मांस उद्योग : अन्नासाठी मारल्या जाणाऱ्या प्राण्यापासून मिळणाऱ्या सर्व खाण्यालायक पदार्थांना मांस म्हणून संबोधण्यात येते. व्यावाहारिक अर्थाने जरी स्नायू व त्याबरोबर येणारी चरबी याला मांस म्हणण्याची प्रथा असली, तरी स्नायूबरोबर येणारे कंडरा (स्नायू हाडांना घट्ट बांधणारे तंतुसमूह), बंधनी (हाडांना एकत्र जोडणाऱ्या बळकट व तंतुमय पट्ट्या) व हाडे यांचाही त्यात समावेश करतात. पाश्चात्त्य देशांमध्ये अन्नासाठी पाळलेल्या पक्ष्यांचे मांस किंवा समुद्रामधून मिळणारे खाद्य मत्स्य व तत्सम खाद्यपदार्थ यांचा निराळा उल्लेख करण्याची प्रथा आहे परंतु भारतामध्ये मांसाहारामध्ये या सर्व पदार्थांचा समावेश करतात. इतकेच नव्हे, तर सामान्यपणे अन्नासाठी मारल्या जाणाऱ्या प्राण्यापासून मिळणाऱ्या सर्व खाण्यालायक पदार्थांचा मांसाहारात समावेश होतो. दुधाला ज्या अर्थाने पूर्णान्न म्हणतात त्या अर्थाने मांसाला प्रथिनांच्या बाबतीत पूर्णान्न म्हणावयास हरकत नाही कारण मनुष्याच्या शरीरपोषणासाठी लागणारी सर्व ⇨ ॲमिनो अम्ले त्यातील प्रथिनांपासून उपलब्ध होतात. काही देशांमध्ये ससे, घोडे व हरिण यांचे मांस नियमितपणे खाल्ले जाते. एस्किमो लोक सील, वॉलरस व कॅरिबू (रेनडिअर) यांचे मांस खातात तर मध्य आफ्रिकेतील लोक मिळेल तेव्हा गेंडा, पाणघोडा (हिप्पोपोटॅमस) व हत्ती यांचे मांस खातात. प्रस्तुत नोंदीमध्ये अन्नासाठी सातत्याने पाळल्या जाणाऱ्या सस्तन जनावरांच्या मांसासंबंधीची माहिती प्रमुख्याने दिलेली आहे.
इतिहास : रानटी अवस्थेतील मानव शिकार करून आपली उपजीविका मारलेल्या प्राण्याच्या कच्च्या अगर शिजवलेल्या मांसावर करीत असे. शेती करण्याची कला अवगत झाल्यावर तो टोळ्या-टोळ्यांनी राहू लागला आणि निकटच्या सान्निध्यामुळे काही प्राणी माणसाळविण्यात आले. त्यांत सर्व प्रथम कुत्रा माणसाळला गेला व त्याचे मांसही खाण्यात येत असे. अश्मयुगापासून (५०,००० वर्षां पूर्वी) ते ब्राँझ युगापर्यंतच्या काळात (इ.स.पू. २००० वर्षे) कुत्रा, मेंढी, गाय, घोडा, डुक्कर व शेळी ही जनावरे मांसासाठी वापरण्यात येत असत. कुत्रा आणि घोडा यांचा अन्य कारणांसाठी उपयोग होऊ लागल्यावर गायीगुरे, शेळ्या-मेंढ्या व डुकरे ही जनावरे आणि कोंबड्या यांचा मांसासाठी वापर करण्यात येऊ लागला. इस्लाम व ज्यू धर्मशास्त्रांप्रमाणे डुकराचे मांस निषिद्ध मानले गेले. इतकेच नव्हे, तर हलाल, झटका, कोशर अशा कत्तल करण्याच्या पद्धतीही विभिन्न होत गेल्या [⟶ खाटीकखाना]. जनावरांची कत्तल करणे व चिरफाड करून त्यांचे मांस जनतेला उपलब्ध करून देणाऱ्या लोकांची खाटीक जमात अस्तित्वात आली. या जमातीची एक संघटना ११७९ सालात. अस्तित्वात असल्याचा यूरोपातील पुरावा उपलब्ध आहे. तसेच १२४८ मध्ये स्वित्झर्लंडमधील बाझेल या गावचे बिशप ल्यूटोल्ड यांनी विक्रीकरिता उपलब्ध मांस कसे असावे याची शहानिशा केल्याचा उल्लेख आहे. असे असले, तरी सार्वजनिक खाटीकखाने अस्तित्वात आले नव्हते. विल्यम पिनचन यांनी १६४० मध्ये अमेरिकेत स्प्रिंगफील्ड गावाजवळ पहिला खाटीकखाना बांधला. फ्रान्समध्ये १८१८ मध्ये पाच सार्वजनिक खाटीकखाने उघडण्यात आले. हळूहळू पशुसंवर्धन, पशुप्रजनन, पशुरोगविज्ञान इ. शास्त्रांत प्रगती होत जाऊन खास मांसोत्पादनासाठी पाळल्या जाणाऱ्या गुरांच्या, मेंढ्यांच्या व डुकरांच्या जाती निर्माण करण्यात आल्या. खाटीकखान्यात एका जागी रोज हजारो जनावरांची कत्तल होऊ लागल्यावर उपलब्ध होणारा मांसाचा साठा टिकविणे किंवा संस्कारित करून मांस गिऱ्हाईकापर्यंत सुस्थितीत पोहोचविणे हा एक उद्योगच अस्तित्वात आला.
एकोणिसाव्या शतकात शीत तापमानाचा उपयोग करून शीतकोठ्या किंवा प्रशीतक (रेफ्रिजरेटर) अस्तित्वात येण्यापूर्वी मांसात मीठ घालूनच ते परिरक्षित केले जाई. असे परिरक्षित गायीगुरांचे व डुकराचे मांस अमेरिकेतून वेस्ट इंडीजला पिनचन यांनी बांधलेल्या खाटीकखान्यातून पाठविण्यात येऊ लागले. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर जिवंत जनावरांची निर्यात करणे हेच मांस व्यापाराचे स्वरूप होते. ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे १८६१ मध्ये मांस शीत करण्याची व्यवस्था करण्यात आली व १८८० मध्ये तेथून प्रथमतः गोठविलेल्या मांसाची लंडनला निर्यात करण्यात आली. मांस परिरक्षित करण्याच्या तंत्रज्ञानात सुधारणा होऊ लागली व त्याचबरोबर मांसाच्या चवीकडेही लक्ष पुरविले जाऊ लागले. त्या दृष्टीने कोणत्या जनावराच्या कोणत्या भागावरील मांसाचा कुठल्या मांस पदार्थामध्ये समावेश करावा याबाबतच्या आवडीनिवडी आकार घेऊ लागल्या. साहजिकच मांस उद्योगातील लोक त्याकडे लक्ष पुरवू लागले व एकाच जनावराच्या अंगावरील निरनिराळ्या भागांवरील मांसाला निरनिराळी नावे देण्यात आली व त्यानुसार पुरवठा करण्याची मांस उद्योगाचा व्याप वाढत गेला.
स्नायूंची रचना : तत्त्वतः स्नायू म्हणजेच मांस. जनावराच्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू असतात: (१) पचन तंत्रातील (पचन संस्थेतील) व इंद्रियांतील अनैच्छिक स्नायू, (२) ह्रदयाचे अनैच्छिक स्नायू व (३) कंकालाशी (हाडांनी बनलेल्या सांगाड्याशी) संबंधित ऐच्छिक स्नायू. स्नायू स्नायुतंतूंचे बनलेले असतात व स्नायुतंतूं स्नायुकोशिकांचे (स्नायुपेशींचे) बनतात. स्नायुतंतूभोवती एक आवरण असते, त्यास परिस्नायुकला म्हणतात. स्नायुकोशिका संयोजी ऊतकाच्या (जोडण्याचे कार्य करणाऱ्या कोशिकांच्या समूहाच्या) जाळ्यात गुरफटलेल्या असतात व वस्त्रामधील उभ्या धाग्याप्रमाणे असलेले स्नायुतंतूही संयोजी ऊतकाच्या साहाय्याने छोट्या छोट्या जुडग्यांच्या स्वरूपात एकत्रित धरलेले असतात. अशा अनेक जुडग्यांचे गठ्ठे एकत्रित होऊन त्याचा स्नायू बनतो. स्नायूतील संयोजी ऊतक दोन प्रकारचे असते : (१) पिवळ्या धाग्याचे व (२) पांढऱ्या धाग्याचे. पिवळ्या धाग्यामध्ये इलॅस्टीन हे प्रथिन असते. हे धागे लवचिक व चिवट असतात आणि मांस शिजवल्यानंतरही ते रबरासारखे राहतात. पांढऱ्या धाग्यात कोलॅजेन हे प्रथिन असते व पाण्यात शिजवल्यावर ते मऊ पडते आणि त्याचे जिलेटिनामध्ये रूपांतर होते. स्नायूमध्ये चरबी असते व ती तेलाच्या बिंदुकांच्या स्वरूपात असते.
