माइनोंग, आलेक्सिअस : (१७ जुलै १८५३–२७ नोव्हेंबर १९२०). प्रसिद्ध ऑस्ट्रियन तत्त्ववेत्ते विख्यात ऑस्ट्रिअन तत्त्ववेत्ते ⇨ फ्रँझ ब्रेन्टानो (१८३८–१९१७) ह्यांचे शिष्य. १८८२ ते मृत्यूपर्यंत माइनोंग ग्रात्स येथील विद्यापीठात प्राध्यापक होते. वर्णनात्मक मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या दोन विषयांत माइनोंग ह्यांनी प्रामुख्याने लिखाण केले आहे आणि त्यांचे बरेचसे तत्त्वज्ञानात्मक लिखाण वर्णनात्मक मानसशास्त्राशी संबंधित आहे. ⇨ बर्ट्रंड रसेल (१८७२–१९७०) ह्यांनी माइनोंग ह्यांच्या तत्त्वज्ञानात्मक सिद्धांतांच्या केलेल्या परीक्षणामुळे माइनोंग तत्त्वज्ञानाच्या इंग्रजी भाषिक अभ्यासकांना परिचित आहेत.

माइनोंग ह्यांनी केलेली पदार्थमीमांसा (थिअरी ऑफ ऑब्जेक्ट्स) हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा भाग आहे. आपण ज्या कशाचा उल्लेख करतो तो पदार्थ (ऑब्जेक्ट) असतो. उदा., ‘गोल चौकोन असे काही नाही’ असे आपण म्हणतो, तेव्हा “गोल चौकोन” हा पदार्थ आहे हे निष्पन्न होते. पण ह्या पदार्थाचे स्वरूप आत्मविसंगत आहे व म्हणून तो अकल्पनीय, अशक्य आहे. पण तो पदार्थ आहे. तो अकल्पनीय पदार्थ आहे. “सोन्याचा पर्वत”ह्या पदार्थाला अस्तित्व नाही. ज्या पदार्थाला अस्तित्व असते तो कुठेतरी आणि कधीतरी असतो त्याला अवकाशात आणि कालात स्थान असते. तसे सोन्याच्या पर्वताला नाही व म्हणून त्याला अस्तित्व नाही. पण गोल चौकोन ह्या पदार्थासारखा तो अशक्य नाही. तो अस्तित्वात नसला तरी तो विद्यमान (सब्‌सिस्टंट) आहे, त्याच्या ठिकाणी विद्यमानता आहे असे म्हटले पाहिजे. उलट “हिमालय पर्वत”हा पदार्थ अस्तित्वात आहे तो सत्तावान पदार्थ आहे. पण “हिमालय पर्वताचे असणे” हा पदार्थ घ्या. हिमालय ह्या पदार्थाला अवकाशात विशिष्ट स्थान आहे. पण हिमालय पर्वताचे असणे ह्या पदार्थाला अवकाशात स्थान नाही. तेव्हा हिमालय पर्वताचे असणे हा अस्तित्वात असलेला पदार्थ नाही. तो विद्यमान पदार्थ आहे.

पदार्थ अशक्य असो, विद्यमान असो किंवा सत्तावान असो त्याला त्याचे स्वरूप असते. तेव्हा स्वरूपाविषयीची विधाने व अस्तित्वविषयक विधाने ह्यांत भेद करावा लागेल. उदा., ‘गोल चौकोन गोल असतो’ हे विधान सत्य आहे. पण म्हणून गोल चौकोन असे काही आहे असे ह्या विधानात अभिप्रेत नाही. तसेच ‘मी ज्याची कल्पना करीत आहे त्या देवदूताचे सोनरी पंख आहेत’ हे स्वरूपाविषयीचे विधान आहे पण सोनेरी पंखाचा देवदूत आहे असे त्यात अभिप्रेत नाही. उलट ‘गंगा पवित्र नदी आहे’ हे अस्तित्वविषयक विधान आहे. अस्तित्वविषयक विधानाची खूण अशी, की त्याच्यापासून ज्याला तर्कशास्त्रात ‘अस्तित्ववाचक सामान्यीकरण’ म्हणतात ते निष्पन्न होते. उदा., ‘गंगा पवित्र नदी आहे’ ह्यापासून ‘एकतरी क्ष असा आहे की क्ष पवित्र नदी आहे’ हे अस्तित्ववाचक सामान्यीकरण प्राप्त होते. पण ‘गोल चौकोन गोल असतो’ ह्या विधानापासून ‘एकतरी क्ष असा आहे की क्ष गोल असतो’ असे अस्तित्ववाचक सामान्यीकरण निष्पन्न होत नाही.

