मानवाचे स्थलांतर : वास्तव्याचे एक ठिकाण सोडून मानव व्यक्ती किंवा गट दीर्घकाल वास्तव्याच्या हेतूने दुसऱ्या ठिकाणी जातात, या हालचालीस ‘मानवाचे स्थलांतर’(ह्यूमन माइग्रेशन) म्हणतात. व्यवसायाच्या निमित्ताने गावोगाव हिंडणे, विद्यामार्जनासाठी परदेशात काही काळ राहणे, उपनगरातून शहराच्या मुख्य भागात रोज नोकरी–व्यवसायासाठी जाणे या हालचालींना स्थलांतर म्हणता येणार नाही. ‘दीर्घकाळ वास्तव्य’ठरविण्यासाठी किमान एक वर्षाची मर्यादा बहुतेक सर्व देशांमध्ये मानली जाते.

 ऐतिहासिक आढावा : प्रागैतिहासिक मानव स्थलांतर करीत पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, किंबहुना स्थिर वस्ती करून राहणे ही सांस्कृतिक उत्क्रांती मानली जाते आणि गेल्या काही सहस्रकांमध्येच ती घडली असे अभ्यासकांचे मत आहे. ज्ञात इतिहासात आर्य टोळ्यांचे उत्तर यूरोपातून दक्षिणेस व नंतर पूर्वेस आशियात झालेले स्थलांतर (इ.स.पू.सु. तिसरे सहस्रक) ईजिप्तमधून हिब्रू गुलामांचे उत्तरेकडे झालेले स्थलांतर–एक्सोडस–(इ.स.पू.सु. तेरावे शतक) इ.स. सातव्या शतकात अरबांचे इस्लामच्य झेंड्याखाली उ. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत झालेले स्थलांतर ही स्थलांतराची काही महत्त्वाची उदाहरणे सांगता येतात.

 गेल्या चारशे वर्षांमध्ये यूरोपियन लोकांची अमेरिका, ऑस्टेलिया, उत्तर आशिया तसेच आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये स्थलांतर करून आपापल्या वसाहती स्थापन केल्या, यूरोप जगाच्या नकाशावर आले तेसुद्धा रोमन साम्राज्य अस्ताला गेल्यानंतर झालेल्या स्थलांतरामुळेच.

 इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या सुमारास इस्लामच्या एकसंध झेंड्याखाली आफ्रिका व मध्यपूर्वेतील बराचसा भूभाग अरबांनी व्यापला. आठव्या शतकात पूर्वेकडे सिंधू खोऱ्यात, तर पश्चिमेकडे फ्रान्समध्ये स्थलांतरे झाली. दहव्या शतकात खितान या भटक्या जमातीने मंगोलिया व उ. चीनमध्ये स्थलांतर करून प्रभुत्व संपादन केले, तर चौदाव्या–पंधराव्या शतकात तुर्कांनी आशिया मायनरवर प्रभुत्व संपादून कॉन्स्टँटिनोपल काबीज केले (१४५३). सतराव्या शतकात रशियनांनी सैबेरिया पादाक्रांत करून वसाहती स्थापल्या.

 नवनवीन भूप्रदेशांच्या शोधानंतर सुरुवातीच्या काळात साहसी व्यापारी स्थलांतर करू लागले. अनेकविध कामे करण्यासाठी या व्यापाऱ्यांनी द. आफ्रिकेतून सु. एक कोटी गुलाम खरेदी केले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत सु. सहा कोटी यूरोपियनांनी स्थलांतर केले. अमेरिकेत १७९० पर्यंत कित्येक हजार स्पॅनिश होते. १९४७ मध्ये अखंड हिंदुस्थानची फाळणी झाल्यामुळे एक कोटी ऐंशी लाख लोक निर्वासित झाले व त्यांनी त्या त्या देशांमध्ये स्थलांतर केले. प्रजासत्ताक जर्मनीने १ कोटी २० लाख, जपानने ६३ लाख, द. कोरियाने ४० लाख, इस्राएलने १० लाख निर्वासितांना आश्रय दिला.

