मांदेल, झॉर्झ : (५ जून १८८५ – ७/८ जुलै १९४४). फ्रेंच मुत्सद्दी व नाझी जर्मनीचा कट्टर द्वेष्टा. त्याचा जन्म उत्तर फ्रान्समधील शातू (सेन-ए-वाझ विभाग) या गावी श्रीमंत ज्यू घराण्यात झाला. त्याचे मूळ नाव ल्वी झॉर्झ रातशिल्द. त्याच्या पूर्व आयुष्याविषयी तसेच शिक्षणाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही परंतु तो झॉर्झ क्लेमान्सोच्या एल् आरोर या वृत्तपत्रातून राजकीय घडामोडींवर प्रारंभी सातत्याने लेखन करीत असे. परिणामतः क्लेमान्सो व मांदेल यांतील मैत्रीचे संबंध दृढतर झाले आणि क्लेमान्सोने पंतप्रधान झाल्यानंतर त्यास आपला खाजगी सहाय्यक म्हणून नेमले (१९०६–०९). पुढे क्लेमान्सो पंतप्रधानपदावरून गेल्यानंतर त्याने ल होम लिब्रे हे दैनिक काढले. यांतूनही मांदेल खरमरीत लेख लिहित असे परंतु ह्या वृत्तपत्रावर शासनाने बंदी घातली. तेव्हा क्लेमान्सोने ल होम एन्चेन हे दुसरे वर्तमानपत्र चालू केले. त्यात तो यशस्वी ठरला. यातूनही मांदेल लिहू लागला. या वृत्तपत्रीय लेखनामुळे क्लेमान्सो पुन्हा १९१७ मध्ये पंतप्रधानपदी निवडला गेला. तेव्हा त्याने मांदेलची मंत्रिमंडळात व्यक्तिगत प्रशासनाचा संचालक म्हणून नियुक्ती केली (१९१७–२०). १९१९ मध्ये तो प्रथम संसदेवर निवडून गेला. १९२४ साली त्याचा पराभव झाला. त्यानंतर मात्र १९२८ पासून १९४० पर्यंत तो संसदेचा सभासद होता. या काळात त्याने राजकारणात सातत्याने सक्रिय भाग घेतला. त्याने मंत्रिमंडळात विविध पदे भूषविली. १९३४ ते १९३६ दरम्यान त्याने पोस्ट खात्याचा कारभार सांभाळला. १९३७ पासून तो वसाहतमंत्री होता तर १९४० मध्ये गृहमंत्री म्हणून नेमणूक झाली. सुरुवातीस राष्ट्रीयवृत्तीच्या समूहाचे नेतृत्व तो करीत होता परंतु नंतर तो स्वतंत्र विचारांच्या समूहाचा नेता झाला, तथापि त्याच्या फ्रान्सविषयीच्या देशभक्तीत तिळमात्रही फरक पडला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी मांदेल याचा नाझी जर्मनीच्या विस्तारवादी धोरणास प्रथमपासूनच विरोध होता. म्हणून फ्रान्सने शरणागती पतकरू नये, या मताचा तो खंबीर पुरस्कर्ता बनला तथापि त्याच्या सहाध्यायांनी युद्ध चालू ठेवण्याचे त्याचे विचार धुडकावून लावले. याच सुमारास त्याला इंग्लंडलाही निमंत्रित करण्यात आले परंतु त्याने फ्रान्स सोडले नाही. अखेर हिटलरने फ्रान्स पादक्रांत केले. ह्यावेळी त्याने आफ्रिकेतून युद्ध पुढे चालू ठेवण्याच्या धोरणाचा पुरस्कार केला आणि त्यासाठी काही सहकाऱ्यांसह आफ्रिकेकडे वाटचाल सुरू केली. व्हिशी सरकारने त्यास मोरोक्कोत अटक केली (१९४०) आणि काही काळाने जर्मनांच्या ताब्यात दिले (१९४२). त्याला जर्मनीमध्ये ओरांनिनबर्ग येथील छलगृहात काही दिवस डांबले. फ्रान्सचा तीन-चतुर्थांश भाग जर्मनीने व्यापला होता. उर्वरित भाग व्हिशी शासनाकडे राहू दिला. जर्मनीमधून त्याची पॅरिस येथे रवानगी करण्यात आली (४ जुलै १९४४). तेथेच फाउंटनब्ल्यू जंगलात त्याचा विश्वासघाताने व्हिशी सरकारच्या पोलीस प्रमुखांच्या आज्ञेवरून खून करण्यात आला.

मांदेल हा क्लेमान्सोच्या प्रभावाखाली फ्रान्सच्या सक्रिय राजकारणात त्याचा सहकारी म्हणून आला. वृत्तपत्रातील सडेतोड लेखनामुळे पुढे तो लोकप्रिय झाला. त्याच्या फ्रान्सविषयीच्या निष्ठा वादातीत होत्या. सुरुवातीपासूनच त्याच्या मनात जर्मन साम्राज्यवादाबद्दल तिरस्कार होता. फ्रान्सने आपली अस्मिता गमावून जर्मन लोकांच्या कच्छपी जावे, ही मानहानी त्याला कदापि सहन होणारी नव्हती. म्हणून त्याने अखेरपर्यंत जर्मनांविरुद्ध युद्ध चालू ठेवावे, असा आग्रह धरला. मांदेल हा स्वतः स्थितिवादी विचारांचाच होता. डाव्या धोरणांना त्याचा विरोध होता पण अतिउजव्या स्थितिवाद्यांच्या जर्मन धार्जिण्या धोरणांनाही त्याने विरोध केला.

संदर्भ : 1. Cobban, Alfred, A History of Modern France, Vol. III, London, 1965.

            2. Matthews, Ronald, The Death of the Fourth Republic, London, 1954.

जोशी, प्रमिला पळशीकर, सुहास