्णालयात जाणाऱ्या सर्व रुग्णांत मानसिक रुग्णांचे प्रमाण जवळजवळ शेकडा ५०% आहे. भारतात त्यामानाने हे प्रमाण अल्प भासायचे कारण येथील सुशिक्षित समाजातसुद्धा प्रचलित असलेले अज्ञान व अनास्था.खात्रीशीर व्यापक पाहणीच्या अभावी लहान प्रमाणावर व खाजगी रीत्या केलेल्या पाहणीच्या अंदाजाप्रमाणे मानसिक विकारांचे प्रमाण नागरी व उपनागरी प्रदेशांत दर हजारी सोळा असे आहे. प्रत्यक्षात ते बरेच जास्त असावे. असले विकार लपविण्याकडेही भारतीय लोकांची परंपरागत प्रवृत्ती आहे. शिवाय ग्रामीण भागातील जवळजवळ ६० ते ७०% लोक (मानसचिकित्सकांच्या अनुभवसिद्ध अंदाजानुसार) देवधर्म, मंदिर–दर्गा, देवऋषी–फकीर, गंडेदोरे, अंगारे–धुपारे अशा प्रकारच्या पुरातन, अशास्त्रोक्त व अंधश्रद्धेवर आधारलेल्या उपायांवर अवलंबून राहतात.
नागरीकरण, औद्योगिकीकरण, बदलती संस्कृती आणि सामाजिक–आर्थिक अडचणींच्या वाढत्या प्रमाणामुळे मानसिक विकारांचे प्रमाण वाढत असावे, असा दाट अंदाज आहे. तरीपण मानसचिकित्सकाकडे येणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या प्रमाणाचे मुख्य कारण ह्या विषयाबद्दल वाढत असलेले लोकांचे ज्ञान व सामाजिक स्वीकृती हे होय.
कारणविज्ञान : मानसिक विकार प्रकट व्हायला अनेक कारकांचा व घटकांचा एकत्रित परिणाम जबाबदार ठरतो. कुठल्याही एका कारकामुळे लक्षणे उद्भवू शकत नाहीत. महत्त्वाचे कारक असे : (१) वय : विशिष्ट वयातील निरनिराळ्या क्षमतेमुळे व वयामुळे बदलत्या परिस्थितीमुळे व तिच्या प्रतिक्रियेमुळे मनोविकाराचे स्वरूप तसेच ते जडण्याची शक्यता बदलत राहते.
जीवशास्त्रीय गरजेनुसार बालमन अत्यंत संस्कारक्षम व अनुकरणशील असते. त्यामुळे कौटुंबिक वातावरणाचा व्यक्तिमत्त्वविकासावर बराच पगडा असतो. पालक–पाल्य–नात्यात गंभीर बिघाड झाल्यासही व्यक्तिमत्त्वविकासावर अनिष्ट परिणाम होतो. त्यातून पुढे व्यक्तिमत्त्वविकार किंवा मोठेपणी मज्जाविकृती अथवा चित्तविकृतीसारखे विकार उद्भवू शकतात मात्र तात्कालिक प्रतिक्रिया मुलांच्या वर्तनसमस्येच्या रूपाने दिसून येते.
पौगंडावस्था हा काल सर्वांत तणावकारक ठरायचे कारण त्या वयात बालवयातील पालकांचे संरक्षण संपून घराबाहेरील समस्याप्रधान सामाजिक वातावरणाला एकट्याने तोंड द्यायची व्यक्तीवर पाळी येते. शिवाय लैंगिक वाढ व भिन्न लिंगीय आकर्षण तसेच उच्च शिक्षणाची जबाबदारी व कष्ट ह्या बाबीही तणावकारक ठरतात. त्यामुळे बऱ्याच मनोविकारांची सुरुवात या वयात होते.
वार्धक्यात व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक क्षमता तसेच सामाजिक महत्त्व क्षीण होते. शिवाय बदलत्या संस्कृतीमुळे वृद्धांकडे दुर्लक्ष होते. ह्यामुळे तसेच आधुनिक काळात आयुर्मर्यादा वाढल्यामुळे जराजन्य मस्तिष्क विकार जास्त प्रचलित झालेले आहेत.
(२) लिंग : लिंगभेदाचे महत्त्व मनोविकारांचा समय आणि अंशतः स्वरूप ठरविण्यापुरते मर्यादित असते. मानवी संस्कृतीप्रमाणे स्त्री–पुरुषांच्या भूमिका व जबाबदाऱ्यास निराळ्या असतात. शिवाय जीवनातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर त्या बदलतही राहतात. त्यानुसार स्त्री–पुरुषांच्या मनावर विभिन्न परिणाम होतात. उदा., स्त्रियांना यौवनावस्थेत (रजःस्रावामुळे), लग्नाच्या वेळी, गरोदरपणी, बाळंतपणात व शेवटी ऋतुनिवृत्तीच्या समयी विशिष्ट क्लेश होतात व त्यामुळे मनोविकार जडू शकतात. याउलट पुरुषांना बाहेरच्या जगाशी तोंड द्यावे लागत असल्याने बाहेरील संकटे, तंटे, कामाचा व व्यवहारातला ताण, आर्थिक जबाबदारी आणि या सर्वांमुळे उद्भवणारी चिंता व निराशा यांना तोंड द्यावे लागते. शिवाय घराबाहेरील विविध मोह, व्यसने व त्यांतून जडणाऱ्या व्याधी व विकार यांचा संभव पुरुषांपुरताच मर्यादित असतो.
(३) आनुवंशिकता : ह्या विषयाबद्दलचे निष्कर्ष अजून नक्की नसून त्याबाबत संशोधन चालू आहे. आनुवंशिकतेच्या नियमाप्रमाणे काही मनोविकार जडण्याची वृत्ती जनुकदोषातर्फे भावी पिढ्यांतही संक्रांत होण्याची शक्यता असते. बहुतेक दोष अनेकजनुकदोषी (पॉलीजेनिक) असतात. एफ्. जे. कालमन यांच्या अभ्यासाप्रमाणे (१९३८ व १९४४) ⇨ उद्दीपन–अवसाद चित्तविकृतीजडलेल्यांच्या भावंडांत २० ते २५ % आणि ⇨छिन्नमानसी रुग्णांच्या भावंडांत ५ ते १२% ह्या प्रमाणात हा रोग आढळून आलेला आहे.
(४) मनोप्रकृती : मनोविकारांचा प्रकार मूळ व्यक्तिमत्त्वाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. उदा., अंतर्मुखी व्यक्तिमत्त्वाच्या माणसांना मानसिक विकार जडलाच, तर त्याचे स्वरूप छिन्नमानसी असायचा दाट संभव असतो. बहिर्मुखी व्यक्तिमत्त्वाच्या माणसांना बहुधा भाववृत्तीय चित्तविकृती जडण्याचा संभव असतो.
(५) शारीरिक व इतर भौतिक कारक : मन हे मध्यवर्ती तंत्रिका तंत्रातील प्रमस्तिष्क गोलार्धाचे (सेरेब्रल हेमिस्फिअर) कार्यिक रूप आहे. मध्यवर्ती तंत्रिका तंत्राचे कार्य आणि इतर शरीरक्रियाविज्ञानीय संस्थांची कार्ये परस्परावलंबी असल्याकारणाने शारीरिक घटना व शारीरिक विकार यांचा मानसिक यंत्रणेवर परिणाम होणे अटळ असते. किंबहुना मन व शरीर ही एकच यंत्रणेची दोन अंगे आहेत. त्यामुळे बहुतेक तीव्र शारीरिक विकारांचा मनावर अनिष्ट परिणाम होऊन त्यातून मानसिक विकारांची लक्षणे उमटतात. उदा., अंतस्रावी ग्रंथीविकार, रक्तक्षयाचे तीव्र प्रकार, तीव्र स्वरूपाचे व दीर्घकालीन हृदयविकार, मधुमेह व मूत्रपिंड विकार, क्षयरोग, विषमज्वर, फ्ल्यू, इतर जीवाणूंचे संक्रामण आणि याशिवाय इतर प्रकारच्या विषबाधांचाही अनिष्ट परिणाम होतो. उदा., मादक पदार्थ – मद्य, गांजा, भांग, अफू काही शामक व शांतक गोळ्या तसेच वेदनाशामक इंजेक्शने (मार्फीन व पेथिडीन) आणि ‘अँफिटामिन’सारख्या उत्तेजक गोळ्या. काही वैद्यकीय उपचारंमुळेही मानसिक उपद्रव होऊ शकतो. उदा., ‘कॉर्टिसोन’, ‘रेसर्पिन’ तसेच शांतक आणि अवसादविरोधी गोळ्यांचा अतिरेक. औद्योगिक क्षेत्रातील रसायनांच्या विषबाधेमुळेही मानसिक विकार जडू शकतो. शारीरिक विकारांपैकी सर्वांत जास्त मानसिक परिणाम मस्तिष्क विकारांमुळे होत असतो. तो इतका प्रचलित आहे, की मानसिक लक्षणे असलेल्या सर्व मस्तिष्क विकारांची गणना मानसचिकित्सीय वर्गीकरणातील ऐंद्रिय विकारांच्या वर्गात केलेली आहे त्यांचे वर्णन इतरत्र दिलेले आहे.