 प्रकार : एखाद्या देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात केले जाणारे ते ‘देशांतर्गत स्थलांतर’आणि एका देशातून दुसऱ्या देशात केले जाणारे ते ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतर’अशा दोन प्रमुख प्रकारांमध्ये स्थलांतराचा अभ्यास केला जातो. यांशिवाय स्थलांतराचे इतर प्रकार असे : एखाद्या भूप्रदेशावरील सर्वच किंवा बहुसंख्य लोक जेव्हा नैसर्गिक किंवा अन्य आपत्तींमुळे स्थलांतरास प्रवृत्त होतात, तेव्हा त्यास ‘प्राथमिक स्थलांतर’म्हणतात. राजकीय शक्ती किंवा अन्य शक्ती बळाच्या वापराने एखाद्या गटास स्थलांतराची वेळ आणतात त्यास ‘सक्तीचे स्थलांतर’म्हणतात. उदा., गुलाम करण्यासाठी पकडून नेणे, एखाद्या देशाच्या सरकारने हद्दपार करणे इत्यादी. व्यक्ती नावीन्याची ओढ म्हणून किंवा साहस म्हणून स्थलांतर करतात, त्या प्रकारास ‘मुक्त’वा ‘ऐच्छिक स्थलांतर’म्हणतात. बेरोजगार शेतमजूर जवळपासच्या प्रदेशात, पिकांच्या प्रक्रियांनुसार स्थलांतर करतात त्यास ‘हंगामी स्थलांतर’म्हटले जाते उदा., महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात ऊसकापणीच्या हंगामापुरते जवळपासच्या जिल्ह्यांतून येणारे मजूर. एका अप्रगत प्रदेशातून मोठ्या संख्येने प्रगत प्रदेशात स्थलांतर होते त्यास ‘सामूहिक स्थलांतर’ म्हणतात. काही वेळा टप्प्याटप्प्याने स्थलांतराचा ओघ विशिष्ट दिशेने सरकताना आढळतो त्याला ‘साखळी स्थलांतर’म्हणता येईल. उदा.,एखाद्या खेड्यातून तालुक्याच्या गावी, तेथून जिल्हाकेंद्रापर्यंत, तेथून प्रांताची राजधानी (किंवा भारतात मुंबई–कलकत्ता– दिल्लीसारखी महानगरे) अशी ही साखळी दिसू शकते. तसेच या साखळीत प्रथम काही लोक स्थलांतर करतात ते मित्र व नातेवाईकांना स्थलांतरास उद्युक्त करतात ते पुन्हा त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना उद्युक्त करतात. अशा प्रकारे अनेकांचे साखळी स्थलांतर होते.


गेल्या तीन शतकांमध्ये प्रत्येक देशात कमीअधिक प्रमाणात औद्योगिकीकरण होत आहे. औद्योगिक केंद्राजवळ नगराची वाढ होणे आणि ग्रामीण भागातून अशा नगरांकडे स्थलांतराचा ओघ वाहत असलेला आढळणे हे विसाव्या शतकातील सार्वत्रिक दृश्य आहे. स्थलांतराचे प्रमाण एखाद्या देशाच्या आर्थिक प्रगतीचे निर्दशक आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

 अर्वाचीन आंतरराष्ट्रीय स्थलांतर : १९२४ मध्ये यु.एस्. आप्रवासन (इमिग्रेशन) कायदा अंमलात येईपर्यंत यूरोपीय देशांमधून अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर चालूच होते. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक व राजकीय दडपणामुळे स्थलांतरितांची समस्या अधिकच गुंतागुंतीची बनली. १८२१ ते १९३२ या कालखंडामध्ये समुद्रोल्लंघन केलेल्या सु. ५ कोटी ९० लाख लोकांपैकी बहुसंख्य यूरोपियन होते. यातील ९०% लोकांनी अमेरिकेत कायम वास्तव्य केले. जगातील लोकसंख्येच्या १/११ नागरिक मूळचे यूरोपियन परंतु आता अन्य देशांत वास्तव्य करून आहेत. अमेरिका हा सर्वाधिक आप्रवासी (इमिग्रंट्स) स्वीकारणारा खंड, तर यूरोप सर्वाधिक उत्प्रवासी (एमिग्रंट्स) पाठवणारा खंड ठरतो. १८३० मध्ये ब्रिटिश वसाहतींमधून गुलामगिरीचे उच्चाटन झाल्यामुळे अतिपूर्वेकडून होणाऱ्या स्थलांतरावर प्रतिकूल परिणाम झाला. भारत, चीन व जपानमधून यापूर्वी शेतमजूर आणण्यात आले होते.

