माणिक्कवाचगर : (सु. सातवे शतक). तमिळ शैव मताच्या त्रेसष्ट ⇨ नायन्मारांमधील जे चार नायन्मार शैव मताचे श्रेष्ठ अध्वर्यू मानले जातात, त्यांतील एक अघ्वर्यू माणिक्कवाचगर हा होय. हे चार श्रेष्ठ अघ्वर्यू तमिळ शैवांचे ‘समयाचार्य’ म्हणून प्रख्यात आहेत. माणिक्कवाचगर हा कुशल राजनीतिज्ञ व मदुराई येथील पांड्य राजा वरकुण्णन् वा अरिमर्दन याचा प्रमुख मंत्री होता. त्याचे मूळ नाव ‘वादपूरर’ असे होते परंतु शिवभक्त झाल्यानंतर त्याने भक्तीने प्रेरित होऊन काव्यरचना केली, म्हणून त्याला ‘माणिक्कवाचगर’ (म्हणजे माणिक ह्या रत्नासारखी वाणी असलेला) ह्या उपाधीने संबोधिले जाऊ लागले. प्रमुख मंत्री असताना त्याला उपरती झाली आणि सर्वसंगत्याग करून तो परम शिवभक्त बनला.
शेक्किळार नावाच्या एका शैव संताने पेरियपुराणम् नावाचा एक काव्यसंग्रह रचला असून त्यात त्रेसष्ट नायन्मारांची चरित्रे वर्णिली आहेत. त्यात माणिक्कवाचगर यातीही चरित्रपर माहिती आली आहे. पेरियपुराणम् हा तमिळ शैवांचा पवित्र ग्रंथ मानला जातो. तमिळ शैवांच्या धार्मिक साहित्यात १४ शास्त्रे, १८ चरित्रे वा पुराणे आणि १२ स्तोत्र वा भक्तिगीत–संकलने यांचा समावेश होतो.यांतील १२ स्तोत्र वा भक्तिगीत-संकलने ‘तिरुमुरै’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ही स्तोत्रे नंबी-आंडार-नंबी (सु. दहावे-अकारावे शतक) नावाच्या शिवभक्तीने ११ ‘तिरुमुरैं’ मध्ये म्हणजे पवित्र ग्रंथांत संकलित केली. बारावे तिरुमुरै म्हणून शेक्किळारच्या पेरियपुराणम्ला स्थान मिळाले. ही तिरुमुरै कर्नाटक संगीतात बद्ध असून ती तामिळनाडूतील प्रमुख शिवमंदिरांतून भाविक मोठ्या श्रद्धेने दैनंदिन प्रार्थना म्हणून गातात. यांतील आठवे तिरुमुरै हे एकट्या माणिक्कवाचगर याच्या रचनांचे असून त्यात तिरुवाचगम् आणि तिरुक्कोवैयार अशा दोन स्तोत्ररचना समाविष्ट आहेत. तिरुवाचगम्मध्ये ६५६ स्तोत्रे असून ती अत्यंत लोकप्रिय आहेत. माणिक्कवाचगर याची शिवभक्ति गुरूच्या प्रती असलेल्या शिष्याच्या भक्तीसारखी आहे. म्हणूनच त्याचा शिवभक्तिमार्ग ‘सन्मार्ग’ म्हणून प्रसिद्ध आहे. उपास्य दैवत शिवाच्या ठिकाणी व्यक्त झालेल्या कवीच्या नम्रतापूर्ण भक्तिभावनेचे त्यांत ठायी ठायी दर्शन घडते. रेव्ह.जी. यू. पोप यांनी तिरुवाचगम्चे इंग्रजीत भाषांतरही केले आहे. त्यांच्या मते या ग्रंथीतील ‘शिव’ हा देवतावाचक शब्द वगळला, तर त्यातील आशय व आध्यात्मिक विचार जगातील सर्व धर्मांना लागू पडतील असे आहेत. तमिळनाडूत ह्या स्तोत्रांबद्दल एक म्हणच रूढ झाली आहे. ‘तिरुवाचगम्मधील स्तोत्रांनी ज्याचे अंतःकरण हेलावत नाही त्याचे अंतःकरण कशानेही हेलवणार नाही.’ म्हणजे त्याचे अंतःकरण दगडच म्हणावे लागेल, अशा अर्थाची ती म्हण आहे. तिरुक्कोवैयारमध्ये ४०० स्तोत्रे असून ती तमिळमधील पारंपरिक प्रेमपर काव्याच्या शैलीत रचली आहेत. वेण्प्पा, असिरियप्पा, कलिप्पा यांसारख्या मधुर छंदांत ती स्तोत्रे रचली गेली आहेत. ह्या दोन्हीही रचनांतील स्तोत्रे भक्तिभावनेने ओतप्रेत असून त्यांत सखोल आध्यात्मिक अनुभूती, रुपकात्मकता व गूढगुंजनपरता उत्कट काव्यरूप घेऊन व्यक्त झाली आहे. संगीतात ती बद्ध असल्याने तमिळनाडूतील अनेक शैव मंदिरांतून ती (विशेषतः मार्गशीर्ष महिन्यात) दैनंदिन प्रार्थनेत गायिली जातात. आध्यात्मिक प्रेरणेतून झालेला भक्तिभावनेचा उदात्त, उत्स्फूर्त व सुंदर असा काव्यमय आविष्कार असे ह्या स्तोत्रांचे स्वरूप आहे. तमिळनाडूत ही स्तोत्रे अनेकांच्या नित्यपाठात असून त्यांना आदराचे स्थान आहे. तमिळ साहित्याचा ही स्तोत्रे अमोल व चिरंतन ठेवा मानली जातात.
संदर्भ : 1. Kingsbury, F. Philips, G. E. Hymns of the Tamil Saivite Saints, Calcutta, 1921.
2. Pope, G. U. The Tiruvasagam, Oxford, 1900.
वरदराजन्. मु. (इं.) सुर्वे, भा.ग. (म.)