(६) सामाजिक कारक : मानवी जीवन हे सामाजिक जीवनाचे एक मूलभूत अंग बनले आहे. बऱ्याच वेळा सामाजिक जीवनाच्या सुरक्षिततेसाठी वैयक्तिक सुखाचा व आशाआकांक्षेचा बळी द्यावा लागतो. त्यामुळे सामाजिक जीवन तणावमयच ठरते. ज्यांचे व्यक्तिमत्त्व कच्चे व विकारप्रवण असते त्यांना मानसिक विकार व्हायला सामाजिक जीवनातील खालील प्रसंग, घटना व अनुभव कारणीभूत ठरतात :
कौटुंबिक जीवन : वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच मुलाचा अहम् आपल्या पालकांची मर्जी सांभाळण्यासाठी स्वतःच्या आवडी व इतर स्वार्थी गरजांची काटछाट करायला शिकतो. वय वाढते तसे त्याला इतर कुटुंबियांशीही बऱ्याच वेळा मर्जीविरुद्ध जुळवून घेणे भाग पडते. त्यामुळे ⇨अबोध मनात असंतोष व ⇨वैफल्य भावना बळावते. परंतु मोठ्यांच्या भीतीमुळे असंतोषाला तेव्हा वाचा फुटत नाही आणि तो प्रौढावस्थेपर्यंत अबोध मनात धुमसतच राहतो तसेच व्यक्तिमत्त्वविकासावर नकळत आपले अनिष्ट वर्चस्व गाजवतो. कौटुंबिक वातावरण दूषित असल्यासही त्या कुटुंबातल्या विशेषतः मुलांच्या तसेच इतर प्रत्येक व्यक्तीच्या मनावर ताण पडतो.
सामाजिक संबंध : खेळगडी व शाळेतील इतर समवयस्क मुलांशी असलेल्या संबंधातून उद्भवणारे ताण, संघर्ष व तेढ तसेच न पेलणाऱ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या, स्पर्धा व चढाओढी आणि पुढे तरुणपणी व्यवसायात किंवा भवितव्य ठरविण्यात आलेल्या अडचणी व निराशा या सर्वांचा व्यक्तिमत्त्वविकासावर परिणाम होऊन कदाचित ताण असह्य झाल्यास मानसिक विकाराला तरुण वयातच सुरुवात होते.
आधुनिक काळात लैंगिक संबंधांना असाधारण महत्त्व व स्वैरता प्राप्त झाल्यामुळे तरुणांत तसेच मध्यमवयीन व्यक्तींमध्ये विवाहपूर्व, वैवाहिक आणि बऱ्याच वेळा विवाहबाह्य संबंधांतून समस्या, तणाव, हेवेदावे व घोर निराशा निर्माण होते आणि त्यामुळे मानसिक विकृतीची लक्षणे निर्माण होऊ शकतात.
आधुनिक जीवन अत्यंत कृत्रिम, अश्रद्ध, भोगी, गतिमान, चढाओढीचे, तेढीचे व असुरक्षित झाल्यामुळे सामाजिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक बदल व विषमता मानसिक विकाराला उत्तेजन देतात. हे चित्र विशेषतः नागरी व औद्योगिक जीवनात जास्त दिसून येते कारण शहरातल्या सतत वाढत्या गर्दीमुळे व महागाईमुळे योग्य मोबदला, निवारा, पोषक वातावरण व इतर गरजा भागवल्या जाणे दुरापास्त होते.
(७) मानसिक कारक : यांचे दोन ढोबळ व मूलभूत वर्ग आहेत : (अ) बोधपूर्वक व (आ) अबोध.
(अ) बोधपूर्वक कारक : (१) मनोघात (शॉक) : मनाला न पटणारी अथवा हितसंबंधांना बाधा आणणाऱ्याघटनेमुळे जो अचानक भावनिक क्षोभ होतो, तो काही वेळा मनोविघटन करू शकतो. (२) वैफल्य : बराच काळ जतन करून ठेवलेली मनीषा वा आकांक्षा व ती पूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न असफल होऊन आपल्यावर अन्याय झाल्याची जी भावना होते, ती पण मानसिक विकार ओढवू शकते. (३) मनोविग्रह : आपले हित आणि कर्तव्य, स्वार्थ आणि परमार्थ किंवा दोन तितक्याच औचित्याचे मार्ग यांमध्ये मन द्विधा होणे हेदेखील मानसिक स्थैर्याला हानिकारक आहे.
(आ) अबोध कारक : काही महत्त्वाचे अबोध कारक पुढे दिल्याप्रमाणे आहेत : (१) अबोध मनात दडून राहिलेल्या अर्भकावस्थेतल्या अथवा बाल्यावस्थेतल्या असह्य आठवणी, चिंता किंवा अभिलाषा संधी मिळताच उफाळून येऊन बोध मनात किंवा वर्तनात विकारी बदल घडवून आणू शकतात. (२) गंड : विवेकाला अमान्य असलेल्या त्याज्य कल्पना एका समान भावनेने बांधलेल्या असल्यास व अबोध मनात दडून बोध विचारावर व आचारावर नकळत नियंत्रण ठेवत असल्यास त्यांना गंड म्हणतात. उदा., न्यूनगंड ज्याच्यामुळे स्वतःला बाधणारी बाहेरील कुठलीही सामाजिक घटना अहमला हानिकारक आहे असे गृहीत धरून आक्रमक वृत्ती आत्मसात केली जाते. गंड तीव्र झाल्यास विकाराला उत्तेजक ठरतो. (३) आंतरिक द्वंद्व : मनोविश्लेषण सिद्धांताप्रमाणे बाहेरील एकाच व्यक्ती वा वस्तूकडे (ऑब्जेक्ट) एकाच वेळी दुहेरी वा परस्परविरोधी भावना व वृत्ती दाखविली जाते. त्यामुळे बाह्यवर्तन अशाश्वत व विरोधीभासी होते. उदा., द्विधाभावप्रवणता (ॲम्बिव्हॅलन्स). (४) संरक्षण यंत्रणा : फ्रॉइड यांच्या मनोविश्लेषण सिद्धांताप्रमाणे ⇨ अहम् आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी व विकारी चिंतेपासून संरक्षणासाठी जे समायोजनकारी डावपेच मांडतो त्याला संरक्षण यंत्रणा म्हणतात. परंतु ह्याचा काही वेळा अतिरेक होऊन त्यांचे विकारलक्षणांत रूपांतर होते. हे डावपेच एकतर ⇨ पराहम्ला अमान्य अशा ⇨ इदम्च्या आवेगाचे रूप पालटून पराहम् ची मान्यता मिळवून देतात किंवा आत्मप्रतारणेने इदम्च्या अभिलाषा तृप्त झाल्याचा आभास निर्माण करतात. एकूण आंतरिक द्वंद्व व अस्थैर्य टाळून अहम् (पर्यायाने व्यक्तिमत्त्व) अबाधित ठेवण्याचा हा एक अविरत प्रयत्न असतो परंतु तो अबोध पातळीवरच राहतो. यातील काही प्रमुख यंत्रणा अशा :
भावविस्थापन (डिस्प्लेसमेंट) : भयगंड वा भावातिरेकी विचारांत मूळ ‘वस्तू’ बद्दल (व्यक्तीची) अव्यक्त गैरभावना, उदा., स्वतःच्याच घाणेरड्या इच्छांची भीती एखाद्या क्षुल्लक ‘वस्तू’ वर (भयगंडीय) लादून व्यक्त केली जाते.
प्रक्षेपण : पीडनमूढश्रद्धेत (डिलुजन्स ऑफ पर्सेक्यूशन) अथवा निर्वस्तुभ्रमात (हॅलूसिनेशन) आंतरिक गैरभावना अथवा वृत्तीचा उगम बाहेरील व्यक्तीपासून आहे असे भासविले जाते. उदा., स्वतःच्या आक्रमक वृत्तीची जबाबदारी दुसऱ्यावर लादून त्याच्यावरच आरोप केले जातात.
परागती (रिग्रेशन) : व्यक्तिविकासाच्या प्राथमिक अवस्थेतील (बाल्यावस्थेतील) वर्तनाची पुनरावृत्ती काही मनोविकारांत दिसून येते. उदा., कठीण जबाबदारी टाळण्यासाठी उन्मादातील बालिश बोलणे अथवा चालणे.
कल्पनाजाल (फॅन्टसी) : वास्तवतेत अशक्य अशा दिवास्वप्नीय आकांक्षांची कल्पनेत अनुभूती घेणे काही विकारांत दिसून येते. उदा., छिन्नमानस.
बोधविच्छेदन (डिसोसिएशन) : विवेकाला अमान्य अशा अभिलाषा तृप्त करण्यासाठी उन्मादी मज्जाविकृतीत बोध मनाचे विच्छेदन करून एक तात्पुरते स्वतंत्र, पण खंडित ‘व्यक्तिमत्त्व’ निर्माण केले जाते. ह्या विच्छेदित मनाने केलेल्या कारवायांची कल्पना वा स्मरण मूळ मनाला नसल्यामुळे अहम् त्याची जबाबदारी नाकारतो.
परिवर्तन : दुसऱ्या उन्मादीय प्रकारात असह्य अशा मनोविग्रहाचे रूपांतर अहम्ला सुसह्य व लाभदायक (जबाबदारी टाळल्यामुळे) अशा दुखण्यात केले जाते. उदा., लेखक−हस्तकाठिण्य (रायटर्स क्रँप).