 याच सुमारास (१८५०–६०) आंतरखंडीय स्थलांतराचे प्रमाण कमी झाले मात्र आंतरविभागीय स्थलांतराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. भारत, पाकिस्तान, चीनमधून ब्रह्मदेश, मलाया, श्रीलंका, बोर्निओ इ. अतिपूर्वेकडील देशांमध्ये उत्प्रवासन वाढले. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अर्जटिना, ब्राझील, व्हेनेझुएला, न्यूझीलंड इ. देशांमध्ये आप्रवाशांचे प्रमाण वाढले.

स्थलांतरणाची प्रमुख लक्षणे : स्थूलमानाने स्थलांतरणाची पुढील लक्षणे सांगता येतील : (१) या प्रक्रियेत तरुण गटाचा सहभाग अधिक असतो. उदा., १९४० साली अमेरिकेत २५–४० वर्षे या वयोगटातील ४०% लोक परदेशीय होते, तर एतद्देशीय केवळ २७% होते. (२) स्थलांतरितांत पुरुषांचे प्रमाण अधिक असते. १८५०–१९२० या दरम्यानच्या स्थलांतरितांपैकी ६०– ७०% पुरुष होते. (३) स्थलांतरितांमध्ये आर्थिक उत्पादन करण्याची क्षमता असणाऱ्यां चे प्रमाण अधिक आढळते. (४) बहुतांश स्थलांतरित हे तरुण वयोगटातील असल्याने ते ज्या देशातून स्थलांतर करतात त्या (उत्प्रवासी) देशातील लोकसंख्येच्या वाढीचा वेग मंदावतो आणि आप्रवासी स्वीकारणाऱ्या देशातील लोकसंख्यावाढीचा वेग वाढतो. उत्प्रवासी देशांमद्ये लहान व वयस्कर गटाचे अधिक लोक राहिल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक होते, तर आप्रवासी देशांमध्ये ते कमी होते. (५) आंतरदेशीय तसेच देशांतर्गत स्थलांतरामुळे आर्थिक प्रगतीचा वेग वाढतो. (६) दुसऱ्या महायुद्धानंतर स्थलांतरितांमध्ये शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कुशल कारागीर मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा प्रकारची स्थलांतरे आप्रवासी देशांच्या आर्थिक प्रगतीस उपकारक ठरली, तर उत्प्रवासी देशांचे या बाबतीत नुकसान झाले. (७) स्थलांतरितांचे वास्तव्य बहुधा शहरी विभागात असल्याने त्यांच्या मुलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिक आढळते.

 स्थलांतरणामागील हेतू व कारणे : स्थलांतरितांचे सामाजिक–सांस्कृतिक संदर्भ महत्त्वपूर्ण असल्याने स्थलांतरणासंबंधी सर्वसाधारण व सर्वमान्य नियम किंवा सिद्धांत ठरविणे अजूनही शक्य झालेले नाही. तरीदेखील स्थूलमानाने अन्नाचा तुटवडा, धार्मिक विटंबना व छळ, राजकीय छळ, साहसाची आवड, अधिक चांगले आर्थिक भवितव्य इ. अनेकविध कारणे स्थलकालपरत्वे स्थलांतरणामागे आढळतात. स्थलांतर ही प्रक्रिया सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक अशा विविध घटकांच्या आंतरक्रियांचा परिपाक असते.