बर्ट्रंड रसेल ह्यांनी आपल्या ‘वर्णनाची उपपत्ती’ च्या साहाय्याने माइनोंग ह्यांच्या वरील भूमिकेचे खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. रसेल ह्यांचा युक्तिवाद थोडक्यात असा : सत्तावान पदार्थ आणि विद्यमान पदार्थ ह्यांत माइनोंग ह्यांना का भेद करावा लागतो ? ‘गंगा पवित्र नदी आहे’ हे गंगेविषयीचे विधान आहे आणि गंगा असे काही जर नसतेच तर हे कशाविषयीचेच विधान आहे आणि गंगा असे काही जर नसतेच तर हे कशाविषयीचेच विधान नाही आणि म्हणून विधानच नाही असे निष्पन्न झाले असते. तेव्हा ह्या विधानात गंगेचे अस्तित्व अभिप्रेत आहे. ह्याच न्यायाने ‘भारताचा सध्याचा राजा क्रिकेटपटू आहे’ ह्या विधानात भारताच्या सध्याच्या राजाचे अस्तित्व अभिप्रते आहे. नाहीतर हे विधानच नाही असे होईल. पण प्रत्यक्षात भारताचा सध्याचा राजा असे काही अस्तित्वात नाही. ह्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अस्तित्वाहून भिन्न असा विद्यमानता हा सत्ताप्रकार आहे असे माइनोंग कल्पितात. मग वरील विधान “सध्याचा भारताचा राजा” ह्या अस्तित्वात नसलेल्या पण विद्यमान असलेल्या पदार्थाविषयीचे आहे असे मानता येते आणि त्याचे विधानपण सुरक्षित राहते. पण हा कल्पित भेद अनावश्यक आहे. कारण ‘भारताचा सध्याचा राजा क्रिकेटपटू आहे’ ह्या विधनाचा खरा तार्किक आकार असा आहे : ‘एकतरी क्ष असा आहे की तो क्ष भारताचा सध्याचा राजा आहे आणि कोणताही य घेतला तर य, क्ष हून भिन्न असेल तर य भारताचा सध्याचा राजा नाही आणि क्ष क्रिकेटपटू आहे.’ म्हणजे हे विधान भारताच्या सध्याच्या राजाविषयी नाहीच. ते अस्तित्ववाचक विधान आहे. एकतरी (आणि एकच) वस्तू अशी आहे, की ती सध्याचा भारताचा राजा आहे आणि ती क्रिकेटपटू आहे असे ते सांगते आणि हे म्हणणे अर्थात असत्य आहे. तेव्हा भारताच्या सध्याच्या राजाविषयीचे हे विधान असल्यामुळे त्याच्यात भारताच्या सध्याच्या राजाचे (कोणत्यातरी प्रकारचे) अस्तित्व गृहीत आहे आणि त्याला जर वास्तव अस्तित्व नसेल तर त्याच्या ठिकाणी विद्यमानता तरी असली पाहिजे, असे मानायचे कारण रहात नाही.


पण ह्या युक्तिवादामुळे माइनोंग ह्यांचे खंडन होत नाही. कारण ‘भारताचा सध्याचा राजा क्रिकेटपटू आहे’ ह्या विधानाचे अस्तित्ववाचक सामन्यीकरण करता येते असे त्यात गृहीत धरले आहे. पण ही गोष्ट माइनोंग नाकारतील. हे विधान विद्यमान पदार्थाविषयी असल्यामुळे त्याचे अस्तित्ववाचक सामन्यीकरण करता येत नाही असेच ते म्हणतील. म्हणजे रसेल माइनोंग ह्यांच्या भूमिकेचे खंडन करीत नाहीत, तर ती नाकारून एका पर्यायी भूमिकेची मांडणी करतात.