वरील संरक्षण यंत्रणेचा सिद्धांत बहुतेक मानसचिकित्सा प्रणालींना मान्य आहे.
लक्षणविज्ञान : मानसिक विकारांच्या सर्वसाधारण लक्षणांचे वर्गीकरण निरनिराळ्या मानसिक यंत्रणेप्रमाणे केलेले आहे.
(१) जाणिवेची लक्षणे : बाहेरच्या वातावरणाशी ज्ञानेंद्रियांतर्फे प्रतिबोधन व स्मृती यांच्या साहाय्याने सतत ठेवलेला संपर्क म्हणजेच जाणीव. प्रमस्तिष्क गोलार्धाच्या कार्यिक अंगाच्या एकत्रित प्रकटनाला ‘शुद्धी’ असे संबोधतात. ‘शुद्धी’ असल्याशिवाय जाणीव राहूच शकत नाही. जाणिवेच्या मदतीने वास्तवतेशी संपर्क ठेवला जातो. जाणिवेच्या कक्षेत अवधान व एकाग्रता, दिशाबोधक्षमता, निद्रा ही कार्ये समाविष्ट आहेत.
संकलित जाणिवेत बदल करणारी कारणे : शुद्धीवर परिणाम झाल्यास जाणिवेची कार्यक्षमता कमी होते. आकुलता (कन्फ्यूजन) हे लक्षण शुद्धीवर हलक्या प्रतीचा परिणाम झाला तर किंवा भावनिक क्षोभ झाल्यास तसेच विचारांच्या गर्दीमुळेही होऊ शकते. त्यामुळे वातावरणाशी बिनचूक संपर्क ठेवणे कठीण होते व व्यक्ती गोंधळून जाते. याहीपेक्षा तीव्र लक्षण म्हणजे तंद्रावस्था (स्टुपर). यात व्यक्तीचा वातावरणाशी संपर्क केवळ निमित्तमात्र असतो आणि धोक्याचीसुद्धा जाणीव रहात नाही. हे लक्षण ऐंद्रिय तसेच तीव्र प्रकारच्या कार्यिक चित्तविकृतींत सापडते. उदा., गलितगात्री छिन्नमानस.
अवधानाच्या बिघाडाचे एक प्रमुख लक्षण म्हणजे व्यग्रतावस्था (डिस्ट्रॅक्टेबिलिटी). यामुळे चित्त एकाग्र होणे अत्यंत कठीण होते.ऐंद्रिय विकाराचे हे प्राथमिक लक्षण असून तीव्र विकारात अवधान दोलायमान (फ्लक्चुएटिंग) राहते. पुढे जाणिवेचीही हीच अवस्था होते. तीव्र चिंतेमुळेही अवधान क्षीण होते. दिशाबोधनक्षमता व्यक्तीला वेळ, स्थळ व व्यक्तिओळख याची स्पष्ट कल्पना देते. ऐंद्रिय विकारात तसेच तीव्र प्रकारच्या चित्तविकृतींत ही क्षमता बरीच क्षीण होते.
निद्रानाश हे सर्वांत प्रचलित असे लक्षण असून जवळजवळ सर्व मानसिक विकारांत ते सापडते. भाववृत्तीय चित्तविकृतीत लवकर जाग येते तर मज्जाविकृतीत उशिरा झोप येते. तीव्रउद्दीपन व छिन्नमानसी चित्तविकृतींत निद्रानाश रात्रभर होऊ शकतो. काही ऐंद्रिय विकारांत निद्राकाळात व्युत्क्रम होतो म्हणजे दिवसा झोप व रात्री निद्रानाश.
(२) भावनिक लक्षणे : भावनिक यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार : भावनेची विसंगती व अयोग्यता तसेच भावनेचे दारिद्र्य किंवा पूर्ण अभाव (ॲपथी) हे छिन्नमानसी चित्तविकृतीचे विशिष्ट विकृतिसूचक (पॅथोग्नोमॉनिक) लक्षण आहे.
भावनेचा अतिरेक व वर्चस्व हे भाववृत्तीय विकारांचे मुख्य लक्षण होय. उदा., उद्दीपन विकृतीत मदांधता (इलेशन) म्हणजे हर्ष, गर्व व फाजील आत्मविश्वास हे मुख्य लक्षण आणि अवसाद चित्तविकृतीत त्याउलट खिन्नता आणि खजीलपणा.
भावनांची सहजता व परिवर्त्यता (लॅबिलिटी) : ऐंद्रिय विकारांतील बुद्धिभ्रंश हे ह्या विकारांचे सूचक लक्षण आहे. ह्याच विकारसमूहाचे लक्षण ‘सुखभ्रम’ (यूफोरिया). यात शारीरिक क्लेश असतानासुद्धा रुग्ण खुशीत दिसतो.
काही विशिष्ट भावना : विशिष्ट विकृती सूचक असतात. उदा., भयगंडातील अवास्तव भीती निवर्तनी अवसादातील (इन्व्होलूशनल डिप्रेशन) क्षोभण (ॲजिटेशन) अवसादी चित्तविकृतीत आणि निर्व्यक्तीकरण (डीपर्सनलायझेशन) मज्जाविकृतीत भावना मेल्याची खंत तसेच भोवतालचे वातावरणच बदलल्याची भावना (डीरियलायझेशन).
(३) विचारयंत्रणेची लक्षणे : रूपान्त (फॉर्म) विकृती : अवास्तवीकरणामुळे (डीरीइझम) विचारांचा आणि अनुभवाचा तसेच तर्कशुद्धतेचा संपर्क तुटतो. इच्छावर्ती विचारक्रियेत स्वेच्छेप्रमाणे निष्कर्ष काढले जातात. दोन्ही लक्षणे छिन्नमानसाची विकृतीसूचक लक्षणे आहेत.
प्रवाहात बदल : विचारप्रवाह अत्यंत जलद झाल्यास त्याला कल्पनोड्डाण (फ्लाइट ऑफ आयजियाज) म्हणतात. याउलट प्रवाह अत्यंत मंदावल्यास विचारजडत्व निर्माण होते. ही लक्षणे अनुक्रमे उद्दीपन व अवसाद ह्या चित्तविकृतींत आढळतात. छिन्नमानसी विचारप्रक्रियेत प्रवाह विसंगत असून विचार अचानक गर्दीने प्रकट होताना त्यांना खील बसते(ब्लॉकिंग) आणि रुग्ण अचानक अवाक् होतो.
आशय : विचारांच्या आशयावरून विकारांचे निदान करणे सुलभ जाते. आशयातला सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे संभ्रम अथवा मूढश्रद्धा. यामुळे अनुभवाचा मेळ नसताना गैर पणदृढ कल्पना बाळगल्या जातात. उदा., पीडनसंभ्रम–आपल्याविरुद्ध कारवाई चालली आहे अशी कल्पना. वैभवी वा आत्मगौरवी संभ्रमात (आयडियाज ऑफ ग्रँजर) स्वतःची ताकद, संपत्ती व हुद्दा असामान्य आहे असे गृहीत धरले जाते. परस्वाधीनता संभ्रमात (आयडियाज ऑफ इन्फ्ल्यूअन्स) आपल्या मनाचा ताबा आपल्या काल्पनिक हितशत्रूंशी मिळवला असून आपल्यावर कुटिल प्रयोग चालू आहेत अशी निराधार कल्पना असते. असे संभ्रम छिन्नमानस चित्तविकृतीत सर्रास आढळतात. भावातिरेकी विचार मनात अविरत थैमान घालतात आणि अप्रिय असूनसुद्धा जाणिवेतून काढून टाकता येत नाहीत.
रचनेत बिघाड : हे छिन्नमानसविकाराचे वैशिष्ट्य आहे. विचारांची असंबद्धता, विसंगती, चिकाटी, गिचमीड तसेच भारूड व नवशब्द असे बिघाड यात प्रचलित आहेत. साहचर्य विकृती, छिन्नमानस तसेच काही ऐंद्रिय विकारांतील वाचाविकारांत ते दिसून येतात. यमकप्रधान साहचर्यात (क्लँग असोसिएशन) तर्कशुद्धतेऐवजी उच्चारसाम्यतेवरून विचार मांडले जातात. साहचर्य विरलतेमुळे (लूझनिंग ऑफ असोसिएशन) भाषणाला आकृतिबंध राहत नसून अनपेक्षित विषयांतर होते.
(४) वर्तनयंत्रणेची लक्षणे : अतिरेगी बदल : मनोप्रेरक उत्तेजन (सायकोमोटर एक्साइटमेंट) ह्या उद्दीपन चित्तविकृतीच्या लक्षणांत व्यक्तीच्या वर्तनात अखंडता, विविधता, गतिमानता आणि उपक्रमशीलता दिसून येते. त्यामुळे रुग्ण स्वस्थ बसूच शकत नाही. काही बालवर्तनसमस्यांत अस्थिरता व धडपड सातत्याने चालू असते. भावक्षोभण वर्तनात रुग्ण अत्यंत अस्वस्थपणे येरझाऱ्याघालतो, हात चोळतो व विव्हळतो. सक्तियुक्त कृतीत रुग्णाला मनाविरुद्ध सक्तीच्या विशिष्ट हालचाली पुनःपुन्हा केल्याशिवाय समाधानच होत नाही. विक्षिप्त वर्तनामुळे (मॅनरिझम) विचित्र, निरर्थक हालचाली छिन्नमानसी चित्तविकृतीच्या निदानसूचक असतात.