 स्थलांतरणास पोषक घटक : (१) १९५० मधील डच उत्प्रवासनाच्या बाबतीत सामाजिक व मानसिक घटक आर्थिक घटकांपेक्षा महत्त्वाचे होते. (२) परस्पर देशांच्या सांस्कृतिक संरचनेतील भावनिक ओढ अधिक असल्यास स्थलांतर सुलभ होते. (३) स्थलांतरांचा पूर्वानुभन देखील महत्त्वपूर्ण ठरतो. (४) चैतन्यशीलता, महत्त्वाकांक्षी स्वभाव, कार्यक्षमता इ. व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वांच्या घटकांचा स्थलांतराच्या प्रमाणावर तसेच पद्धतीवर निश्चित परिणाम होतो. (५) परस्पर समाजांतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व भाषिक ओढ तसेच भावनिक बांधिलकी यांचा स्थलांतरावर अनुकूल परिणाम होतो. 

स्थलांतराची दिशा ठरविण्यातसुद्धा हे घटक महत्त्वपूर्ण ठरतात. उदा., भाषा व परंपरा यांतील साधर्म्य ब्रिटनमधून राष्ट्रकूल देशांत, स्पेन−पोर्तुगालमधून लॅटिन अमेरिकेत व आयर्लंडमधून अमेरिकेत स्थलांतर होण्यास अनुकूल ठरले.


पूर्वी युद्ध, नैसर्गिक किंवा सामाजिक आपत्ती किंवा उत्पात स्थलांतरास पोषक ठरले, तर आधुनिक काळात आर्थिक व औद्योगिक कारणे अधिक महत्त्वपूर्ण ठरतात. आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या मागास देशांतून विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडते. औद्योगिकीकरणाच्या प्रगतीमुळे कारागिरांची उपयुक्तता संपुष्टात आल्याने यूरोपात मोठ्या प्रमाणात देशांतर्गत स्थलांतरे झालेली आढळतात.

सामाजिक–सांस्कृतिक संदर्भ : आप्रवाशांची ते ज्या देशात जातात त्या देशांच्या लोकजीवनाशी एकात्मता साधली जाणे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे. उभय समाजांतील भिन्नभिन्न संस्कृती, परंपरा, भाषा, धार्मिक व राजकीय संकल्पना यांमुळे एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेत बऱ्याच अडचणी निर्माण होतात. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेसंबंधी थोडेफार संशोधन झाले आहे. परस्पर समाजांतील विविधता किती प्रमाणात असावी ? विलीनीकरण साधावयाचे की एकात्मता ? इ. समस्या संशोधकांसमोर आहेत.

 अपेक्षित एकता साधण्याचे दोन मार्ग दिसून येतात : (१) सामाजिक−सांस्कृतिक बहुलतेच्या (प्ल्यूरॅलिटी) सर्वसाधारण चौकटीवर भर देऊन परस्पर समाजांना एकरूप करण्याचे प्रयत्न करणे आणि (२) स्थलांतरितांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये जोपासून एकात्मता साधण्याचा प्रयत्न करणे.

यूनेस्कोच्या स्थलांतर–तज्ञांच्या मते स्थलांतराचे समाजाच्या विविध अंगोपांगावर दूरगामी परिणाम घडतात. स्थलांतरितांनी त्यांनी स्वीकृत करणाऱ्या समाजात मूलभूत असे कोणतेही बदल न घडविता त्या समाजाच्या संस्कृतीत अनेकविध प्रकारची भर घालून ती संस्कृती अधिक संपन्नच केली.

सामाजिक−सांस्कृतिक वैशिष्ट्ये ही स्थलांतराचे प्रमाण व गती सीमित करतात. आर्थिक कारणांमुळे कोणत्याही देशात ठराविक मर्यादेपर्यंतच स्थलांतर घडू शकते. प्रमाणाबाहेरील स्थलांतरामुळे स्थलांतर करणाऱ्यांना स्वीकृत करणाऱ्या समाजाची मूलभूत मूल्ये व संरचना यांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्थलांतराबाबत विविध कायदेकानू करण्यात येतात. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व स्वित्झर्लंडमध्ये अशीच परिस्थिती उद्‌भवली होती. इझ्रायलच्या बाबतीत तर ही समस्या अधिकच उग्र बनली होती.

