माताहारी : (७ ऑगस्ट १८७६–१५ ऑक्टोबर १९१७). एक जगप्रसिद्ध स्त्री-हेर. पहिल्या महायुद्धात तिने जर्मनांकरिता गुप्तहेरगिरी [⟶ हेरगिरी] केल्याबद्दल ती जागतिक ख्यातीची स्त्री-हेर ठरली. देहिक सैंदर्य व लैंगिक आकर्षक या गुणांचा तिने आपल्याकामी भरपूर उपयोग केल्याचा प्रवाद आहे. उलटसुलट ज्ञात माहितीवरून ती केवळ एक जर्मन हेर होती तथापि प्रत्यक्षात तिने हेरगिरी अत्यल्प केली आणि आर्थिक स्वारस्यासाठी देहविक्री चालविली, असा समज रुढ आहे. माताहारीबद्दल विश्वासार्ह अशी माहिती मिळत नाही. एवढे खरे, की तिच्याबद्दल बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत, माताहारीच्या काळातील मार्था रीशे या फ्रेंच स्त्री-हेराच्या तुलनेत माताहारी अगदी यःकश्चित ठरते.
माताहारीचा जन्म नेदर्लंड्समधील लेयूव्हार्डन या गावी झाला असून तिचे मूळ नाव मार्गारेटा झेले असे होते. तिची आई डच नसून जावा द्विपीय (इंडोनेशिया) होती असेही म्हटले जाते. तिच्या स्वतःच्याच सांगण्यावरून तिची आई दक्षिण भारतीय देवदासी असून ती शिव भक्त होती असे दिसते. घनदाट काळ्या केशसंभारामुळे माताहारीचे भारतीयत्व विश्वासार्ह वाटते.
नेदर्लंड्समध्ये शालेय शिक्षण झाल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी तिचा विवाह चाळीस वर्षीय कॅप्टन मक्लाउड याच्याशी झाला. विवाहानंतर मक्लाउड दांपत्य ईस्ट इंडीजला गेले. तेथे ते असताना धार्मिक नृत्याच्या नावाखाली मार्गारेटा (माताहारी) लैंगिक वासना प्रदीप्त करणारे नृत्यप्रकार शिकली. १९०३ साली नेदर्लंड्सला परतल्यावर मक्लाउडने तिच्यावर सोडचिठ्ठीचा दावा दाखल केला. सोडचिठ्ठी मिळाल्यानंतर तिने ‘माताहारी’ म्हणजे ‘प्रभात नेत्र’ हे मॅले भाषेतील नाव धारण केले व ती लंडन, बर्लिन, पॅरिस इ. राजधान्यांतील श्रीमंत तसेच उच्च अधिकाऱ्यांच्या निवडक वर्तुळामध्ये नृत्य करू लागली. जारसंबंध ठेवण्यासही तिने प्रारंभ केला. एक अद्वितीय पौर्वात्य नर्तिका म्हणून ती तेथे विख्यात झाली. १९१४ मध्ये ती बर्लिनला आली. तेथे तिचे संबंध एक जर्मन राजकुमार व जर्मन हेरगिरी संघटनेचा प्रमुख फोन योगोव याच्याशी जुळले. याच सुमारास हेरगिरी करण्यास तिने अनुमती दिली. हेरगिरी करण्याचे कारण वास्तविक आर्थिक होते. १९१५ साल तिने नेदर्लंड्समध्ये काढले. तेथेही तिचे अनेक जारसंबंध होते. आयुष्याच्या शेवटच्या दोन वर्षांत व्हॅन दर कॅपेलान या श्रीमंत डच अमीराने तिचा योगक्षेम चालविला. १९१५ मध्ये ब्रिटिश गुप्तहेरखात्याला माताहारीविषयी संशय आला. त्या खात्याने फ्रान्सच्या गुप्तहेरखात्याच्या कॅप्टन लॅडाउक्स यास माताहारीबद्दल कळविले. ती हेर नसावी असे लॅडाउक्सला वाटत असले, तरी त्याने तिच्यावर पाळत ठेवली. युद्धक्षेत्रात असलेल्या एका रशियायी प्रियकाराला भेटण्याची तिने परवानगी मागितली तेव्हा फ्रान्सच्या वतीने हेरगिरी करण्यास तिला लॅडाउक्सने सांगितले. त्यासाठी १० लक्ष फ्रँक रकमेची तिने मागणी केली. ती जर्मन हेर आहे किंवा नाही ह्याचा शोध करताना ती जर्मन हेर असावी असा लॅडाउक्सला संशय आला, परंतु ब्रिटिश हेरखात्याला ती हेर नाही हे पटले. पुढे माद्रिदमध्ये असताना तिचे जर्मन अधिकाऱ्याशी संबंध आले. नर्तिकेची भूमिका वठविणे वयोमानामुळे तिला जमेना. फ्रान्सच्या मोरोक्कोत जर्मनी आपले सैन्य उतरविणार आहे. अशी जुजबी गुप्तवार्ता तिला जर्मन अधिकाऱ्याकडून कळली. ही वार्ता माद्रिदमधील फ्रेंच दूताला न कळविता तिने एकदम पॅरिसच्या खात्याला कळविली. त्यामुळेही तिचा हेरगिरीचा वकूब कळून आला. तिच्या राष्ट्रनिष्ठेबद्दलही संशय निर्माण झाला. आर्थिक तंगीमुळे तिने देहविक्री सुरु केली. जानेवारी १९१७ मध्ये ती पॅरिसला परतली. तेथेच १३ जानेवारी रोजी शत्रुराष्ट्राकरिता हेरगिरी केल्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत तिने स्वतःच्या पूर्वायुष्याची माहिती दिली नाही. १९१४ ते १९१७ या काळातील हालचाली व संबंध याविषयीही तिने असंबद्ध आणि परस्परविरोधी माहिती सांगितली. तिच्या अंगावर पाऱ्याचे ऑक्सिसायनाईड हे गुप्तशाईरसायन सापडले. गर्भनिरोधासाठी ते ठेवले होते, या तिच्या स्पष्टीकरणावर कोणीच विश्वास ठेवला नाही. पहिल्या महायुद्धात गुप्तहेर असल्याच्या केवळ संशयावरून फाशी देण्याची प्रथा होती. प्रत्यक्ष हेरगिरी केली काय किंवा हेरगिरीत शत्रुराष्ट्राला काही महत्त्वाची वार्ता कळविली काय, याबद्दल शोध घेण्याची तसदी घेतली जात नसे. जर्मन हेरखात्याने माताहारीला दिलेले सांकेचिक नाव एच्-२१ असे होते. तिने जर्मनीला पुरविलेल्या गुप्तवार्तांमुळे दोस्तराष्ट्रांचे ५०,००० सैनिक गारद झाले असावे, तसेच जर्मन अधिकाऱ्याकडून तिला पैसे मिळत होते, अशा कच्च्या पुराव्यावरून तिला फाशीची शिक्षा झाली. त्याप्रमाणे १५ ऑक्टोबर १९१७ रोजी व्हिन्सेंझ येथील दुर्गाच्या खंदकात तिच्यावर गोळी झाडण्यात आली व ती मृत्युमुखी पडली.
संदर्भ : Franklin, Charles, Spies of the 20th Century, London, 1967.
दीक्षित, हे. वि.
“