अभावी बदल : मनोप्रेरक मांद्यामुळे (सायकोमोटर रिटार्डेशन) अवसादी चित्तविकृतीत रुग्णाच्या हालचाली अत्यंत कमी व मंद होतात. काही वेळा तीव्र अवसादामुळे रुग्ण निश्चल व गलितगात्र होतो. स्थिरतानावस्थेतील (कॅटॅटोनिया) छिन्नमानसी चित्तविकृतीत रुग्ण एकाच विचित्र आसनात थिजून राहतो.
वैशिष्ट्यपूर्ण बदल : साचेबंद वर्तनात एकाच विशिष्ट अंगस्थितीची अथवा हालचालीची सतत पुनरावृत्ती होत असते. ऋणरोधनेत (निगेटिव्हिझम) स्थिरतानावस्था छिन्नमानसी रुग्ण चिकित्सकाच्या निर्देशाविरुद्ध वर्तन करतो. त्याउलट त्याच विकारात नियंत्रणबाह्य आज्ञाधारकतेत (ऑटोमॅटिक ओबिडियन्स) निर्देशित हालचाली स्वहिताविरुद्ध असल्या, तरीसुद्धा निमूटपणे रुग्णाकडून केल्या जातात तसेच काही अतिविक्षिप्त हालचाली व अंगविक्षेप न कंटाळता केले जातात. मज्जाविकृतीत चेहऱ्याच्या व हाताच्या काही अनियंत्रित झटकेवजा हालचाली किंवा चाळे (टिक्स) वारंवार केले जातात.
(५) बौद्धिक कार्याची लक्षणे : बुद्धिभ्रंश (डिमेन्शिया) : बुद्धीचा ऱ्हास तीव्र ऐंद्रिय विकारांमुळे होऊ शकतो त्यामुळे नवीन गोष्टींचे आकलन नीट होत नाही. निर्धारण चुकीचे होते. विचार ठराविक, पुनरावृत्त व जुन्या आठवणींपुरतेच मर्यादित असतात. बुद्धीची तीव्र कमतरता मतिमंद मुलांत दिसून येते [⟶ मनोदौर्बल्य].
स्मृतीची लक्षणे : स्मृतिलोप वा स्मृतिभ्रंशाचे तीन प्रकार आहेत : (अ) पूर्ण स्मृतिलोप : हा दुर्मिळ असून फक्त उन्मादी विकारात आढळतो. मस्तिष्काला इजा वा इतर तीव्र विकार झाल्यास स्मृतिलोप तीव्र असला तरी तो पूर्ण नसतो. जुन्या व लहानपणाच्या स्मृती आठवतात. साधारण स्मृतिलोप बहुतेक ऐंद्रिय विकारामुळे उद्भवू शकतात त्यामुळे कमी महत्त्वाच्या घटना आठवत नाहीत [⟶ स्मृतिलोप].
(आ) अपस्मृती : यात चुकीचे आठवले जाते. उदा., कथाकरण(कॉनफॅब्यूलेशन). हे लक्षण कोर्सॅको चित्तविकृतीत सापडते त्यामुळे न आठवलेल्या घटनांची जागा कपोलकल्पित तपशिलाने भरली जाते. पूर्वावलोकित प्रसंग (‘देजा व्ह्यू’) ह्या अपस्मृतीमध्ये मनोप्रेरक अपस्मारी विकारामुळे (सायकोमोटर एपिलेप्सी) नवीन प्रसंग व स्थळेसुद्धा पूर्वी पाहिल्यासारखी वाटतात.
(इ) अतिरेकी स्मृती : यात रुग्ण उद्दीपन अवस्थेत फार जुन्या काळच्या क्षुल्लक प्रसंगाचीसुद्धा आठवण करू शकतो.
(६) परावधानी लक्षणे : निर्वस्तुभ्रमांत निरनिराळ्या ज्ञानेंद्रियांतर्फे उत्तेजन न होतासुद्धा संवेदना जाणवतात. उदा., दृष्टिभ्रमात नसलेल्या वस्तू वा व्यक्ती अथवा त्यांच्या सावल्या दिसतात. श्रवणभ्रमात माणसांचे आवाज किंवा पावले ऐकू येतात. बहुधा असले निर्वस्तुभ्रम संभ्रमाला जोडूनच होत असतात. असले भ्रम छिन्नमानस, तीव्र प्रकारचे उद्दीपन किंवा ऐंद्रिय विकारांतील ⇨ मुग्धभ्रांतीच्या विकारात प्रामुख्याने दिसतात.
भ्रम (इलूजन) ह्या लक्षणात निरनिराळ्या ज्ञानेंद्रियांतर्फे प्राप्त झालेल्या संवेदनांचा चुकीचा अर्थ लावून चुकीच्या संवेदना होतात. उदा., दोरीऐवजी साप दिसतो. सावलीऐवजी व्यक्ती दिसते. हे लक्षण ऐंद्रिय विकारांत विशेषतः मुग्धभ्रांतीमध्ये प्रचलित आहे [⟶ भ्रम].
(७) व्यक्तिमत्त्वाला बाधा आणणारी लक्षणे : काही तीव्र मानसिक विकारांमुळे व्यक्तिमत्त्वात बदल होतात तसेच व्यक्तिमत्त्वाच्या यंत्रणेमध्ये म्हणजे निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वगुणांचे संघटन तसेच व्यक्तीचे वैयक्तिक समायोजन यांत बिघाड होतात. व्यक्तिमत्त्वऱ्हास हे तीव्र स्वरूपाचे लक्षण बुद्धिभ्रंश ह्या ऐंद्रिय विकारात तसेच जीर्ण छिन्नमानसी चित्तविकृतीत दिसून येते. मूळ व्यक्तिमत्त्वात समाविष्ट असलेले स्वभावाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू हळूहळू नष्ट होतात आणि त्या विकाराचे रुग्ण एकाच मानसिक साच्यातले वाटू लागतात.
बहुविध व्यक्तिमत्त्व हे लक्षण नसून उन्मादी बोधविच्छेदनाचा एक दुर्मिळ प्रकार आहे. त्यात काही काळ अबोध मनातील सुप्त भावना, आकांक्षा व कल्पना यांची जटिल यंत्रणा संपूर्ण मन व शरीराचा ताबा घेऊन मूळ व्यक्तिमत्त्वापेक्षा निराळ्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू दाखवते. या काळात मूळ व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण विसर पडतो.
वर्गीकरण : संज्ञागण : १९७८ मध्ये जागतिक आरोग्य संघटना (आय–सी–डी–९) आणि १९८० मध्ये अमेरिकेचे मानसचिकित्सक मंडळ (ए.पी.ए.डी.एस्.एम्. −III) या दोन सर्वमान्य तज्ञ समित्यांनी जे वर्गीकरण केले आहे, ते एकसारखे नसल्यामुळे मानसचिकित्सक वर्तुळात काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्गीकरणाला जास्त मान्यता असल्यामुळे त्यातील वर्गांची व महत्त्वाच्या विकृतींची संक्षिप्त यादी पुढे दिली आहे. :
(अ) ऐंद्रिय वा शरीरदोषोद्भव चित्तविकृतीय प्रकार (ऑर्गॅनिक सायकॉटिक कंडिशन्स) :
(१) जराजन्य आणि जराजन्यपूर्व ऐंद्रिय चित्तविकृतीय प्रकार :
− जराजन्य बुद्धिभ्रंश (साधा – सिनाईल डिमेन्शिया).
−जराजन्यपूर्व बुद्धिभ्रंश (प्रीसिनाईल डिमेन्शिया).
−रोहिणी-काठिण्यजन्य बुद्धिभ्रंश (आर्टेरियोस्क्लेरॉटिक डिमेन्शिया)
−आणि इतर ४ प्रकार.
(२) मद्यातिरेकी चित्तविकृती (आल्कोहॉलिक डिमेन्शिया) :
−याचे १० प्रकार.
(३) औषधी चित्तविकृती (ड्रग सायकोसिस) :
−याचे ५ प्रकार.
(४) अल्पकालीन ऐंद्रिय चित्तविकृतीय प्रकार (ट्रांझियंट ऑर्गॅनिक सायकॉटिक कंडिशन्स) :
−तीव्र आकुलता अवस्था (ॲतक्यूट कन्फ्यूजनल स्टेट).
−उपतीव्र आकुलता अवस्था (सब – ॲक्यूट कन्फ्यूजनल स्टेट).
−आणि इतर २ प्रकार
(५) इतर व जीर्ण ऐंद्रिय चित्तविकृतीय प्रकार :
−याचे ४ प्रकार.
(आ) इतर चित्तविकृती :
(१) छिन्नमानसीय चित्तविकृतीय (स्किझोफ्रेनिक सायकोसिस) :
−साधा प्रकार.
−बधिर वा विक्षिप्त प्रकार (हेबेफ्रेनिक टाइप).
− स्थिरतानावस्था वा गलितगात्र प्रकार (कॅटॅटॉनिक टाइप).
−प्रणालित संभ्रमयुक्त प्रकार (पॅरॅनॉइड टाइप).
−छिन्नमानसी – भाववृत्तीय प्रकार (स्किझोॲ फेक्टिव्ह टाइप).
−आणि इतर ५ प्रकार.
(२) भाववृत्तीय चित्तविकृतीय (ॲफेक्टिव्ह सायकोसिस) :
−उद्दीपन अवसाद चित्तविकृतीय ७ प्रकार.