 उभय समाजांची एकात्मता साधण्यास विविध घटक कारणीभूत ठरतात. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेतील आप्रवाशांना त्या देशाची सहिष्णुता व साधनसुविधांची उपलब्धता यांमुळे एकात्मता साधणे सुलभ गेले. विषमतेवर आधारित सामाजिक स्तरीकरण व धार्मिक पूर्वग्रह एकात्मतेस बाधा आणतात.

 संपूर्ण कुटुंबच स्थलांतरित झाले, तर कौटुंबिक व सामाजिक पातळीवर मुलांवर होणाऱ्या भिन्न संस्कारांमुळे संघर्षाची शक्यता वाढून एकात्मता साधणे कठीण होते. शहरी संस्कृतीमध्ये मूलतः विभिन्नताच अधिक असल्याने शहरी भागात एकात्मतेची प्रक्रिया अनिवार्य व सुलभ होते.


स्थलांतरित समाजातील तणावांमुळे मानसिक दौर्बल्य वाढण्याची शक्यता असते. आत्महत्येचे प्रमाण वाढते. उदा., ब्रिटनमधील पोलिश निर्वासितांमध्ये उभय समाजांतील सेवासंधीतील दुजाभावामुळे मानसिक दौर्बल्य उद्‌भवलेले बरेच रोगी आढळले.

 आफ्रिकेमधील अत्यंत काटेकोर नियमपद्धतींनी बांधलेला चिरेबंदी आदिम समाज नवीन औद्योगिक आणि नागरी व्यवसायांमुळे बिथरला. कारण त्यामुळे त्यांच्या मुक्त जीवनशैलीवरच आघात झाला विवाह−कुटुंब संस्थांवर विपरीत परिणाम झाले. अत्यावश्यक सुविधांच्या तुटवड्यामुळे स्थलांतरित समाजाच्या समाजस्वास्थ्यावरही विपरित परिणाम होतात.

 आप्रवाशांचे प्रमाण (संख्या), त्यांचे व्यावसायिक स्थान, राजकीय बळ, आर्थिक स्थिती, सांस्कृतिक तफावत यांसारख्या घटकांमुळे स्थानिक व आप्रवासी गटांमध्ये गंभीर समस्या निर्माण होऊन संघर्ष होण्याचीही शक्यता असते. उदा., १९४७ मध्ये पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या निर्वासितांना सामावून घेताना गंभीर व संघर्षमय समस्या निर्माण झाली नाही तथापि आसामात येणाऱ्या बांगला देशातील निर्वासितांमुळे गंभीर समस्या निर्माण झाली. काही ठिकाणी आप्रवाशांच्या विरोधी कडव्या संघटनाही (आर्थिक, राजकीय, धार्मिक इ. कारणांनी) निर्माण होतात आणि समस्या अधिकच बिकट व स्फोटक बनते. उदा., श्रीलंकेतील तमीळ लोकांचा प्रश्न.

पहा : औद्योगिकीकरण नगरे व महानगरे नागरीकरण निर्वासित लोकसंख्या सात्मीकरण, सामाजिक.

 संदर्भ : 1. Groh, G. W. The Black Migration : The Journey to Urben America, New York, 1972.

            2. Hansen, M. L. The Atlantic Migration 16071860, New York, 1964.

            3. Jackson, J. A. Ed. Migration, Cambridge, 1969.

            4. Jansen, C. J. Ed. Readings in the Sociology of Migration, Oxford, 1970.

            5. Kylischer, E. M. Europe on the Move : War and Population Changes, 19171947, London, 1948.

            6. Rose, A. M. Migrants to Europe : Problems of Acceptance and Adjustment, Minneapolis, Minnor, 1969.

            7. Thomas, D. S. Research Memorandum on Migration Differantials, New York, 1938.

मांडके, म. बा.