मॅलिनोस्की, ब्रॉनीस्लॉ कास्पेर : (७ एप्रिल १८८४–१६ मे १९४२). प्रसिद्ध पोलिश मानवशास्त्रज्ञ आणि सामाजिक मानवशास्त्राचा प्रवर्तक. पोलंडमधील क्रेको या गावी जन्म परंतु शिक्षण व व्यवसाय यांसाठी १९१० नंतर इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांनी वास्तव्य केले.
मानवशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धी पावलेल्या मॅलिनोस्कींचे सुरुवातीचे अभ्यासक्षेत्र पदार्थविज्ञान हे होते. त्यांनी १९०८ मध्ये क्रेको येथील जॅगिलॉनियन विद्यापीठातून पीएच्.डी. पदवी मिळविली तथापि तत्कालीन प्रख्यात मानवशास्त्रज्ञ जेम्स फ्रेझर यांच्या गोल्डन बाऊ या ग्रंथामुळे मॅलिनोस्की मानवशास्त्राकडे आकृष्ट झाले. १९१० मध्ये ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षणसंस्थेमध्ये अध्ययनासाठी गेले. त्यांनी १९१४–२० दरम्यान विविध भूप्रदेशांतील आदिम जमातींचा क्षेत्र-अभ्यास केला. त्यांची १९२० मध्ये लंडन विद्यापीठात मानवशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तत्पूर्वी त्यांनी एल्सी मॅसन या ऑस्ट्रेलियन युवतीबरोबर विवाह केला (१९१९). त्यांना तीन मुली झाल्या. १९३८ मध्ये मॅलिनोस्की अमेरिकेस गेले व आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते तेथील निरनिराळ्या संस्थांमध्ये संशोधन अध्यापनाचे कार्य करीत राहिले.
मॅलिनोस्कींची प्रथम पत्नी एल्सी मॅसन १९३५ मध्ये मृत्यू पावल्यानंतर त्यांनी १९४० मध्ये व्हेलेट्टा स्वॉन या चित्रकर्तीबरोबर दुसरा विवाह केला. मॅलिनोस्की यांना पोलिश, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन इ. अनेक भाषा येत होत्या. त्यांनी ज्या आदिवासी जमातींचा अभ्यास केला, त्यांच्या भाषा त्यांनी प्रथम आत्मसात करून घेतल्या होत्या.
मॅलिनोस्की यांनी प्रत्यक्ष क्षेत्र-अभ्यासपद्धतीचा अवलंब करून न्यू गिनी, ऑस्ट्रेलिया, तूलॉन, वुडलार्क, ट्रोब्रिअँड, इ. बेटांवरील आदिवासींच्या कुटुंबसंस्था, नातेसंबंध, धर्म, यातुविद्या, अर्थव्यवस्था इत्यादींचा अभ्यास करून त्यांवर अनेक ग्रंथ व शोधनिबंध प्रसिद्ध केले. अखेरच्या दिवसांत मेक्सिको-इंडियन समाजातील सामाजिक बदलांचा अभ्यास ते करीत होते. त्यावेळी हृदयविकाराने त्यांचे न्यू हेवन येथे निधन झाले.
मॅलिनोस्की मानवशास्त्रातील कार्यान्वयी विवेचनाचे मुख्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. सांस्कृतिक गोष्टींची निर्मिती मानवाच्या काही मूलभूत शारीरिक-मानसिक गरजांच्या पूर्ततेच्या संदर्भात झालेली असते आणि सामाजिक संस्थांचे स्वरूप त्यांच्या सामाजिक कार्याच्या स्वरूपातच समजावून घेणे इष्ट होय, असे महत्त्वाचे विचार त्यांनी पुढे मांडले. त्याचप्रमाणे मानवाच्या जडणघडणीवर होणाऱ्या परिणामांचे दिग्दर्शन त्यांनी केले.
आपल्या कुटुंबविषयक संशोधनाद्वारे कुटुंबान्तर्गत भोग निषेधाच्या नियमांचे कुटुंबाच्या स्थैर्याच्या संदर्भात असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. संशोधनाच्या आधारे त्यांनी सिग्मंड फ्रॉइड यांच्या मातृ-लैंगिक-आसक्ती भावनेच्या सार्वत्रिकतेच्या कल्पनेला आव्हान दिले.
यातुविद्या, विज्ञान व धर्म यांच्या संदर्भात त्यांनी विस्तृत संशोधन केले होते. काही संकटांशी अथवा अडीअडचणींशी मुकाबला करताना मानवाला आपल्या सामर्थ्याच्या कमतरतेची व उणिवांची जाणीव होते आणि त्यामुळे तो यातुविद्येकडे वळतो असे मत त्यांनी मांडले. विज्ञानाची निर्मिती यातुविद्येतून झाली हे फ्रेझर यांते मत त्यांनी खोडून काढले. यातुविद्या व धर्म यांतील फरक स्पष्ट करताना यातुविद्येचे साध्यहेतू व्यावहारिक स्वरूपाचे असतात तर धार्मिक विधी व्यक्तीच्या जीवनातील कठीण प्रसंगाच्या संदर्भात केले जातात असे त्यांनी प्रतिपादिले.
ट्रोब्रिअँड बेटावरील जमातीच्या आर्थिक जीवनाच्या संदर्भात त्यांच्या ‘कुला’ (Kula) या वस्तुविनिमय पद्धतीचे मॅलिनोस्की यांनी केलेले विवरण महत्त्वपूर्ण मानले जाते.
मानवशास्त्राच्या ज्ञानाचा उपयोग पाश्चिमात्य राष्ट्रांना आपल्या अंकित असलेल्या आफ्रिकन प्रदेशांवर राज्य करण्यासाठी कसा करता येईल हेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्कृतीविषयक मूलगामी विचार, कार्यान्वयी विवेचन पद्धतीचा पुरस्कार, आदिवासींच्या लैंगिक जीवनाचे विवरण हे मॅलिनोस्की यांचे मानववशास्त्राला मिळालेले महत्त्वपूर्ण योगदान होय.
मॅलिनोस्की यांचे प्रमुख ग्रंथ : द फॅमिली अमंग द ऑस्ट्रेलियन ॲबॉरिजीनीझ (१९१३), मॅजिक सायन्स अँड रिलिजन अँड अदर एसेज (१९१६), ऑर्गनॉट्स ऑफ द वेस्टर्न पॅसिफिक (१९२२), सेक्स अँड रिप्रेशन इन सॅव्हिज सोसायटी (१९२७), कोरल गार्डन्स अँड देअर मॅजिक, २ खंड (१९३५).
संदर्भ : 1. Firth, Raymond, Ed. Man and Culture : An Evaluation of the Work of Bronislaw Malinowski, New York, 1957.
2. Haris, Marvin, The Rise of Anthropological Theories, London, 1968.
भोईटे, उत्तम
“