−आणि इतर २ प्रकार.
(३) प्रणालित संभ्रमी चित्तविकृती (पॅरॅनॉइड सायकोसिस) :
−याचे ६ प्रकार.
(४) इतर ऐंद्रियेतर चित्तविकृतीय (नॉन – ऑर् गॅनिक सायकोसिस) :
−याचे ७ प्रकार.
(५) बाल्यावस्थेत उगम पावणाऱ्या चित्तविकृती :
−अर्भकीय इच्छावर्तता (इन्फटाइल ऑटिझम).
– आणि इतर ३ प्रकार.
(इ) मज्जाविकृतीय, व्यक्तिमत्त्व आणि इतर चित्तविकृतेतर मानसिक विकृती :
(१) मज्जाविकृतीय विकृती :
−चिंताप्रतिक्रिया अवस्था (अँग्झायटी स्टेट्स).
−उन्माद (हिस्टेरिया).
− भयगंडीय अवस्था (फोबिक स्टेट).
−भावातिरेकी सक्तियुक्त विकृती (ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिस्ऑर्डर).
−मज्जाअशक्ती (न्यूरॅस्थेनिया).
−निर्व्यक्तीकरण लक्षणसमूह (डिपर्सनलायझेशन सिन्ड्रोम).
−शरीरचिंता (हायपोकाँड्रियासिस).
– आणि इतर २ अवस्था.
(२) व्यक्तिमत्त्व विकृती :
– प्रणालित संभ्रमी (पॅरॅनॉइड).
– भाववृत्तीय (ॲफेक्टिव्ह).
– अलिप्तवादी (स्किझॉइड).
– स्फोटक (एक्स्लोझिव्ह).
– ॲनॅन्कॅस्टिक.
– उन्मादी.
– अशक्ती (ॲस्थेनिक).
− आणि इतर ३ प्रकार.
(३) लैंगिक अपमार्गण आणि विकृती :
− समलिंगी कामुकता (होमोसेक्शुॲलिटी).
– आणि इतर ९ प्रकार.
(४) मद्यासक्ती (आल्कोहॉल डिपेंडन्स).
(५) औषधावलंबन (ड्रग डिपेंडन्स).
− याचे १० प्रकार.
(६) अवलंबनेतर औषधातिरेक (नॉनडिपेंडन्ट ॲब्यूज ऑफ ड्रग्ज) :
− मद्य, तंबाखू, गांजा वगैरे एकूण १० प्रकार.
(७) मानसिक कारकांमुळे होणाऱ्या शारीरिक अवस्था :
− याचे १० प्रकार.
(८) विशेष लक्षणे वा लक्षणसमूह (इतरत्र समाविष्ट नसलेले) :
− तोतरेपणा.
−अंगविक्षेप.
− आणि इतर ८ प्रकार.
(९) ताणाची तीव्र प्रतिक्रिया (ॲक्यूट रिॲक्शन टू स्ट्रेस) :
− याचे ६ प्रकार.
(१०) समायोजन प्रतिक्रिया :
− याचे ७ प्रकार.
(११) ऐंद्रिय मस्तिष्क हानीनंतर होणारे विशिष्ट चित्तविकृतेतर मानसिक विकार :
− याचे ५ प्रकार.
(१२) अवसादी विकृती (इतरत्र समाविष्ट न केलेल्या).
(१३) वर्तनविकृती (इतरत्र समाविष्ट न केलेल्या) :
− याचे ६ प्रकार.
(१४) बाल्यावस्थेतील व पौगंडावस्थेतील भावनिक विकृती :
− याचे ६ प्रकार.
(१५) बाल्यावस्थेतील अतिगतिकी (हायपर कायनेटिक) लक्षण समूह :
− याचे ५ प्रकार.
(१६) बालविकासातील विशिष्ट विलंब :
− याचे ८ प्रकार.
(१७) मानसिक कारक (दुसरीकडे समाविष्ट केलेल्या विकृतींचे).
(१८) सौम्य मनोविकलता.
(१९) इतर निर्दिष्ट मनोविकलता :
− याचे ३ प्रकार.
(२०) अनिर्दिष्ट मनोविकलता.
निदान : मानसविकारांचे निश्चित निदान करण्यासाठी पुढे दिलेल्या कार्यपद्धती क्रमशः वापरल्या जातात :
(१) रुग्ण वृत्तान्त : रुग्णाच्या माहितगार नातेवाईकांकडून रुग्णाच्या दुखण्याच्या स्वरूपाची, कारणांची तसेच त्याच्या मानसिक व सामाजिक पार्श्वभूमीची तपशीलवार माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आनुवंशिकता, मनोप्रकृती तसेच आधी जडलेल्या मनोविकारांच्या माहितीवरून वर्तमान दुखण्याच्या स्वरूपाची बरीचशी कल्पना येते. त्यानंतर उरलेली माहिती व रुग्णाला स्वतःला होणाऱ्या त्रासाची पूर्ण कल्पना त्याच्याकडूनच करून घेतली जाते. आणखी विशेष माहिती जरूरीची वाटल्यास मानसचिकित्सी समाजसेवकाकरवी त्याच्या नातेवाईकांकडून वा निकटवर्तियांकडून ती घेतली जाते.
(२) तपासणी : मानसिक आणि शारीरिक तपासणीत आधी रुग्णाची बाह्यस्थिती (चर्यामुद्रा−पेहे राव), वर्तन, वातावरणाशी संपर्क, विचार, भावना व त्यांच्या प्रतिक्रिया त्यानंतर केंद्रीय तंत्रिका तंत्राची तपासणी तसेच सर्वसाधारण शारीरिक तपासणी केली जाते.
(३) खास मानसिक तपासणी : वरील तपासणीत निदान न झाल्यास काही काळानंतर फेरतपासणी अथवा जरूर वाटल्यास शांतक इंजेक्शन देऊन रुग्णाशी त्याचे दुखणे समजून घ्यायच्या हेतूने मोकळेपणाने चर्चा केली जाते ( ग्लानी−विश्लेषण).
(४) निर्धारण मापन : लक्षणांच्या स्वरूपाची व तीव्रतेची पूर्ण कल्पना येण्यासाठी निरनिराळ्या निर्धारण मापनांचा (रेटिंग स्केल्स) वापरही केला जातो.
(५) मनोनिदानीय कार्यपद्धती : निदानीय मानसशास्त्रज्ञाच्या (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट) मदतीने व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे निरनिराळ्या व्यक्तिमत्त्व कसोट्यांतर्फे मूल्यनिर्धारण केले जाते तसेच प्रक्षेपणी कार्यपद्धतीने (प्रोजेक्टिव्ह टेक्निक्स) त्याच्या स्वरूपाची पण कल्पना येते. उदा., रोर्शाक कसोटी.
(६) खास तपासण्या : ऐंद्रिय मस्तिष्क विकाराच्या निदानासाठी शारीरिक संस्थांची खास तपासणी केली जाते. उदा., कवटीची क्ष-किरण तपासणी विद्युत् मस्तिष्कालेखन (इ.इ.जी.) मस्तिष्क मेरुद्रव तपासणी (सी.एस्.एफ्.) व काँप्युटराइज्ड एक्शिअल टोमोग्राफीतर्फे (कॅट स्कॅन) मेंदूची तपासणी.
उपचार : मानसचिकित्सेत उपचारपद्धती विविध प्रकारच्या असून त्यांची वर्गवारी अशी आहे : (एक) औषधोपचार, (दोन) मानसोपचार, (तीन) वर्तनोपचार, (चार) भौतिक-शारीरिक उपचारपद्धती आणि (पाच) काही खास उपचार.
(एक) औषधोपचार : गेल्या वीस वर्षांत मानसौषधीच्या क्षेत्रात बरेच संशोधन झालेले असून आज अनेक प्रभावी औषधांमुळे बहुतेक मानसिक लक्षणांनर मात करता येते. [⟶ मानसौषधी].
(दोन) मानसोपचार : मानसिक विकारांपासून मुक्ती देण्यासाठी मनोव्यापारांच्या तत्त्वावर आधारलेल्या ज्या उपचारपद्धती आहेत, त्यांनी मानसोपचार असे संबोधतात. मानसोपचाराचे मुख्य वर्ग असे आहेत : पहिले दोन ढोबळ वर्ग आहेत : (१) वैयक्तिक मानसोपचार आणि (२) समूह मानसोपचार.
(१) वैयक्तिक मानसोपचाराचेही दोन वर्ग आहेत : (अ) मनोविश्लेषणीय मानसोपचार व (आ) इतर मानसोपचार.
(अ) मनोविश्लेषणीय मानसोपचाराचेही खालील अ−१ ते अ−३ असे तीन प्रकार होतात :
(अ−१) मनोविश्लेषणीय मानसोपचार फ्रॉइड व त्यांचे शिष्य यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतावर आधारलेले आहेत. ह्या उपचाराच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रथम मुक्त साहचर्य, स्वप्नविश्लेषण तसेच प्रतिरोधन (रेझिस्टन्स) आणि संक्रमण (ट्रान्सफरन्स) यांचे अर्थबोधन करून रुग्णाच्या अबोध मनातील विकारी आशयाचा शोध लावला जातो. त्यानंतर रुग्णाशी स्नेहबंध (रॅपोर) निर्माण करून सुप्त मनोव्यापारांचे भावविरेचन केले जाते. गंड व इतर अबोध मनोयंत्रणा बोधयुक्त करण्यात यश आल्यानंतर विकार बरा होऊ लागतो.