स्नायुतंतूंच्या जुडग्यांचे आकारमान एकाच जनावराच्या निरनिराळ्या भागांतील स्नायूंच्या बाबतीत तसेच निरनिराळ्या जातींमध्ये वेगवेगळे असते. मांसाचा पोत त्यातील लहान मोठ्या जुडग्यांचे आकारमान व त्यातील संयोजी ऊतकाचे प्रमाण यांवर अवलंबून असतो. स्नायुतंतूंची संख्या जनावराच्या वयाबरोबर वाढत नाही, तर त्याची जाडी व लांबी वाढत जाते. तसेच ज्या स्नायूंचा उपयोग जास्त केला जातो, त्यांतील स्नायुकोशिकांच्या भित्ती जाड व संयोजी ऊतक घट्ट बनते म्हणून अशा स्नायूमध्ये ताठरपणा जास्त दिसून येतो. मांसाकरिता गलेलठ्ठ करण्यात येणाऱ्या जनावरातील चरबीचे बिंदुक संख्येने व आकारमानाने वाढत जातात. ही चरबी खाद्यातील चरबीसदृश असते व तिचा रंग पशूंच्या निरनिराळ्या जाती, अभिजाती (अस्सल जाती), वय यांवर अवलंबून असतो. दुधाळ गायीमधील चरबी पिवळट रंगाची तर मांसाकरिता वाढवलेल्या गायीची पांढरी असते. चरबीचे स्नायूमध्ये कमीअधिक प्रमाणात निक्षेपण (साचत जाण्याची क्रिया) होत असते. स्नायुतंतूंमध्ये तसेच त्यांच्या जुडग्यामध्ये होणाऱ्या चरबीच्या निक्षेपणामुळे मांसामध्ये चरबी विखुरल्यासारखी दिसते. या विखुरण्याला ‘मार्बलिंग’ म्हणतात. मार्बलिंगमुळे स्नायूच्या आतील भागात ओलसरपणा (ओशटपणा) राहतो आणि मांसाला मऊपणा व रसाळपणा येतो. शिवाय चरबीमध्ये विरघळणाऱ्या गंधद्रव्यामुळे मांसाला स्वाद येतो. निरनिराळ्या ठिकाणांच्या स्नायूंमध्ये चरबीचे प्रमाण १० ते ४०% असते. सर्वसाधारणपणे कलेवराच्या (शवाच्या) वजनाच्या १० ते २०% त्यातील हाडांचे वजन असते. गलेलठ्ठ पशूमध्ये हाडांचे वजन १०%, तर रोडावलेल्या पशूमध्ये २०% किंवा क्वचित अधिक असते.
मांसाचे पोषणमूल्य : मासातील पोषकद्रव्यांचे पृथ्क्करण केल्यास असे दिसून येते की, निरनिराळ्या जातींच्या पशूंच्या मांसात, तसेच एकाच जनावराच्या निरनिराळ्या ठिकाणच्या मांसातील पोषकद्रव्यामध्ये थोडाफार फरक आढळून येतो.
कोष्टक क्र. १ मध्ये गायीगुरांचे, गोवत्स (मांसाकरिता मुद्दाम वाढविलेल्या वासरांचे व्हील), म्हशीचे, कोकराचे, डुकराचे, शेळीचे व कोंबड्याचे मांस यांतील पोषकद्रव्यांची सरासरी आकडेवारी दिलेली आहे. चरबीचे प्रमाण कमी असलेल्या जागीचा मांसाची तुकडा घेतल्यास त्यात प्रथिनांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. मानवाच्या शरीरपोषणास लागणारी प्रथिने, ब गटातील जीवनसत्त्वे व काही खनिजे (विशेषतः लोह) यांचा पुरवठा मांसामधून भरपूर प्रमाणात होतो. मांसातील चरबी ट्रायग्लिसराइडाच्या (ग्लिसरॉल व वसाम्ले यांच्या मिश्रणाच्या) स्वरूपात असते. सस्तन प्राण्यांच्या मांसामध्ये उपलब्ध होणारी स्टिअरीन ही वसा (स्निग्ध पदार्थ मांदे) अन्यत्र कोठेही उपलब्ध होऊ शकत नाही. याशिवाय ओलेइक व पामिटिक वसाम्ले मांसापासून मिळतात. अगदी ताज्या मांसामध्ये ग्लुकोज व ग्लायकोज थोड्या प्रमाणात असते हे खरे पण कत्तलीनंतर शवकाठिण्य आल्यावर त्यांचे लॅक्टिक अम्लामध्ये रूपांतर होते. त्यामुळे बाजारी मांसामध्ये कार्बोहायड्रेटांचे प्रमाण १% पेक्षाही कमी असते.
मांसामध्ये ब गटातील जीवनसत्त्वांचे प्रमाण बरेच असते. हे प्रमाण जनावराची जात, वय, त्याला देण्यात येणारे खाद्य, लठ्ठपणा आणि मांसाची जागा यांवर अवलंबून असते. इतर जनावरांच्या मांसापेक्षा डुकराच्या मांसात थायामिनाचे प्रमाण ५ ते १० पट अधिक असते. गोवत्स मांसामध्ये गोमांसापेक्षा अधिक जीवनसत्त्वे असतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत त्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यातील जीवनसत्त्वांवर त्यांच्या मांसातील जीवनसत्त्वांचे प्रमाण अवलंबून असत नाही पण डुकराच्या बाबतीत ते तसे असते.
कोष्टक क्र. १ मांसातील पोषकद्रव्ये (मध्यम प्रतीची चरबी असलेल्या १०० ग्रॅ. वजनाच्या कच्च्या मांसातील) |
|||||||
पोषक द्रव्ये |
गायीगुरे |
गोवत्स |
म्हैस |
कोकरू |
डुक्कर |
शेळी |
कोंबडी (ब्रॉयलर) |
पाणी % ऊर्जा(कॅलरी) प्रथिने (ग्रॅ.) चरबी (ग्रॅ.) राख (ग्रॅ.) कॅल्शियम (मिग्रॅ.) फॉस्फरस (मिग्रॅ.) लोह (मिग्रॅ.) थायामीन (मिग्रॅ.) रिबोफ्लाविन (मिग्रॅ.) निॲसीन (मिग्रॅ.) |
६० २७३ १७·५ २२ ०·९ १० १५० २·६ ०·०८ ०·१६ ४·२ |
६० १९० १९·१ १२ १ ११ १९३ २·९ ०·१४ ०·२५ ६·४ |
७८·७ ८६ १९·४ ०.९ १ ३ १८९ – – – – |
५५·८ ३१७ १५·७ २७·७ ०८ ९ १५७ २·४ ०·१४ ०·२० ४·५ |
४२ ४५७ ११·९ ४५ ०·६ ७ ११७ १·८ ०·५८ ०·१४ ३·१ |
७४·२ ११८ २१·४ ३·६ १·१ १२ १९३ २·५ ०·१८ ०·२७ ६·८ |
७१·२ १५१ २०·४ ७·२ १·१ १४ २०० १·५ ०·०८ ०·१६ १०·२ |
अ आणि क ही जीवनसत्त्वे मात्र अत्यल्प प्रमाणात असतात. मांसामधील जीवनसत्त्वे बऱ्याच अंशी स्थिर स्वरूपात असल्यामुळे शिजविण्याच्या कृतीत वा संस्करणातील क्रियांमुळे त्यांचा फारसा नाश होत नाही. यकृत व वृक्क (मूत्रपिंड) यांमध्ये इतर ठिकाणच्या मांसापेक्षा अधिक जीवनसत्त्वे असतात व शिजवण्याच्या कृतीमध्ये ती पाण्यामध्ये उतरतात पण नष्ट होत नाहीत.
खनिजांपैकी कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांचे प्रमाण मांसामध्ये चांगले असते तर सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियाम यांचे बऱ्यापैकी असतेआणि ॲल्युमिनियम, कोबाल्ट, तांबे, मँगॅनीज व जस्त ही शेषमूलद्रव्ये पोषणाच्या दृष्टीने महत्त्व असावे इतपत असतात. यकृत, वृक्क व प्लीहा (पानथरी) यांसारख्या ताज्या इंद्रियांमध्ये फॉस्फरस व लोह यांचे प्रमाण ताज्या मांसापेक्षा अधिक असते. मांसातील ९५% लोह मायोग्लोबिन या प्रथिनामध्ये असते. कोलेस्टेरॉलाचे प्रमाण कमी असले, तरी सर्व जानावरांच्या मांसामध्ये ते असते. कोलेस्टोरॉल तसेच किंवा वसाम्लाशी एस्टरीकरण झालेल्या संयुगांच्या स्वरूपात असते. हृद्रोगाच्या बाबतीत या वसाभाचे (वसासदृश पदार्थाचे) महत्त्व कळून आले आहे. मांसामध्ये काही हॉर्मोने (उत्तेजक स्त्राव) वसाभ स्वरूपात असतात पण हे प्रमाण कुठल्याही प्रकारे धोकादायक असत नाही. अलीकडे मांसदायी जनावरे लवकर लठ्ठ करण्यासाठी हॉर्मोनांचा पशुखाद्यात (विशेषतः कोंबड्यांच्या खाद्यात) उपयोग केला जातो. त्यांचा वाजवीपेक्षा अधिक उपयोग केल्यास मांसामध्ये हॉर्मोनांचे प्रमाण अधिक होऊन ते अपायकारक ठरण्याचा संभव नाकारता येणार नाही.
कोणत्याही खाद्यपदार्थाचे पोषणमूल्य त्यातील पोषणद्रव्यांवर अवलंबून आहेच. तथापि या पोषणद्रव्यांतील किती सहज पचनीय आहेत यावरही अवलंबून आहे. मांसाचे पचन हळूहळू होत असले, तरी त्यातील २५% प्रथिने व ९६% चरबी पचनीय आहे आणि याच कारणासाठी वनस्पतिजन्य प्रथिनांपेक्षा मांसापासून मिळणारी प्रथिने कमी प्रमाणात लागतात. म्हणून त्यांना पहिल्या वर्गातील व वनस्पतिजन्य प्रथिनांना दुसऱ्या वर्गातील प्रथिने म्हणतात.
चविष्टपणा : मांसाचा चविष्टपणा त्याचा स्वाद व वास, रंग कोवळेपणा व रसाळपणा यांवर अवलंबून असतो. गोमांसातील बाष्पनशील (बाष्परुपात उडून जाणाऱ्या) वसाम्लामध्ये स्वाद व वास देणारी ७५ संयुगे आहेत, असे आढळून आले आहे. मांसाचा रंग त्यातील मायोग्लोबिनाच्या प्रमाणावर अवलंबून असतो, तर रसाळपणा त्यातील आर्द्रता व चरबी यांवर अवलंबून असतो. मायोग्लोबिनाचा मूळचा रंग गुलाबी-तांबडा असतो पण ऑक्सीजनाशी संयोग झाल्यावर त्याचे ऑक्सिमायग्लोबिनात बिनात रूपांतर होते व त्याचा रंग तजेलदार तांबडा होतो.
