माते : (मॅटे इं. पॅराग्वे टी, यर्बा मॅटे लॅ. इलेक्स पॅराग्वेन्सिस इ. पॅराग्वेरिएन्सिस कुल ॲक्विफोलिएसी). सु. ६ मी. उंच, लहान, सुगंधी व सदापर्णी वृक्ष. ह्याच्या इलेक्स (इं. हॉली) या प्रजातीत एकूण सु. ४०० जाती असून त्यांपैकी २२ भारतात आढळतात.माते वृक्ष दक्षिण ब्राझील, पॅराग्वे व अर्जेंटिना येथे जंगली अवस्थेत आढळतो व फार प्राचीन काळापासून तद्देशीय लोक (रेड इंडियन) याचा उपयोग करीत आले आहेत. मातेची लागवड मोठ्या प्रमाणावर होते मात्र लागवडीत तो झुडपाप्रमाणे वाढतो. याची पाने साधी, एकाआड एक, अरुंद, लहान देठाची, दातेरी, टोकदार, लंबगोल व १०–१२ (कधी १५–२०) सेंमी. लांब असतात. फुले लहान, पांढरी, चतुर्भागी किंवा पंचभागी, द्विलिंगी असून पानांच्या बगलेत झुपक्यांनी येतात [⟶ फूल]. आठळी फळे गोलसर, सु. ०·५ सेंमी. व्यासाची, लाल आणि चतुर्बीजी असतात. मातेचा समावेश ॲक्विफोलिएसी (इलिकेसी) कुलात केला असून ⇨ सेलॅस्ट्रेसी किंवा ज्योतिष्मती कुल व ॲक्विफोलिएसी कुल या दोन्हींचा अंतर्भाव सेलॅस्ट्रेलीझ गणात करतात. जे.सी. विलिस यांनी इलेक्स, नेमोपँथस व फेलिने ह्या प्रजाती व सु. ५०० जाती ॲक्विफोलिएसीत घातल्या आहेत. इलेक्स प्रजातीतील काही जाती बागेत शोभेकरिता लावतात.
मातेच्या अभिवृद्धीकरिता (लागवडीकरिता) प्रथम बी रुजवून रोपे बनवितात व सु. १·५–२ वर्षांनी ती बाहेर काढून लागवड करतात. सुमारे ३–५ वर्षांनी पानांची तोडणी करतात. त्यानंतर सु. २५–३० वर्षांपर्यंत पानांचे वाढते पीक मिळत राहते मात्र यामुळे झाडाचा आकार झुडपासारखा लहान राहतो. फळे पक्व होते वेळी फांद्या काढतात व विस्तवावर थोडा वेळ भाजतात. त्यानंतर पाने काढून ती मंदाग्नीवर सपाट आधारावर ठेवून २४–३६ तास सुकवितात. त्यानंतर त्यांची भरड पूड करून पोत्यात भरतात. ती पोती सुरक्षित खोलीत ओलावा न लागू देता पक्कापणा आणण्यास साधारणपणे वर्षभर ठेवतात. झाडाच्या वयोमानानुसार प्रत्येक झाडापासून १०–४० किग्रॅ. व्यापारी ‘माते चहा’ पूड मिळते.
चहा, कॉफी व कोको यांच्या खालोखाल माते चहाचे महत्त्व मानतात. चहाप्रमाणे माते चहा बनवितात. काही लोक त्यात लिंबाचा रस घालून पितात. दक्षिण अमेरिकेतील लाखो लोक माते चहाच पितात तो पिताना चांदीची, पितळेची किंवा गवताची नळी वापरतात. त्याला हिरवट रंग असून चांगला स्वाद येतो तो थोडा कडवट, परंतु उत्तेजक व आरोग्य पुनःस्थापक असतो, तो पोषक व सौम्य विरेचन आणि चहापेक्षा कमी स्तंभक (आकुंचन करणारा) असून त्यामुळे जठरविषयक तक्रारी उद्भवत नाहीत संधिवातावर तो हितकारक असतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत तो सौम्य पेयांत घालतात. माते चहाचा स्वाद व सुवास पाने जमविली त्या वेळेवर अवलंबून असतो. फळे जवळजवळ पक्व होतात त्या वेळच्या फांद्यांवरील पानांत जास्तीत जास्त सुवास आढळतो. पानांत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल व थोडे टॅनीन असते. व्यापारी माते चहात सरासरीने पुढील द्रव्ये (प्रतिशत) आढळतात : जलांश ६·९०–१०·४०, कॅफीन ०·५८–१·६४, टॅनीन ७·८–१०·९८, राख ६·०९–७·३८. यांशिवाय यात साखर (६%), नायट्रोजनयुक्त पदार्थ (२%), मेद, मेण व बाष्पनशील तेल (०·०८%), स्टार्च, राळयुक्त पदार्थ व जीवनसत्त्वेही असतात.
कॅफीन मिळविण्याकरिता याची पाने वापरतात. पानांचा उपयोग व्यापारी प्रमाणावर हरितद्रव्य मिळविण्याकरिता करतात. लाकडाखेरीज इतर भागांत (पाने, खोड, साल, बी व मुळे यांत) कॅफीन असते मात्र ह्याचे प्रमाण चहातल्यापेक्षा कमी असते.
पानांपासून काढलेल्या मेणाचा उपयोग सौंदर्यप्रसाधनांत करतात. इ. वाइटियाना या जातीचे वृक्ष दक्षिण भारतातील टेकड्यांत आढळतात त्यांचे लाकूड चहाची खोकी बनविण्यास वापरतात.
संदर्भ : 1. C. S. I. R The Wealth of India, Raw Materials, Vol. V, New Delhi, 1959.
2. Hill, A. F. Economic Botany, Tokyo, 1952.
परांडेकर, शं. आ.