(अ−२) संमोही विश्लेषण : मनोविश्लेषणात प्रतिरोदन बलवत्तर झाल्यास मानसोपचाराच्या प्रगतीला खीळ बसते. अशा वेळी संमोहनाचा वापर करून हा अडथळा दूर केला जातो.
(अ−३) इतर विश्लेषणीय मानसोपचार : फ्रॉइडच्या सिद्धांतावर आधारलेले परंतु तत्त्वाने निराळे असे युंग ह्यांच्या प्रणालीचे विश्लेषणीय मानसशास्त्रीय उपचार व ॲड्लर यांचे वैयक्तिक मानसशास्त्रीय उपचार प्रचलित आहेत. नवफ्रॉइडी मनोविश्लेषक ह्या नावाने संबोधले जाणारे सलिव्हन, होर्नाय, रॅडो, रांक व फ्रॉम यांच्या प्रणालीप्रमाणे मानसोपचार केले जातात. सिफनिऑस यांनी मनोविश्लेषणीय मानसोपचाराची संक्षिप्त आवृत्ती (ब्रीफ सायकोथेरपी) प्रचलित केली. आणखी एका प्रकारात मर्मदृष्टीवर भर दिला जातो (इन्साइट सायकोथेरपी).
(आ) इतर मानसोपचार : यात अबोध मनातील आशयाला महत्त्व न देता बोधपूर्वक मनोव्यापारांच्या अभ्यासावर भर दिला जातो. कार्यपद्धतीत मानसिक आशयाचे समन्वेषक, विकाराबद्दलचे विवरण, आश्वासन, आधारदान, सूचन, मार्गदर्शन व पुनर्शिक्षण यांचा क्रमाने वापर केला जातो. इतर मानसोपचारांचे काही खास प्रकार असे :
(१) भावविरेचनी (ॲब्रिॲक्टिव्ह) मानसोपचारात दडपलेल्या भावनांना व विचारांना मुक्ताभिव्यक्ती करून देण्यात येते.
(२) ग्लानी−विश्लेषणात (नार्कोॲनॅलिसिस) शामक वा शांतक इंजेक्शनच्या साहाय्याने रुग्णाचा संकोच, भीती व दमन यांचा अडसर दूर करून भावविरेचनी मानसोपचार केला जातो.
(३) आधारदायी (सपोर्टिव्ह) मानसोपचारात रुग्णाच्या कैफियतीला वाव दिला जातो आणि बिकट सामाजिक परिस्थितीशी समायोजन करण्यासाठी त्याला आधारदायी मार्गदर्शन देऊन त्याची चिंता कमी केली जाते.
(४) रुग्णकेंद्रित (क्लायंटसेंटर्ड) मानसोपचारात रॉजर्झ यांनी उपचारज्ञाच्या निर्देशनाऐवजी रुग्णाच्या दृष्टिकोनाला महत्त्व देऊन त्याच्या उपजत समायोजन शक्तीलाच वाव देऊन व्यक्तिमत्त्वसमृद्धीचे उद्दिष्ट गाठले जाण्याची पद्धत मांडली.
(५) अस्तित्ववादी (एग्झिस्टेन्शियल) मानसोपचार अस्तित्ववादी तत्त्वज्ञानावर आधारलेला असून त्यात रुग्णाच्या आंतरिक अनुभवाला महत्त्व दिले जाते. रुग्णाच्या भावनेला साद देऊन तो या परकी जगात एकटा नाही हे आश्वासन देऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाला समृद्धी आणण्याचा प्रयत्न केला जातो. ह्याच उपचाराच्या दुसऱ्या एका प्रकाराला ‘लोगोथेपरी’म्हणतात.
(६) इतर अप्रचलित मानसोपचाराचे प्रकार असे आहेत : जेस्टाल्ट मानसोपचार वास्तवता (रिॲलिटी) मानसोपचार आणि बुद्धिप्रणीत-भावनात्मक मानसोपचार (रॅशनल−इमोटिव्ह थेरपी).
(२) समूह मानसोपचार : एकाच वेळी दोन किंवा अधिक रुग्ण किंवा त्यांचे निकटवर्तीय यांच्या सहभागाने केल्या जाणाऱ्या मानसोपचाराला समूह मानसोपचार म्हणतात. त्याचे तीन वर्ग पाडले आहेत : (१) क्रियाशीलता समूह मानसोपचार : यात सहभागी रुग्णांना प्राधान्य देऊन मुक्तवर्तन व भावोक्ती (व्हेंटिलेशन) करण्यास उत्तेजन देतात. (२) विश्लेषणी समूह मानसोपचार : यात समूहात घडणाऱ्या परस्परक्रियेचे अर्थबोधन सहभागींना समजावून देण्यात येते आणि (३) निर्देशक प्रशिक्षणीय समूह मानसोपचार : यात उपचारज्ञ निर्देशनावर व रुग्णशिक्षणावर जास्त भर देतो.
समूह मानसोपचार मुलांच्या व रुग्णांच्या भावनिक विकृती व सामाजिक वर्तनसमस्या तसेच दीर्घकालीन मज्जाविकृती व सौम्य चित्तविकृतींच्या रुग्णांना दिला जातो.
समूह उपचाराचे काही खास प्रकार : कुटुंबोपचार (फॅमिली थेरपी) : हा समूह मानसोपचार असला, तरी काही वेळा मानसिक रुग्ण-विशेषतः छिन्नमानसी−हा कुटुंबाच्या विकृत मनोगतिकीचा बळी असतो, ह्या सिद्धांतावर आधारलेला आहे. त्यात बहुतेक सर्व कुटुंबीय उपचारज्ञाच्या निर्देशनाखाली परस्परक्रियेत सहभागी होतात आणि सर्व कुटुंबियांना मार्गदर्शन दिले जाते. विशेषतः मुलांच्या वर्तनसमस्या तसेच वैवाहिक समस्यांवरही हा उपचार दिला जातो.
परस्परव्यवहारी वा विनिमयात्मक विश्लेषण (ट्रॅन्झॅक्शनल ॲनॅलिसिस) : एरिक बर्न यांनी अहम् च्या तीन अवस्था वर्णिलेल्या आहेत. पालक अहम्, प्रौढ अहम् व बाल अहम्. या तीनही अवस्था व्यक्तीला सामाजिक वातावरणाकडे निरनिराळ्या भूमिकेतून पहायला लावतात. कौटुंबिक परस्परसंबंधांत ह्या पातळ्या प्रसंगानुसार, गरजेनुसार आणि सवयींनुसार बदलत राहतात. बहुधा ‘सामाजिक पातळीवर’ एक वर्तन अथवा संदेश असतो पण त्याचा ‘मानसिक पातळीवरील’ अर्थ व उद्देश निराळाच असतो बर्न त्याला मानसिक खेळ म्हणतात. ह्या सिद्धांतावर आधारलेल्या उपचारात उपचारज्ञ, रुग्ण आणि मनोगतिकी दृष्ट्या संबंधित कुटुंबीय यांचे खेळरूपी परस्परव्यवहार आपल्या निर्देशनाखाली सरळ आणि उघड करून रुग्णाला ह्या ‘खेळा’ ऐवजी समायोजनशील वर्तनपद्धती स्वीकारायला लावतात. [⟶ विनिमयात्मक विश्लेषण].
मनोनाट्य (सायकोड्रामा) : मोरेनो ह्यांनी रचलेल्या ह्या उपचारात रुग्णाला आपल्या अव्यक्त भावनिक समस्यांना, इतर रुग्णांच्या किंवा स्वयंसेवकांच्या मदतीने त्याच्या पूर्वजीवनातील प्रसंगाचे नाट्य रचून वाचा फोडायला मदत केली जाते.
(तीन) वर्तनोपचार (बिहेवियर थेरपी) वा अध्ययनोपचार (लर्निंग थेरपी) : अपसामान्य वर्तन अथवा मानसिक विकृतीचे लक्षण ही एक शिकून जडलेली अपसमायोजनी सवय असून ती अध्ययन सिद्धांताच्या नियमानुसार काढून टाकता येते, हे तत्त्व मानसचिकित्सेत उपयोजित केलेले आहे [⟶ भयगंड]. ह्या उपचारांत मनोगतिकीला महत्त्व नसून उपचारांचे लक्ष्य, लक्षण हेच असते. ह्या उपचारपद्धतीचा सर्वांत जास्त प्रभावी उपयोग चिंताप्रतिक्रिया, भयगंड, भावातिरेकी सक्तियुक्त मज्जाविकृती, मज्जाविकृतीय क्षुधानाश तसेच मद्यासक्ती, औषधावलंबन, लैंगिक विकृती, बाल्यवर्तनसमस्या आणि चित्तविकृती यांच्या काही जीर्ण लक्षणांवर केला जातो. इतर मानसिक विकारांवरही ह्या उपचारांचे प्रयोग चालू आहेत.
हे उपचार तीन मुख्य सिद्धांतावर आधारलेले आहेत : (१) पारस्परिक स्तंभन (रेसिप्रोकल इन्हिबिशन) ह्या वोल्पे यांनी प्रतिपादलेल्या तत्त्वावर आधारलेले उपचार, (२) क्रियावलंबी अभिसंधान (ऑपरंट कंडिशनिंग) ह्या स्कीनर यांनी प्रतिपादलेल्या तत्त्वावर आधारलेले उपचार आणि (३) पाव्हलॉव्ह यांचा मूळ सिद्धांत अभिजात अभिसंधान ह्यावर आधारलेले उपचार.