मांसोत्पादक जनावरांची कत्तल : मांसासाठी कापली जाणारी जनावरे झटका, हलाल व कोशर पद्धतीने मारली जातात. कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना विश्रांती दिल्यास मांसातील ग्लायकोजेनाचे लॅक्टिल अम्लात रूपांतर होऊन मांस थोडे अम्लीय बनते. यामुळे मांसाची रचना खुली होऊन ते कमी चिकट होते. शिवाय मांसाचे परिरक्षण होण्यास यामुळे मदत होते. याउलट कत्तलीपूर्वी विश्रांती न दिल्यास मांस फोफसे (थलथलीत) व चिकट होऊन त्याची टिकाऊपणा कमी होतो. कत्तल केल्यावर ५ ते १० मिनिटांत शरीरातील रक्त वाहून जाते. त्यानंतर जनावराचे कलेवर टांगून त्याच अवस्थेत डोके व खूर वेगळे केले जातात आणि त्वचा अलग करतात. धडाला पोटावरील भागावर उभा छेद देऊन आतील हृदय, फुप्फुसे, आतडी इ. अंतस्त्ये (अंतर्गत इंद्रिये) बाहेर काढून धड प्रशीतन किंवा गोठविण्याच्या खोलीत पाठविले जाते. गोठविलेल्या अवस्थेत असे मांस एका देशामधून दुसऱ्या देशात पाठविले जाते. काही वेळा मांसाचे लहानमोठे तुकडे करून ते खारवून नंतर पाठविले जातात. त्याचप्रमाणे घाऊक विक्रीने निरनिराळ्या भागांवरील मांसाचे काप संस्करण केंद्रांना दिले जातात. मासाचे विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी म्हणजे सॉसेज बनविण्यासाठी डब्यामध्ये भरण्यासाठी अगर सरळ जेवणात उपयोग करण्यासाठी (उपहारगृहे, रुग्णालये इ.) त्या त्या प्रकाराचे व प्रतीचे मांसाचे मोठाले खंड प्रशीतन व्यवस्था असलेल्या वाहनातून लांबवर पाठविले जातात.
मांसोत्पादक जनावरे व मांसाचे प्रकार : गुरे, म्हशी, मेंढ्या, शेळ्या व डुकरे यांचे मांस तसेच बदके, कोबड्या व टर्की पक्षी व तत्सम पक्ष्यांचे [⟶ कुक्कुटपालन] मांस खाण्यासाठी वापरतात. मांस उद्योगाच्या दृष्टीकोनातून मात्र वर उल्लेखिलेली जनावरे व कोंबड्या यांच्या मांसाचाच प्रामुख्याने विचार होतो. भारतातील मांस उद्योग खाटीकखान्यात कत्तल केलेल्या जनावरांच्या ताज्या मांसाची विक्री करणे एवढ्यापुरताच बऱ्याच प्रमाणात मर्यादित असल्यामुळे निरनिराळ्या मांसप्रकारांची माहिती ही पाश्चात्त्य देशांतील व अमेरिकेतील मांस उद्योगासंबंधीची असणे अपरिहार्य झाले आहे. जागतिक बाजारपेठेत निरनिराळ्या जनावरांचे मांस निरनिराळ्या नावांनी ओळखले जाते. इतकेच नव्हे, तर मांसाहारी लोकांचा चोखंदळपणा वाढल्यावर एकाच जनावराच्या अंगावरील निरनिराळ्या ठिकाणांच्या मांसालाही निरनिराळी नावे देण्यात आली आहेत. यामुळे विक्रीच्या संदर्भात मांस उद्योगातील लोकांबरोबर गिऱ्हाईकांचीही सोय झाली आहे.
गायीगुरांचे व गोवत्स मांस : पूर्ण वाढ झालेल्या गायीगुरांच्या व म्हशीच्या मांसाला बीफ म्हणतात. गाईच्या वासराच्या मांसाला म्हणजे गोवत्स मांसाला व्हील म्हणतात. मांसोत्पादनासाठी पाश्चात्त्य देशांत गायीगुरांच्या लवकर गलेलठ्ठ होणाऱ्या अभिजाती निर्माण करण्यात आल्या आहेत [⟶ गाय]. त्यामुळे व्यावहारिक अर्थाने त्या देशांमधून ‘बीफ’ याचा अर्थ गायीगुरांचे (गायबैलांचे) मांस असाच होतो कारण तिकडे म्हशीचे मांस खाण्यात येत नाही. अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका व कॅनडा हे देश बीफ या मांस प्रकाराच्या बाबतीत उत्पादनात व वापर करण्यातही अग्रेसर आहेत. गायीगुरांच्या मांसाच्या बाबतीत त्यातील विखुरलेल्या चरबीच्या प्रमाणाला महत्त्व आहे. त्यामुळे मार्बलिंगवरून या मांस प्रकाराची प्रत ठरविण्यात येते. कारण यावरच मांसाला लुसलुशीतपणा, रसाळपणा व स्वाद अवलंबून असतो. या प्रकारच्या मांसासाठी मारण्यात येणाऱ्या जनावराचे वजन सामान्यपणे ४५० ते ५५० किग्रॅ. असते. विक्रीच्या व साठविण्याच्या दृष्टिकोनातून गायीगुरांच्या कलेवराचे तुकडे करण्याच्या (काप घेण्याच्या) विशिष्ट पद्धती देशादेशांतून दिसून येतात. त्यांपैकी एक पद्धत आ. १ मध्ये दाखविली आहे. कलेवराच्या निरनिराळ्या भागांवरील मांसाला राउंड, सिरलॉइन, फ्लँक, शॉर्ट लॉइन, शॉर्ट प्लेट, रिब, ब्रिस्केट, शँक व चक अशी नावे देण्यात आली आहेत. या नावांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वापर होतो. हिंदुधर्मीयांमध्ये रूढी नुसार हा मांस प्रकार निषिद्ध मानला आहे. त्यामुळे भारतामध्ये हा फारच थोड्या प्रमाणात खाण्यात येतो. गोवत्स मांस गायीगुरांच्या मांसापेक्षा चविष्ट, लुसलुशीत व रसाळ असते तथापि अगदी लहान वयाच्या वासरांचे मांस पसंत केले जात नाही. गोवत्स मांस सर्वसाधारणपणे ताजे खाल्ले जाते. बीफ मात्र १० ते १४ दिवस ४° से. तापमानात ठेवून ते मुरू देतात व मग खातात. या मुदतीत मांसामध्ये लॅक्टिक अम्ल तयार होते व एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणणाऱ्या प्रथिनांच्या) क्रियेमुळे त्यातील संयोजी ऊतकाचे काही प्रमाणात जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेमुळे घटक अलग होण्याची क्रिया) होते.
शेळ्या-मेंढ्यांचे मास : कोकराच्या मांसाला लँब म्हणतात व पूर्ण वाढलेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाला मटन (सागुती) म्हणतात. न्यूझीलंड, अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, चीन व रशिया या देशांमध्ये हा मांस प्रकार मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.
भारतामध्ये बहुतेक मटन मेंढीपासून मिळते व त्याला महाराष्ट्रात बोलाईचे मटन म्हणतात. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये प्रतिवर्षी दरडोई वापर ३० किग्रॅ. आहे. या मांसप्रकाराची प्रत बहुधा मारलेल्या जनावराच्या वयावर अवलंबून असते. जनावराच्या अंगावरील मांसाची विशिष्ट नावे म्हणजे लेग (तंगडी), लॉइन (कंबर), रिब (फासळ्या) व शोल्डर (खांद्यावरील) अशी आहेत. भारतात मांसाची नावे गर्दन (मान), सिना (बरगडी), मांडी, भेजा (मेंदू), कलेजी वा काळीज (यकृत), गुर्दा (मूत्रपिंड) इ. इंद्रियानुसार वा शरीरातील स्थानानुसार वापरण्यात येतात पण त्यात प्रमाणीकरण आढळत नाही. विविध ठिकाणी निरनिराळी नावे वापरात आहेत.
डुकराचे मांस : या मांसाला ‘पोर्क’ म्हणतात. पाश्चात्त्य देशांमध्ये हा मांसप्रकार अतिलोकप्रिय आहे. सर्वसाधारणपणे डुकरे वयात येण्याच्या सुमारास पूर्ण वाढ होण्याआधी मारली जातात. त्यामुळे लँब किंवा व्हील या मांसप्रकाराशी डुकराच्या मांसाची तुलना होऊ शकते. या मांसाच्या प्रकारात सामान्यतः चरबीचे प्रमाण इतर मांस प्रकारांपेक्षा अधिक असल्यामुळे मांस टिकविण्याच्या दृष्टिकोनातून ते संस्कारित करण्याची अधिक गरज असते. अन्यथा चरबी खराब होण्यामुळे खवट वास येऊ लागतो. डुकराच्या दोन्ही बाजूंच्या फासळ्यांवरील संस्कारित मांसाला ‘बेकन’ म्हणतात. साधारणपणे चौथ्या फासळीपासून श्रोणी हाडा पर्यंतच्या (धडाच्या तळाशी असलेल्या हाडा पर्यंतच्या) भागावरील मांसाच्या ३·५ ते ५ सेंमी रुंदीच्या लांब पातळ पट्ट्या बेकनसाठी काढतात. देशादेशांमध्ये याविषयी निरनिराळे संकेत आहेत. यूरोपणध्ये डोके व खूर काढून टाकून उरलेल्या धडावरील सर्व भागावरील मांसाच्या पट्ट्या काढण्यात येतात व त्याला विल्टर बेकन म्हणतात. डुकराच्या मागील पायावरील मांसाला ‘हॅम’ म्हणतात. काही देशांत खांद्यावरील मांसालाही हॅम म्हणण्याची प्रथा आहे. मांसात विखुलेल्या चरबीचा घट्टपणा, मार्बलिंग व मांसाचा पोत यांवर या प्रकारच्या मांसाची प्रत ठरवितात. भारतामध्ये हा मांसप्रकार तितकासा लोकप्रिय नाही. डुकराच्या कलेवराचे तुकडे करण्याच्या पद्धती देशादेशांमध्ये निरनिराळ्या आहेत. आ.२ मध्ये त्यांतील एक पद्धत दाखविली आहे. निरनिराळ्या भागांवरील मांसाला हॅम, साइड (बेकन), स्पेअर रिब्ज, लॉइन अँड फॅटबॅक, शोल्डर बट, पिकनिक शोल्डर, जाऊल, हॉक, फुट अशी नावे आहेत.