‘गृहीता’ विषयीची (ॲसम्पशन विषयीची) माइनोंग ह्यांनी प्रतिपादन केलेली उपपत्तीही महत्त्वाची आहे. समजा ‘भुते आहेत’ असा माझा निर्णय (जज्‌मेन्ट) आहे. माइनोंग ह्यांच्या मते भुते हा वस्तुप्रकार ह्या निर्णयाचा विषय नाही, तर भुतांचे असणे हा आहे. निर्णयांचा असा जो विषय किंवा आशय असतो त्याला माइनोंग ‘वस्तुवृत्त’ (ऑब्जेक्टिव्ह) म्हणतात. वस्तुवृत्त सत्य किंवा असत्य असू शकते. मी जेव्हा निर्णय करतो तेव्हा त्याचा विषय असलेल्या वस्तुवृत्ताचा सत्य म्हणून मी स्वीकार केलेला असतो. आता समजा मी भुताची कल्पना केली. ह्या कल्पनेचा विषय भूत ही वस्तू आहे भुताचे असणे हे वस्तुवृत्त नव्हे. आणि भुताची कल्पना करण्यात त्या कल्पनेचा वास्तव म्हणून स्वीकारही केलेला नसतो किंवा अवास्तव म्हणून निषेधही केलेला नसतो. ह्या दोन्ही बाबतीत कल्पना आणि निर्णय ह्यांच्यात भेद आहे. आता माइनोंग ह्यांच्या मते गृहीत करणे ही कृती कल्पना आणि निर्णय ह्यांच्यामध्ये येते. ‘(समजा) उद्या बस अर्धा तास उशीरा सुटली’ असे समजा मी गृहीत केले. हे गृहीत मी सत्य म्हणून स्वीकारीतही नाही किंवा असत्य म्हणून नाकारीतही नाही. ह्या दृष्टीने ते कल्पनेसारखे असते. पण त्याचा विषय वस्तू नसून ‘उद्या बसचे अर्धा तास उशीरा सुटणे’ ह्यासारखे सत्य किंवा असत्य ठरू शकणारे वस्तुवृत्त असते. ह्या बाबतीत गृहीत निर्णयासारखे असते. अनुमान करणे, एखादे कृत्य करावे की करू नये असा खल करणे, खेळ, क्रीडा, कला ह्यांसारखे व्यवहार हे गृहीत करण्याच्या कृतीवर आधारलेले असतात.

माइनोंग ह्यांच्या मूल्यविचारात मूल्यभावना (व्हॅल्यू-फीलिंग) ह्या संकल्पनेला मूलभूत स्थान आहे. एखादी गोष्ट मूल्यवान आहे ह्याचा अर्थ तिची आपल्याला इच्छा असते किंवा ती आपल्या दृष्टीने हितकर असते असा नसतो तर तिच्याविषयी आपल्याला एक विशिष्ट भावना मूल्य-भावना-वाटते असा असतो. वस्तू हा मूल्यभावनेचा विषय नसतो तर वस्तुवृत्त हा असतो वस्तूचे असणे किंवा नसणे हा असतो. मूल्यभावना ही आनंद किंवा सुख ह्या स्वरूपाची तरी असते किंवा दुःख ह्या स्वरूपाची तरी असते. ज्ञानाचे असणे हा आनंदभावनेचा विषय असेल तर ज्ञान हे मूल्यवान आहे असे निष्पन्न होते. चांगले कृत्य म्हणजे जे केले जाणे आनंदभावनेचा विषय असतो असे कृत्य. एखादे कृत्य केले जाणे हा आनंदभावनेचा विषय असला पण न केले जाणे हा दु:खभावनेचा विषय नसला-उदा., एखाद्याने आपल्या सर्व संपत्तीचे दान करणे-तर ते विशेष गुणवत्तेचे कृत्य असते. ह्या रीतीला अनुसरून आपल्या मूल्यविषयक संकल्पनांची व्यवस्था लावण्याचा माइनोंग ह्यांनी प्रयत्न केला आहे.

पुरावा, पुराव्याचे प्रकार आणि पुराव्यावर आधारलेल्या निष्कर्षांचे तार्किक प्रकार ह्यांविषयीही माइनोंग ह्यांनी मूलभूत विवेचन केले आहे. माइनोंग यांचे सर्व लेखन जर्मनमध्ये असून त्यातील काहीचेच इंग्रजीत भाषांतर झाले आहे.

संदर्भ : Findlay, J. N. Meinong’s Theory of Objects and Values, (2nd ed.), Oxford, 1963.

रेगे, मे. पुं.