पहिल्या वर्गातील मुख्य उपचार म्हणजे रीतसर निर्संवेदीकरण (सिस्टिमॅटिक डीसेन्सिटायझेशन). याचा भयगंड व चिंताप्रतिक्रिया या विकारांसाठी उपयोग होतो. ह्या उपचारात शवासनासारखे एक आसन शिकविले जाते ज्यामुळे रुग्ण शरीराने शिथिल व मनाने निश्चिंत होतो. अशा निवांत अवस्थेत क्रमाक्रमाने जास्त तीव्र असे भीतिदायक प्रसंग कल्पनेत उभे केले जातात परंतु निवांत अवस्थेत असल्यामुळे त्यांची भीती वाटत नाही. अशा तऱ्हेने रोज मनोशारीरिक निवांतीकरण करून भीतीचे निर्संवेदीकरण करण्याचा सराव केल्यावर भयगंडीय अथवा चिंताप्रतिक्रियेतील भीतीवर मात केली जाते. भावनात्मक प्रतिमासृष्टी (इमोटिव्ह इमेजरी) ह्या उपचारात गैरभावनांचे स्तंभन करण्यासाठी आल्हादकारक तसेच स्फूर्तिदायक कल्पना वा प्रतिमा मनात आणल्यानंतर गैरप्रसंगाची आठवण करून दिली जाते. प्रबळ भावनांमुळे उद्दीपित झालेल्या रुग्णाला मग भीती वाटेनाशी होते.
दुसऱ्या वर्गातील मुख्य उपचार म्हणजे धनप्रबलन व ऋणप्रबलन. ह्या दोन्ही उपचारपद्धतींत ज्या प्रतिक्रियेमुळे वैयक्तिक वातावरणात योग्य तो बदल होतो (ऑपरंट) तिचे प्रबलन केले जाऊन अपसमायोजन (विकारी लक्षण) नष्ट केले जाते. त्यासाठी अप्रत्यक्ष (किंवा मुलांच्या बाबतीत प्रत्यक्ष) बक्षिसाचा अवलंब लक्षणासमवेत केला जातो. अप्रत्यक्ष बक्षिसाचे स्वरूप विविध असते. उदा., कुपनअर्थव्यवस्था पद्धतीत (टोकन इकॉनॉमी) योग्य वर्तनाबद्दल रुग्णालयातील जीर्ण रुग्णांना कुपने दिली जातात आणि त्याचा वापर ते हव्या त्या वस्तू वा सवलती घेण्यासाठी करतात. प्रशंसा, प्रसन्न मुद्रा, जिव्हाळा ह्या स्वरूपातही बक्षिस दिले जाते. शिक्षा मात्र अप्रत्यक्षच असते. उदा., हव्या त्या वस्तू न देणे, अबोला धरणे, पूर्ण दुर्लक्ष करणे, संस्थेतील सवलती नाकारणे वगैरे. ह्या पद्धतीने मुलांच्या वर्तनसमस्या, क्षुधानाश, रुग्णालयीन रुग्णांच्या वाईट सवयी, मज्जाविकृतीय चाळे यांचा यशस्वी उपचार केला जातो.
तिसऱ्या वर्गातील मुख्य उपचार म्हणजे विमुखता अभिसंधान (ॲव्हर्सिव्ह कंडिशनिंग). ह्या उपचारातील तत्त्व असे आहे, की रुग्णाला प्रिय असलेली विकृत सवय (लक्षण)−उदा., मद्यासक्ती व औषधावलंबन ह्या विकारांतील मादक द्रव्ये घेण्याची क्रिया−व विमुख (म्हणजे अत्यंत अप्रिय असा) अनुभव−उदा., पोटात मळमळ, घाण वास, भीतिदायक शारीरिक लक्षण इत्यादी−हे दोन अनुभव अनेक वेळा लागोपाठ एकत्र आणल्यामुळे मादक द्रव्य व अप्रिय अनुभव यांचे अवलंबीकरण होऊन मादक द्रव्य नकोसे होते. हा उपचार समलिंगी आकर्षण व इतर विकृतींसाठीही दिला जातो. हाच उपचार कल्पनेत देण्याचे तंत्रही प्रचलित असून त्याला ‘सुप्त संवेदीकरण’ (कोव्हर्ट सेन्सिटायझेशन) असे म्हणतात.
काही वर्तनोपचाराच्या प्रकारांना दोन सिद्धांताचे तंत्र लागू पडते. प्रस्थापनी प्रशिक्षणात (ॲसर्टिव्ह ट्रेनिंग) पारस्परिक स्तंभन व क्रियावलंबी अभिसंधान ही तत्त्वे लागू पडतात. चेतक वर्षाव (फ्लडिंग) या उपचारात हल यांच्या ‘पश्चात क्रियाशील स्तंभन’ (रेट्रोॲक्टिव्ह इन्हिबिशन) ह्या सिद्धांतावर तसेच ‘अभिजात अभिसंधान’ ह्या सिद्धांतावर आधारलेला आहे. पहिल्या उपचारात अपर्याप्त वा मज्जाविकृतीय व्यक्तिमत्त्वातील पडखाऊपणा तसेच भित्रटपणा काढण्यासाठी आपले हक्क कसे प्रस्थापित करावे हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाते. चेतक वर्षावाचे मुख्य उपयोग भयगंड व भावातिरेकी विचारावर असून भयप्रद व अप्रिय अनुभव अतिरेकी करणाऱ्या काल्पनिक अनुभवांचे कथन रोज करून त्या अनुभवातील भावक्षोभी ताकद बोथट केली जाते. ह्याच उपचारात जेव्हा मनोगतिकी महत्त्व असलेल्या अनुभवांवर भर दिला जातो, तेव्हा त्याला अंतःस्फोटी उपचार (इंप्लोझिव्ह थेरपी) असे म्हणतात.
स्वनिर्देशित शिथिलीकरण प्रशिक्षण (ऑटोजेनिक ट्रेनिंग) व शरीरावस्था प्रतिसंभारण प्रशिक्षण (बायोफीडबॅक ट्रेनिंग) ह्या उपचारात पारस्परिक स्तंभन ह्या तत्त्वाचा वापर अंशतः केलेला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने स्वतःच्या शिथिलतेची तसेच मनःशांतीची स्पष्ट व बिनचूक कल्पना आल्यावर मनोशारीरिक शिथिलीकरण प्रभावी व शीघ्रतेने करण्यास रुग्ण शिकतो आणि असे सतत करत राहिल्यास तणाव व अतिरेकी स्वयंचलित मज्जासंस्थीय क्रिया बरीच कमी करून वाढीव रक्तदाब, जठरव्रण, अर्धशिशी इ. मनोशारीरिक विकारांवर तो नियंत्रण मिळवू शकतो.
(चार) भौतिक-शारीरिक उपचारपद्धती : ह्या उपचारात मानसौषधी सोडून इतर वैद्यकीय उपचार समाविष्ट आहेत : (१) विद्युत् उपचार (इ.सी.टी.) : हा उपचार कार्यिक चित्तविकृतीच्या आणि काही काळजीपूर्वक निवडलेल्या ऐंद्रिय विकाराच्या तसेच मज्जाविकृतीच्या रुग्णांना दिला जातो. विकाराच्या तीव्रतेप्रमाणे जरूर असतील तितके वेळा (बहुधा ८ ते २० पर्यंत) उपचार दिले जातात. उपचार सुरुवातीला काही दिवस रोज, नंतर दिवसाआड व सुधारणा दिसून आल्यावर अंतर वाढवून दिले जातात. सुधारणा पूर्ण झाल्यावर काही वेळा, विशेषतः छिन्नमानसी रुग्णात प्रगती अबाधित रहावी म्हणून महिन्यातून एखादे वेळी उपचार देण्याची गरज भासते. एका खास विजेच्या उपकरणातून देण्यात येणारे विजेचे प्रमाण व वेळ अल्प व सुरक्षित असून सर्व काळजी घेतली जाते. त्यापासून होऊ शकणाऱ्यात्रासाची जाणीव व धोक्याची शक्यता कमी करण्यासाठी गुंगीचे इंजेक्शन व स्नायुशिथिलक इंजेक्शन दिले जाते (रूपांतरित विद्युत् उपचार). सव्यहस्ती (डावखोऱ्या) व्यक्तीत स्मृतीची केंद्रे डाव्या मस्तिष्क गोलार्धात असल्यामुळे, विद्युत् अग्र उजव्याच बाजूला लावून उपचार दिल्यास, स्मृतीवर होणारा अल्प अनिष्ट परिणाम टाळता येतो (एकतर्फी विद्युत् उपचार). काही वेळा विद्युत् उपचार अत्यल्प प्रमाणात देऊन बुद्धीचे उद्दीपन साधले जाते (मस्तिष्कोद्दीपन). हा उपचार काही सौम्य अवसादी विकारांत प्रभावी ठरतो.