कोष्टक क्र. २ ते ६ मध्ये अनुक्रमे गायीगुरांच्या व गोवत्स, म्हशींच्या मेंढ्यांच्या शेळ्यांच्या आणि डुकारांच्या मांसाच्या खाटीकखान्यांतील उत्पादनांची १९७९ सालची काही देशांची आकडेवारी दिलेली आहे. कोष्टक क्र. ७ मध्ये घोड्यांच्या व कोष्टक क्र. ८ मध्ये कोंबड्यांच्या मांसाच्या उत्पादनाची आकडेवारी दिलेली आहे. कोष्टक क्र ९ ते ११ मध्ये अनुक्रमे स्थानिक गायीगुरांच्या व म्हशींच्या, शेळ्यांच्या आणि डुकरांच्या मांसाच्या
उत्पादनाची आकडेवारी दिलेली आहे.
कोष्टक क्र.२ खाटीकखान्यांतील गायीगुरांच्या व गोवत्स मांसाचे उत्पादन (१९७९). |
|||
देश |
कत्तल केलेल्या जनावरांची संख्या (हजार) |
कलेवराचे सरासरी वजन (किग्रॅ./जनावर) |
मांस उत्पादन (हजार टन) |
अमेरिकेची संयुक्तसंस्थाने |
३७,४२० |
२६५ |
९,९२५ |
ऑस्ट्रेलिया |
११,३५९ |
१७८ |
२,०१८ |
इटली |
४,८१९ |
२२० |
१,०६० |
कॅनडा |
४,१०० |
२३३ |
९५५ |
कोलंबिया |
३,२८८ |
१८२ |
५९८ |
चीन |
११,११६ |
१५० |
१,६६८ |
जपान |
१,२६० |
३१३ |
३९५ |
जर्मनी, पश्चिम |
५,२२६ |
२८३ |
१,४८० |
दक्षिण आफ्रिका |
२,५०० |
२०८ |
५२० |
न्यूझीलंड |
३,२८० |
१५२ |
४९८ |
पोलंड |
४,९०० |
१४९ |
७३० |
फ्रान्स |
७,६७० |
२३६ |
१,८१० |
ब्राझील |
९,९९९ |
२११ |
२,१०६ |
ब्रिटन |
४,००१ |
२४७ |
९९० |
भारत |
९०० |
८० |
७२ |
मेक्सिको |
३,५३० |
१६६ |
५८५ |
रशिया |
३८,००० |
१८४ |
७,००० |
एकूण जागतिक |
२,३०,४९६ |
१९७ |
४५,३६३ |
कोष्टक क्र.३ खाटीखान्यांतील म्हशींच्या मांसाचे उत्पादन (१९७९) |
|||
देश |
कत्तल केलेल्या जनावरांची संख्या (हजार) |
कलेवराचे सरासरी वजन किग्रॅ./जनावर) |
मांस उत्पादन (हजार टन) |
इजिप्त |
८७५ |
१२९ |
११३ |
चीन |
३,७१३ |
१७० |
६३१ |
पाकिस्तान |
२,११२ |
८२ |
१७४ |
भारत |
८५० |
१४२ |
१२० |
एकूण जागतिक |
९,३९५ |
१४६ |
१,३७५ |
कोष्टक क्र.४ खाटीकखान्यांतील मेंढ्यांच्या मटनाचे व लँबचे उत्पादन (१९७९). |
|||
देश |
कत्तल केलेल्या जनावरांची संख्या (हजार) |
कलेवराचे सरासरी वजन (किग्रॅ./जनावर) |
मांस उत्पादन (हजार टन) |
अफगाणिस्थान |
६,७०० |
१५ |
९९ |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
५,४७५ |
२४ |
१३३ |
ऑस्ट्रेलिया |
२६,६५३ |
१८ |
४९१ |
इराण |
१०,३१० |
१८ |
१८६ |
चीन |
२६,३०० |
१५ |
३९५ |
तुर्कस्थान |
१९,००० |
१५ |
२८० |
दक्षिणआफ्रिका |
८,००० |
१६ |
१२७ |
न्यूझीलंड |
३३,४९६ |
१५ |
५०५ |
पाकिस्तान |
१०,१५८ |
१२ |
१२५ |
फ्रान्स |
७,७६२ |
२१ |
१६३ |
ब्रिटन |
११,६३४ |
२० |
२२७ |
भारत |
१३,१७० |
९ |
१२० |
रशिया |
५३,०८० |
१६ |
८६० |
स्पेन |
१०,१०४ |
१२ |
११९ |
एकूण जागतिक |
३,६०,१२९ |
१५ |
५,५०२ |
कोष्टक क्र.५ खाटीकखान्यांतील शेळ्यांच्या मांसाचे उत्पादन (१९७९). |
|||
देश |
कत्तल केलेल्या जनावरांची संख्या (हजार) |
कलेवराचे सरासरी वजन(किग्रॅ./जनावर) |
मांस उत्पादन (हजार टन) |
इथिओपिया |
६,४७५ |
८ |
५५ |
इराण |
३,५४४ |
१३ |
४४ |
ग्रीस |
४,१०३ |
११ |
४४ |
चीन |
२२,०३० |
१५ |
३३२ |
तुर्कस्तान |
६,६०० |
१६ |
१०७ |
नायजेरिया |
९,९०० |
९ |
८९ |
पाकिस्तान |
१५,०१४ |
११ |
१६४ |
बांग्ला देश |
४,४०० |
१० |
४४ |
भारत |
३०,६०० |
९ |
२७८ |
रशिया |
२,५०० |
१६ |
४० |
सूदान |
३,२०० |
१३ |
४२ |
सोमाली प्रजासत्ताक |
४,१४२ |
१३ |
५४ |
एकूण जागतिक |
१,६२,२६४ |
१२ |
१,८९२ |
अमेरिकेत गायीगुरांच्या व इतर जनावरांच्या कलेवरांची प्रत लावण्यात येते. ही पद्धत १९२७ पासून सुरू झाली. प्राइम, चॉइस, गुड, स्टँडर्ड, कमर्शिल, युटिलिटी, कटर व कॅनर अशा या प्रती आहेत.
मांस परिरक्षण : मांस हे लवकर खराब होणारे नाशवंत अन्न आहे. कत्तलीनंतर येणाऱ्या शवकाठिण्यामुळे स्नायूंचे आकुंचन होणे, हवामानातील परिणामामुळे मऊ पडणे, तसेच त्याचा पोत व त्यातील आर्द्रता यांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्याचा ताजेपणा नाहीसा होणे, स्वाद कमी होणे, चवीमध्ये फरक होणे इ. परिणाम होतात. एंझाइमांच्या व इतर रासायनिक क्रियांमुळे ते गिळगिळीत होते.
कोष्टक क्र. ६ खाटीकखान्यांतील शेळ्यांच्या मांसाचे उत्पादन (१९७९). |
|||
देश |
कत्तल केलेल्या जनावरांची संख्या (हजार) |
कलेवराचे सरासरी वजन (किग्रॅ./जनावर) |
मांस उत्पादन (हजार टन) |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
८८,१५० |
८० |
७,००८ |
इटली |
९,८२३ |
९७ |
९५० |
कॅनडा |
१२,१०० |
६२ |
७४५ |
चीन |
२,६१,००० |
५९ |
१५,५१५ |
जपान |
१९,२०० |
७३ |
१,४०० |
जर्मनी, पश्चिम |
३६,५२७ |
७४ |
२,६८८ |
जर्मनी, पूर्व |
१२,२०० |
९२ |
१,१२४ |
चेकोस्लोव्हाकिया |
८,८०० |
९९ |
८७० |
डेन्मार्क |
१२,७५० |
७१ |
९०० |
नेदर्लंड्स |
१३,००० |
८५ |
१,१०० |
पोलंड |
२१,००० |
८७ |
१,८३५ |
फ्रान्स |
२०,४७० |
८९ |
१,८३० |
बेल्जियम व लक्सेंबर्ग |
८,७०० |
८२ |
७१६ |
ब्राझील |
१२,६८६ |
६७ |
८५० |
ब्रिटन |
१४,६७२ |
६४ |
९४३ |
भारत |
२,१०० |
३२ |
६७ |
यूगोलाव्हिया |
११,९०० |
५३ |
६३० |
रशिया |
६९,५५३ |
७६ |
५,३०० |
रूमानिया |
१०,५०० |
७८ |
८१९ |
स्पेन |
११,५०० |
७४ |
८५४ |
हंगेरी |
९,६८० |
९१ |
८८० |
एकूण जागतिक |
७,६४,७१९ |
६९ |
५२,७८५ |
कोष्टक क्र. ७ घोड्यांच्या मांसाचे उत्पादन (१९७९). |
|||
देश |
उत्पादन (हजार टन) |
देश |
उत्पादन (हजार टन) |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
७१ |
पोलंड |
२१ |
अर्जेटिना |
६२ |
फ्रान्स |
४४ |
इटली |
५९ |
ब्रझील |
५० |
इथिओपिया |
४१ |
मंगोलिया |
५० |
चीन |
६४ |
मेक्सिको |
५४ |
एकूण जागतिक |
६३० |
याहीपेक्षा त्यावर होणाऱ्या सूक्ष्मजंतूच्या क्रियेमुळे त्याचे जलीय अपघटन होते व ते कुजण्या-सडण्याची क्रिया सुरू होते. ॲक्रोमोबॅक्टर, मायक्रोकॉकस, स्यूडोमोनस, लॅक्टोबॅसिलस व क्लॉस्ट्रिडियम य जातींचे सूक्ष्मजंतू मुख्यतः या क्रियांस जबाबदार असतात. क्लॅडोस्पोरियम व म्यूकर या प्रजातींतील कवकांमुळेही (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळेही ) मांस बिघडते.
कोष्टक क्र. ८. कोंबड्यांच्या मांसाचे उत्पादन (१९७९) |
|||
देश |
उत्पादन (हजार टन) |
देश |
उत्पादन (हजार टन) |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
८,५२६ |
ब्राझील |
७६५ |
इटली |
९८८ |
ब्रिटन |
७५७ |
कॅनडा |
६५९ |
भारत |
१०७ |
चीन |
३,४७६ |
मेक्सिको |
४०१ |
जपान |
९६० |
रशिया |
२,००० |
जर्मनी, पश्चिम |
३६५ |
रुमानिया |
३८० |
नेदर्लंड्स |
३५० |
स्पेन |
७५० |
पोलंड |
३७० |
हंगेरी |
३२० |
एकूण जागतिक |
२८,०३९ |
कोष्टकक्र. ९स्थानिकगायीगुरांच्यावम्हशींच्यामांसाचेउत्पादन(१९७९). |
|||
देश |
उत्पादन(हजारटन) |
देश |
उत्पादन(हजार टन) |
अमेरिकेचीसंयुक्तसंस्थाने |
९,७०४ |
न्यूझीलंड |
५०१ |
अर्जेंटिना |
३,०९६ |
पाकिस्तान |
३४२ |
आयर्लंड |
४६६ |
पोलंड |
७६२ |
ऑस्ट्रेलिया |
२,०१० |
फ्रान्स |
१,९४५ |
इटली |
८६४ |
ब्राझील |
२,०७८ |
कॅनडा |
९८७ |
ब्रिटन |
१,०३५ |
कोलंबिया |
६६७ |
भारत |
१८९ |
चीन |
२,३२० |
मेक्सिको |
६५० |
जर्मनी, पश्चिम |
१,४८५ |
यूगोस्लाव्हिया |
३३८ |
जर्मनी, पूर्व |
३९७ |
रशिया |
६,९६६ |
दक्षिणआफ्रिका |
४२० |
रुमानिया |
३१८ |
नेदर्लंड् |
३७५ |
स्पेन |
३९१ |
एकूणजागतिक |
४६,७६९ |
कोष्टकक्र. १०स्थानिकशेळ्यांच्यामांसाचेउत्पादन (१९७९). |
|||
देश |
उत्पादन (हजारटन) |
सरासरीवजन(किग्रॅ./जनावर) |
उत्पादन (हजारटन) |
अफगाणिस्तान |
१२६ |
नायजेरिया |
११६ |
अमेरिकेची |
न्यूझीलंड |
५०३ |
|
संयुक्तसंस्थाने |
१३५ |
पाकिस्तान |
२८९ |
अर्जेटिना |
१३७ |
फ्रान्स |
१६२ |
ऑस्ट्रेलिया |
५६० |
ब्रिटन |
२३५ |
इथिओपिया |
१३१ |
भारत |
३९४ |
इराण |
१७६ |
मंगोलिया |
१११ |
ग्रीस |
१२१ |
रशिया |
८८३ |
चीन |
७२६ |
रुमनिया |
१०५ |
तुर्कस्थान |
३९६ |
सूदान |
१२५ |
दक्षिणआफ्रिका |
१४३ |
स्पेन |
१३२ |
एकूणजागतिक |
७,४०७ |
देश |
जनावरांची संख्या (हजार) |
सरासरी वजन (किग्रॅ./जनावर) |
उत्पादन (हजार टन) |
अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
७,१६५ |
फिलिपीन्स |
३८६ |
अर्जेंटिना |
२५९ |
फ्रान्स |
१,७२८ |
ऑस्ट्रिया |
३४२ |
बेल्जियम व लक्सेंबर्ग |
७८० |
ऑस्ट्रेलिया |
२०० |
ब्राझील |
८५० |
इटली |
९१० |
ब्रिटन |
९४३ |
कॅनडा |
७५७ |
भारत |
६७ |
चीन |
१५,७१५ |
मेक्सिको |
४३३ |
जपान |
१,४०० |
यूगोस्लाव्हिया |
६३० |
जर्मनी, पश्चिम |
२,६२१ |
रशिया |
५,३०० |
जर्मनी, पूर्व |
१,१७९ |
रुमानिया |
८१९ |
चेकोस्लोव्हाकिया |
८७० |
व्हिएटनाम |
४३६ |
डेन्मार्क |
९०९ |
स्पेन |
८५३ |
नेदर्लंड्स |
१,२५० |
स्वित्झर्लंड |
२७० |
पोलंड |
१,८३५ |
स्वीडन |
३०७ |
हंगेरी |
९१९ |
||
एकूण जागतिक |
५३,१०८ |
||
मांस ताज्या अवस्थेमध्ये टिकविणे ही मांस उद्योगातील नितांत गरज आहे व त्यासाठी योजिल्या जाणाऱ्या उपायांवर या उद्योगातील आर्थिक नियोजन अवलंबून आहे. मांस टिकविण्यासाठी योजण्याचे उपाय मांसप्रकार (कोणत्या जनावराचे आहे) व ते साठविण्याचा उद्देश (आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी किंवा घाऊक विक्रीसाठी मोठाले तुकडे करून साठविण्यासाठी किंवा संस्करण करून डब्यात भरावयाचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी, शिजवून किंवा कच्चे साठविण्यासाठी) यांवर अवलंबून असतात. जनावराची कत्तल केली जाते त्या वेळी त्याचे मांस सूक्ष्मजंतूंनी जवळजवळ दूषित झालेले नसते परंतु कत्तलीनंतर कापलेल्या रक्तनलिकांवाटे लगोलग सूक्ष्मजंतूंचे आक्रमण होऊन हवेतील व शरीरातील सूक्ष्मजंतूंच्या क्रिया सुरू होतात. मांस परिरक्षित करण्याच्या खालील पद्धती आहेत.
प्रशीतन व गोठविणे : कुठलाही अन्नपदार्थ शीत तापमानात साठविल्यास अन्नातील घटकांचे विघटन होण्याच्या क्रियेस आळा बसतो. कत्तलीनंतर लगोलग घेतलेल्या गायीगुरांच्या मांसाचे तापमान ३९° से. असते. प्रशीतन खोलीचे तापमान −४° से. ते −२° से. इतके असल्यामुळे कत्तलीनंतर (त्वचा, आतडी व इंद्रिये इ. अंतस्त्ये काढून) शक्य तितक्या लवकर कलेवरे खोलीत नेल्यास मांसांचे तापमान कमी होऊ लागते. हे तापमान −२° से. पर्यंत येण्यासाठी गायीगुरांच्या कलेवरांना ७२ तास, तर मेंढी, डुक्कर व वासरे यांच्या कलेवरांना २४ ते ३६ तास इतकाच अवधी लागतो. अर्थात हा अवघी प्रशीतन कोठीत ठेवलेल्या कलेवरांच्या संख्येवर अवलंबून असतो. प्रशीतन तापमानामध्ये (–२° ते ०° से.) सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते, एंझाइमांची क्रिया थांबते व मांसामध्ये होणारे रासायनिक बदलही थांबतात. गायीगुरांची कलेवरे मलमलीच्या कापडात गुंडाळून प्रशीतन कोठीत पाठवितात. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग रोखला जाऊन मांस रसाळ व लुसलुशीत राहण्यास मदत होते. प्रशीतन तापमानात गायीगुरांचे मांस ५ ते ६ आठवडे, तर डुकराचे व शेळ्या-मेंढ्यांचे मांस २ आठवडे टिकते.
मांसाचे तापमान –२° से. पेक्षा कमी झाल्यास ते गोठते. गोठलेल्या मांसात त्यातील पाण्याचे बर्फ स्फटिक तयार होतात. एकदा गोठविलेल्या मांसाचे तापमान वाढवून त्यातील काही बर्फाचे पाणी होऊ दिले व पुन्हा तापमान कमी करून गोठविले, तर त्यातील बर्फाटे स्फटिक मोठे होतात व त्यामुळे मांसाचा पोत खराब होतो. गोठवण कोठीचे तापमान–१०° से. ते–१८° से. इतके ठेवतात. अलीकडे मांस गोठवून एका देशातून दुसऱ्या देशात पाठवितात. प्रवासामध्ये त्याचे तापमान –१° से. इतके ठेवावे लागते. अशा स्थितीत ते काही महिने चांगल्या स्थितीत राहते. वरील गोठवण तापमानात गायीगुरांचे मांस एक वर्ष, तर डुकराचे सहा महिने टिकते. अशी साठवण करण्यापूर्वी ते मेणकागदात अगर दुसऱ्या वेष्टणामध्ये गुंडाळून ठेवणे जरूर असते. अन्यथा बाष्पीभवनामुळे पृष्ठभागावरील आर्द्रता कमी होऊन काही भाग रंगहीन होतो. यामुळे याचा दिखाऊपणा व चविष्टपणा कमी होतो. गोठविलेले मांस बराच काळ साठविले तर हळूहळू त्यातील चरबीच्या ऑक्सिडीकरणामुळे [⟶ ऑक्सिडीभवन] त्याचा स्वाद व गंध कमी होतो. डुकराच्या मांसात चरबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे या मांस प्रकारात हे विशेषत्वाने जाणवते. गोठविण्याने मांसाच्या पोषणमूल्यात काहीही फरक होत नाही.
याशिवाय द्रव नायट्रोजन (उकळबिंदू − १९५° से.), नायट्रस ऑक्साइड (उकळबिंदू – ९८° से.) व शुष्क बर्फ (उकळबिंदू – ७८° से.) या प्रशीतनक द्रव्यांचा वापर करून मांस गोठविले जाते. मांसाचा प्रशीतनक द्रव्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क आल्यामुळे ते गोठविले जाते. अशा तऱ्हेने साठविलेले मांस कित्येक महिने टिकते.
गोठवून वाळविणे : या प्रकारात मांस गोठविलेल्या अवस्थेतच शुष्क केले जाते. प्रथम मांसाचे तापमान वेगाने कमी करून ते गोठविले जाते व ते निर्वात अवस्थेत ठराविक वेळ ठेवल्याने त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते शुष्क होते. ही वाळविण्याची क्रिया होत असताना मांसाचे तापमान नेहमी मांसाच्या गोठण तापमानाच्या बरेच खाली असते. हवेचा दाब कमी झाल्यावर पाण्याचा उकळबिंदू कमी होतो या साध्या तत्त्वाचा उपयोग करून निर्वात अवस्थेत मांसातील पाण्याची वाफ होऊन ते शुष्क होते. निर्वात कोठीमधील तापमान काही वेळा थोडे वाढविले तरी चालते. मात्र ते इतकेच वाढविले पाहिजे की, आर्द्रतेचे बाष्पीभवन होताना गोठलेल्या मांसातील बर्फाचे पाणी होता कामा नये. अशा तऱ्हेने शीतशुष्क केलेल्या मांसातील स्नायुतंतूंची रचना, स्वाद, चव इ. ताज्या मांसाप्रमाणेच राहतात मात्र ते थोडे सच्छिद्र होते. ते आर्द्रताशोषक बनल्याने हवाविरहित बरण्यांत अगर डब्यांतच साठविणे जरूर असते. शीत-शुष्क केलेल्या मांसातील आर्द्रता २% असते. मांस शीत-शुष्क करण्याची पद्धत १९५५–६० च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रचारात आली. सूप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मांसाचे घनाकार तुकडे या पद्धतीने बनविले जातात.