(२) इन्शुलिन उपचार : मधुमेहावर इलाज म्हणून प्रचलित असलेले हे द्रव्य जास्त प्रमाणात दिल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण मस्तिष्क कार्याला जरूर असलेल्या पातळीपेक्षा कमी होऊन रुग्ण बेशुद्ध होतो (रक्तशर्करान्यूनता). ह्याचा हेतुपुरःसर उपयोग छिन्नमानसी विकाराच्या उपचारासाठी केला जातो. अशी इंजेक्शने रोज सकाळी उपाशी पोटी देऊन जवळजवळ वीस ते तीस मिनिटे बेशुद्धी वीस ते तीस दिवस रोज आणली जाते. हा उपचार खर्चिक, धोक्याचा व त्यामानाने फारसा प्रभावी न ठरल्यामुळे आज विशेष वापरात नाही.
(३) उत्सर्गवायू उपचार (कार्बन डाय-ऑक्साइड थेरपी) : ३०% उत्सर्गवायू व ७०% प्राणवायू यांच्या मिश्रणाने अंतःश्वसन रोज तीन ते दहा मिनिटे असे वीस ते तीस दिवस करण्याचा उपचार काही मज्जाविकृतींच्या निवडक रुग्णांवर केला जातो. काही उन्मादी लक्षणांवरही हा उपचार प्रभावी ठरतो.
(४) सतत निद्रोपचार : चित्तविकृतीतील भावक्षोभन, उद्दीपन, तीव्र उत्तेजन व तीव्र निद्रानाश तसेच मज्जाविकृतीतील तीव्र चिंता व औषधावलंबनी रुग्णांत ह्या उपचाराचा उपयोग होतो. चार ते पाच दिवस शांतक (ट्रँक्विलायझर), शामक (सेडेटिव्ह) व संमोहक वा निद्रादायी (हिप्नॉटिक) औषधांचा सतत मारा करून रुग्णाला सतत जवळजवळ बेशुद्ध ठेवतात. त्यामुळे मानसिक यंत्रणेला पूर्ण विश्रांती मिळते आणि विकार बरा होण्यास प्रभावीपणे मदत मिळते.
(५) मानसशल्यचिकित्सा : काही जीर्ण चित्तविकृती व अत्यंत तीव्र आणि उत्तापसह (रिफ्रॅक्टरी) अशा कोणत्याही मानसिक विकारावर, इतर उपचारांचा उपयोग न झाल्यास, मस्तिष्कशल्यक्रियांचा उपचार केला जातो. योग्य वेळी योग्य शल्यक्रियेची पद्धत निवडल्यास लाक्षणिक विमोचन होते. त्रिमिती क्ष किरण दर्शन (स्टिरिओटॅक्सिस) सारख्या अत्याधुनिक आयुधांच्या साहाय्याने सूक्ष्मशल्यक्रिया केली जात असल्यामुळे उपद्रवाचे प्रमाण अत्यल्प असते.
(पाच) काही खास उपचार : (अ) व्यवसायप्रधान चिकित्सा : दीर्घकालीन मनोविकारांमुळे व्यवसायसंपर्क तुटून कामाची सवय तसेच आत्मविश्वास कमी होतो. तेव्हा पुनर्वसन करण्याच्या मुख्य हेतूने तसेच विकाराच्या तापदायक लक्षणांचा विसर पडावा व इतर रुग्णांबरोबर वावरून सामाजिक संबंध सुधारण्याच्या तसेच हस्तव्यवसाय वा कारागिरी शिकण्याच्या अशा दुहेरी हेतूने हा उपचार दिला जातो. बहुधा मनोरुग्णालयात अशा उपचाराची सोय उपलब्ध असते. प्रशिक्षित व्यवसायप्रधान चिकित्सक निरनिराळे हस्तव्यवसाय व धंदेशिक्षण रुग्णांना शिकवितात व त्यांच्याकडून उत्पादक काम करून घेतात. [⟶ व्यावसायिक चिकित्सा].
(आ) आसमंतोपचार (मिलू थेरपी) : रुग्णालयातील वातावरण विकार-विमोचनास पोषक नसल्यास इतर उपचारही निष्प्रभ व्हायचा संभव असतो. कारण रुग्णाला बरे होण्यास प्रेरित केल्याशिवाय कुठल्याही उपचारांस तो सहकार्य देत नाही. ह्या हेतूने रुग्णालयातील सर्व सेवकवर्ग आणि इतर सुधारलेले रुग्ण ह्यांना उपचारास मदत करायला लावतात. रुग्णालयाच्या कारभारात रुग्णालाही सहभागी व्हायला लावले जाते. त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क पण कायम ठेवला जातो व त्यासाठी बहुतेक रुग्णांना रुग्णालयात फिरायचे स्वातंत्र्य दिले जाते.
(इ) संगीतोपचार : मनोदुर्बल मुलांच्या सामाजिक वर्तनकौशल्यात आणि शालेय शिक्षणक्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी तालबद्ध संगीताचा वापर गेली तीस वर्षे मनोदुर्बलांच्या रुग्णालयात आणि त्यांच्या खास शिक्षणसंस्थांत चालू आहे. मनोविकारांच्या बाबतीत मात्रसंगीतोपचाराचे प्रयोग अजून बाल्यावस्थेत आहेत. मनोरुग्णालयातील बहुसंख्य जीर्ण, विशेषतः छिन्नमानसी, रुग्णांचे मनोरंजन संगीताने केल्यास (रिक्रिएशन थेरपी) त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते हे आजवर सिद्ध झाले आहे. मद्यासक्ती व मज्जाविकृतीच्या समूह मानसोपचारात संगीताची जोड लाभदायक होते असेही आढळून आलेले आहे. वर्तनोपचारातील शिथिलीकरणासाठी संगीत आणि ताल यांचा वापरही होऊ लागला आहे. मात्र संगीताचे ज्ञान व आवड असलेल्यांनाच ह्या उपचाराचा खरा फायदा होऊ शकतो.
संशोधन : इतर वैद्यकीय शाखांच्या मानाने नवीन असलेल्या मानसचिकित्सेच्या क्षेत्रात अजून प्रगतीला बराच वाव असल्याकारणाने विविध प्रकारच्या संशोधनावर बराच भर दिला जातो. यांतील प्रमुख क्षेत्रे अशी :
(१) औषधे : शांतक तसेच उद्दीपक (अवसादविरोधी) औषधांच्या क्षेत्रात सतत संशोधन चालू असून दरवर्षी नवीन औषधे निदानीय चाचणीसाठी मानसचिकित्सकाकडे येत असतात.
(२) जीवरसायनशास्त्रीय संशोधन : प्रयोगशाळेत चित्तविकृतींच्या जीवरसायनशास्त्रावर बरेच संशोधन चालू आहे. विशेषतः छिन्नमानस आणि अवसाद या विकारांवर तसेच ह्या विकाराच्या स्वरूपाची निश्चित कल्पना येण्यासाठी सुखभ्रमाभासी द्रव्यांचा जीवरासायनिक अभ्यास चालू आहे. त्यासाठी मानवी स्वयंसेवकावरही प्रयोग चालू आहेत.
(३) प्रायोगिक मज्जाविकृती : आजपर्यंत प्रायोगिक मज्जाविकृती प्राण्यात निर्माण करून त्याचा अभ्यास व संशोधन करणे चालू असून आता ह्या क्षेत्राचा विस्तार मानवी स्वयंसेवकांपर्यंत केलेला आहे. विशेषतः प्रयोगशाळेत मानवी स्वयंसेवकांवर निर्संवेदी अस्तित्वाचे प्रयोग करून त्यांच्या दुष्परिणामांचा अभ्यास चालू आहे. औद्योगिक सुधारणा व जलद वाहतुकीमुळे होणाऱ्या. अपघातांचे निवारण करण्याच्या दृष्टीने ह्या संशोधनाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.
(४) गणकयंत्राचा उपयोग : मानसचिकित्सेच्या अकादमिक अभ्यास व संशोधनासाठी गणकयंत्रांचा नियमित उपयोग केला जात आहे.
(५) वर्तनोपचार : वर्तनोपचाराचे क्षेत्र वाढवून चित्तविकृती, उदा., अवसाद, उन्माद, व्यक्तिमत्त्वविकार ह्यांच्यावर उपचाराचे प्रयोग चालू आहेत. तसेच शरीरावस्था प्रतिसंभरण ह्या तंत्राचा उपयोग मानस-शारीरक्रियाशास्त्राच्या संशोधनासाठी तसेच मनोशारीरिक विकाराचा उपचार जास्त प्रभावी करण्याच्या दृष्टिकोनातूनही संशोधन चालू आहे.
संदर्भ : 1. Batchelor, I. R. C, Ed. Henderson and Gillespie’s Textbook of Psychiatry, London, 1975.
2. Cavenar Jr., J. O.; Brodie, H. K. H. Signs and Symptoms of Psychiatry, Philadelphia, 1983.
3. Costello, C. G. Ed. Symptoms of Psychopathology, New York, 1970.
4. Kaplan, H. I.; Sadock, B. J. Modern Synopsis of Comprehensive Textbook of Psychiatry–III, Baltimore, 1981.
5. Kolb, L. C.; Brodie, H. K. H. Modern Clinical Psychiatry, Philadelphia, 1982.
6. Masserman, J. H.; Schwab, J. J. The Psychiatric Examination : Serial Handbook of Modern Psychiatry, Vol.I, New York, 1973.
7. Menninger, K. A. A Mannual for Psychiatric Case Study, New York, 1952.
शिरवैकर, र. वै.