निर्जलीकरण : कोणताही पदार्थ वाळवून त्यातील आर्द्रता कमी केल्याने तो दीर्घकाळ टिकू शकतो हे धान्य वगैरे अन्नप्रकारांच्या बाबतीत दिसून येते. मांस वाळवून टिकविता येते हे पुरातन काळापासून माहीत होते. प्रशीतन पद्धतीने सूक्ष्मजंतूंची वाढ रोखली जाते, तर वाळविण्याच्या प्रकारात ते मारले जातात. अमेरिकन इंडियन लोक मांस विस्तवावर वाळवीत व त्याला धुराचा वास लागे. याला जर्क्ड बीफ म्हणत. निर्जलीकरण करून गायीगुरांचे व डुकरांचे मांस परिरक्षित करतात. यासाठी मांसाचे ५ सेंमी. लांबीरुंदीचे चौकोनी पातळ तुकडे करून ते ०·७ किग्रॅ/सेंमी.२ वाफेच्या दाबावर (७०°–७३° से.) शिजविले जातात. नंतर त्यांचे आणखी बारीक तुकडे करून ते १४६° ते १४९° से. तापमानात त्यातील आर्द्रता ५ ते १०% इतकी कमी होईपर्यंत (२·५ ते ३ तास) वाळवितात. असे मांस हलके होते व त्यामुळे युद्धाच्या वेळी सैनिकांना पुरविण्यासाठी त्याची सोईस्करपणे वाहतूक करता येते.
डबाबंदीकरण : (कॅनिंग). शिजविलेले मांस टिकविण्यासाठी डब्यात घालून ते साठविण्यात येते. काही वेळा कच्चे मांस डब्यांत घालून ते डबे नंतर वाफेच्या साहाय्याने गरम करून (तापमान १०५°–१२०°से.) आतील मांस शिजविले जाते, तर काही वेळा मांसाचे खाद्य पदार्थ तयार करून डब्यांत भरण्यात येतात. एका पद्धतीत मांस पदार्थ शिजविण्याच्या आधी डब्यात भरतात व अल्प काळ तापमानात ठेवण्याच्या (एचटीएसटी-हाय टेंपरेचर शॉर्ट टाइम) पद्धतीने शिजविले जातात. ही शिजविण्याची क्रिया दोन टप्प्यांत करतात. पहिल्या टप्प्यात हे डबे ६५° ते ८५° से. तापमानात ५ ते १० मिनिटे व दुसऱ्या टप्प्यात १२५° ते १५०° से. तापमानात ३ ते ३० सेकंद ठेवतात. डब्यातील मांस या क्रियेत निर्जंतुक झाल्याने ते कित्येक महिने टिकू शकते. डब्यातील हवा पूर्णपणे काढून मांस ठासून भरणे आवश्यक असते. पिकल्ड पिगफीट (मुरवणामध्ये घातलेल्या डुकराच्या पायापासून बनविलेला खाद्यपदार्थ), चॉप्ड लेचिऑन मीट (खिमा केलेले मसालेदार मांस), मीट स्ट्यू (भाज्यांचे व मांसाचे तुकडे एकत्र शिजविलेले) इ. पदार्थ या पद्धतीने शिजविले जातात. डबा भरण्याच्या, बंद करण्याच्या क्रिया स्वयंचलित यंत्राच्या साहाय्याने केल्या जातात. [⟶ डबाबंदीकरण].
रासायनिक परिरक्षण : प्रशीतन व गोठविणे या मांस परिरक्षणाच्या पद्धती अस्तित्वात आल्यापासून रासायनिक परिरक्षण करण्याची पद्धत फारशी वापरात नसली, तरी रसायनांचा वापर मांसाचा स्वाद, चव, रंग सुधारण्यासाठी व ताजेपणा टिकविण्यासाठी काही प्रमाणात व काही मांसप्रकारांच्या बाबतीत परिरक्षण करण्यासाठीही प्रचारात आहे. रसायने वापरून मांस परिरक्षित करण्याच्या पद्धतीत खारविणे म्हणतात.
होमर यांच्या काळापासून (ख्रि.पू. ८०० वर्षे) मिठाचा वापर करून मांस टिकविण्याची पद्धत अस्तित्वात आहे. मिठाबरोबर सोडियम नायट्रेट किंवा नायट्राइट, ग्लुकोज, सुक्रोज, शिर्का (व्हिनेगार) हे पदार्थ खारवण मिश्रण तयार करण्यासाठी वापरतात. सोडियम किंवा पोटॅशिअम नायट्रेट वापरण्याची प्रथा १९०० सालापासून सुरू झाली. वरील घटकांच्या प्रमाणात बदल करून निरनिराळ्या मांसाना उचित अशी अनेक खारवाण मिश्रणे वापरण्यात येतात. मांसामध्ये खारवण भिनण्याच्या प्रमाणात त्याचा परिणाम अवलंबून असतो आणि हे प्रमाण खारविण्याच्या रीत, मांसाच्या तुकड्याचे आकारमान, त्यावरील चरबीचा थर व तापमान यांवर अवलंबून असते. त्यामुळे मांसाचा प्रकार, मांसाचे लहान मोठे खंड, लहान मोठे तुकडे, अगदी बारीक तुकडे (खिमा), चरबी काढलेले मांस, हाडे व चरबी दोन्ही काढलेले मांस, तापमानामध्ये केला जाणारा बदल इत्यादींमुळे खारविण्याच्या अनेक तऱ्हा प्रचारात आहेत. खारवण मिश्रणातील मीठ, साखर व शिर्का यांचा मांस परिरक्षणासाठी उपयोग होतो, तर सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे सोडियम नायट्रेटाचे नायट्राइटात रूपांतर होऊन त्याच्या ऑक्सीजनाशी झालेल्या संयोगाने नायट्रस ऑक्साइड तयार होते. मांसातील रक्तारुणाशी (हीमोग्लोबिनाशी) नायट्रस ऑक्साइडचा संयोग होऊन नायट्रोसोहीमोग्लोबिन तयार होते व या रसायनामुळे मांसाचा रंग ताज्या मांसाप्रमाणे राहतो. मांस खारविण्याच्या चार पद्धती आहेत.
(अ) सुके खारवण : या पद्धतीत सुके खारवण मिश्रण मांसाच्या मोठ्या खंडावर चोळतात. गायीगुरांच्या दोन्ही बाजूंवरील मांस, विशेषतः बेकन हा डुकाराच्या मांसाचा प्रकार या पद्धतीने खारवतात. खारवणातील वेगवेगळ्या लवणांचे प्रमाण बदलून अनेक मिश्रणे वापरण्यात येतात. डुकराच्या मांसाकरिता वापरण्यात येणारे त्यांतील एक नमुनेदार मिश्रण असे : ४५ किग्रॅ.मांसासाठी १·३५ किग्रॅ. मीठ, ०·९ किग्रॅ. साखर, ७ ग्रॅ. सोडियम नायट्राइट व ५६ ग्रॅ. सोडियम नायट्रेट हे मिश्रण पुरेसे होते खारविण्याची क्रिया मंद गतीने होते. त्यामुळे मिश्रण चोळलेले मोठे खंड मेणकागदाचे अस्तर लावलेल्या जलरोधी लाकडी पेट्यांत थरावर थर असे भरून घट्ट झाकण लावून २°·२ ते ३°·३ से. तापमानात २५ ते ३० दिवस ठेवतात. साधारणपणे ०·५ किग्रॅ. करिता एक दिवस इतका वेळ ठेवतात. तापमान २° से. पेक्षा कमी ठेवले तर खारविण्याची क्रिया चांगली होत नाही.
(आ) द्रव खारवण : मिठाच्या पाण्यामध्ये वरील लवणे वापरून द्रव खारवण किंवा मुरवण तयार करतात. पाण्यामधील मिठाचे प्रमाण सॅलोमीटर या उपकरणावरून ठरवितात. सॅलोमीटरवर १००° इतके प्रमाण दाखविले म्हणजे त्या विद्रावामध्ये (१५°·५ से. तापमान) वजनाच्या २६·४% मीठ असते. मांसाचे मोठाले खंड मुरवणामध्ये काही दिवस ठेवतात. मुरवण अभिसरणाच्या क्रियेने मांसात भिनते. तापमान वाढविले, तर त्या प्रमाणात मुरवणामध्ये मांस ठेवण्याचे दिवस कमी करता येतात. मात्र त्यामध्ये सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे मांस खराब होण्याचा धोका असतो.
(इ) पिचकारी पद्धत : या पद्धतीत द्रव खारवण वापरतात. शरीरामध्ये रक्ताभिसरणासाठी ज्या शिरा कार्य करतात. अशा मांस खंडातील शिरांमधून पिचकारीच्या साहाय्याने द्रव खारवण मांस खंडात घुसविले जाते. हॅम किंवा ब्रिस्केट या जाड मांस खंडांमध्ये त्यांच्या वजनाच्या ११० ते १२०% इतके द्रव खारवण टोचतात. या प्रकाराला रोहिणी पंपिंग म्हणतात. ज्या मांस खंडामध्ये कुठल्याही कारणामुळे हे अशक्य होते, त्या वेळी मोठ्या सुया वापरून पिचकारीच्या साहाय्याने ठिकठिकाणी खारवण आत घुसविले जाते. ही क्रिया यांत्रिक पद्धतीने थोड्या वेळात (काही मिनिटांच्या आत) करता येते. याला स्टिच पंपिंग म्हणतात. डुकराचे मांस खारविण्यासाठी ही पद्धत वापरतात. काही वेळा प्रथम रोहिणी पंपिंग पद्धत वापरून नंतर स्टिच पंपिंग अशा दोन्ही पद्धती एकत्र वापरतात. हॅम या मांसप्रकारामध्ये काही वेळा त्यातील हाडे व चरबी काढून नंतर स्टिच पंपिंग पद्धत (विशेषतः मांसाची किरकोळीने विक्री करते वेळी) वापरतात. खारविण्याच्या वेळेमध्ये यामुळे २४ तासांची बचत होते. जाडजूड मांस खंड स्टिच पंपिंगने खारवून पुन्हा द्रव खारवणामध्ये ७ ते १४ दिवस बुडवून ठेवतात. या वेळी दुसऱ्या प्रकारच्या द्रव खारवणामध्ये लवणांचे प्रमाण निराळे ठेवतात. स्टिच पंपिंग करण्यासाठी २४% मीठ, २·५% साखर, ०·१ %सोडियम नायट्राइट, ०·१% सोडियम नायट्रेट या प्रमाणामध्ये आणि बुडवून ठेवण्यासाठी उपयोगात आणण्याच्या द्रव खारवणामध्ये १५% मीठ, १·५%साखर, ०·०५% सोडियम नायट्रेट व ०·०८% सोडियम नायट्राइट वापरतात.
(ई) विखंडित मांसाचे खारवण : कलेवराच्या काही भागांमध्ये मांसाचे मोठाले तुकडे (काप) मिळू शकत नाहीत. त्या वेळी काटछाट करून मांसाचे लहान तुकडे मिळतात. अशा मांसात खारवणातील रसायने सहज आणि जलद (काही तासांमध्ये) मिसळली जातात. मात्र नायट्राइटाची क्रिया इतक्या जलद होऊ शकत नाही परंतु मांसाचे तापमान थोडे वाढविल्यास हे साध्य होते. सॉसेज या खाद्यपदार्थासाठी मांस या पद्धतीने खारविले जाते.
खारवणामध्ये वापरण्यात येणाऱ्या वर उल्लेखिलेल्या लवणांव्यतिरिक्त ॲस्कॉर्बिक अम्ल, आयसोॲस्कॉर्बिक अम्ल, सोडियम ट्रायपॉलिफॉस्फेट, सोडियम अम्ल, पायरोफॉस्फेट इ. आणखी काही पदार्थांची उपयोग करण्यात येतो.
धुरी देणे : मांसपरिरक्षणाकरिता त्याला धुरी देण्याचा काही प्रमाणात उपयोग होतो. परिरक्षणापेक्षा धुराचा विशिष्ट वास मांसाला देण्यासाठी ही पद्धत अलीकडे जास्त प्रमाणात वापरली जाते. धुरात असललेले फॉर्माल्डिहाइड, क्रिओसोट, पायरोलिग्नीयस अम्ल, फिनॉल संयुगे यांसारखे घटक मांसात भिनले जातात व त्यांचा परिरक्षक म्हणून उपयोग होतो. हे घटक प्रतिऑक्सिडीकारक असल्यामुळे चरबीच्या ऑक्सिडीभवनामुळे येणारा खवट वास मांसाला येत नाही आणि थोड्या प्रमाणात सूक्ष्मजंतूंची वाढही रोखली जाते. धुरी देण्याच्या खोलीत धूर तयार करण्यासाठी लाकडाचा ओलसर भुसा जाळतात. ओक व हिकरी या झाडांच्या लाकडाचा भुसा वापरण्याची प्रथा आहे. मांसाली धुरी किती वेळ द्यावयाची हे मांसप्रकार व मांस खंडाचे आकारमान यांवर अवलंबून असते. एका पद्धतीत हॅमचे ७ ते ७·५ किग्रॅ. वजनाचे तुकडे धुरी देण्याच्या खोलीत ४५ दिवस टांगून ठेवतात. याला स्मिथफील्ड पद्धत म्हणतात. अलीकडे धुरी देण्याचे कार्य त्वरित होण्यासाठी खोलीचे तापमान ६८° से. ठेवतात. यामुळे बेकन या मांसप्रकाराच्या पट्ट्यांना ३० मिनिटांत धुरी देऊन होते. सॉसेज या खाद्यपदार्थाला धुरी द्यावयाच्या वेळी खोलीचे तापमान प्रथम ४९° से. ठेवले जाते व नंतर ७६° ते ८२° से. पर्यंत वाढविले जाते. त्यामुळे सॉसेजमध्ये भरलेले कच्चे मांस शिजविण्याची क्रियाही होते. भुसा जळण्याची क्रिया यांत्रिक पद्धतीने नियंत्रित केल्यामुळे खोलीमध्ये योग्य प्रमाणात धूर राहील अशी व्यवस्था करता येते. अलीकडे द्रव स्वरूपात धूर तयार करण्यात येतो. मोठ्या प्रमाणावर धूर तयार करून त्यावर पाण्याचे फवारे मारून धुरातील पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ फवाऱ्याच्या पाण्यात गोळा केले जातात.
संस्करण : वरील वर्णनामध्ये मांसावर करण्यात येणाऱ्या काही संस्करण क्रिया ठिकठिकाणी आलेल्या आहेतच. उर्वरित क्रियांची माहिती खाली दिली आहे.
कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांना विश्रांती दिल्यास स्नायूतील ग्लायकोजेनाचे लॅक्टिक अम्लांत रूपांतर होऊन मांस अम्लीय बनते. यामुळे मांसपरिरक्षणास मदत होऊन स्नायुतंतूंच्या जुडग्यांची रचना खुली राहते व मांस कमी चिकट होते. या उलट विश्रांती न दिल्यास मांस फोपसे व चिकट होते. जनावरांची कत्तल केल्यावर डोके, खूर व त्वचा अलग करून आणि आतील आतडी, इंद्रिये वगैरे भाग बाहेर काढून टाकून उरलेले धड (मांस) प्रशीतन कोठीत थंड होण्यासाठी शक्य तितक्या लवकर पाठविले जाते. शवकाठिण्यामुळे मांस घट्ट चिवट होते. एंझाइमांच्या क्रियेमुळे हळूहळू ते नरम होते पण प्रशीतन कोठीत या क्रियेला काही आठवडे लागतात. हे नरमीकरण लवकर होण्यासाठी एंझाइमांचा वापर केला जातो. प्रशीतन कोठीत ठेवण्याआधी मांसामध्ये विशिष्ट प्रमाणात ही एंझाइमे टोचतात. काही वेळा एंझाइमांच्या विद्रावामध्ये मांस एक मिनिट बुडवितात. काही वेळा कत्तलीपूर्वी जनावरांना एंझाइमांची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) देतात. पपईपासून मिळणारे पेपेन, अननसापासून ब्रोमेलीन, अंजिरापासून फायसीन किंवा कवकांच्या काही प्रकारांपासून मिळणारी प्रोटिएज ही एंझाइमे वापरली जातात. जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांच्या वापराने वातावरण निर्जंतुक करून अशा वातावरणात मांस काही दिवस राहू दिल्यास ते आपोआप नरम होते व खराबही होत नाही.
खाटीकखान्यामध्ये कापण्यात आलेल्या जनावरांच्या मांसाचे मोठाले खंड संस्करण केंद्राकडे प्रशीतन व्यवस्था असलेल्या वाहनातून पाठविले जातात. संस्करण केंद्रात असे मांस घाऊक पद्धतीने विकत घेऊन त्यापासून निरनिराळे खाद्यपदार्थ वर वर्णन केलेल्या खारवण, धुरी देणे, शिजविणे इ. क्रिया करून तयार करतात. बहुतेक देशांमध्ये या खाद्यापदार्थांमध्ये मासांचा भाग किती असावा तसेच धान्य, दुधाची भुकटी, सोयाबीन, कॉर्न सायरप यांसारखे अमांसजन्य पदार्थ किती प्रमाणात असावेत यांसबंधीचे नियम आहेत. तसेच मीठ, बीटापासून व उसापासून केलेली साखर, स्वाद येण्यासाठी घालण्यात येणारे पदार्थ मसाल्याचे पदार्थ इ. पदार्थांचे प्रमाणही किती असावे याविषयीचे दंडक घालण्यात आले आहेत. तसेच तयार खाद्यपदार्थांचे वेष्टनावर आतील खाद्यापदार्थांचे प्रमाण, वजन वगैरे लिहिलेले असलेच पाहिजे असा नियम आहे. खाद्यपदार्थ तयार करण्याच्या बहुतेक कारखान्यांत ते मानवी स्पर्शाने हाताळले न जाता स्वयंचलित यंत्रणेने फार मोठ्या प्रमाणावर तयार होतात. अशाच एका कारखान्यात तासाला ३६,००० या हिशोबाने फ्रँकफुर्टर नावाचा सॉसेज हा खाद्यपदार्थ तयार होतो. मांस व मांसाचे पदार्थ गिऱ्हाईकापर्यंत सुस्थितीत तसेच आकर्षक पद्धतीने पोहोचविण्यासाठी मेणकागद, तेलकागद, सेलोफेन, पॉलिएस्टर, पॉलिमाइड, पॉलिस्टायरीन, ॲल्युमिनियम वर्ख, पुठ्ठ्याच्या पेट्या, जस्ताचे डबे, काचेच्या बरण्या इ. आवेष्टन पदार्थ उपयोगात आणले जातात.
मांसाचे खाद्यपदार्थ : मांसाचे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ निरनिराळ्या पद्धतींनी बनविण्यात येतात. निखाऱ्यावर भाजणे (ब्रॉयलिंग, ग्रिलिंग), बंद पात्रात १५०° ते १७७° से. उष्णता देणे (बेकिंग), भट्टीत वा निखाऱ्यावर मांसाला स्निग्ध पदार्थ लावून भाजणे (रोस्टींग), धातुपात्र गरम करून त्याच्या उष्णतेने भाजणे (टोस्टिंग), पाण्याच्या माध्यमामध्ये १००° से. तापमानात शिजविणे (कुकिंग), वाफेवर तेलाच्या माध्यामामध्ये शिजवणे (ब्रेझिंग), ८५° से. १००° से. तापमानात बेताने उष्णता देऊन शिजविणे (सिमरिंग), थोडेसे पाणी वा इतर पदार्थाचे द्रवमिश्रण करून कढ येईपर्यंत शिजविणे (स्ट्यूइंग), थोडे तेल टाकून पदार्थ उलटसुलट परतणे (शॅलोफ्राइंग), तेलात संपूर्ण बुडवून तळणे (डीप फ्राइंग) इ. शिजविण्याच्या पद्धतींचा वापर करून मांसाचे अनेक खाद्यपदार्थ बनविले जातात. [⟶ पाकशास्त्र].
जनावरांची आतडी स्वच्छ करून त्यांचा आवरणासारखा उपयोग करून म्हणजे आतड्यांच्या पोकळीत पेस्ट केलेले (खळीसारख्या अर्धघन अवस्थेतील) मांस भरून तयार करण्यात येणाऱ्या पदार्थाला सॉसेज म्हणतात. हा खाद्यपदार्थ इतिहासपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. सलामी सॉसेज हे नाव सायप्रसमधील सॅलमिस या शहराच्या नावापासून आलेले असावे व हा खाद्यपदार्थ ख्रिस्तपूर्व काळीही तेथे बनविला जात असे. हा तयार करण्यासाठी रगड्यासारख्या यंत्रात वाटून मांसाची पेस्ट बनवितात. पेस्ट बनविताना त्यामध्ये मीठमसाला, दुधाची भुकटी इ. पदार्थ घातले जातात. कच्चे किंवा शिजविलेले मांस वापरतात. कमीजास्ती व्यासाच्या आतड्यामध्ये हवेचा दाब वापरून मांसाची पेस्ट ठासून भरली जाते. अलीकडे आतड्याऐवजी सेल्युलोज, कोलॅजेन किंवा प्लॅस्टिकचा वापर करून सॉसेज बनविण्यासाठी एकाच व्यासाच्या लांबच लांब नळ्या बनविण्यात येतात. मांस भरले जात असताना. अंतराअंतरावर नळ्यांना पीळ दिला जातो व त्यामुळे हव्या त्या लांबीचे सॉसेज बनविता येतात. अशा रीतीने सॉसेजच्या साखळ्याच स्वयंचलित यांत्रिक पद्धतीने बनविण्यात येतात. कच्चे मांस वापरल्यास या साखळ्या वाफेच्या साहाय्याने शिजविण्यात येतात.
फ्रँकफुर्ट (जर्मनीतील फ्रँकफुर्ट या गावी प्रथम बनविलेले), बोलोन्या (इटलीमधील गावाच्या नावावरून) अशी अनेक नावे सॉसेजना दिलेली आहेत. अमेरिकेतील ३,००० कारखान्यांत २०० प्रकारांची सॉसेज बनविली जातात. अमेरिकेतील हॉट डॉग हा लोकप्रिय पदार्थ म्हणजे दोन पावाच्या तुकड्यांमध्ये किंवा अर्धवट चिरलेल्या बनपावामध्ये घातलेले सॉसेज होय.
अगदी बारीक तुकडे (खिमा) केलेल्या मांसामध्ये मीठमसाला घालून ते शिजवल्यानंतर थापून त्याच्या पॅटी (वांग्याच्या जाड कापाच्या आकाराच्या चकत्या) करून दोन पावाच्या तुकड्यांच्या अगर अर्धवट चिरलेल्या बनपावामध्ये टोमॅटोच्या व कांद्यांच्या एक एक कापाबरोबर घालून तयार केलेल्या पदार्थ म्हणजे हॅम्बर्गर होय. सामान्यपणे गायीगुरांच्या किंवा कोंबडीच्या मांसाचा मध्यम प्रतीचा तुकडा निखाऱ्यावर भाजला जात असताना टोमॅटो सॉस, मसाला, शिर्का व द्रव धूर यांचे मिश्रण वारंवार लावून त्यात जिरवून तयार होणाऱ्या पदार्थाला बार्बेक्यु म्हणतात. बीफ स्टेक म्हणजे गायीगुरांच्या मांसाचा स्निग्ध पदार्थ लावून निखाऱ्यावर भाजलेला मांसाचा तुकडा होय. निरनिराळ्या भाज्यांच्या तुकड्यांबरोबर मांसाचे तुकडे मीठमसाला घालून सिमरिंग पद्धतीने मंद विस्तवावर पाण्यात शिजवून तयार केलेल्या पदार्थाला स्ट्यू म्हणतात. यास मांस थोडे जून असले, तरी चालते. त्यातील मांसाच्या प्रकारावरून बीफ स्ट्यू, मटन स्टियू असे म्हणतात.
भारतामध्ये सर्वसाधारणपणे ताजे मांस बाजारातून आणून त्याचे पदार्थ घरी बनवून खाण्याची प्रथा आहे. तथापि काही मांसप्रकारांपासून ते संस्कारित करून काही पदार्थ बनविण्यात येतात. १९६५ मध्ये हॅम, बेकन, पोर्क या खारविलेल्या मांस पदार्थांपासून ३,००० टन मांसाचे खाद्यपदार्थ तयार करण्यात आले. सॉसेज हा खाद्यपदार्थ तसेच खिमा, कोफ्ता, पुलाव असे काही खास भारतीय पदार्थही भारतामध्ये तयार होतात. दिल्ली येथील द एसेक्स फार्म्स प्रा. लि. आणि मुंबई (महाराष्ट्र), अलवर (राजस्तान), विजयवाडा (आंध्र) येथील बेकन फॅक्टरींमध्ये प्रामुख्याने डुकराच्या मांसापासून हे खाद्यपदार्थ तयार केले जातात.
व्यापार : जगातील मांसोत्पादनापैकी ३५% मांस व मांसपदार्थ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत उत्पादित केले जातात व तितकेच त्या देशात खाण्यात येतात. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व डेन्मार्क हे देश मोठ्या प्रमाणावर मांस व मांसपदार्थ निर्यात करणारे आहेत तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन व जर्मनी हे मोठ्या प्रमाणावर आयात करणारे देश आहेत. बरेच देश एका प्रकारचे मांस निर्यात करतात, तर दुसऱ्या प्रकारचे आयात करतात. भारतामधून १९६४ पर्यंत गायीगुरांचे, शेळ्या-मेंढ्यांचे खारविलेले मांस व डुकरापासून मिळणारे बेकन, हॅम व सॉसेज यांची अगदी थोड्या प्रमाणात निर्यात होत असे. त्यानंतर त्यात घट होत गेली. १९६४ मध्ये दर तिमाहीस १५६ टन गायीगुरांचे व ९ टन शेळ्या-मेंढ्यांचे मांस निर्यात होत असे, तर १९६४ ते ६७ या तीन वर्षांत शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाची निर्यात अवघी ४ टन झाली. १९७० नंतर इराणच्या आखाताच्या सभोवतालच्या देशांमध्ये भारतामधून शेळ्या-मेंढ्यां व गायीगुरे यांची व काही प्रमाणात या जनावरांच्या मांसाची निर्यात होऊ लागली आहे. भारतातून एकूण मटन उत्पादनापैकी १% व गायीगुरांच्या मांस उत्पादनापैकी ५% निर्यात होते. जिवंत शेळ्या-मेंढ्यांची निर्यात १९७७–७८ मध्ये या एकूण प्राण्यांच्या संख्येच्या ०·१% होती. म्हशीच्या मांसाला भारतात फारशी मागणी नसल्याने त्यातील ७०% निर्यात करण्यात येते. १९७८–७९ मध्ये मांस व मांसपदार्थ यांची निर्यात १० कोटी रूप यांची होती आणि ती १९८०–८१ मध्ये ४० कोटी रूप यांची होईल, अशी अपेक्षा होती.
मांस उद्योगापासून कातडी, हाडे, शिंगे आणि खूर, सरस, ओंगण, सॉसेजसाठी आतड्याची आवरणे, खाद्य चरबी, लार्ड तसेच काही इंद्रिये व ग्रंथी यांपासून मिळणारे इन्शुलीन, रेनीन, पेप्सीन यांसारखे औषधोपयोगी पदार्थ मिळतात. [⟶ खाटीकखाना जैव पदार्थ].
भारतीय मानके : मांस उद्योगातील विविध बाबींविषयी भारतीय मानक संस्थेने निरनिराळी मानके ठरविलेली आहेत. त्यांपैकी काही मानके पुढीलप्रमाणे आहेत : कत्तलीपूर्वी व कत्तलीनंतर मांसदायी जनावरांच्या तपासणीसाठी वापरावयाची पद्धत (आय एस १९८२–१९७१) मांस व मांस पदार्थांची परीक्षा घेण्याच्या पद्धती (आय एस ५९६०–१९७० ते १९७४–एकूण ८ भाग) ताजे व गोठविलेले मटन आणि शेळीचे मांसप्रकार, दर्जा, उत्पादन क्रिया, गोठविणे, साठविणे, आवेष्टन व त्यावर नोंदवावयाचा तपशील (आय एस २५३६–१९६३) ताजे व गोठविलेले गायीगुरांचे व म्हशींचे मांस (आय एस २५३७–१९६५) ग्राहकाला खात्रीचा पुरवठा होण्यासाठी संस्कारित मांसपदार्थाच्या आरोग्यविषयक बाबी, उत्पादन क्रिया, हाताळणी, आवेष्टन, साठवण व वहातूक (आय एस ८१८२–१९७६) डुकराचे डबाबंद मांस (आय एस ४३५२–१९६७) डुकराचे डबाबंद सॉसेज (आय एस ३०६०–१९६५) डुकराचे ताजे सॉसेज (आय एस ३०६१–१९६५) मिठाच्या पाण्यातील डबाबंद मटन शेळीचे मांस (आय एस १७४३–१९७३) डुक्कर व गायीगुरे यांसारख्या मोठ्या जनावरांच्या मांसाची विक्री करणाऱ्या केंद्राचा आराखडा, आरोग्यविषयक व मूलभूत बाबी (आय एस ८७००–१९७७) शेळ्या-मेंढ्यांसारख्या लहान प्राण्यांच्या मांसाची विक्री केंद्रे (आय एस ७०५३–१९७३) मांस पदार्थ व मांसदायी प्राणी यांच्याबाबतीत वापरावयाची परिभाषा (आय एस ८५३९–१९७७). तपासणीसाठी नमुना घेण्याच्या आणि परीक्षण करण्याच्या पद्धतीही काही मानकांत दिलेल्या आहेत.
पहा : खाद्यपदार्थ उद्योग डबाबंदीकरण पाकशास्त्र.
संदर्भ : 1. American Meat Institute Foundation. The Science of Meat and Meat Products, San Francisco, 1960.
2. Ashbrook, F.G. Butchering, Processing and Preservarion of Meat, Princeton, 1955.
3. Gerrard, F. Meat Technology, London, 1964.
4. Herschdoerfer, S. M., Ed., Quality Control in the Food Industry, London, 1968.
5. Lawrie, R. A. Meat Science, Oxford, 1966.
6. Mackenzie, D. S. Prepared Meat Products Manufacturing, New York, 1967.
7. Price, J. F. Schweigert, B. F., Ed., The Science of Meat and Meat Products, San Francisco, 1971.
8. Pyko, M. Food Science and Technology, London, 1964.
कुलकर्णी, पुष्पा र. दीक्षित, श्री. गं.
“